महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे

प्रज्ञा भीमराव जाधव

त्या दिवशी, कळंब ला बस स्टँड च्या बाहेर पडले, रस्त्याच्या एका बाजूला काही बंद दुकाने होती आणि त्या समोर पत्र्याचे भले मोठे शेड टाकलेले होते. तिथं विशी-बविशीतली एक बाई एका पाच सहा महिन्यांच्या तान्ह्याला दूध पाजत बसली होती, पोलीस तिला शिवीगाळ करत होते आणि तिला बसल्या जागेवरून ओढत होते, जवळ जाऊन बघितलं तर समजलं की बाई पारधी समाजाची आहे आणि तिच्याकडं असलेलं लेकरू तिनं चोरून आणलं होतं म्हणे, बरं इथे महिला पोलीस वगैरे काही भानगड नाही, ” पुरुष” पोलिसच तिच्यावर तोंडसुख घेत होते. ते बाळ खुप गोरंपान होतं, आणि म्हणून बाळ तिचं असूच शकत नाही अशा ठाम समजुतीने पोलीस आणि जमलेले सगळे बघे तिला बोल बोल बोलत होते. ती काही जागची हलायला तयार नव्हती, पोलिसांची भाडभिड न ठेवता तिच्यावर बरसणाऱ्या शिव्या परतवून लावत होती. लेकरू भुकेलं झालं असल म्हणून सावलीत येऊन त्याला दूध पाजत बसली होती, शेवटी जवळच बांधकामाच्या साईटवर जिथं ती कामाला आली होती, तिथून काही बायका काय झालं ते बघायला आल्या तेव्हा आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की लेकरू तिचं च आहे तेव्हा कुठं पोलीस तिथून गेले.

हा प्रसंग मनावर कोरून ठेवला गेलाय, विशेषतः नुकत्याच केरळ मधल्या एका मासिकातल्या मुखपृष्ठावर सार्वजनिक जागी डोळा मारत दूध पाजणाऱ्या बाईचा फोटो झळकला आणि तमाम फेमिनिष्ठांच्या दृष्टीने तो फोटो म्हणजे एक उत्क्रांती च आहे असे रंगवून सांगितले गेले. तेव्हा ती आठवली, वाटलं मग अशा माझ्या असंख्य आय बहिणी कोणत्या फेमिनिष्ठ फ्रेम मध्ये मावतील??

ज्या गोष्टी कष्टकरी आणि दलित बहुजन समाजातील लोकांच्या आयुष्यात नॉर्मल* या सदरात मोडतात त्या गोष्टी हौस म्हणून जेव्हा फेमिनिष्ठ स्वतः करून पाहतात तेव्हा त्याला “रॅडिकल स्टेप” वगैरे संबोधतात. आम्ही आमच्या कामवाल्या बाईला कसं आम्ही पितो त्याच कपातून चहा प्यायला देतो, तिचा नवरा कसा हिंसक आहे, तिच्या मुलांना काहीच दिवस वापरलेले कपडे दिले यावर भाष्य करून महिला दिनही साजरा करतात.
दलित पितृसत्ता ही या फेमिनिष्ठांनी नव्याने जन्माला घातलेली अभ्यासकीय भानगड आहे, स्त्री विरुद्ध पुरुष ही फेमिनिष्ठ खेळी आहे.

“महिला प्रश्न” समावेशक आहे, तो जितका माझ्या आई-बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचा सुद्धा आहे, जातीव्यवस्थेत जितकी पिळवणूक तिची आहे तितकीच त्याचीही आहे, जातीचा चष्मा न लावता माझ्या प्रश्नांची मांडणी ही क्रूर थट्टा च आहे. ज्योती लांजेवरांच्या कवितेतली– थकून भागून घरी आलेली माय, चोळीतून रुपयाचं नाणं काढून तिच्या लेकराच्या हातात ठेवत, अभ्यास करून बाबासाहेब बन असं सांगते, तिचं माय खऱ्या अर्थाने मुक्ती चा अर्थ सांगते, महिला दिनाच्या शुभेच्छांची तिच खरी हक्कदार..

प्रज्ञा भीमराव जाधव

लेखिका औरंगाबाद येथील रहिवासी असून JNU येथे PhD student आहेत, तसेच भीमाच्या लेखण्या (Round Table India – Marathi) च्या सहसंपादक आहेत.

2 Comments

  1. खरंय. तुमचे आणखी काही लिखाण असतील तर ते वाचायला नक्कीच आवडेल..

Leave a Reply

Your email address will not be published.


*