सिध्दार्थ कांबळे
प्रिय पँथर…
हा फक्त लढा नाहीहे –
हा आहे तुझ्या माझ्यातल्या अणू-रेणूंच्या उत्सर्जित कणांचं चिरायूत्व
ग्रहगोल उत्थापनाच्या संदर्भात पेटलेला धगधगता अग्निडोह
सर्वांगिण सार्वभौमत्वाचा आशावादी उरूस
हा फक्त पक्षपाती तिटकारा नाहीहे –
तर जात धर्म युद्धाच सर्वोतपरी अनहिलेशन !
तू फक्त इतक्यात डोळे मिटू नये
निष्प्रभ खडकांचा इतिहास जागवू नये
हळूहळू निद्रा चिरकाळ नांदु पाहतेय
शून्याचा पसारा जग फस्त करतोय
तरीसुद्धा तू
स्वाभिमानशून्यत्वाचे थवे यातनांवर बसू देऊ नकोस
जखम अशीच भळभळू दे
ओटीपोटावरून
तू मात्र विटाळाला मुठीत घेऊ नकोस
रक्तांकित वाहणारी तुडुंब गावकुसे
निष्पर्ण होत गेलेली प्रेतवाही अंगाई
अंधारात खचलेली-सडलेली फुले ठार
हे कशाचं द्धोतक समजशील ?
इतिहासाला माणसे लागतात
चिरडायला खायला
तू मात्र हुकुमबारी बनू नकोस
त्यांचा हिशोब फक्त हाताळत बसू नकोस
लक्षात घे –
इथे
पाण्याला अस्ते भूक- खायला प्यायला
पोटुसपणाच्या परिक्रमेला
हाडकी हाडवळ्याची भरते जत्रा-
याची त्याची बिनचेहऱ्याची
हीनतेची भाषा साधर्मी असते बघ
त्रिकालबाधित
ती पहा
चिरव्याकुळ हत्याकांड तर चक्क झुलतायेत
फेरा धरतायेत नाचतायेत
कधी कधी उस्मरतातही
इथे विरुद्धार्थी घटनेचा मानेइतबारे पंचनामा होतो
तरी म्हातारा वरच्या आळीतल्या दगडाला झपाटतो
त्यांच्यातल्या रक्तस्रावाच वांझपण म्हणूयात याला हवं तर
तू मात्र या अज्ञानाचा बळी ठरु नकोस !
आता –
असंख्य लाटा एकाच वेळी मस्तकाला बिलगतील
त्या फक्त लाटा नाहीत
दुःखाच्या अंतिम यात्रेचं पूर्वरूप समज हवं तर
त्या झिडकारत तोडत येतील निवडुंगाची बेट
नि पेरतील
सम्यक त्सुनामी
दुष्काळी किनाऱ्यांच्या जगात
उंचावतील
आपल्या भविष्यकालीन महात्मेपणाची ध्वजा
निळ्याशार आभाळभर…
नि ठासून सांगतील आपल्या क्लासिकल लढाईचे ब्लास्टिंग सूत्र
प्रिय पँथर…
तू मात्र सूर्याला विसरू नको !
सिद्धार्थ कांबळे
लेखक टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) येथे PhD रिसर्च स्कॉलर आहेत.
- नामदेवा… - February 15, 2022
- प्रिय पँथर… - July 15, 2021
मस्त सिद्धार्थ भाई… निःशब्द…तुझ्यातला पँथर लेखणीतून ओतप्रोत उतरलाय…सूर्याला कायम हृदयात जपणारा जय भीम💙