वडिलांबद्दल मला काय वाटते?

माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण तो वाटतो खरा! ते चेहऱ्यावरुन उग्र व गंभीर दिसत असले तरी ते अत्यंत मायाळू आहेत, याचा आम्हांला नेहमीच अनुभव येतो. एखादा जिन्नस मागितला की तो आम्हांला केव्हाही मिळतो. पण आम्हांलाच तो मागावा कसा अशी उगाच मनातल्या मनात भीती वाटते. आमची आई नेहमी आजारी असायची. माझ्या आत्या व आमचे इतर संबंधी व नातलग यांच्याकडून मला कळले की, डाॅक्टर साहेब रायगडवर राहत असताना एकदा लोकांनी त्यांच्यावर अचानकपणे भाले, बर्च्या घेऊन जीव घेण्याच्या हेतूने हल्ला केला. डाॅक्टर त्यातून बचावले पण आईने त्याची विलक्षण दहशत घेतली. महाडास चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची चळवळ भयंकर जोरात आली होती. श्री.ए.व्ही.चित्रे यांचा माझ्या वडिलांशी फार जिवाभावाचा संबंध आहे. महाडच्या या सत्याग्रहाच्या मोहिमेत त्यांनी पुढाकार घेतला होता. ऐन बाराच्या सुमारास त्यांच्या व्याख्यानाचा परिणाम लोकांच्या मनावर एवढा विलक्षण झाला की, प्राण गेले तरी बेहत्तर पण चवदार तळ्यात उतरून पाणी पिणार अशी त्यांनी शपथ वाहिली. ते म्हणाले, “तुम्हांला उन्हामुळे तहान लागली आहे ना? चला माझ्याबरोबर, आपण सारेजण त्या तळ्यातले पाणी पिऊ या!” त्यानंतर जो हलकल्लोळ उडाला त्याचा परिणाम माझ्या आईच्या मनावर फार झाला. ती अगोदरच अशक्त होती. आणि तशातून हिंदू लोक चिडून डाॅक्टरसाहेबांचा प्राण घेणार अशी तिच्या मनाने धास्ती घेतली. त्यामुळे पुढे तिला ताप येऊ लागला व तिने अंथरूण धरले ते अगदी कायमचेच! पुढे सतत आठ वर्षे ती क्षयाने आजारी होती. २७ मे १९३५ रोजी ती आम्हांला सोडून गेली. लग्नात आई नऊ वर्षांची होती व आमचे साहेब सोळा वर्षांचे होते.

आईचा स्वभाव फार कडक आणि करारी होता. तिला आम्ही वावगे वर्तन केलेले मुळीच खपत नसे. त्याचा तिला मनस्वी संताप येई. या तिच्या करडेपणामुळे तिला स्वतःला सुद्धा फार त्रास होत असे. आईला आम्ही एकंदर पाच मुले झालो. पैकी मीच थोरला. माझ्या पाठीवर दोन भावंडे होती. तिसरी बहिण व तिच्या पाठीवर आणखी एक धाकटा भाऊ होता. पण मला वाटते ही सारी माझी भावंडे एक दोन वर्षांची असतानाच वारली. माझी आई अत्यंत धर्मभोळी होती. ती नेहमी उपासतापास करायची. ती नेहमी पौर्णिमेचा उपवास करीत असे. आमचे घराणे कबीरपंथी असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला ओवाळण्याची आमच्या घरी चाल आहे. त्या प्रथेला अनुसरून ती पौर्णिमेच्या दिवशी कडक उपवास करीत असे. डाॅक्टरसाहेब नेहमी विलायतेस जायचे. त्यांच्यासाठी आई किती तरी उपवास नवस करायची. आईला मुलांचे अतोनात प्रेम असे. ती स्वतः नेहमी मुलांची काळजी घ्यायची. पण पावसाळा आला की तिची व्यथा उचल घेत असे व मग ती अंथरूणाला खिळून राहायची. ती खूप प्रेमळ असली तरी ती बरीच अबोल असावी असे मला आठवते. डाॅक्टरसाहेब एवढे विद्वान आहेत, त्यांच्या उच्च पदवीमुळे त्यांना फार मोठा मान मिळतो याचा आम्हा साऱ्यांनाच अभिमान वाटतो. पण लहानपणापासून त्यांचा आमच्या मनावर जो धाक बसला आहे तो कायमचा! त्यांच्यासमोर उभे राहण्याचे धैर्यही आम्हांला होत नाही. तथापि आम्हांला काय पाहिजे असते ह्याची दुसऱ्याजवळ चौकशी करून डाॅक्टर आम्हांला त्या गोष्टी पुरवीत असत. डाॅक्टरांना एकच शोक आहे आणि तो म्हणजे कपड्यांचा. “मुंबईतील बॅरिस्टरांमध्ये अत्यंत उत्तम पोशाख केलेला मी एकटा आहे.” असे ते नेहमी म्हणतात. मी सुध्दा त्यांच्याप्रमाणे चांगला पोशाख करावा असा त्यांचा कटाक्ष असतो. साहेबांची राहणी पहिल्यापासून अत्यंत साधी व स्वच्छ पण जरा अनियमितच! पण दिल्लीला गेल्यापासून मात्र त्यांच्या राहणीत विलक्षण सुसूत्रपणा आला. न्याहारी, दुपारचे जेवण, चहा, रात्रीचे जेवण वगैरे अगदी वेळच्या वेळी होऊ लागले. तीच त्यांची सवय अजून कायम आहे. सकाळी अंघोळ केल्यावर नऊ वाजता ते न्याहारी करतात व कपडे करुन बरोबर दहा वाजता हायकोर्टात जातात. त्यांना मोटारीचाही फार शोक आहे. संध्याकाळी कामावरून परत आले की काही ना काही नवी पुस्तके ते आपल्याबरोबर घेऊन आलेले आढळतात. दिल्लीला असताना ते माझ्याशी अत्यंत प्रेमळपणाने वागत असत.

मला यंत्रकामाची लहानपणापासून भारी आवड. म्हणून पुस्तके वाचणे वगैरे गोष्टीकडे माझे फारसे लक्ष नाही. माझे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले आहे. आरंभी एल्फिन्स्टन हायस्कूलात व पुढे प्रो.दोंदे यांचे हायस्कूलात मी होतो. शाळेतील शिक्षणापेक्षा आपण एखादा छापखाना काढावा असे लहानपणापासून मला वाटे. पुढे साहेबांना ही गोष्ट पटली व त्यांनी मला छापखाना काढून देऊन माझी ही हौस पुरवली. पण साहेबांशी विरोध असलेल्या लोकांनी तो माझा छापखाना गेल्यावर्षी जाळून टाकला. आता आमच्या नवीन छापखान्याची भव्य इमारत पुरी होत आलेली आहे. म्हणून मला आता फार हुरूप वाटू लागला आहे. साहेबांची सारी पुस्तके आणि त्यांची सारी वगैरे माझ्या वर्तमानपत्रे भारतभूषण छापखान्यात छापली जावीत अशी माझी महत्वाकांक्षा आहे. या माझ्या छापखान्यात साहेब स्वतः फार लक्ष घालतात. सकाळ संध्याकाळ माझा बहुतेक सारा वेळ या छापखान्यातच जातो. छापखान्याचे सारे शिक्षण मी स्वतःच काम करून शिकून घेतले आहे. डाॅक्टर साहेबांना कुत्र्यांची भारी आवड आहे. हल्ली त्यांच्यापाशी एक छानसा कुत्रा आहे. त्याचे नाव पीटर. हा पीटर रात्री त्यांच्या अंथरूणापाशीच झोपतो. दोन वाजता एकदा व सकाळी सहा वाजता एकदा तो त्यांना हुंगून पुन्हा जागच्या जागी निजून राहतो.

त्याचप्रमाणे फाऊन्टनपेनचे त्यांना भारी वेड आहे. नवे चांगलेसे पेन दिसले की घातलेच ते त्यांनी आपल्या कोटाच्या खिशात! पण कधी कधी विसरभोळेपणाने आपली घड्याळे व पेने ते बाहेर कुठेतरी हरवून येतात. साहेबांना बाजरीची भाकरी आणि कांदा मिळाला तर त्यांना इतर पक्वान्नांची मुळीच पर्वा वाटत नाही. त्यांना मुसंब्याचा रस आवडतो व ते तो रोज नियमाने घेतात. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते दूध घेतात. त्यांना भाज्या फारच आवडतात. पण जेवणाखाण्याकडे त्यांचे फारसे लक्ष असते असे मला वाटत नाही. घरी असले म्हणजे त्यांचे जेवण ग्रंथालयातल्या एका कोपऱ्या एक छोटेसे टेबल आहे, त्या टेबलावर वाढले जाते. ते जेवताना एखादा जिन्नस आवडला किंवा नाही आवडला, किंवा अधिक हवा आहे वगैरे काहीच बोलत नाहीत. पानावर वाढले ते जेवायचे असा त्यांचा नेहमीचा परिपाठ आहे.

ते कधीकधी रात्रभर वाचत लिहीत बसलेले असतात. ते कामात असले म्हणजे माडीवर कोणाला सोडायचे नाही असा त्यांचा कडक नियम आहे. पण कोणीतरी भेटायला येतोच. पण त्यांना गंभीरपणे बसलेले पाहून पाहुणाच मुकाट्याने काही वेळाने परत जातो. त्यांचा स्वभाव अत्यंत भिडस्त असल्याने आलेल्या माणसाला ते सहसा जा म्हणून सांगत नाहीत. पण असल्या माणसाचा त्यांना भारी राग येतो यात शंका नाही.

माझ्या हातून सुध्दा काहीना काही चांगली कामगिरी व्हावी असे मला नेहमी वाटत असते. कारण माझे वडील इतके विद्वान आणि जगप्रख्यात आणि मी- मी हा असा! तरीपण मी काहीतरी करून दाखवीन!

~~~

यशवंत भीमराव आंबेडकर

(नवयुग आंबेडकर विशेषांक १९४७)


साभार: नागसेन फेस्टिवल
https://www.facebook.com/Nagsenfestival

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*