राहुल पगारे
जब्बार पटेलांचा मुक्ता बघितला. चित्रपटांची कथा पटकथा दिग्दर्शन वगैरे सगळं पटेल साहेबांनी केलं. वरवर जातीवर भाष्य करणारा, पुरोगामी पठडीतला हा चित्रपट वाटतो. पण थोडं निरीक्षण ठेवलं तर यातली सवर्ण – ब्राह्मणगिरी बिलकुल सुटली नाही. ती कशी ?
तर सिनेमाच्या टायटल सहित, सिनेमाची मूळ कथा ही मुक्ता नावाच्या सवर्ण हिंदू मुलीला अनुसरून आहे. सवर्ण हिंदू मुलीचं कशी कुंचबणा होते ? कसं शोषण होतंय ? आणि तिचं भावविश्व व तिच्या संघर्षाला प्रदर्शनात मांडलं एक मुख्य पात्राची भुमिका देऊन. हे चित्रण इतकं भंपक आहे की विचारु नका. सवर्ण हिंदू श्रीमंत मुलीचे शोषण हा यांचा कथागाभा आहे, पण या संपूर्ण सिनेमात दलित स्रीला कुठेच स्थान नाही. नायकाची आई, बहीण, मैत्रीण, किंवा इतर सहाय्यक पात्र सुद्धा दलित स्री भोवती नाही. विशेष म्हणजे जब्बार पटेल फुले आंबेडकर वाचून अभ्यासून आहे, असं असताना सिनेमाचं नाव मुक्ता ठेऊन, स्री शोषणाला अधोरेखित करताना मुक्ता साळवेच्या कविता, निबंधाची आठवण होऊ नये ? का ? काय कारण असावं की मुक्ता नावाच्या पात्रात जात व स्री शोषणाला अधोरेखित करताना मुक्ता साळवे आठवण झाली नसल्याची? कदाचित सवर्ण हिंदू पुरोगामी मुलीचे शोषण होतेय हे भकंस दाखवताना विरोधाभास निर्माण झाला असता ! कदाचित फोकस शिफ्ट होऊन सवर्ण मुक्ता ही आपल्या मांगाच्या मुक्ता साळवे समोर निव्वळ निरर्थक, हास्यास्पद ठरली असती!
सिनेमाच्या कथानकात नायक संघर्ष करताना एक प्रसंग असाही येतो की एका गावात एक दलित विधवा स्रीची नग्न धिंड काढली म्हणून आंदोलन करतो. पण हा प्रसंग २ तास २२ मिनिटांच्या संपूर्ण सिनेमात निव्वळ ३-४ मिनटात आटोपता घेतला. कारण दलित स्त्रियांच्या समस्या, तिच्या शोषणापेक्षा, नाकारलेल्या सामाजिक दर्जा व न्यायापेक्षाही जब्बार पटेलांचा इंटरेस्ट हा सवर्ण हिंदू मुलीच्या choice of partner साठीचा तिच्या परिवाराच्या संघर्षा सोबत दाखवून तिचं हलकं हलकं शोषण मोठं मोठं करुन दाखवुन, अधोरेखित करण्यात जास्त होता.
सिनेमाचं लेखन स्वतः जब्बार पटेलांनी केलं आणि सिनेमात एका ठिकाणी एक डॉयलॉग वापरला की मेनस्ट्रीम मधे काम करायचं तर सगळ्यांचा द्वेष करुन जमत नाही! आता मेनस्ट्रीम तर ब्राह्मणांच्या हातात आहे. म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करु नये असे ते म्हणतात आणि म्हणूनच सिनेमाच्या मुख्य पात्रात मुक्ताचा परिवार ब्राह्मण ऐवजी मराठा दाखवण्यात आला. मराठा एक राज्य व त्या राज्यातलं प्रादेशिक राजकारण व शेती सोडलं तर देशव्यापी शोषणात कुठेच नाही.पण ब्राम्हण आहेत. प्रत्येक राज्यात, प्रत्येक राजकीय पक्षात, साहित्य क्रिडा मनोरंजन मिडिया, सगळ्या अशा key power agency ब्राह्मणांच्या हातात आहे. ब्राह्मण हा इथला ruling class, शोषक आहे. ब्राह्मणांच्याच कल्पनेतून इथे जातीय विषमतेची निर्मिती झाली. मग असं असताना मुक्ताचा परिवार मराठा ऐवजी ब्राह्मण का दाखवला नाही ? पुरोगामी ब्राह्मण मित्रांच्या संभाव्य नाराजीला मख्ते नजर जर पटेल पारंपरिक जातीय शोषक म्हणून represent करु शकत नसतील तर त्यांनी पुरोगामी सिनेमा बनवत असल्याचा आव आणले जाणारे धंदे करु नये. यात ही गमतीचा भाग असा की मुख्य पात्र नायक हा महार व बौध्द म्हणून उल्लेखला गेला. त्याची संघटना डावी संघटना म्हणून तीन चार ठिकाणी उल्लेख झाला पण मिलिंद वाघ हा आंबेडकरवादी म्हणून कुठेच उल्लेख झाला नाही. का ? आंबेडकरवादी हा शब्द पटेलांना का झेपला नाही ?
एका पार्टीत एका ठिकाणी नायक मिलिंद वाघ जात हाच शोषणाचा आधार आहे हे strongly assert करतो तरी त्याला डाव्याचा का म्हणून दाखवलं ? डाव्यांचा व जातीच्या प्रश्नांचा काय संबंध ? विशेषतः ६० च्या दशकात रिपब्लिकन चळवळ, ७० च्या दशकात दलित पँथर चळवळ आणि ८० च्या दशकात बामसेफची चळवळ अशा तीन वेगळ्या फॉर्मटच्या तीन वेगळ्या चळवळी झाल्या आणि तिन्ही चळवळी आंबेडकरवादी होत्या. मग या तिन्ही चळवळी जब्बार पटेलांनी जवळून बघितल्या असताना व मुक्ता सिनेमां ९० नंतर बनला असताना मुख्य पात्र नायक डावे ऐवजी आंबेडकरवादी म्हणून सांगण्यात काय अडचण होती ? कोणत्या पुरोगामी चमूला खुश करण्याचा प्रयत्न होता हा ? हे प्रश्न मुक्ता बघताना सतत पडत गेले.
आणि हो जातीअंत चळवळीवर भाष्य करणारे साहित्य, कलाकृती निर्माण होत असेल तर महारांच्या मिलिंद वाघ सोबत चळवळीत खांद्याला खांदा लावून लढणारी मांगमहाराचीच मुक्ता साळवेच शोभेल, ९६ कुळी मुक्ता पाटील किंवा मुक्ता जोशी कुलकर्णी नाही. कथानकाची तात्विक व व्यवहारिक दृष्ट्या सकस मांडणी होणे गरजेचे, प्रस्थापितांना निव्वळ लोणी लावायचे धंदे नकोच.
राहुल पगारे
लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक – कार्यकर्ते आहेत.
- क्रांतिकारी फुलनदेवी यांचे शेखर कपूरने केलेलं विकृतीकरण - February 14, 2022
- 200 हल्ला हो : ब्राह्मण मसीहाचे उदात्तीकरण आणि जातीप्रश्नाचे विकृतीकरण - September 11, 2021
- सनातनी/पुरोगामी/मार्क्सवादी ब्राह्मण सवर्ण बुद्धाचा द्वेष का करतात? - September 3, 2021
उत्कृष्ट विश्लेषण