ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ४

कामगारांच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तूम्ही राजकीय उद्दिष्टांसाठीही संघटित झाले पाहिजे. केवळ कामगार संघटनेच्या बळावर मालकांच्या विरोधात कामगार विजयी होऊ शकत नाहीत, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. कामगार संघटनांनी राजकारणात शिरावे की शिरू नये या बद्दल आज दुमत असू नाही. कामगार संघटनांनी राजकारणात शिरलेच पाहिजे कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हितांचे रक्षण करणे अशक्य आहे. इतकेच नव्हे तर कमीत कमी मजुरीचे दर, कामाच्या वेळा, अन्य नियम इत्यादी सामान्य स्वरूपाच्या सुधारणा केवळ संघटनेच्याद्वारे घडवून आणणे अशक्य आहे. संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.

केवळ कामगार संघटनेच्या उद्दिष्टांचे रक्षण करणे हा एकच राजकारणामध्ये शिरण्याचा हेतू नसावा. तुम्ही आपला हेतू केवळ कामगार संघटनेच्या उद्दिष्टांपुरताच मर्यादित ठेवणे म्हणजे प्राप्त कर्तव्यालाच ध्येय समजण्यासारखे आहे. गुलामगिरी हा नशिबाचा खेळ असून कामगार वर्ग त्यातून सुटू शकत नाही, हे गृहीत धरून चालण्यासारखेच हे आहे. या उलट ही मजूरपद्धती बदलून तिच्या जागी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वांवर आधारलेली नवी पद्धती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ, समाजाची पुनर्रचना आणि अशा प्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करू शकेल? राजकीय शक्तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास या बाबतीत ते निश्चितच एक शक्तिशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे. कामगार संघटनेने राजकारणापासून अलिप्त राहणे याचा अर्थ कामगारांनी व्यक्तिशः राजकारणात भाग घेऊ नये, असा नव्हे. या उलट त्यांच्यापैकी अनेक राजकीय सभांना हजर राहतील, एखाद्या उमेदवाराच्या बाजूचे मतदान करतील. कोणी नेहमी एखाद्या राजकीय. पक्षात सहभागी राहील. कामगार संघटनांना राजकारण नको' याचा अर्थ त्या संघटनेच्या कामगार सदस्यांना राजकारण नको असा नाही.राजकारण नको’ ही धोक्याची सूचना फक्त पक्षबद्ध राजकारणासाठी आहे. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आवडीप्रमाणे स्वतंत्ररीत्या राजकारणात भाग घेऊ शकते. जर त्याच्या कामगार बांधवांच्या सहकार्याने त्यांचे स्वतःचे संघटन उभारण्यात आले असेल तर त्याच क्षणी त्याला राजकारणातून बाहेर पडावे लागेल. अशा प्रकारे स्वतःच्या वर्गाच्या उद्दिष्टांसाठी त्याच्या व्यक्तिगत शक्तीला नियंत्रित करून राजकारणातून बाहेर पडावे लागेल. या मुळे ही कामगारांची संघटना निश्चितपणे भांडवलशाहीवादी राजकीय पक्षाचे कुरण ठरल्यावाचून राहणार नाही.

तुम्हाला बहुत करून माहीत असेलच की, कामगारांच्या नावाने बोलण्याचा अधिकार सांगणाऱ्या ‘ट्रेड युनियन काँग्रेस आणि ‘ट्रेड युनियन फेडरेशन’ या दोन्ही संघटना आता एका संघटनेत विलीन होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येकीने आपल्या अर्ध्या धोरणाचा त्याग करून ऐक्य घडविण्याचे ठरविले आहे. ट्रेड युनियन काँग्रेसने, ट्रेड युनियन फेडरेशनची घटना स्वीकारली असून ट्रेड युनियन फेडरेशनने आपल्या नावाचा त्याग करण्याचे ठरविले आहे. मला असे कळले की, या ऐक्यामधील एक अट ही संघटना विशुद्धपणे कामगार संघटनेच्या स्वरूपाची असावी, अशी आहे. तिला राजकारणाशी कर्तव्य राहणार नाही. जेव्हा मी हे ऐकले तेव्हा या सद्गृहस्थांना त्यांच्या म्हणण्याचा अर्थ खरोखर समजला की नाही या बद्दल मला नवल वाटले. स्वतःच्या हातातील राजकीय शक्तीचा उपयोग आपल्यावरील अन्यायाच्या निवारणासाठी वापरण्यावर बंधने घालण्याचा हा साधा प्रकार असून हा मोठया खेदजनक प्रकार आहे. जर या एकत्रित झालेल्या कामगार संघटनेला आपली एकत्रित राजकीय शक्ती वापरावयाची नाही तर ती कशासाठी एकत्रित आली हेच मला कळत नाही. क्षुल्लक स्वरूपाचे मतभेद असेल आणि ते जर दुसऱ्या एखाद्या मोठ्या उद्देशासाठी मिटविले तर ‘तडजोड' या शब्दाला काही अर्थ प्राप्त होतो. परंतु एखाद्या मोठ्या प्रश्नाबद्दल लोकांमध्ये मतभेद असेल तर त्यांचा त्याग करून केवळ क्षुल्लक बाबींच्या स्वीकारासाठी एक होण्यात ‘ऐक्य’ या शब्दाला काही अर्थच उरत नाही. इतरांचा या बाबत कोणताही दृष्टिकोन असो परंतु मी असेच म्हणेन की कामगारांनी राजकारणापासून अलिप्त राहाण्याची जर संघटितपणे शपथ घेतली तर त्यांना तो एक अभिशापच ठरेल.

कुठल्याही परिस्थितीत आपण हे समजून घेतले पाहिजे की, आजपर्यंतचे आपले प्रयत्न केवळ सामाजिक सुधारणेच्या एकाच दिशेने सुरु होते आणि आपण विसरून गेलो होतो किंवा अर्धवट लक्षात घेत होतो की, आर्थिक उन्नतीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण यापुढे हे पक्के लक्षात घेतले पाहिजे की, आपणाला जे अन्याय सहन करावे लागतात त्याचे मूळ एकच आहे व ते म्हणजे ज्यांच्या हातात सामाजिक व आर्थिक शक्ती आहे त्यांनी कामगारांचे राजकीय हक्कही हिरावून घेतलेले आहेत हेच होय.

राजकारणात शिरणे याचा अर्थ आपला पक्ष स्थापन करणे असा होतो. पक्षाचा पाठिंबा नसलेले राजकारण ही एक कल्पनेतील वस्तू होय. स्वतंत्रपणे राजकारण चालविण्याचा व आपली पोळी आपणच पकविण्याचा प्रयत्न करणारे अनेक राजकारणी पुरुष आहेत. जो राजकारणी असा स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतो त्याच्याबद्दल मी नेहमीच सतर्क असेल तर कोणत्याही राजकीय उद्दिष्टासाठी तो निरर्थक आहे. तो काहीच साध्य करू शकत नाही. त्याच्या एकाकी प्रयत्नाने गवताचेही पीक तो काढू शकत नाही. परंतु स्वातंत्रतेची हाव धरणारे राजकारणी पुरुष त्यांच्या बौद्धिक प्रमाणिकतेमुळे स्वतंत्र राहत नाहीत, तर जास्तीत जास्त मागण्या मागण्यासाठी ते तसे स्वतंत्रपणे राहतात. या मुळेच त्यांना पक्षशिस्तीच्या जाळ्यातून मुक्त राहावयाचे असते. ते काहीही असो, परंतु राजकारणात स्वतंत्र राहणाऱ्या अनेक राजकीय मुत्सद्द्यांबद्दलचा माझा अनुभव तरी असाच आहे. पक्षाशिवाय खरेखुरे आणि परिणामकारी राजकारण असूच शकत नाही.

~~~

क्रमशः

येथून https://roundtableindia.co.in/Marathi/?p=2587&fbclid=IwAR2t0IYy1czaW6a2Z1NGuPJv1Obbe8ISBR2lH6USCS60LonkaABzNYa_rQQ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आपले संविधान-2 “ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू!” पृष्ठ क्र.१७-१९ , कौशल्य प्रकाशन

1 Trackback / Pingback

  1. ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ५ – भीमाच्या लेखण्या

Leave a Reply

Your email address will not be published.


*