ब्राह्मण सवर्णांनी त्यांच्या स्वतःच्या समुहाचे प्रबोधन करावे

हेममाला कांबळे

टीआरपी

आपल्याबाबत घडणाऱ्या कोणत्याही वाईट गोष्टीला आपण स्वतःच कसे जबाबदार आहोत, हे सांगण्यासाठी इतक्या भाकडकथा लिहिल्या, वाचल्या, बोलल्या व दाखवल्या जातात… अगदी अलीकडची म्हणजे ‘क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील सिरीयल टीआरपी अभावी बंद होत असल्याची भाकडकथा!’

एका मराठी डान्स शोचा एक एपिसोड बघत होती. तो निवेदक सांगतो की, “यावेळी एकूण तीस लाख वोटिंग झाले! (शेवटच्या एपिसोडला सांगतो साठ लाख!)” तुम्हाला हे खरे वाटते? मराठी लोकांची संख्या किती? त्यात ते अमुकच चॅनेल बघणारे किती? त्यातही नाचगाण्याचे कार्यक्रम नियमित बघणारे किती? आणि त्यातून मग वोटिंग करणारे किती? तर हे असे भंकस काहीही सांगून दिवसरात्र निव्वळ बिनकामाचा मसाला हे मनोरंजनवाले लोकांच्या माथी मारतात. बरं मग महामानवांच्या सिरीयलला टीआरपी नाही आणि दिवसभर जे तद्दन निरुपयोगी प्रसारण सुरू असते, त्या सर्वांना टीआरपी मिळतो? हे प्रश्न इतर भंगार कार्यक्रमांबद्दल, फालतू कंटेंट बद्दल विचारले पाहिजे होते. ते सोडून मोर्चा इकडे आंबेडकरी लोकांकडे वळवला! ही हुशारी, हेच मेरिट!

कंटेंट
तर, सिरीयलमधील कलाकारांचे फोटो आता महापुरुषांचे म्हणून सोशल मिडिया, इंटरनेट, इ. वर दिसायला लागले आहेत. अजून अशा अनेक गोष्टी या सिरीयलच्या उपद्व्यापामुळे पुढे येणार आहेत. आधीच आम्हाला स्वतःच्या उत्कर्षाचे मार्ग दिसू नयेत याची पूर्ण व्यवस्था केलेली असते. त्यात यांचे हे नवीन उपक्रम.

सिरीयल असो की सिनेमा, त्याची मध्यवर्ती भूमिका ही स्टोरी, दिग्दर्शन, इ. टप्प्यात ठरत असेल की नाही? मग बाबासाहेबांचे (न झालेले) घरगुती सेलिब्रेशन्स, समारंभ, कधी कोणी न पाहिलेली लग्नपत्रिका, लग्नघरातील कोणी न बघितलेले कार्यक्रम, इ. इ. त्यांचे वैयक्तिक जीवन जसे दाखवले जात होते, त्यात कलेची, काल्पनिकतेची लिबर्टी घेऊन काय साध्य केले? कोणती प्रेरणा निर्माण केली? मग अशा उपक्रमांचा उद्देश तरी काय असतो? उदा.‌ शाळेच्या भागात ब्राह्मण गुरूजीचे महात्म्य दाखविणे. याची काय गरज होती? बाबासाहेबांनी स्वतः लिहून ठेवले आहे की त्यांनी कोणत्या वातावरणात शिक्षण घेतले.

तसेही, यांच्या माकड-उड्या बंद करायची वेळ आलेली आहे आता. तुमचे बारीक आवाजातले व नको तिथे किंचाळत बोलणे, स ला श म्हणणे, नको तिथे येल पाडून बोलणे-वागणे, बहुजन जाती-जमातीची भूमिका साकारताना तोंडाला काळा रंग लावणे, हे सर्व तुम्हीच बघत बसा हे या ब्राम्हणी कलेच्या कल्लाकारांना कोणीतरी कानात ओरडून सांगितले पाहिजे.

सहभाग – प्रकल्प कोणाचा? फायदा कोणाचा? आणि ग्राहक कोण?
बहुजन जाती-जमातीच्या लोकांना मुख्य भूमिका न देता महामानवांचे विचार सांगायला ब्राह्मणी कलाकार घेऊन येतात. यातूनही उत्पन्न मुख्यत: उच्चवर्णीय सवर्णांच्याच खिशात जाणार आहे; तर त्याचा प्रचार-प्रसारही त्यांच्याच शाखांमध्ये, काॅलन्यांमध्ये करावा की नाही? तर ते सोडून येतात इकडे रडगाणे गात, “एवढे तुमचे बाबासाहेब साकारतोय, तरी तुम्ही बघत कां नाही?” असे म्हणत, पाय आपटत. खरे म्हणजे, तरीही लोक सिरीयल बघत होते, सिरीयलवर चर्चाही करत होते. पण यांना झेपणारे नाही, बाबासाहेब, महात्मा फुले… म्हणून सिरीयल गुंडाळून ठेवली.

(टीप:- हीच गोष्ट रवीश, कन्हैया, रॉय, पटवर्धन, वागळे, सिन्हा, इ. अनेकांची आहे.) महामानवांचे फक्त नाव घेऊन आता चालणार नाही. समस्यांचे मूळ व वर्तमानात त्या कोणामुळे टिकून आहेत; त्या जातीव्यवस्थेवर हे लोक बोलत नाहीत. स्वतःच्या उच्च जात जाणीवा या लोकांना ते करू देत नसाव्यात. किती महत्त्वाच्या जागांवर ब्राह्मणी उच्चवर्णीय सोडून इतरांना सामावून घेतले, हा प्रश्न यांना आता लोक विचारायला लागले आहेत. शिक्षणाचा अभाव, आरोग्याचे प्रश्न, गरिबी, बेरोजगारी, विषमता, भेदभाव हे आजचे प्रश्न जातीव्यवस्थेमुळे आणि त्यामुळे उच्चवर्णीयांकडे एकवटलेल्या पिढीजात प्रिविलेजेसमुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत. या प्रश्नांवर जर हेच लोक बोलत असतील; तर या प्रश्नांना कारणीभूत कोण? सत्ता, संपत्ती, संसाधन, संस्था कोणाच्या नियंत्रणात आहेत? हेदेखील बोलावे लागेल. आणि हे सर्व शोषितांना, समस्याग्रस्त लोकांना नाही, तर शोषक आणि शासक जातींकडे जाऊन त्यांनाच सांगावे लागेल. अशा प्रकारच्या सर्व प्रिविलेजवाल्या उच्च जातीय लिबरल पुरोगाम्यांनी यापुढे एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी कार्यक्रम न घेता उच्चजातीयांसाठी काही प्रबोधनपर सिनेमे, सिरीयल, पुस्तके, इ. काढली तर ठीक राहील.

हेममाला कांबळे

लेखिका इंजिनिअर असून शासकीय सेवेत कार्यरत आहेत, तसेच त्या स्वतंत्र ब्लॉगर आहेत.

2 Comments

  1. TV व ईतर मिडिया यावर यावर बाम्हणांचे कसे वर्चस्व आहे व ते याद्वारे बामनी विचार पेरण्याचे कसे काम करतात याबध्दल बहुजन समाजात प्रबोधन करणे गरजेचे आहे.
    बहुजन समाजातून बामनी विचारातून मुक्त होणार्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*