कुरुंदकरांचा ब्राह्मणी दर्प आणि बहुजन द्वेष

सिद्धांत बारसकर

काल नरहर कुरूंदकरांची जयंती होती. कुरूंदकर हे नाव मला फेसबुक वर पहिल्यांदा ऐकण्यात आले. त्यांच अनेक मित्रांच्या वॉल वर कौतुक पाहिलं. त्यांच्या पुस्तकातले उतारे वाचण्यात आले. प्रथम दर्शी हे व्यक्तीमत्व फार पुरोगामी तटस्थ अत्यंत सेक्युलर वगैरे वाटलं. पण त्यांची पुस्तकं वाचल्यावर भ्रमनिरास झाला.
त्यांचे फेसबुक दिसणारे वरील उतारे वगैरे Cherry picking चा भाग होते हे लक्षात आलं.

याला कारण ठरलं त्यांच शिवरात्र हे पुस्तकं. यातील गांधी हत्या आणि मी या प्रकरणात कुरूंदकर ब्राह्मण विरोधी दंगलीं बद्दल लिहताना कुचक्या बहुजन समाजाचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला आहे. कुरूंदकर लिहतात, “काँग्रेस मध्ये ब्राम्हणेतर समाज आलाच 1936 च्या नंतर. हा सर्व ब्राम्हणेतर समाज तोपर्यंत स्वातंत्र्यापासून दूर, टिळकांच्या विरोधी, चिरोलचे आणि गांधीजींच्या विरोधी सजातीय संस्थानिकांचे कौतुक करण्यातच रंगला होता!”

पहिले गोष्ट ज्या काळी टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करत होते तेव्हा तो लढा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लढा होता का हे तपासायला हवे. टिळक फक्त त्यांच्या राजकीय हक्कांसाठी आणि राजकीय प्रतिनिधित्वासाठी आणि स्वतःचे धार्मिक वर्चस्व पुन्हा प्राप्त करण्यासाठी मोर्चेबांधणी करत होते. दुसरी कडे टिळक तात्कालिक सुधारकांना म्हणजे काँग्रेस मधील ‘सामाजिक सुधारणा पहिले’ असं मत असलेल्या नेत्यांना साईडलाईन करत होते. आणि टिळक काही बहुजन वर्गासाठी करणार होते असे वाटत नाही याची प्रचिती त्यांच्या कुप्रसिद्ध वक्तव्यातून येते, “तेल्यातांबोळ्यानी संसदेत जाऊन नांगर हाकायचा का!” जर तेल्यातांबोळ्याला तुम्ही प्रतिनिधित्व देणार नसाल तर तो तुमच्या वैयक्तिक हितासाठी का झक मारणार? शिवाय ब्रिटिश सरकारच्या राजकीय स्थैर्यामुळे भारतीय बहुजन वर्गाची परिस्थिती काही प्रमाणात स्थिर झाली होती. पेंढारी वगैरे लुटारू जमातींपासुन होणारी लुट थांबली होती. त्यांना कित्येक वर्षातून सप्तबंदीतून बाहेर पडून शिक्षण घेता येत होते.
या पार्श्वभूमीवर तेली तांबोळी कुणबी हा बहुजन समाज टिळकांच्या मागे जाणे हे अशक्य होते.

आता ‘स्थानिक सजातीय संस्थानिकांचे कौतुक’ या कडे येऊं. त्यावेळचे सजातीय संस्थानिक म्हणजे अर्थात छत्रपती शाहू महाराज. त्यांच कौतुक हे साहाजिक होतं. शाहूंनी बहुजन वर्गास शिक्षण दिले होते. आरक्षण देऊन बहुजन वर्गास वर उचलून सामाजिक समतलीकरण करण्याचा ते प्रयन्त करत होते. ब्राम्हणेतर चळवळ जी फुलांच्या सत्यशोधक चळवळीची पुढची आवृत्ती होती तिला समर्थन करत होते. आमच्या क्रिडा कलांना राजाश्रय देत होते. मंदिरात पुजेचा हक्क देत होते. म्हणून त्यावेळी बहुजन समाज काही लोकांच्या जातवर्चस्ववादी लढ्यात न सहभागी होता साहजिकच त्यांची सामाजिक परिस्थिती सुधरवणाऱ्या छत्रपतींच्या पाठीशी होता. हे तर झालच पण शाहू महाराजांनी टिळकांना “टिळक विरुद्ध चिरोल” या खटल्यातून सुध्दा वाचवलं होतं.

ह्याची जाणीव बुद्धीप्रामाण्य मानणाऱ्या पुरोगामी कुरूंदकरांना का झाली नाही? स्वतःच्या वैयक्तिक लढ्याला स्वातंत्र्य लढ्याचे नाव देऊन त्यात बहुजन समाज नव्हता हा आरोप लावून आणि सजातीय संस्थानिकांचे कौतुक करण्यात रंगील असे शब्द वापरून उलट बहुजन समाजावर रिव्हर्स कास्टीजम चा आरोप लावू पाहणारे कुरूंदकर, शाहूंच कौतुक खटकणारे कुरूंदकर हे जातवर्चस्ववादी वाटतात. शिवाय गोपाळ गोडसे (नथुराम गोडसे चा भाऊ) याने स्वतःच्या पुस्तकातून सावरकरांना थेट गांधीहत्येत ओढलं असताना त्यावर पांघरूण टाकून स्वतःचे जात भाई वि.दा.सावरकर यांना बचावू पाहतात. तरीही पुरोगामी गांधीवादी वर्गाला त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं असल तर खुशाल नाचावं.

सिद्धांत बारसकर

लेखक सोलापूर येथील रहिवासी असून B.B.A. चे विद्यार्थी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*