ब्राह्मण सवर्णांकडून शोषित समूहाचेच गुन्हेगारीकरण (criminalization) कुठपर्यंत?

विकास कांबळे

शासन, प्रशासन, राजकारण, समाजकारण यातल्या आपल्या अत्यल्प प्रतिनिधीत्वामुळे एक अख्खा समुह गुन्हेगाराच्या मागे उभा राहतोय. आपल्यातला प्रतिनिधित्व मिळालेला व्यक्ती कितीही क्रुर असला, प्रस्थापितांना शरण गेलेला असला तरी समूहाला तो व्यवस्थेत सत्तास्थानी आहे याचा आधार वाटत असतो. या समूहाला तो हवा असण्याच कारण त्याच व्यवस्थेत, सत्तेत असण आणि त्याच्याच आधारे आपल्या प्रश्नांना वाचा फुटेल याची असलेली पुसटशी अपेक्षा. तेंव्हा मुळ प्रश्न त्या समूहाच असलेल अत्यल्प प्रतिनिधित्व आहे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन त्या समूहाला गुन्हेगाराला समर्थन देतोय हे कारण पुढे करत मुर्ख, निष्ठूर, अंध, पितृसत्ताक ठरवणारे मला त्या राठोड इतकेच क्रुर वाटतात.

या समूहांमधे पितृसत्ताक व्यवस्था आहे हे नाकारण्याच कारण नाही आणि त्याच्या समर्थनाचा तर प्रश्नच येत नाही. पण ही व्यवस्था यांची स्वतःची आहे की सवर्ण बामणी व्यवस्थेने यांच्यावर लादलीय हे पाहणार आहात की नाही. म्हणजे आज ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, साधनसामग्री, जमीनी आहेत, ज्यांच्याकडे शिक्षण आणि शिक्षणसंस्थांची कमतरता नाही अशा जात-समुहातल्या पितृसत्ताक व्यवस्थेचे वाभाडे काढताना मला तरी अजुन कुणीही आढळल नाही. पण या अशिक्षित, कसलीही साधनसामग्री ताब्यात नसलेल्या आणि दोन वेळच्या जगण्याचीही भ्रांत असलेल्या संख्येने अल्प असलेल्या या समुहाला वारंवार मुर्ख, अंध, पितृसत्ताक, निष्ठूर ठरवताना पाहतोय. काही लोक तर खाजगीत या जातीतल्या लोकांच्या या प्रथा परंपरा पाहता यांना जगण्याचा अधिकारच नसायला हव अस बोलतानाही पाहीलय. अनेकांनी या समुहातल्या लोकांना तुरुंगात डांबून टाकल पाहीजे अशी भाषा करताना दिसतात. तेंव्हा या पुरोगामी विचारधारेच्या लोकांना शरम कशी वाटत नसेल हा प्रश्न मनात येतो. मूलभूत प्रश्न आणि त्यावरचे उपाय यावर कधीही सकारात्मक चर्चा करताना कुणीच दिसत नाही. पितृसत्ताक व्यवस्था, जातपंचायती याची चर्चा होताना दिसते पण त्यांच्या अत्यल्प असलेल्या प्रतिनिधित्वाचा, जमीनी-रोजगाराचा आभाव, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न याबाबत कुणीही ठोस अस काहीच बोलत नाही.

काही दिवसांपासून पारधी आणि गोरा-बंजारा समुहाला शिव्या हासडणाऱ्यांपैकी किती जणांना या समुहाबाबत माहीती होती किंवा तुमच्या शहर-तालुक्यात यांच्या वस्त्या कुठे आहेत याची माहीती आहे? हे लोक गावगाड्याचा भाग आहेत की नाही याची किती जणांना माहीतीय? कितीजण यांच्या वस्त्यांत गेलय? त्यांच दुःख अनुभवय??? मी पोहचलोय यांच्यापर्यंत, यांच जीवन जवळून पाहीलय म्हणून त्यांना दोष द्यायच धाडस मी कधीच करणार नाही.

छ. शाहुंना जेंव्हा लक्षात आल की जातीय भेदभावामुळे बहुजनांपर्यंत शिक्षण पोहचत नाही, वस्तीगृहे ही सवर्णांची मक्तेदारी बनून मागासवर्गीयांचा तिथे छळ होतो, शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्यासाठीचे प्रयत्न होतायत तेंव्हा राजांनी प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वस्तीगृहे निर्माण केली. शिक्षण देण्यासाठी शाळांची कमतरता जाणवली तेंव्हा त्यांनी प्रत्येक गावची चावडी, मंदिरांत शाळा भरवण्याचे आदेश दिले, शेतीच्या कामांसाठी मुलांना शाळेत पाठवण्यात लोक कचरतात हे लक्षात येताच शाहूंनी पालकांना दंड लावणे, जमीन जप्त करणे अशा शिक्षा दिल्या जातील असे फर्मान काढले. चोर-गुन्हेगार ठरवलेले पारधी पोटासाठी हे करतात समजताच शाहुंनी पारध्यांसाठी रोजगार उपलब्ध करुन दिला, त्यांच्या स्वतंत्र वस्त्या वसवल्या. पारध्यांना प्रशासनात स्थान दिल, त्यांना स्वतःचे अंगरक्षक म्हणून नेमल. या समुहाला मुर्ख, चोर न ठरवता त्यांचे वास्तविक प्रश्न समुजन घेतले आणि त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यनंतर आजपर्य॔त देशातील पुरोगाम्यांनी या समुहाच्या मुळ प्रश्नांसाठी काय काम केल? मला तर काहीच दिसत नाही, हा ऊठसुठ पितृसत्ताक व्यवस्था, रानटी लोक म्हणत कॉलर पकडून जाब मात्र विचारत गेले.

मोदीच्या तथाकथित फॅसिझमशी लढाई लढल्याने, EVM बॅन केल्याने, डफ हातात घेऊन हिंदु-मुस्लीम एकतेची गाणी गायल्याने भाजपची सत्ता जाईलही आणि काँग्रेस किंवा मग जास्तीत जास्त कम्युनिस्ट सत्तेत येतील पण दलित-बहुजन समाजाच्या प्रतिनिधीत्वाचा, जमीनीचा, शिक्षणाचा, जगण्याचा प्रश्न जशास तसा राहील. खरच ही परिस्थिती बदलायची असेल तर Caste Census, Propational Representation, साधन-संपत्तीच, जमीनीच पुनर्वाटपाच, शिक्षण, याच मार्गावर काम कराव लागेल. जगण्याची भ्रांत असलेल्यांची कॉलर पकडून त्यांना जाब विचारल्याने काहीच बदल होणार नाही.

विकास कांबळे

लेखक इंडिपेंडट रिसर्चर असून फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*