अप्पर कास्ट गेझ मधून आलेला मंडेला!

अरहत धिवरे

स्त्रोत – इंटरनेट

लॉरा मल्वे या ब्रिटिश फिल्म थेअरीस्टने मीडियातली एक थेअरी मांडली. मेल गेज थेअरी. यात लॉरा म्हणतात, सिनेमात बऱ्याच वेळा स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाची जी मांडणी केलेली असते ती पुरुषांना हवी तशी किंवा पुरुषांना सुखावणारी असते. म्हणजे कमी कपड्यात असणारी स्त्री किंवा बिकिनी घालून फिरणारी स्त्री मॉडर्न, बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत असली तरीही ती पुरुषांना हवी तशी आहे, किंवा सिनेमा किंवा तत्सम माध्यमातल्या स्त्रीच्या चित्राचं अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन पुरुष प्रेक्षकांना मिळतं. त्याउलट कमी कपड्यात असलेले पुरुष किंवा कपडे न घातलेले पुरुष हे प्रचंड मर्दानी वगैरे दाखवलेले असतात. स्त्रियांना वाचवण्यासाठी तत्पर असलेले पुरुष सिनेमात आपल्याला सर्रास बघायला मिळतात. हे झालं मेल गेज.

याच गोष्टीकडे आपल्याला भारतीय सिनेमात दाखवलेल्या जाती आणि त्यांच्या मांडणीच्या दृष्टिकोनातूनही पाहता येऊ शकतं. जसा सिनेमात मेल गेज बघायला मिळतो तसाच अप्परकास्ट गेजही बघायला मिळतो.

याचं उदाहरण म्हणून आत्ताच नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘मंडेला’ सिनेमाकडे बघता येईल. मंडेला एक उत्तम राजकीय उपहास (पॉलिटिकल सटायर) आहे असं मेनस्ट्रीम मीडियातल्या लेख किंवा रिव्ह्यूजमध्ये वाचायला मिळतं. पण सिनेमात दाखवलेल्या संपूर्ण गोष्टीला जात परिप्रेक्ष्यातून बघावंच लागेल. सिनेमा पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला आवडतो. मलाही तो आवडला होता, सामान्यपणे मनोरंजक असल्याने सिनेमा आवडतोच. फिल्म क्रिटिक्सच्या पारंपरिक भाषेत बोलायचं झालं तर इथेच सिनेमा जिंकतो. पण सिनेमा जिथे आपल्याला आवडतो तिथे खरंतर आपण हरलेलो असतो. अजून सोप्पं करून सांगतो.

सिनेमाचा नायक एका मोठ्या झाडाखाली लोकांचे केस कापण्याचा व्यवसाय करतो. झाडाखाली एक तुटकी खुर्ची आणि संपूर्ण चेहराही दिसू शकणार नाही असा एक आरसा, एवढंच काय ते दुकान. यासोबतच गावातल्या लोकांचं पडेल ते काम तो करतो. मिळणारे थोडे बहुत पैसे साठवून त्याला गावात मोठं सलून टाकायचं असतं. त्यासाठी जमवलेले पैसे चोरीला जाऊ नये म्हणून तू पोस्टात ठेव, असा सल्ला गावातलाच एक व्यक्ती त्याला देतो.
गावात नवी आलेली पोस्टमास्तर (पोस्टमास्तर ह्या शब्दाला मराठीत दुसरा पर्याय सापडला नाही) त्याला अकाऊंट उघडण्यासाठी आयडी विचारते. काहीच आयडी नसल्याने आणि त्याला त्याचं मूळ नाव माहित नसल्याने ती त्याला नेल्सन मंडेला नाव देते. त्याला त्याचे आयडी कार्ड्स बनवून देते. गावात निवडणूका असतात. गावातले दोन वेगळ्या जातीतून येणारे आणि सावत्रभाऊ असलेले दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहतात. गावातले दोन्ही पार्टींचे समर्थक लोक मोजले तर समान आकडा पुढे येतो आणि नव्याने मतदान कार्ड मिळालेला नेल्सन मंडेला गेम चेंजर ठरणार म्हणून आजपर्यंत त्याला हाडतुड करणाऱ्या दोन्ही पार्ट्या त्याची मर्जी राखायला सुरुवात करतात.

नाव नेल्सन मंडेला असलं किंवा त्याचं मत गेमचेंजर असलं तरीही त्याची जात मात्र तीच पूर्वीची असल्याने गावातल्या लोकांचा मात्र मंडेलाला विरोध असतोच. दोन वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली त्याला लोक घराच्या मागच्या दरवाजाऐवजी पुढच्या दरवाजाने प्रवेश देतात, पण मर्जीविरोधात. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याला आश्रय दिलेला असतो परंतु गावातले लोक त्याच्याकडे दाढी किंवा केस कापण्यासाठी येणंही बंद करतात. 
शेवटी निवडणूक होते, तो मतदान करतो. दोन सावत्रभावांपैकी जो कुणी निवडणूक हरेल त्याच्या कार्यकर्त्यांनी मंडेलाला मारण्याचा कार्यक्रम आधीच ठरवलेला असतो, म्हणजे काहीही झालं तरीही मंडेलाचं मरण आता फिक्स असतं. पण आपल्या मताच्या लोभाने त्या दोन उमेदवारांकडून गावासाठी अनेक चांगली कामं करून घेतलेली असल्याने दोन मिनिट आधीपर्यंत विरोधात असलेलं संपूर्ण गाव त्याच्या बाजूने उभं राहतं. 

सिनेमातलं गावातल्या खालच्या जातीतून येणाऱ्या नायकाचं चित्रण कसं आहे हा मूळ प्रश्न आहे. सिनेमातला नायक तोच पिचलेला, प्रतिकार न करू शकणारा, सगळं सहन करणारा. बरं त्याचं किंवा त्याच्या बापाचं स्वप्न पण तेच… गावात एक मोठं सलून सुरु करायचं. एवढं असूनही गावात आपल्या मताच्या अधिकाराच्या जोरावर अनेक लोकोपयोगी कामं करून घेऊनही गावातल्या सामान्य लोकांचा त्याच्याशी वागण्या बोलण्याचा दृष्टिकोन तोच. अगदी शेवटी त्याला मारायला नेत्यांचे गुंड आल्यावर एका सेकंदात गावातल्या अप्परकास्ट लोकांना जाग आली आणि ते या गरीब बिचाऱ्या, खालच्या जातीतल्या मंडेलाच्या मागे उभे राहिले. म्हणजे सगळं करून चांगलं काय तर आम्ही अप्परकास्ट असून एका लोवरकास्ट माणसाच्या मागे उभं राहिलो आणि आमचा गाव एक झाला किंवा गाव म्हणून आम्ही किती आदर्श आहोत हे शेवटी दाखवून दिलं.

संपूर्ण गाव शेवटी त्याच्या मागे उभं राहिलं हे खरं असलं तरीही ते का राहिलं याचा विचार इथे करावाच लागेल. मंडेलाने आपल्या मताची लालच देऊन गावात रस्ते करून घेतले, गावातली शाळा सुधरवली. रस्त्यावर दिवे लागले, गावात बस आली. एवढं सगळं त्याने केलं, म्हणून गाव त्याच्या मागे उभं राहीलं. गावाने स्वतःचा गिल्ट क्षमवण्यासाठी किंवा दयाभावनेने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधी माणूस म्हणून त्याला मिळालेली वागणूक कशी आहे ? त्याला गावाने माणूस म्हणून कधीच स्वीकारलेलं नाही, या गोष्टीकडे सामान्यपणे दुर्लक्ष होऊन, गाव आणि गावातली सर्व लोकं सरतेशेवटी किती चांगली आणि समजूतदार झाली या भावनेने सिनेमाचा अप्परकास्ट प्रेक्षक खुश होतो.
यासगळ्या नंतरही सिनेमात शेवटचं वाक्य येतं, “या निवडणुकीत गाव जिंकलं.” 
हे वाक्य समजण्यापलीकडे आहे. ते फक्त अप्परकास्ट प्रेक्षकांना समजू शकतं आणि ज्यांना गिल्ट आहे त्यांचा गिल्ट क्षमवू शकतं.

हा अप्परकास्ट गेज लॉरा मल्वेच्या मेल गेज थेअरीसारखाच आहे. फक्त मेल गेज मध्ये सिनेमात किंवा इतर तत्सम माध्यमात बऱ्याच वेळा स्त्रीला ऑब्जेक्ट म्हणून वापरण्यात येतं आणि इथे या सिनेमात एका खालच्या जातीतल्या व्यक्तिरेखेला(न्हावी). बाकी शेवटी सुखावतोय कोण… या सगळ्यातून दलित असेल अथवा आदिवासी किंवा भटके किंवा इतर मागास जाती ह्या सगळ्या विरुद्ध अप्परकास्ट कसे पोर्ट्रे होतायेत आणि या गोष्टीचं अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन कोणत्या वर्गातल्या प्रेक्षकांना मिळतंय हे दरवेळी तपासून बघितलं पाहिजे. एवढंच !

अरहत धिवरे

लेखक मिडिया स्टुडंट असून Freelance Video Editor आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*