आमनाकडे आमना कॉन्टेन्टनी शिदोरी शे…

अरहत धिवरे

नाशिकपासून ६५ किमी. अंतरावर असणाऱ्या सप्तशृंगी गडाचं विशेष महत्व आहे. फक्त महाराष्ट्रातलं अर्ध शक्तिपीठ एवढीच गडाची खासियत नाही. महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या भाषेचा, अहिराणीचा उगम गडावर होतो, असं भालचंद्र नेमाडे एका स्थानिक कार्यक्रमात म्हटले होते. सप्तशृंगी गडापासून तुरळक लोक अहिराणी बोलताना दिसतात. छोट्या झऱ्यासारखी इथे उगम पावलेली अहिराणी संस्कृती, नाशिकमधले कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुके करत, धुळे जळगावपर्यंत स्वतंत्र आणि विस्तीर्ण होत जाते. तालुक्यागणिक नवे वेगळे शब्द, भाषेचा लहेजा यात थोड्या बहुत प्रमाणात फरक जाणवतो पण संस्कृतीत जास्त फरक दिसून येत नाही.

सांगायचा मुद्द्दा असा की महाराष्ट्रातल्या कोणत्याच मेनस्ट्रीम चॅनेलवरवरच्या मालिका किंवा कार्यक्रमांमध्ये ही संस्कृती दिसत नाही. अहिराणी व्यक्तिरेखा किंवा कुटुंबकेंद्रित मालिका नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये शाम राजपूत, एक अहिराणी कलाकार सोडला तर कोणत्याही कार्यक्रमात काहीच दिसत नाही. सर्व मेनस्ट्रीम चॅनेल्सच्या कार्यक्रमांमध्ये तोचतोचपणा आहे. एक स्वतंत्र संस्कृतीला आणि भाषेला तिथे स्थान नाही.

पण अहिराणीने तक्रार केली नाही. वटवृक्षाला पसरण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. अहिराणीने आपलं स्वतंत्र काम सुरु ठेवलं. भाषा सहजासहजी मरत नसते. मुळात भाषा कधीच मरत नसते. नवे शब्द स्वीकारले जातात. तिच्यात अवश्यक बदल होतात. त्यामुळे अहिराणी मरेल अशी भीती वाटणाऱ्यांना चिंता करण्याचं कारण नाही.

युट्युबवर अहिराणी गाण्यांऐवढे व्ह्यूज मराठीतल्या सुप्रसिद्ध गायकांच्या गाण्यालाही नाहीत. अजय अतुलच्या खेळ मांडला गाण्याला फक्त २७ लाख व्ह्यूज आहेत. देवाक काळजी रे ला १३ कोटी. सचिन कुमावतच्या एकट्या फुगे घ्या फुगे गाण्याला २२ कोटी व्ह्यूज आहेत. अजय अतुल पासून मराठीतले अनेक सुप्रसिदध संगीतकार भावाने एका गाण्यात खाऊन टाकलेत. त्याच्या बाकीच्या सगळ्या गाण्यांना लाखात आणि कोटीतच व्ह्यूज आहेत.

मालेगावचे सिनेमे जगातले पुरस्कार घेऊन आलेत. ते अहिराणी नाहीत, पण मालेगावच्या हिंदीमध्ये आलेल्या अहिराणी म्हणी, शब्द, वाक्प्रचार त्याला रंगत आणतात. त्यांनी अहिराणीला टाकलेलं नाही. अतिशय कमी संसाधनांमध्ये बनलेले सिनेमे अंतरराष्ट्रीय ठिकाणी नावाजलं जाण्यासाठी कॉन्टेन्ट तगडा असावा लागतो. तो कॉन्टेन्ट खान्देशात आहे.

मेनस्ट्रीम मीडियाने दाखवलं नाही म्हणून काय झालं. अहिराणी संस्कृतीतून आलेल्या कलांनी छोट्या छोट्या लेव्हलवर संसाधनं उभी करूनही मोठं यश मिळवलंय. असंही आमच्याकडे एक म्हण आहेच…

“पदर शिदोरी ते व्हस जेजुरी”

आमनाकडे आमना कॉन्टेन्टनी शिदोरी शे… अशाच नई आमना बबल्या २२० मिलियन व्ह्यूज घी वना…

अरहत धिवरे

लेखक मिडिया स्टुडंट असून Freelance Video Editor आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*