लैंगिकतेच्या चर्चा : बहुजन समाज आणि ब्राह्मणवर्गाच्या चालबाजी

सागर अ. कांबळे

बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी ब्राह्मणीजम कसा वेगवेगळे मार्ग अवलंबून आपल्याला चकवा देतो ते समजून घेतलं पाहिजे. आपल्याला गोंधळात टाकणं, रिऍक्शन द्यायला भाग पाडणं हा त्यांचा खेळच आहे.

स्त्रियांच्या प्रश्नांवरील चर्चेत असं तंत्र त्यांच्याकडून जास्तच वापरलं जातं. ते क्षेत्र त्यांच्या रणनीतीसाठी सहज सुलभ आहे. “एका गावात गरीब ब्राह्मण..” या मिथकापेक्षा.
सतीप्रश्न सोडवण्यासाठी, विधवा पुनर्विवाह यासाठीची चळवळ आणि शूद्रातिशूद्र स्त्रियांच्या कल्याणाच्या चळवळी इथून या लढ्याला सुरुवात होते. दोन्ही लढे महत्वाचे होते.
बऱ्याच खालच्या जातीत काही प्रमाणात पुनर्विवाह होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. शूद्रातिशूद्रांना मिळत न्हवतं ते शिक्षण, सन्मान, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगण्याची आर्थिक संसाधने. या समस्या बहुजन स्त्री पुरुष दोघांच्या होत्या आणि आहेत.

आजच्या वेळेतील थेट उदाहरणे घेऊन हे द्वंद्व समजून घेऊया. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा जो डिस्कोर्स (विचारविश्व) आहे त्यात नैतिक ताकद (मोरल हाय ग्राउंड) कुणाला मिळत आहे हे समजून घेतलं तर ब्राह्मणी म्युटेशन (बदलत राहणारं वर्चस्व) समजून घेणं सोप्प जाईल.

लैंगिकता संबंधी प्रश्नांचे चर्चाविश्व ब्राह्मणी वर्चस्वाला काबीज करणं जास्त सोप्प गेलं आहे. सुरुवातीच्या काळात जे स्त्रीवादी लिखाण झालं, ज्याला झंझावाती संबोधलं गेलं त्यात कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध या संरचनांना प्रश्न करण्यात आले. लैंगिक स्वातंत्र्यावर परखड लिहिण्यात आलं, बोलण्यात आलं. टाळलं गेलं ते म्हणजे धर्माची (ब्राह्मणग्रस्त हिंदू धर्म) चिरफाड करणं. ज्या धर्माने या स्त्री दास्य आणि जातीव्यवस्थेला नैतिक पाठबळ मिळवून दिलं, विषमतेचं समर्थन केलं त्या धर्माला हात घालणं टाळण्यात आलं. आणि तरी या एलिट (ब्राह्मण वर्गातील) स्त्रियांच्या लेखनाला क्रांतिकारकत्व देण्यात आलं. या गटाकडून मोरल हाय ग्राउंड मिळवलं गेलं.

मुक्त लैंगिकता, समलैंगिकता याबाबत भूमिका घेणारे विचार हे पुरोगामी, समाजहिताचेच विचार आहेत. त्याला सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांकडून पाठींबा मिळत राहिला पाहिजे. पाठींबा असतानाही मग अनेकदा बहुजन व्यक्ती वेगळी प्रतिक्रिया नेमकी का देतो? बहुजन कार्यकर्त्याला, व्यक्तीला जाणवत असतं या चर्चाविश्वात काहीतरी गफलत आहे. कमतरता आहे. फार कमी लोकांना हे बारकावे कळतात. मुद्दा थेट आहे. लैंगिकतेचे प्रश्न हे फक्त उच्चभ्रू स्त्रियांचेच असतात का? असं अजिबात नाही. ब्रा च्या वापराचा मुद्दा घेऊ. हा प्रश्न थोडा वेळ उच्चभ्रू वर्गातील स्त्रियांचा समजू. पण दुसरी ऐतिहासिक, सामाजिक बाजू आपण समजून घेतली पाहिजे. बहुजन स्त्रिया आणि ब्रा या गोष्टीचा तसा काही संबंध न्हवता. चोळी आणि झंपर आणि घालणाऱ्या या स्त्रिया. पदर खेचून काम करणाऱ्या. पोटऱ्या, पोट, क्लिव्हेज दिसेल याची फिकीर पण न करणाऱ्या. बहुजनांची गाणी, गीते, म्हणी, हुमान, भाषा मुक्त लैंगिकतेने भरलेली आहे. बऱ्याच आदिवासी जमातीत तर चोळी पण वापरल्या जात नाहीत/न्हवत्या. ही झाली आपल्या बहुजन पार्श्वभूमीची एक बाजू. पण दुसरी बाजू पण आहेच की. आपण बहुजन स्त्रिया पोरींना का स्टीरिओटाईप करायचं? सध्याच्या जमान्यातील ज्या बहुजन तरुणी आहेत त्यांचे प्रश्न, अडचणी या एलिट वर्गातील मुलींसारख्या असू शकणे स्वाभाविक आहे. त्यामुळे हे बहुजन पोरींचे प्रश्नच नाहीत असं म्हणणं चुकीचे आहे. या सगळ्या चर्चाविश्वात एक गोंधळ मात्र आहे तो समजून घेतला पाहिजे.

सध्या अशी विरोधाभासाची परिस्थिती झाली आहे (आणि हे एलिट वर्गाकडून पद्धतशीर घडवून आणले जाते) की जणू लैंगिकता ही सामजिक परिवर्तनाच्या लढ्यातील सर्वात महत्वाचे क्षेत्र ( site of revolution) आहे असा विचार प्रबळ करणे, पुढे रेटणे. जे स्थान सामाजिक, आर्थिक विषमता बद्दलच्या प्रश्नांना मिळायला पाहिजे. बहुजन कार्यकर्त्यांची अस्वस्थ प्रतिक्रिया इथूनच येते.
वटपौर्णिमा सणाच्या वेळी एका व्यक्तीने लिहिले होते की, “ही समस्या नाही तर लग्न ही समस्या आहे आणि वटपौर्णिमा ( स्त्रियांचे व्रतात, बंधनात अडकणे) हा परिणाम आहे.” आता वरवर हे खूप सहज आणि बरोबर वाक्य वाटते. पण यात नकळत पुन्हा धर्माला, ब्राह्मणी संस्कृतीला दुय्यम समस्या म्हणून दाखवलं आहे. हीच असते चालबाजी, किंवा विचारांच्या मर्यादा म्हणा.

बहुजन विचारविश्वात लैंगिकता आणि त्याबद्दलचे स्वातंत्र्य, प्रश्न यांच्याबद्दल काही प्राधान्य नाही असे नाही. फुल्यांनी दुसऱ्या विवाहबद्दल सावित्रीबाईंना दिलेले उत्तर आपल्याला माहीत आहेच. लैंगिकता हेच सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे असं पुढे रेटून सामाजिक संरचना, सर्व्हायव्हलचे प्रश्न यांना मिळणारं स्थान, ऊर्जा दुसरीकडे जावू नये हाच हेतू बहुजन कार्यकर्त्यांचा असतो. त्यामुळे आपण हे प्रश्न आमचे नाहीतच असं म्हणू नये. रणनीती समजून घ्यावी. गरज पडेल तेव्हा अशा विषयात हस्तक्षेप करावा. केरळातील खालच्या जातीतील स्त्रियांना स्तन झाकण्यासाठी मुभा मिळणे हे परिवर्तन होतं. एकीकडे न्यूडीटी म्हणजे स्वातंत्र्य ; दुसरीकडे मजूर बायकांना अंग झाकायला कपडे मिळणं म्हणजे स्वातंत्र्य आहे. एकीकडे लग्न विरहित जीवन जगणे म्हणजे स्वातंत्र्य मानलं जाईल; पण दुसरीकडे आंतरजातीय लग्न हेच क्रांतिकारक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे लैंगिकता या विषयातील एकचएक असं सोईस्कर नरेटिव्ह एलिट वर्गाकडून मांडलं जाणं म्हणजे स्वहितसंबंध रेटणं. एका प्राध्यापकाने आम्हाला पुरुष सत्तेचं राजकारण (Politics of masculinity) या विषयावर एक डॉक्युमेंटरी दाखवली होती. त्यात सगळे पुरुष हे बहुजन समाजातील कामगार होते. याला बोलतात चर्चाविश्वाचं manipulation (चालबाजी).

तर मुद्दा हा आहे समलैंगिकता, लैंगिकतेचे प्रश्न यावर बोलणारी, भूमिका घेणारी उच्चजातीय व्यक्ती एकंदरीत सामाजिक परिवर्तन लढ्याच्या क्षेत्रात जे मोरल हाय ग्राऊंड मिळवायला बघते ना, ती खरी समस्या आहे. अशा व्यक्ती मग त्यांच्या अनुभवाच्या आणि सामजिक आकलनाच्या बाहेरील गोष्टीवर, सामजिक-आर्थिक विषमतेवर काही मत मांडायला लागते तेव्हा तिच्या मर्यादा दिसायला लागतात. विरोधाभास हाच आहे. इकडून मोरल हाय ग्राऊंड मिळवून, वाहवा मिळवून त्यांना वाटतं की आपण आता पूर्णच सामजिक परिवर्तनाचे हिरो आहोत. ज्या व्यवस्थेची ती खरंतर लाभ घेणारी असते. ती status quoist असू शकते.

प्रश्न पुन्हा एकदम बेसिकवर आणून ठेवला पाहिजे? Who gets what, when and how? माझ्याकडे काय आहे? ( Kuffir’s words : ‘The Land I stand On’) हा सामाजिक परिवर्तन लढ्याच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू राहिला पाहिजे.

सागर अ. कांबळे

लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

1 Comment

  1. बहुजनचा विचार राजकीय ठीक आहे पण सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निकामी आहे हे स्पष्ट दिसत आहे. आता बऱ्याच जातींनी हिंदु किंवा क्षत्रिय बनण्याचा निर्धार केला आहे. ८५ विरुद्ध १५ अशी कोणतीच भावना लोकांमध्ये नाही हे आपण सर्वांना दिसत आहे. जमीनदार जातींना वगळता येईन अशी ओळख निर्माण करा लागीन.

Leave a Reply

Your email address will not be published.


*