सुरेखा पैठणे

जिच्या जन्म घेण्याने मी जागतिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या महिलादिनासोबत स्वतःला जोडू शकले, त्या सावित्रीबाई फुले ह्या रणरागिणीचा आज स्मृतिदिवस.
पतीच्या कार्यात स्वतःला झोकून देऊनही स्वतंत्र मशाली सारखी पेटून उठलेले हे व्यक्तिमत्व. एखाद्या झुंजार लढाऊ सैनिकासारखाच मृत्यू हि.
भारतातील मूलगामी समस्यांना वाचा फोडण्यात अवघी हयात खर्ची घातली. विधवा विवाह, स्त्रीशिक्षण, प्रस्थापित चालीरीतीविरुद्ध लढा दिला.तिने केलेल्या कार्याची नुसती यादी वाचली तरी छाती दडपते.
पतीनिधनानंतरही सत्यशोधक समाजाची खंदी कार्यकर्ती म्हणून झटली. प्लेगची साथ आली असता खांद्यावरून रुग्ण वाहून नेत असताना प्लेगची बाधा झाली आणि लढवय्या वृत्तीने मृत्यू पत्करला.
समंजस सहजीवनाचा आदर्श सांगणार हे जोडपं त्यातही सावित्रीची भूमिका नुसतीच मम म्हणणारी नव्हती तर स्वतंत्र अस्तित्व राखून होती. सावित्रीच्या नंतरहि काही मोजक्या स्त्रीसुधारक झाल्या परंतु पतीविरहित त्यांचे वेगळे अस्तित्व दिसून येत नाही.
आद्य कवयित्रींचा मान हि खरे तर सावित्रीनाच द्यायला हवा. परंतु इतिहासकारांनी तसे होऊ दिले नाही.
या भारताच्या काळ्याकुट्ट काळात सावित्री मशालीसारख्या पेटून उठल्या नसत्या तर आजही तुम्ही आणि आम्ही अंधारयुगाच्या भिंती लिंपित बसलो असतो.
सुरेखा पैठणे
लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री /वक्ता /निवेदिकाआहेत.

Leave a Reply