डॉ सुनील अभिमान अवचार
अजूनही धारावीत जिवंत लोक राहतात? होय राहतात –
फक्त उपाशी पोट भरताहेत फक्त रिकामे खिसे आहेत
अहंकाराच्या नजरेतील कस्टडीत फक्त स्त्रियांची अब्रू मळकट कपड्यांसारखी रस्त्यावर वाळत टाकलेली
लहान मुले आहेत बेवारस खेळतात सेकंडहॅण्ड खेळण्यासोबत
तारुण्य रोजगाराची वाट पाहत बसले आहे जुगाराच्या डावांवर
गुदमरणारे श्वास चालले आहेत तंग गल्लीतून
प्रेम वापरले जात आहे कंडोमसारखे मानवीसंबंधांत
महापुरुषांचे पुतळे आहेत दलदलीत फसलेले चौकाचौकांत
येथे शांती करणार आहे डिप्रेशनमध्ये आत्महत्या कोणत्याही क्षणाला
येथे कच्चा माल आहे माणसांच्या विक्रीला ठेवलेला
त्याचा करू शकता वापर मनसोक्त कमी दरांत
तो पोहोचवत उपाशीपोटी तुमच्या लाडक्याजवळ जेवणाचा डबा
तो जाहीर सभेसाठी येईल मोठ्या नेत्याच्या गदीत शक्तीप्रदर्शनात सामील होण्यासाठी
त्याचे आवाहन ऐकेल, टाळ्या वाजवेल
हवे असेल तर बॅनर पकडेल, घोषणा देईल, जयजयकार करेल !
ठेंगण्या झोपड्यांत राहत असला तरी, स्वत:चा जीव मुठीत घेऊन
उंच इमारतीला रंगवण्यासाठी चढेल, रंग लावेल
हे सर्वाचेच आश्रयस्थान आहे, ज्याच्या टायऱ्या घासल्या गेल्या आहेत
ज्यांचे हक्क कॉण्ट्रक्टरकडे हस्तांतरित झालेले
ही नेत्यांच्या खिशातली
ही गुंडांच्या तावडीतली
हो मृत्यूची वाट पाहत असणार्यांची
ही सवर्णांच्या तुच्छतेची
ही तुंबलेल्या गटारांची
ही थकलेल्या खांद्यांची
खाली दुकान उपर मकान धारावी
गरिबाचा ताजमहल धारावी, इबादतची जागाही धारावी
धारावी रियालिटी टूरिझम :
प्रारंभ माहिम ते शेवट कुंभारवाडा
येतात लोक जर्मनी, ऑस्ट्रिया, कॅनडातून वगैरे वगैरे
सैलानी म्हणून
घेतात गरिबाचा जायका
गरिबांच्या चेहर्यांचा मोठा बाजार
हे सैलानी पाहून म्हणतात,
गरिबी पाहून अश्रू येतात,
मी तसा नाही थँक गॉड!
येथे जीवन रात्रंदिवस घोड्यासारखे
दौड़त आहे या दौडीत आहे बिहारी, युपी, कर्नाटकी इत्यादी
धारावीचा विकास सुरू
जमिनीवर डोळा सर्वांचा आहे
सडक- जैसे थे
नाले- सडलेले कुजके
उंच इमारती- तकदीर
धारावीच्या माणसाचे हृदय चिमूटभर नाही
ते आहे सुपाएवढे
येथे स्लम डॉग राहतात तुम्हावर ते भुंकणार नाहीत!
डॉ सुनील अभिमान अवचार
लेखक हे समकालीन कवी- चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’, ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’, हे त्यांचे महत्वाचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.’Our WORLD is Not for SALE ‘आणि ‘We, the Rejected People of India’ हे त्यांच्या मराठी कवितेचे इंग्रजीत अनुवाद झालेले काव्यसंग्रह आहेत. अवचार यांचे साहित्य जात, लिंग, वर्ग भेदाच्या मुक्तीदायी अवकाशासाठी उभे राहणारे आहे.
- तो दम ‘आंबेडकरवादी’ नावातच आहे… - April 21, 2021
- मुंबईची धारावी - March 4, 2021
- डेबूजी:गाडगेबाबा - February 23, 2021
Leave a Reply