काव्यांश.. मार्शल रेस मधून

सगळे राग, द्वेश, अहंकार गळून जावेत पुन्हा एकदा
रक्तासाठी रक्ताचे नाते जुळून यावेत पुन्हा एकदा
आधी आपण स्वतःलाच असे समजून घ्यावे
काळीज दुखविणा-या शब्दांना फासावर द्यावे….

सर्वासाठी एक आणि एकासाठी सर्व
हे सुत्र काळजावर गोंदून घ्यावे….
कुणीच कुणासाठी अंतःकरणात घृणा पाळू नये….
कुणीच कुणाच्या समोर द्वेशाचा अंगार जाळू नये…..

आलाच कोणी ओथंबून गळ्याशी तर
द्यावी करुणेची कोरभर भाकर
भरलाच तर भरु द्यावा मायेने डोळा
आभाळ नसलेल्या मनांना उभारुन द्यावा मायेचा पदर
माणसाने माणसाच्या जगण्याचा करावा आदर

कुणीच मोडू नये कुणाच्या कुंपणाच्या काड्या
कुणीच कुणाची गाय अथवा मारु नये वासरु
प्रत्येकच कंठातून असा मानव्याचा सूर यावा
माणसांच्या वस्तीत मायेचा महापूर यावा…

~~~

युगकवी मार्शल केतन पिंपळापुरे

संदर्भ: मार्शल रेस

फोटो सौजन्य: केतन पिंपळापुरे यांच्या फेसबुक वॉल वरून

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*