भारत नावाचे अवकाश पुन्हा हिंदुस्थान नावाच्या खाईत हरवू नये..

सुरेखा पैठणे

“We the people of India” ह्या पहिल्याच वाक्यात तुकड्या तुकड्यात खंडित झालेल्या आणि गुलामगिरीच्या ओझ्याने वाकलेल्या ह्या हिंदुस्थानमधील प्रत्येक नागरिकाला “भारत” नावाचे स्वतंत्र अवकाश बहाल केले, २६ जानेवारी ला लोकांनी लोकांकरिता चालविलेले लोकतंत्र म्हणत प्रजासत्ताक भारत अस्तित्वात आला आणि मानविय मूलभूत हक्क संवैधानिक चौकटीत सुरक्षित झाले. शेकडो वर्षांची गणराज्य परंपरा असलेल्या भारतवर्षात लोकशाही ही आदीभूत आहे, केवळ ब्रिटिश राजवट झुगारून आपण लोकशाही निर्मिली असे नाही. या सिंधू संस्कृतीत कधीच हुकमशाही रुजली नाही.

पूर्वी, गणराज्य संकल्पनेत छोटी छोटी सुटी सुटी राज्ये ही सामायिक निवडणूक करून एक प्रतिनिधी निवडून त्याला त्या त्या कालावधी पुरता राजा घोषित करायचे. भगवान गौतम बुद्धांचा जन्म देखील एका गणराज्यातच झाला. त्यांनीही वेळोवेळी गणराज्ये म्हणजेच लोकांच्या संमतिने, लोकांना समान अधिकार देऊन चालविलेले राज्य. हीच लोकशाहीची बीजे ह्या गणराज्य भारतात शेकडो वर्षापासून रुजलेली आहेत. लिच्छवी राज्याचे लोक भगवान बुद्धांकडे मगध आक्रमण पासून शरण मागण्याकरिता आले असता बुद्धांनी त्यांना उपदेश दिला की ‘ जे लोक वारंवार एकत्रित सभा घेतात, वारंवार एकत्रित चर्चा करतात त्यांना विलग करणे कठीण आहे’ याचं संपूर्ण गाथेत भगवान बुद्धांनी यशस्वी गणराज्यासाठी समाजाने विशेष गुणांची निर्मिती करणे आवश्यक असते असे ही सांगितले आहे. यशस्वी गणराज्यांची अशी निर्मिती झाली असेल, तर त्या गणराज्यांचा कोणीही पराभव करू शकत नाही; परंतु एकदा विकारांचा उद्भव झाला की अशी गणराज्ये नष्ट व्हायलाही वेळ लागत नाही. त्यामुळे आजचे आपले गणराज्य बलशाली बनायचे असेल, तर कोणत्या गुणांची वृध्दी केली पाहिजे व कोणत्या विकारांचा त्याग केला पाहिजे. भारतीय सार्वभौमत्वाला हरताळ फासणाऱ्या घटनाबाह्य गोष्टींचा तीव्र निषेध करून आपण ह्या देशावर लादल्या जाणाऱ्या एकधिकाशाहीचा धिक्कार करायलाच हवा. विविध जात, धर्म पंथ यांनी नटलेला हा भारत देश आज अंतरबाह्य धुमसत आहे. समता, बंधुत्व आणि करुणा ह्या त्रिसूत्रीची सांगड घालून भारतीय संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे दिलेलं अधिकार आपण अबाधित राखलेच पाहिजे.

We the people of India

आम्ही भारताचे लोक,
आज आम्ही अराजकतेच्या उंबरठ्यावर उभे आहोत
आम्ही भारताचे लोक,
स्वतंत्र भारतात पुन्हा आझादी चा नारा लावत आहोत..
आम्ही भारताचे लोक,
आज आमच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा संविधान वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत..

हे भारत नावाचे अवकाश पुन्हा हिंदुस्थान नावाच्या खाईत हरवू नये..
हे भारत नावाचे अवकाश पुन्हा गुलामगिरीच्या कचाट्यात सापडू नये..

ज्यांनी या नवीन अवकाशाला जन्म दिला अशा घटनेच्या शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समस्त भारतवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा !

सुरेखा पैठणे

लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री /वक्ता /निवेदिकाआहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*