प्रकाश रणसिंग
सध्या पर्यावरणवादी नावाचं खुळ आलंय. बरं यात कुणाला ही पॉईंट करायचं नाही, तसा उद्देश ही नाही. पर्यावरणासाठी जे कोणी चांगलं काम करतात त्यांनी करावं आणि अखंड करावं..
पर्यावरण रक्षण हे विकेंद्रित प्रकियेचा भाग आहे, म्हणजेच स्थानिक प्रक्रिया आहे असं मला वाटतं. पर्यावरण एखाद्या एसी रूम मध्ये किंवा एखाद्या लॅपटॉपच्या स्क्रीन वर फुलत नाही. पर्यावरण मुक्तं आणि विकेंद्रित गोष्ट आहे. म्हणून पर्यावरण रक्षण आणि सांभाळ हा विकेंद्रीत आहे. हे विकेंद्रीकरण स्थानिक परिसंस्थाचं राखण करणार आहे. परंतु सध्या एखादं कुणी तरी डायरेक्ट ग्लोबल वाँर्मिंग वर बोलणार आणि पर्यावरणवादी होणार.
बरं भारतात यात ब्राम्हणी आयडियालॉजि आधारभूत जातीसंस्था काम करते. जी लोकं स्थानिक परिसंस्था जोपासून ठेवतात. ज्यांच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा भाग पर्यावरण असते. त्या लोकांचं योगदान सरळ सरळ दुर्लक्ष करून नाकारलं जातं. ते कधीच मीडिया आणि शासनसंस्थाच्या दरबारात पर्यावरणवादी होत नाहीत. झालेच तर देशद्रोही होतात.
ब्राह्मण सवर्ण वर्गातुन एखादा नुसता प..पर्यावरणाचा जरी म्हणलं तरी पर्यावरणवादी म्हणून गणला जातो. बरं हे पर्यावरणवादी सरळ सरळ पर्यावरणाच्या शोषक सिस्टिम वर कधीच बोलत नाही. फ़क्त मोठाल्या कॉन्सेप्ट वापरून आभाळ हेपलन्याचं काम करतात. यांच्या आभाळ हेपल्यातून पर्यावरणाची कोणतीही हानी भरून येत नाही, आणि हे पर्यावरणवादी.. !
ते आजकाल एक फॅड आहे. झाडं लावणे म्हणजे पर्यावरण रक्षण. केवळ झाडं लावले म्हणजे पर्यावरणाची हानी भरून येत नाही ना! निसर्गत: असणारी प्राकृतिक रचना, नद्याची पात्र, टेकड्याची रचना, जमीनीचं खोलीकरण आदी कडे सर्रास सोयीस्कर दुर्लक्ष हे पर्यावरणवादी करतात. आपण स्वतः कसे पर्यावरणवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी ग्लोबल वार्मिंग वर व्याख्यांनं झाडत असतात.
एक दहा वर्षांचं जुनं झाडं तोडून तुम्ही त्याचं नुकसान भरून काढण्यासाठी १०० झाडं लावलीत तरी त्या झाडावर तयार झालेली परीसंसंस्थेचं नुकसान भरून येणार नाही. जी झाडं पर्यावरणाला पोषक आणि स्थानिक गरजा पूर्ण करणारे असतात, त्या झाडांना आदिवासी संस्कृतीत महत्वपूर्ण स्थान असतं. असं झाड कोणत्याही फायद्यासाठी तोडलं जात नाही. ज्याची संस्कृतीच पर्यावरण रक्षणाची आहे त्यांना पर्यावरणवादी म्हणून महत्व प्राप्त करून दिलं जातच नाही.उलट त्यांना पर्यावरणाचे शत्रू ठरवून जंगलातुन हाकलून दिलं जातं. बरं त्या विरोधात आवाज काढला की मग आतंकवादी होतो. उदा. ओडिसा च्या कुना सिक्का, बॉक्ससाईट खनन च्या विरोधात उभी राहिली तर तिला आतंकवादी म्हणून अटक केली. हे सूत्र आहे ब्राह्मणी सवर्ण मानसिकतेचं. जिथं भांडवली शक्ती आणि ब्राह्मण सवर्ण हातात हात घालून एकमेकांच्या हिताचं काम करत असतात.
पर्यावरणाच्या शोषक वर्गाला ब्राह्मण सवर्ण पर्यावरणवादी उभं करणं सोपं आणि फायद्याचं असतं. कारण हे पर्यावरणवादी फक्तं आवई करतात, हे बघा… झाडं कशी तोडली जातात. ग्लोबल वार्मिंग कशी वाढलीय. पण शोषक कोण आहे त्यांचं पितळ कधीच उघडे पाडत नाहीत. त्याविरुद्ध ऍक्टिव्ह भूमिका घेणार नाही. नियामगीरी डोंगर वाचवण्यासाठी लोकांनी ऍक्टिव्ह भूमिका घेतली. लोकं ठाम राहिली. आणि नियामगीरी डोंगर वाचला. ही लोकं पर्यावरणवादी नाहीत का?
पर्यावरण श्रमण परंपरेचा भाग आहे. नवनिर्माणाची क्षमता, सर्जनाची क्षमता श्रमात आहे. म्हणून श्रमण परंपरेतुनच पर्यावरण वाढतं आणि घडतं. आदिवासी बहुजनांनी याच परंपरेतुन जंगल, जमीन, जल आदीचं राखण केलं. पर्यावरणाचे नियम एका पिढीतुन दुसऱ्या पिढीत पोहचवले. टिकवले.
ऑक्सिजनसाठी दुसऱ्यानी वाढवलेल्या जगवलेल्या जंगलावर ते कधी अवलंबून राहिले नाही. ज्यांनी स्थानिक परीसंस्था टिकवल्या वाढवल्या ते खरे पर्यावरणवादी. पण ब्राह्मण सवर्ण पर्यावरणवाद्यानी अश्या लोकांना व्हीलन केलं. तसं ते धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही बनवलंच आहे. तसं इथंही केलं. मग आदिवासीमुळे जंगली प्राण्यांना धोका आहे. त्यांना बाहेर काढा अशी आवई उठवतात.बरं आदिवासी पूर्वीपासून जंगलात राहतात. जंगलाचा कायदा आला आणि आदिवासी बाहेरचे झाले. त्यांच्या जमीनी ते करणारच. पूर्वजापासुन ते करत आलेत. त्यांचा तो अधिकार आहे. आदिवासीनी जंगलात राहू नये. त्यांनी जमिनी काढू नयेत. का तर पर्यावरणाला धोका आहे. बरं मग तुम्ही निसर्ग सहवास लाभावा म्हणून पार डोंगर कोरून हॉटेल काढता. बिल्डिंगा बांधता. टेकड्याचं पार सपाटीकरण केलं. जास्तीचे उत्पादन व्हावं म्हणून रासायनिक खतं घालून जमीनीचं वाटुळ केलं. वसावा पडतो म्हणून बांधावरची झाडं तोडली. हे सगळं आम्ही करू पण पर्यावरणाचा बोजा..आदिवासीवर.
बरं, आदीवासींनी ते जपलंय, तरीही पर्यावरणाच्या रक्षणाचं, श्रेय मेरे को सब आता हैं.. म्हणून लुटायचं आणि मग आम्ही पर्यावरणवादी.
२०१९ मध्ये आदिवासीयत या कार्यशाळेसाठी झारखंड मधील दुमकाला येथे गेलो होतो. कार्यशाळेच्या दरम्यान गावातील एका १४ ते १५ वर्षाच्या मुंडा आदिवासी जमातीतील मुलीनं आम्हांला गावातील एका टेकडीवर नेलेलं. टेकडीवर जाताना आणि येताना ती प्रत्येक झाडाचं नाव सांगत होती. त्याचा उपयोग सांगत होती. एखादं फुल कसं खाली पडतं, ते पडल्यानंतर किती दिवसात मातीत रुजलं तर त्याचं रोप उगऊ शकतं असं बरंच काही. हे तिला कुठं शिकवलं नव्हतं. की मोठ्या कॉन्फरेन्स मध्ये ऐकायला गेली नव्हती. तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग ती टेकडी होती. भविष्यात त्याच टेकडीवर कधी एखादी कोळशाची खाण आली तर, नक्कीच ती पोरगी टेकडी वाचवायला जीवाचं रान करेल आणि ब्राह्मण सवर्ण पर्यावरणवादी घराच्या गॅलरीत कुंड्या लावत बसतील स्वतःच्या शांती साठी. फ्रेश वाटावं म्हणून. जसा बुद्ध ठेवतात शोकेस म्हणून.
प्रकाश रणसिंग
लेखक विद्रोही संघटनेचे राज्य निमंत्रक असून District Magistrate Fellowship अंतर्गत तोरणमाळ येथे कार्यरत आहेत.
- बुळे पठार: ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध ‘उलगुलान’ पुकारलेले गाव - June 16, 2023
- चॅरिटी नको तर आदिवासींच्या मूलभूत हक्कांची पूर्तता हवी ! - August 17, 2022
- आदिवासींचं अस्तित्व फक्त शो-पीस/डाटा इतकचं? - April 8, 2021
आपली सदर विषयावर सविस्तर मुलाखत घ्यायची आहे , कृपया वेळ मिळावा !