प्रिय बाबासाहेबांस पत्र…

पूजा वसंत ढवळे

प्रति,

प्रिय बाबासाहेबांस

बाबा! मी, पूजा ढवळे, तुमच्या वटवृक्षासम विस्तारलेल्या कुटुंबातील तुमचंच एक लेकरू…
तुम्ही गेल्या नंतरच्या पिढीत जन्मास आलेली मी.
बाबा! खूप लहानपणी तुमची ओळख करून देण्यात आली होती मला.

तुमची एक दुर्मिळ प्रतिमा आहे आमच्या घरात. मी जन्माला यायच्या आधी पप्पा मुंबईला गेले होते, तुमचं पुस्तकांचं ‘ राजगृह ‘ पाहण्यासाठी…
तिकडूनच चैत्यभूमीवरील एका दुकानातून पप्पांनी तो फोटो आणला होता असं पप्पा त्या फोटोंद्दल प्रत्येकाला सांगत असतात. हा त्याच फोटोला पाहत, वंदन करत मी मोठी मोठी होत गेले..
आई त्या फोटो समोर मला उभं करून शिकवायची..बाबा.. बाबा बोलायला.

आमच्या वस्तीत सुरुवातीस बुध्द विहार नव्हतं तेंव्हा दररोज प्रत्येकाच्या घरी वंदना ठरलेली असायची तिथं आम्ही लहान लेकरं सुध्दा जायचो, महिला मंडळासोबत. तिथूनच प्राथमिक संस्काराची पेरणी होत गेली माझ्यात..
वंदना म्हणता येवू लागली, तुम्ही लिहलेल्या बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथातील शब्द कानावर पडू लागले..

इयत्ता पाचवीला होते तेंव्हा विहारातील कार्यक्रमात तुम्ही दिलेल्या बावीस प्रतिज्ञा तोंडपाठ करून शेकडो लोकात म्हणून दाखवल्या होत्या…
तिथूनच कळायला लागलं की देव वगैरे सगळं थोतांड आहे, असं आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे.त्यामुळे त्यांना आपण मानायचे नाही… म्हणूनच आजतागायत कुठल्या दगडा धोंड्यावर डोकं टेकवलं नाही.

तुमची विद्यार्थ्यांसाठीची भाषणे वाचून काढली, तुम्ही लिहलेले राम व कृष्णाचे कोडे प्राथमिक शाळेत असतानाच वाचून काढले, त्यामुळे तुमच्या विचारांची पकड माझ्या बुद्धीवर अगदी मजबूत होण्यास मदत झाली आणि विज्ञान जवळचं वाटू लागलं, तेही तुमच्यामुळेच.

तुम्ही म्हणालात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.म्हणून कधीही शाळेचं तोंड न बघितलेल्या माझ्या आई – वडिलानी आम्हाला उच्च शिक्षित करण्याचं स्वप्न बघितलं.. आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी आजही कष्ट करत आहेत.

तुम्ही म्हणालात माऱ्याच्या व मोक्याच्या जागा प्राप्त करा म्हणून… सध्या स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेत उतरले, तर इथे आल्यावर थक्कच झाले…
भारतीय राज्य व्यवस्थेचा अभ्यास करताना मला प्रत्येक कलमा – कलमा मधे तुमचं प्रकांड पांडित्य उठून दिसतं, तुमचा दूरदर्शीपणा चकित करतो तुम्ही काळाच्या किती पुढे जाऊन खोलवर विचार केलात हे दिसतं…आणि त्यामुळे अभिमानाने मान उंचावते माझी आणि अभ्यासात इंटरेस्ट निर्माण होतो.

बाबासाहेब जेंव्हा मी इतिहास वाचायला घेतला आणि त्यामागून तुमचं लेखन वाचलं तेंव्हा कमालीचा विरोधाभास जाणवला मला.. तुमच्या लेखनात आणि प्रस्थापित म्हणवल्या गेलेल्या इतिहासकारांच्या लेखनात. असो तुम्ही जे जे म्हणाला होतात ते ते सगळं मी ध्यानात ठेवलंय. अगदी हे सुद्धा की ‘ जे लोक आपला इतिहास विसरतात, ते लोक आपला इतिहास कधीच घडवू शकत नाहीत म्हणून… तुमचं लिखाण वारंवार वाचून आम्ही आपला इतिहास स्मरणात ठेवण्याची कसरत करत असतो.

स्पर्धा परीक्षेला असणारा महत्वाचा विषय अर्थशास्त्र
आता तुम्हीच अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे रस वाटतो त्या विषयात.. तुमच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाच्या आधारावर RBI स्थापन झाली होती हे वाचून कमालीची स्फूर्ती संचारली होती माझ्या अंगात…
जेंव्हा मला माझ्या मैत्रिणी विचारतात की अर्थशास्त्रा सारखा अवघड विषय तुला सोप्पा कसा जातो? तेंव्हा मी म्हणते माझे बाबा अर्थशास्त्रज्ञ होते त्यामुळे मला तो सोप्पा जाणारच ना!… (तेंव्हा माझा निर्देश तुमच्याकडे असतो.) बाबा!

जिथं कुठं तुमचं नाव ऐकते वाचते तेंव्हा खूप अभिमान वाटतो.. आपला ‘ बा ‘ किती मोठा आहे याची जाणीव होत असते पदोपदी..
म्हातारी खोतारी माणसं सुध्दा रोज उठता बसता तुमचं गुणगान गात असतात.. म्हणतात की “त्या काही ‘पड़े लिखे’ बाबासाहेबाना गद्दार झालेल्यांच्या जातीतले तुम्ही निघू नका रे..!”

बाबासाहेब अलिकडेच माझी आफ्रिका खंडातील एका मुलीशी ओळख झालीय… ईथिओपिया देशातील माझी नवीन मैत्रीण सारा तिचं नाव. तिला मी विचारलं तुला गौतम बुध्द आणि बाबासाहेब माहिती आहेत का?
तर ती म्हणाली मला बुध्द माहिती आहेत पण बाबासाहेब तेवढे ओळखीचे नाहीत त्यावर मी तिला तुमच्याबद्दल नेटवर उपलब्ध असलेले विविध आर्टिकल पाठवले… ते सर्व वाचून ती खूप प्रभावित झाली.. आणि म्हणू लागली की काश असे महापुरूष आमच्या देशात जन्मले असते…
आणि तिनं तिच्या देशात सुरू असलेल्या अशांतते बद्दल मला सांगितलं… त्यावर उपाय म्हणून मी तिला तुमचा शिका! संघटित व्हा! आणि संघर्ष करा हा फॉर्म्युला सांगितला.

खरंच बाबासाहेब जिथं जिथं प्रश्न आहेत तिथं उत्तर म्हणून तुम्ही आहात..
परवा देशाने आपला ७४ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा केला… तरी काही मूळ प्रश्न जैसे थे आहेत…
त्याचं कारण म्हणजे घटना राबवणारे लोक चांगले भेटले नाही आपल्या लोकशाहीला …
आजही भरदिवसा आपल्या वस्त्या पेटवून दिल्या जातात..,
आजही सार्वत्रिक हत्याकांड घडवून आणले जातात…,
आजही जाती – पातीच्या नावावर मॉडर्न स्पृश्य – अस्पृश्य भेद निर्माण केले जाताहेत..,
आजही समाज दुभंगलेला आहे..,
जनावरांसारखी माणसं भर दिवसा कापली जातात..,
आजही वाड्या वस्त्यात स्त्रियांची आब्रू दावणीला बांधली जाते..,
आजही शोषण चालूच आहे.

हे सर्व बदलायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही..
कार्यकर्ते संघर्ष करताहेत हे महत्वाचं …
बा!
या स्वार्थी मनाला कधी कधी वाटतं तुम्ही आणखी जास्त दिवस जगायला पाहिजे होते… कदाचित या सगळ्या चाली रिती तुम्ही संपवू शकला असतात.
पण शेवटी तथागतांची शिकवण आठवते तृष्णा, लोभापसून मुक्ती..
असो..
शेवटी बाबा! एवढं आश्वासन देते की आम्ही शिकू, संघटित होऊ आणि संघर्ष सुध्दा करून दाखवूच.
ह्या समाजाविरुद्ध,या व्यवस्थेविरुद्ध,या अघोषित हुकूमशाही विरुद्ध.


जय भीम!

तुमचंच लेकरू,

पूजा वसंत ढवळे


लेखिका नांदेड येथील रहिवासी असून वाणिज्य शाखेच्या स्टुडंट असून कवियित्री आहेत.


11 Comments

  1. article is good, but one thing doesn’t sound right.
    ‘पढ़े-लिखे लोगों ने मुझे धोखा दिया’ असं बाबासाहेब कधीच म्हणाले नाहीत. संघटने करिता fund जमा करण्यासाठी लोकांना भावुक बनवायला अशे dialogue काही ‘संघटन्यांनी’ वापरले व इतिहासात फेरफार करत गेले. यपासुन आपण सावध असायला पाहिजे .

    • Kaustubh Sir, बरोबर आहे तुमचं, पण मी वरील पत्रात बाबासाहेब तसं म्हणालेत असा कुठेही उल्लेख केलेला नाही.
      धन्यवाद🙏

  2. बरोबर आहे, आपण जे विचार मांडलेत ते वास्तुस्थितीवर आधारित आहे. आता देखील अल्पसंख्याकावर होणारे अत्याचार थांबले नाहीत.

  3. Khup Chan Pooja…Babasaheb manze ek jawala nav Jari getala na rakat kasa usalayala lagat..khup urja nirman hote…aapan khup nasiwan aahot ki aapala bap khup motha hota …tya mule jawabsari sudhawadate…shika shaknagatit Hwa Ani shangarsh kara….itaka jari wachal tar aapala bap aaplaya bajulach ubha aahe aas watata ….He sagala lihatana sudha mazya dolayat pani hote…Jaibhim Jaibharat

  4. खूप छान ‘पत्र’ लिहिले आहे पूजाने. या पत्रातून तिच्यावर बाबासाहेबांचे झालेले संस्कार दिसून येतात. तिच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. जय भीम. जय भारत.

Leave a Reply to Dr. Sunil Machindra Kamble Cancel reply

Your email address will not be published.


*