पवनकुमार शिंदे

● स्पार्टा–300 चित्रपट
300 स्पार्टन सैनिकांनी पर्शियाच्या हजारोंच्या फौजेसोबत कसा चिवट लढा दिला याचे चित्रण करणारा हॉलिवूड चित्रपट 2006 मध्ये फार गाजला. भारतातील युवा वर्गात कल्ट उभे राहिले, एवढा लोकप्रिय हा चित्रपट होता.
137 वर्षांआधी, 1883 ला क्रांतीबा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शुद्रतिशूद्र व शेतकऱ्यांनी स्पार्टाच्या 300 देशाभिमानी सैनिकांनी प्रजासत्ताक वाचवण्यासाठी झरक्सिस च्या सैन्याशी दिलेल्या लढ्यातून प्रेरणा घ्यावी असे अधोरेखित केले होते.
हो 137 वर्षांपूर्वी ! मराठी साहित्यात स्पार्टा, रोम आदी जगातील विविध देशांच्या इतिहासात घडलेल्या प्रेरणास्थानांचे निर्देशन करणारे क्रांतीबा फुले हे पहिलेच व्यक्ती आहेत. तो कित्ता येत्या काळात गिरवावा लागेल…
विशेष म्हणजे प्रसिद्ध इतिहासकार जेम्स टॉड याने कोरेगाव भीमा येथील युद्धाला भारतीय थर्मोपिलई (Thermopylae) चे युद्ध असे म्हटले होते.Thermopylae म्हणजे तोच डोंगराळ भूप्रदेश जिथे पर्शियन आणि 300 स्पार्टन सैनिकांत तुंबळ युद्ध झाले होते.
●रोम आणि निरो
कोरोना (COVID-19) च्या महासंकट काळात अख्खा भारतीय समाज आर्थिक, मानसिक, सामाजिक, आरोग्यविषक बाबतीत होरपळत असताना भारतातील शासक वर्ग टाळ्या, फटाके,दिवे वगैरे लावून नागरिकांची जी प्रतारणा करत आहे, त्यावर सोशल मिडीयात निरो आणि रोम चा उल्लेख करून अनेक पोस्ट लिहिण्यात आल्या. रोम जळत असताना त्या राष्ट्राचा शासक निरो फिडल वाजवत बसला होता. राजाच जर फिडल (व्हायोलिन सारखे वाद्य) वाजवत बसला असेल तर इतर अधिकारी काय करत असतील याची कल्पना करता येईल.
तर हा रोमन राजा निरो, याचा उल्लेख क्रांतीबा फुले यांनी त्यांच्या साहित्यात केला होता. गुलामगिरी ग्रंथाच्या प्रस्तावनेत. निरो सोबत मॅकीआवेली याचा उल्लेख करून महात्मा फुले यांनी सांगितले की स्वार्थी, क्रूरकर्मा, माणुसकीला काळिमा फासणारा, कुप्रसिद्ध परशुराम याच्या समोर निरो (आणि मॅकीआवेली) फिके पडतील ! इतका परशुराम नीच होता.
निरो तर रोमला आग लागल्यानंतर फिडल वाजवत बसला, पण भारतातील शासक वर्गाची मानसिकता स्वतःहून आग लावून, त्यावर समाजद्रोही राजकारण करण्याची आहे. इतकेच नव्हे तर हा शासक वर्ग लागलेल्या आगीत स्वतः फिडल वाजवतोच, पण भारतीय नागरिकांना देखील वाजवा म्हणून, ‘इव्हेंट’ साजरे करा, हे पटवून देऊ शकतो. यासाठी Manufacturing of consent करण्यात ब्राह्मणी मीडिया अर्थातच कारणीभूत आहेच.
क्रांतीबा फुले यांचे विचार तत्वज्ञान जयंतीनिमित्त नव्या पिढीने समजून घ्यावे. ते आजही किती प्रासंगिक आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. सर्वसामान्य भारतीयांच्या मुक्तीसाठी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचे तत्वज्ञान कृतीत उतरवूयात.
पवनकुमार शिंदे
लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.

Leave a Reply