भिडेवाडा: क्रांतीचं अभूतपूर्व स्मारक

साक्य नितीन

१ जानेवारी १८४८ रोजी जोतिबांनी सावित्रीमाई आणि फातिमामाईला सोबत घेउन तात्याराव भिडेंच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सूरु केली. ही एक अभुतपूर्व क्रांतिकारी घटना होती. या घटनेने भारतात एका नव्या क्रांतीची सुरवात केली. या क्रांतीच अपत्य असणाऱ्या मुक्ताईने पुढे “आमचा धर्म कोणता?” असा परखड सवाल धर्मव्यवस्थेला केला.

जेव्हा धर्ममार्तंड सावित्रीमाईवर शेणगोळ्याने हल्ले करू लागले तेव्हा सावित्रीमाई घरातून बाहेर पडताना पिशवीत एक जास्तीच लुगडं घेत आणि शाळेत जाऊन घाणीने भरलेलं लुगडं बदलून टाकत. पुढे सावित्रीमाईला-जोतिबाना लहुजी साळवे आणि खंडूजी महार या पैलवानांनी सरंक्षण पुरवलं. मुक्ताई ही लहुजींची नात. ही क्रांती घडवणारी सावित्रीमाय तेव्हा फक्त १८ वर्षांची होती आणि जोतिबा फक्त २१ वर्षांचे.. त्या पोरसवदा जोतिबा-सवित्रीमाईने स्त्रिया-शूद्रातीशूद्रांच्या अवनतीची नेमकी चिकित्सा करून त्यावर उपाय योजना सुरू केली. जगाशी युद्ध करायला निघालेल्या आपल्या २१ वर्षाच्या पतीसोबत १७-१८ वर्षांची सावित्रीमाय खांदयाला खांदा लावून युद्धभूमीत पाय रोवून उभी राहिली. ही जोडी आणि त्यांनी केलेले कार्य अद्भुत होते.

विचार करा.. १७-१८ वर्षांची सावित्रीमाय आणि नुकतेच मीसुरड फुटलेले जोतिबा काय मनात कोणत्या विचारांचं वादळ आणि भारावलेपण घेऊन जगत असतील. एकीकडे हा संघर्ष सुरू असताना त्यांनी एकमेकांवर मनसोक्त प्रेम सुद्धा केलं. . एकमेकांवर प्रचंड प्रेम आणि विश्वास असल्यामुळेच ते ही लढाई लढू शकले. ज्यांच्या विरोधात लढले त्यांचा द्वेष केला नाही.

जोतिबा आणि सवित्रीमायचा उपकारातून कधीही उतराई होऊ शकत नाही.आज महाराष्ट्रातील तरुणांनी जोतिबाना आपला वाडा मुलींची शाळा सुरू करण्यासाठी ज्यांनी समाजाचा विरोध पत्करून दिला त्या तात्याराव भिडेंच्या आदर्श समोर असताना मनोहर भिडे नामक एका भंपक माणसा मागे आजचा तरुण बहकावत चालला आहे. ज्या भिडेवाड्यात जोतीबा-सावित्रीमाईने क्रांती घडवली त्या भिडेवाड्याची आज झालेली दुरावस्था डोळ्यांनी पाहवत नाही. भिडे वाड्याची ही दुरावस्था मनाला प्रचंड वेदना देणारी आहे.

भिडेवाडा हा १ जानेवारी १८४८च्या अभूतपूर्व क्रांतीच स्मारक म्हणून जतन केला गेला पाहिजे. येणाऱ्या पिढ्याना जोती-सावित्रीच क्रांतिकार्य समजलं पाहिजे.

~~~
साक्य नितीन हे आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत आणि व्यवसायाने Freelance IT integrator आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*