प्रजासत्ताक दिनी संविधानाचे महत्त्व सांगावे!

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे

२६ जानेवारी १९५० सालापासून भारत राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून ओळखले जाऊ लागले.

संविधानाची निर्मिती साठी दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसांची प्रक्रिया पूर्ण झाली. आज २६ जानेवारी २०२१ साल अर्थात २१ वे शतक आणि ७० वर्षे भारत राष्ट्र अबाधित राहिले ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळेच! शंभर पेक्षा जास्त घटनेमध्ये दुरुस्ती झाली. याच काळामध्ये घटना बदलण्याचे जातीयसुर सुद्धा ऐकू येऊ लागले. पण ते कोणालाही शक्य झाले नाही, कारण मुळात घटना कोणीही बदलू शकत नाही. घटनाकार महामानव प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अभ्यास करूनच संविधान तयार केले आहे. संविधान लिहिणे हे काय सोम्यागोम्याचे काम नाही! त्याचबरोबर एक महत्वाची बाब म्हणजे १९७६ साली इंदिरा गांधी यांनी घटनेच्या मूळ प्रास्ताविकेला हात घातला आणि ४२ व्या घटनादुरुस्ती घडवून आणली, त्यात (समाजवाद, धर्मनिरपेक्ष) हे शब्द समाविष्ट केले गेले. हा एक स्वतंत्र विषय आहे.

२६ जानेवारी “प्रजासत्ताक” लोकशाही किंवा गणतंत्र दिवस” ह्याचा नेमका अर्थ काय आहे? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडले पाहिजे. १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही! तर भारताची फाळणी झालेली होती आणि भारतातून एक नवीन देश पाकिस्तान निर्माण झाले. त्याच बरोबर त्यादिवशी ब्रिटिश भारतातून त्यांच्या मायदेशी गेले नाहीत तर जोपर्यंत भारतामध्ये संविधान निर्माण होत नाही तो पर्यंत ब्रिटिश भारतातून जाणार नव्हते हे सर्वश्रुत आहे. दरवर्षी भारतात १५ ऑगस्ट ला ‘स्वतंत्रता दिवस’ साजरा केला जातो, कारण राजकीय स्वातंत्र्य भारतीयांना नव्हते? भारताची फाळणी झाली आणि तेव्हा पासून भारताचे दुश्मन ब्रिटिश न होता पाकिस्तान हाच भारताचा मूळ पहिला व शेवटचा दुश्मन आहे असे भारतीयांना भ्रमित करून ठेवले आहे. भारत-पाक युद्ध किंवा भारत-पाक क्रिकेट याकडे भारतीयांचे लक्ष केंद्रित करून विशिष्ट धर्माबद्दल आणि देशाबद्दल द्वेष, घृणा निर्माण करून युद्धजन्य किंवा दंगली घडवून आणण्यासाठी भारतातील काही धर्मांध लोकं पोषक वातावरण निर्माण करून राजकीय अस्तित्व टिकवून आहेत. एवढे सगळे होत असताना देशाला स्थिर ठेवले आहे भारतीय संविधानाने. कारण देशात विविध धर्म, जाती, भाषा, संस्कृती, सण, उत्सव, इत्यादी सत्तर वर्षे अबाधित ठेवले आहे, कारण भारतीय संविधान होय! भारताला खऱ्या अर्थाने समता, स्वातंत्र्य बंधुभाव व न्याय या चार महत्त्वपूर्ण तत्त्वावर आधारित भारताला एकत्रित ठेवले आहे. मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, ज्यु, इस्त्राईल, पारशी, जैन, बौद्ध, आणि हिंदू मधील ६५०० जाती उपजातींना भारतीय संविधानाने श्रद्धा, उपासना, व्यक्ती स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य इत्यादी मूलभूत अधिकार बहाल करून देशाला सुरक्षित ठेवले आहे. ही किमया संविधानाची आहे, संविधानाने जातीभेदांना छेद दिलेले आहे. २६ जानेवारी १९५० पासून भारताला आणि भारतीय लोकांना ‘भारतीय नागरिकत्व’ प्राप्त झाले. कुठेही हिंसा न करता भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, आरक्षण इत्यादी सर्वजाती धर्माचा सखोल अभ्यास करूनच प्रत्येकाला संविधानाने सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. तरी देखील देशात अशी ही लोकं आहेत त्यांना देशात अशांतता, हिंसा, दंगल, धर्मांध माजवायचा आहे. देशाला अस्थिर ठेवायचे आहे. यातून त्यांना त्यांची राजकीय पोळी शेकवता येईल. आज प्रत्येक नागरिकांकडे भारतीय संविधान आहे का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा, भारतीय संविधान परिपूर्ण वाचले आहे का? उत्तर आहे नाही! आणि मग काही लोकं बोलतात, घटना चुकीची आहे? संविधान बदलले पाहिजे. मग संविधानाच्या बाजूने आणि संविधानाच्या विरोधात अशी फाळणी झालेली दिसून येते. संविधानाची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे असे मी मानतो! संविधानाची अंमलबजावणी म्हणजे नेमके काय करायला पाहिजे. संविधानाचे सामूहिक वाचन झाले पाहिजे. शाळेत, महाविद्यालयात, शासकीय निमशासकीय कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वाचले पाहिजे. काही महत्त्वाचे अनुच्छेद कडे पाहूया, संविधानात भाग तीन मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क (भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, संघटना स्थापन करण्याचा स्वातंत्र्य, भारतात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्य, कोणत्याही भागात राहण्याचा व स्थानिक होण्याचा स्वातंत्र्य, कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि विशेष म्हणजे अनुच्छेद ३२ नुसार संविधानिक उपाय योजण्याचा हक्क दिलेले आहे. तसेच भाग चार मध्ये प्रत्येक राज्याला धोरण निदेशक तत्वे दिलेले आहे. प्रत्येक राज्याने तिथल्या प्रत्येक नागरिकांचा विकास करणे ही राज्याची जबाबदारी आहे. आपण संविधानाचे परिपूर्ण वाचन केलेच पाहिजे

परंतु सध्या काय चालू आहे, २६ जानेवारी आले की, त्यादिवशी टेलिव्हिजन वर युद्धाचे चित्रपट दाखविले जातात, २६ जानेवारीला असे कोणते युद्ध झाले होते की युद्धाचे चित्रपट तुम्ही दाखवता? २६ जानेवारीला भारतामध्ये कोणीही शहीद झालेले नाही! तर त्यादिवशी भारताला एक संविधान प्राप्त झाले आणि या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्रातील व्यवहार, कोर्ट, विधिमंडळ, संसद इत्यादी कायदेशीररीत्या चालत आहेत. अर्थात २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आहे, त्यादिवशी भारतीय संविधानाचे ३९५ अनुच्छेद संपुर्ण देशाला समजून सांगितले पाहिजे! ते जमत नाही किंवा जाणून बुजून २६ जानेवारीचे महत्त्व लपवून किंवा त्याला महत्त्व न देता २६ जानेवारी म्हणजेच शहिदांचा दिवस आहे? टेलिव्हिजन मध्ये २६ जानेवारी भारत-पाक, किंवा भारत-चीन, भारत-बांगला, किंवा स्वातंत्र्य लढ्याबद्दल चित्रपट दाखविले जातात तसे न करता त्यादिवशी भारतीय संविधानाचे महत्त्व व्याप्ती, अनुच्छेद, हक्क-कर्तव्ये, दाखविले पाहिजे अर्थात प्रजेचे राज्य आहे ते कसे निर्माण झाले त्याचा इतिहास दाखवून लोकांमध्ये संविधानाबद्दल माहिती दिली गेली पाहिजे. आता याच दिवशी बऱ्याच सोसायटीमध्ये किंवा मध्ये (शासकीय कार्यालयात) सत्यनारायणाची धार्मिक पूजा केली जाते, वर्गणी गोळा करून भटाला पोसण्यासाठी आणि त्या सत्यनारायणाच्या धार्मिक विधी सोबत देशातील महापुरुषांचे आणि भारतीय वीर जवानांचा फोटो लावले जाते. हे कोणत्या प्रकारचे देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत? सत्यनारायणाने देशासाठी कोणकोणते आंदोलने, मोर्चे, उपोषणे केली होते? त्यांच्या आजोबांनी किंवा वडिलांनी किंवा घरातील कोणत्या सदस्यांनी काय काय योगदान दिले आहेत, हे कोणी सांगायला तयार नाहीत! मग विरोध केला तर पुन्हा ते बोलतात, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात? धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला सत्यनारायण यांनी दिलेले नाही तर भारतीय संविधानाने दिलेले आहेत, याची तरी जाणीव असावी! एवढे सगळे असताना, मराठी मालिकांमध्ये स्त्रियांना टार्गेट केले जाते आणि दाखविले जाते की, स्त्रियांना सुद्धा मुक्त स्वातंत्र्याचा अधिकार आणि हक्क आहे? परंतु हे सांगितले जात नाही की, तो अधिकार कोणत्या लेखकाने किंवा निर्मात्याने दिला नसून (लेखक-निर्माता) त्याला सुद्धा लिहिण्याचा संविधानिक अधिकार, भारतीय संविधानामुळेच प्राप्त झालेला आहे.

“मूलभूत कर्तव्ये”–

स्त्रियांच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतीय स्त्रियांना मग ती कोणत्याही धर्माची असो तिला २६ जानेवारी १९५० पासून मतदानाचा संविधानिक हक्क परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच मिळवून दिला, त्यासाठी तिला कुठेही मोर्चा, उपोषण, आंदोलने करावी लागले नाही, आणि तिच्या धर्माने सुद्धा तिचे हक्क-अधिकार नाकारलेत ते भारतीय संविधानाने तिला हक्क मिळवून दिलेत. आपण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ (क) मूलभूत कर्तव्यकडे पूर्णपणे दुर्लक्षच करतोय! त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की,

(ड) धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे; “स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे” इथे मूलभूत कर्तव्ये आपल्याला दिलेले आहे की, स्त्रियांना सन्मानाने वागविले पाहिजे, आणि जे जे अनिष्ट प्रथा रूढी तसेच जो धर्म स्त्रियांना तुच्छ किंवा दुय्यम स्थान देतो त्या सर्व प्रथांचा आपण त्याग केलाच पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. आजही काही विशिष्ट धर्मामध्ये “स्त्रियांना मासिक पाळी” मध्ये किंवा त्या पाच दिवसांत तिला स्वातंत्र्य दिले जात नाही, अथवा तिला एक प्रकारे बहिष्कृत केले जाते, ती अस्वच्छ, अस्पृश्य वगैरे आहे अशीच तिला घरात आणि समाजात वागवणूक दिली जाते. त्या पाच दिवसांत तिला धार्मिक स्थळी वर्ज्य केले जाते. स्त्री म्हणून ती उपभोगाला चालते, परंतु मासिक पाळीच्या काळात तिला स्पर्श केले की विटाळ होतो, असल्या अघोरी आणि बुरसटलेल्या प्रथांना कायमचे जाळून टाकावे हेच भारतीय संविधान आम्हाला मूलभूत कर्तव्य म्हणून सांगत आहे. परंतु त्याची अंमलबजावणी आपण करत नाही आणि स्त्री स्वातंत्र्याचा गप्पा मारत असतो.
पुढे त्यातच
(छ) मध्ये वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे; परंतु सध्याचे मेट्रोचे कामे करण्यासाठी झाडे मात्र रात्रीच्या वेळेत सर्रासपणे तोडली जातात. नुकतेच आरे कॉलनी मधील उदाहरणे आपल्या नजरे समोरच आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होताना दिसत आहे.

(ज) विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. अर्थात आजही टेलिव्हिजन मध्ये विविध चॅनेल मध्ये अंधश्रद्धा पसरवून चमत्कारिक लॉकेटचे जाहिरात करून लोकशाही नागरिकांना आर्थिक दृष्ट्या लुबाडले जातात. शेतकरी आत्महत्या करत आहे हे थांबविण्यासाठी एकही लॉकेट हे बनवू शकत नाहीत? असे जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा मात्र हे चॅनेल वाले काहीच बोलत नाही. देशाचे गृहमंत्री विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवून पूजा करतात, अर्थात मूलभूत कर्तव्याचे उल्लंघनच केलेले आहे. आणि यावर मीडिया किंवा राष्ट्रपती काहीच बोलत नाही. आपण सर्वसामान्य लोक आहोत, म्हणून काहीच करू शकत नाही हे आधी आपल्या मेंदू मधून काढले पाहिजे. तुम्ही आम्ही जगातील सर्वोच्च लोकशाही असलेल्या राष्ट्राचे लोकशाही नागरिक आहोत, मग आम्ही भारतीय म्हणून का राहत नाही? आम्ही जातीच्या धर्माच्या भिंती का तोडत नाही! लोकशाही नागरिक म्हणून आम्ही राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांना थेट प्रश्न किंवा पत्राच्या माध्यमातून का विचारू शकत नाही? आता प्रश्न पडला असेल की प्रधानमंत्री यांना पत्र पाठविले तर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल केले जातात. हो हे सत्य आहे तरी आपण लोकांमध्ये भारतीय संविधानाची माहिती का सांगत नाही.

“धर्मनिरपेक्षतेच्या पोकळ गप्पा”

सामान्य रुग्णालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस ठाण्यात, तहसीलदार, जिल्हाधिकारी, कोर्ट, मंत्रालयात गेल्यावर तिथे विशिष्ट धर्माचे मंदीरे दिसतात, किंवा तिथल्या (शासकीय कार्यालयात) भिंतीवर किंवा टेबलावरच्या काचेच्या खाली विशिष्ट धर्माच्या देव देवतांचे फोटो दिसतात! माझा विरोध त्या फोटोंना नाही देशात धर्मनिरपेक्ष आहे ना मग जे जे धर्म देशात आहेत, त्या त्या धर्माच्या संस्थापकाचे सुद्धा फोटो लावले पाहिजे तरच धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखले जाऊ, एका विशिष्ट धर्माच्या देवी देवतांचे फोटो लावून इतर धर्मावर अन्यायच आहे. नाहीतर कोणत्याही धर्माच्या देवतांचे फोटो लावूच नये. धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला आहे ते तुमच्या धार्मिक स्थळा मध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयात नाही, तिथे तुम्ही कर्मचारी अधिकारी म्हणूनच आहात हे संविधानानुसार आहे.

लोकशाही देशात विचारातून प्रश्न सोडवले पाहिजे, हिंसा करून किंवा माणसांना मारून प्रश्न सुटत नाहीत. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचे राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या खूपच सोपी आणि सरळ सांगितली आहे, ‘लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तविरहित क्रांती घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजेच लोकशाही होय’ परंतु सध्याचे वातावरण पाहता संविधानाच्या विरुद्ध दिशेने देशाला लोटले जात आहे ते आपण भारतीय म्हणून वेळीच रोखले पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःला प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय म्हणूनच राहिले पाहिजे तरच देश खऱ्या अर्थाने महासत्ता बनू शकेल.
७१ वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे

लेखक अधिवक्ता असून कवी तसेच सामजिक कार्यकर्ता आहेत व ठाणे शहर येथील रहिवासी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*