“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ४)

गौरव सोमवंशी

भारतीय उपखंडात मेरिट ही संकल्पना कशी हास्यास्पद आहे यावर अगोदर काही भाग लिहिलेत, पण ही पोस्ट स्वतंत्र वाचू शकता. पाहिले एक मस्त गोष्ट सांगतो. कारण प्रश्न पडला असेलच की हा वरील फोटो कोणता आहे, काय दर्शवतो, जणू काही विमानाला चिकन-पॉक्स झालंय.

तर हा फोटो दुसऱ्या महायुद्धात बनवला गेलाय. विमानाची नक्की कोणती बाजू जास्त मजबूत करावी यासाठी हिटलर विरोधी देशांमध्ये बराच अभ्यास केला जायचा, त्यामध्ये त्यांनी काही स्टॅटिस्टिशियन्स किंवा गणितज्ञ व्यक्तींना सुद्धा सामील केले, त्यापैकी एक म्हणजे अब्राहाम वाल्ड.

विमाने जेव्हा लढायला जाईची आणि तिकडच्या विमानांपासून ते जमिनीवरील बंदुकांपासून जो मारा व्हायचा त्यापासून वाचवून परतून आली, की सगळे गणितज्ञ (स्टॅटिस्टिशियंस खरंतर) मग सगळा डेटा गोळा करून हे बघायची की सर्वात जास्त गोळ्या कुठे लागल्या आहेत. त्यावरून त्यांनी असं मांडलं की विमानाला अजून मजबूत करायला त्यांच्या पंख्याला आणि शेपटीला जास्त मजबूत करा कारण गोळ्यांचा भडिमार तिकडे जास्त होतोय. ऐकायला सर्वाना बरोबर वाटलं.

तेव्हाच आपला हिरो, अब्राहाम वाल्ड येऊन बोलला की याच्या उलटं करा. जिकडेपण गोळ्या सर्वात कमी लागत आहेत, त्या भागांना मजबूत करा! असं का?

कारण ही सगळी मंडळी त्याच विमानांचा अभ्यास करत होती जी परतू शकली. जी विमाने जाऊन गोळ्या लागून पडली त्यांचा अभ्यास कसा करणार? याचा अर्थ, जर का गोळी विमानाच्या नाकाला किंवा शेपटीच्या वर लागत असतील (फोटोमध्ये तिथे सर्वात कमी लाल निशान आहेत), ते हमखास तिकडेच पडली. आणि ज्यांना पंख्याला किंवा शेपटीला लागली ती परतू शकली म्हणजे की त्या भागांना जरी गोळ्यांनी वेध घेतला तरी ते देखील ती विमाने परतू शकत होती.

अब्राहाम वाल्डने इथे “सर्व्हायव्हर बायस” काय असतो ते सांगितलंय. की आपली सगळी मतं, निष्कर्ष वगैरे फक्त त्या उदाहरणांवर अवलंबून असतील जी “जिंकली, वाचली, मोठी झाली” तर मग सगळंच गणित चुकत आहे (अक्षरशः).

मग आपण काय वेगळं करतो का? अगोदरच्या भागांमध्ये जे वारंवार सांगत आलोय की जरी ते “मोठ्या गोष्टी” करणं हे गरजेचं आहे, जसं UPSC IIT IIM Oxford Cambridge Harvard अमेरिका लंडन आफ्रिका वगैरे वगैरे जे काही असेल ते, पण समाजामध्ये काय चुकतंय हे बघायला या अपवादांकडे बघून काही होणार नाहीये. बुद्धीने सर्वजण जवळपास सारखीच असतात, त्यांना वेगळं करतात तर त्यांना मिळणारी संधी, अनुकूल परिस्थिती, पैसा, योग्य दिशा योग्य वेळी मिळणं (म्हणजे काकांचीच कंपनी असणं किंवा मामाचं दुकान असणं).

यामुळे चळवळीची दिशा ही सर्वांसाठी बालवाडी ते PhD शिक्षण मिळवून देणे, आरोग्य उपचार सगळं सरकार कडून पुरवणे (तितके टॅक्स अस पण घेतातच की, आपल्याच पैशाने आपली हक्काची सोय मागत आहोत), शेतकऱ्यांना एक मिनिमम इन्कम देणे (पीक येऊ अथवा न येवो), आणि या दिशेने बरंच काही.

याचा दुसरा अर्थ असा पण होतो की कोणी त्या भारीवाल्या पदव्या किंवा पद मिळवून डोक्यावर बसायचं प्रयत्न करीत असतील तर त्यांना शांतपणे खाली बसवा. प्रत्येकाला इथे विचाराने, कार्याने, बलिदानाने, आणि चारित्र्याने मापायचे मापदंड लावून ठरवा कोणाला मानायचं आहे कोणाला हलक्यात घ्यायचंय.

आणि आजूबाजूला दिसणाऱ्या असंख्य “गोळ्या घालून हाणून पाडलेल्या” विमानांचा विचार मनात घेऊन ठरवा की नक्की कुठे चुकतोय. त्यांना डोळ्यासमोर ठेऊन सगळे निर्णय, मतं, निष्कर्ष बनवा. .

तळटीप: अब्राहाम वाल्ड यांचा मृत्यू भारतात विमान अपघातात झाला जेव्हा ते इकडे लेक्चर सिरीज साठी आले होते.

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*