सुरेखा पैठणे
कार्ल मार्क्स आणि लेनिन ला गवसणी घालून येणारा भारतीय समाज आणि जगातील सगळा कामगार एक आहे अशी हाकाटी घालणारा समाज आपापले आठ तासाचे काम संपल्यावर त्याच्या जातीची झुल पांघरून निवांत सांगत बसतो महत्व इथल्या सनातन परंपरेचे. तेव्हा नाभीकांचा संप घडवून आणणारे महात्मा फुले पडून असतात इतिहासाच्या एका पानावर, एखाद्या चौकात, एखाद्या घोषणेत.
सिमोन द बोव्ह ला कडेवर घेऊन येणारा इथला सोयीचा स्त्रीवाद आणि तमाम स्त्रीवादी महात्मा फुलेंच्या शिक्षणचळवळीला पद्धतशीर बगल देऊन करतात उदोउदो इथल्या जातीपातीला शाबीत ठेऊन करत असलेल्या बोलघेवड्या समाजसुधारकांचा.
‘तृतीय रत्न’ नाटक लिहून इथल्या ब्राह्मणी शोषक व्यवस्थेचा बुरखा फाडून सर्वसामान्य बहुजनात जनजागृती घडवणारे महात्मा फुले आद्य नाटककार न ठरता ठरतात ते केवळ समाजसुधारक..
आपल्या गद्यलेखनातून ‘अखंड’ काव्य निर्माण करूनही ठरत नाहीत ते कवी,वा संत.
सोळाव्या शतकात जन्माला आलेल्या छत्रपतींना इतिहासाच्या पानातून बेदखल करून अदखलपात्र ठरवणाऱ्या पेशव्यांच्या बेमुरवतखोरीला छत्रपतींची समाधी शोधून अन त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहूनही महात्मा फुले ठरत नाहीत संशोधक ..
घोटभर पाण्यासाठी हजारो वर्षे तिष्ठत असलेल्या समाजासाठी आपल्या अंगणातील हौद खुला करणारे महात्मा फुले,
आपल्याच लेकीबळींच्या केसांवरून विकृत वस्तरा फिरवणाऱ्या उचचवर्णीय रुढीविरोधात न्हाव्याचा संप घडवणारे महात्मा फुलेे,
‘आमच्या इथे येऊन गुपचूप बाळंत होऊन जा’ असा फलक आपल्या दारावर लावणारे महात्मा फुले,
त्याच अनौरस मुलांसाठी अनाथालय सुरू करणारे महात्मा फुले.
मुलींनी शिकायला हवे म्हणून स्वतःच्या पत्नीला शिक्षित करणारे महात्मा फुले.
– मला लिहितानाच धाप लागली,
तरीही महात्मा फुले केवळ समाजसुधारकच…
सुरेखा पैठणे
लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री /वक्ता /निवेदिकाआहेत.
- बाबासाहेबांची प्रिय रामू, आमची रमाई! - May 27, 2021
- तेव्हा सखे सप्रेम जयभीम! - April 13, 2021
- महाडचा संगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर मूलभूत मानवी हक्कांचा संगर - March 20, 2021
realty madam