भीमा कोरेगाव चित्रपटाचे स्वागत पूर्वग्रह दूर ठेवून करूया.

सुशिम कांबळे

ही लढाई कुण्या एका जाती विरोधात नव्हती, समूहा विरोधात नव्हती, जमिनीच्या तुकड्या साठी नव्हती, राजसत्तेसाठी तर मुळीच नव्हती!मग कशा साठी होती? का घडला हा रणसंग्राम! का याच मातीतील लोकं याच मातीतील लोकांविरुद्ध पेटून उठले आणि परक्या असलेल्या इंग्रजांसोबत लढले?

याची उत्तरे इतिहासातली त्या पानांत आहेत जी जातीयतेच्या गलिच्छ इतिहासाने भरलेली आहेत! त्याची उत्तरे त्या चिरडल्या गेलेल्या स्वाभिमानात आहेत ज्या ठिणग्या बनून पेशव्यांवर बरसल्या!बाबासाहेब म्हणतात एक वेळ पोटाला भाकर नसेल तर ठीक परंतु स्वाभिमान गहाण टाकू नका! तोच बाणा त्या वेळच्या वीरांनी पत्करला होता असे म्हणावे लागेल!

स्वाभिमानाचे जीवन मिळणार असेल तर पेशव्यांकडून लढू असा खुलेपणाने प्रस्ताव मांडल्यावर सुद्धा तुम्ही पायरीनेच राहा हा सल्ला त्यावेळच्या जात्यंध व्यवस्थेकडून देऊन तो प्रस्ताव लाथाडल्या गेला, त्याच स्वाभिमानाच्या ठेचेतून इतिहास घडला!

त्यांनी जातीयवादी सरंजामी मोडीत काढली! आणि पेशवाई संपली!

पण दुर्दैव म्हणजे या देशात जातीवाद आजही शिल्लक आहे!हा लढा महार विरुद्ध मराठा कधीच नव्हता, ना कधी महार विरुद्ध ब्राह्मण! हा लढा केवळ जातीवाद विरुद्ध स्वाभिमान असा होता आणि तो तसाच पाहिल्या जावा.महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचारांच्या तरुणांना माझे आवाहन आहे की कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय हा चित्रपट पहावा आणि आपल्या राज्यात घडलेला इतिहास जाणून घ्यावा. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला जातीय रंग देऊ पाहणाऱ्यांना बळी न पडता प्रत्येक महाराष्ट्रीयाने हा चित्रपट पहावा!

सुशिम कांबळे

लेखक fAM सदस्य असून मंत्रालय येथे कार्यरत आहेत. तसेच ते Baudhkaro टीम चे सदस्य आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*