गुणवंत सरपाते

“माझं प्रिविलेज मला मान्य आहे, मी प्रिविलेज्ड जातीं मधून येतो,”
नाही रं भावा. तू शोषक जातींमधून येतोस. जातींची रचना ही प्रिविलेज/अंडरप्रिविलेज्ड ह्या फ्रेमवर्क काम करत नसती. जातींची भौतिक सरंचना ‘शोषणा’वर आधारित आहे. इतरांना कनिष्ठ मानून, त्यांना जगण्याचा अधिकार नाकारून, त्यांच्या शोषणावर उभं असतं. फुले-आंबेडकर न वाचतही माझ्या वस्तीतलं शेम्बडं लेकरू हे सांगू शकतं.
तसंही प्रिविलेज ही फार चलाख तसचं अगदी हवी तशी स्वादानुसार वापरता येणारी संकल्पना आहे. इथली हेजोमनी, ग्राम्सीच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘ट्रॅडीशनल इंटलेक्च्युअल्स’ असं भासवून देतात की ‘प्रिव्हीलेज्ड’ म्हणजे काहीतरी मुक्कामाची छान छान रम्य अशी जागा आहे जिथं ‘अंडरप्रिवलेज्ड’ लोकं अजून पोचली नाहीत, कारण त्यांना तितकं ‘मेरिट, टॅलेंट’ नाही. पण पोहचतील कधीतरी ते तिथं. इथं असं दर्शवील जातं की प्रीवलेज्ड आणी अंडरप्रीवलेज्ड हे दोन्ही समूह एकाच समान जमिनीवर, फक्त काही अंतरावर उभे आहेत.
म्हणजे शोषक कुणीच नाही, तुमच्या शोषणाला कुणीच जबाबदार नाही. तुम्हीच ‘अंडरप्रिविलेज’ आहात. कारण तुमच्याकडंचं ‘प्रीवलेज्ड’ ह्या मुक्कामा पर्यंत पोहचण्यासाठीचं टॅलेंट नाही, मेरिट नाही.
मित्रा तुझी आजची अर्थिक सुबत्ता, नेटवर्क, अमाप सामाजिक भांडवल, संपत्ती, जमीन, वर्चस्व हे काय कसल्या ‘प्रिविलेज’ मधून आलेलं नसून इतरांचं माणूसपण नाकारून त्यांचं रक्त शोषून आलंय. नाहीतर तुझ्याकडं तुझी जात सोडून असलं कोणतं वेगळं विशेष टॅलेंट आहे जे गावकुसात, शेताशिवारात, रस्त्याच्या कडेल्या रक्त आटवून काम करणाऱ्या मजूरांकडं, शेकडो मैल भाकरीसाठी पायपीट करणाऱ्या शोषित समूहांकडं नाही?
न्यायालया पासून ते मीडिया पर्यंत हरएका स्पेसेस वरचा तुझा एकहाती ताबा मिळवणं हे काय ‘प्रिविलेज’ मधून आलेलं नसून कुणाची तरी तिथं पाऊल टाकायची ‘संधीचं नाकारल्या’ मुळं आहे.
तुझं ऐशोआरामात जगणं, हे आयतं आभाळातून आवतरलेलं ‘प्रिविलेज’ नसून कुणाचं तरी माणूसपण नागवून आलंय. ‘इतरांच्या’ शोषणातून आलंय. काही जिवंत माणसांना ‘खालच्या जातीचे’ ठरवून त्यांना जगण्याची बेसिक संसाधनं, डीग्नीटी नाकारून, त्यांना गुलाम बनवून, त्यांच्या पिढ्यांपिढ्याच्या रक्ताळलेल्या श्रमातून आलंय.
हे बेसिक आहे.
हा इथला वैचारिक गोंधळ फक्त आणी फक्त शोषक वर्गाला लपण्यासाठी, त्यांना डिफेन्ड करण्यासाठी मुद्दामहुन माजवण्यात आलाय. दुसरं तिसरं काही नाही. ब्राह्मण्य असंच इतकं खोलवर नॅरेटीव रुजवतं. थेट नेणीवेत की काही कळायला मार्ग उरत नाही.
हे तुम्हाला लाख भारी भारी, लांबलचक शब्दात भुलवून ठेवतील. पण आपण ठाम राहून ह्यांच्या वर्चस्वाला प्रश्न विचारत रहायचं. हे तुम्हाला सांगतील की ‘शोषक वर्ग पण आता चांगला होऊ पाहतोय’ (शोषण करणार पण तुम्हाला जय भीम घालून!) त्यांना मार्ग दाखवा. पण लक्षात ठेवा शोषक वर्गाला शिकवण हे तुमची जबाबदारी नाहीये. तुम्ही अजिबात एकही मिनिट तिथं वाया घालवू नका. तो सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. तुमचा मानवी अनुभव, तुमची ह्युमन स्पेस ही तुमचीचं आहे. जे तुमच्या शोषणावर जगतात त्यांना ती पटवून देणं, म्हणजे ठार गुलामी!
एवढं लक्षात ठेवा यार जगात कुठल्याच शोषितांना शोषक वर्गाचं ‘पुरोगामीत्व जागवून’ मुक्ती मिळत नसते.
गुणवंत सरपाते
लेखक मूळचे नांदेड येथील रहिवासी असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.

Leave a Reply