जयंत रामटेके
मी दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यामध्ये विचारल होत की मिलीटरीमध्ये अधिकारी बनन्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची ( CDS, NDA, AFCAT ) तय्यारी करणार्या एखाद्या एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्याला आपण ओळखता काय ? ह्या पोस्टला 18 likes व दोन Comments आले त्या मित्रांचे आभार. ह्या पोस्टला अल्प प्रतिसाद मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या परीक्षांबद्दल बहुजन समाजात असलेला माहितीचा अभाव. मिलीटरीच्या अधिकारी पदांसाठी आरक्षण नसल्यामुळे, बहुजन युवक ह्या परीक्षा देण्याच्या भानगडीतच पडत नाही. त्यामुळे आज मिलीटरी च्या – एअर फोर्स, आर्मी, नेव्ही ह्या विंग्सच्या लाखो अधिकाऱ्यांमध्ये 85% लोकसंख्या असलेल्या एससी/एसटी/ओबीसी चे प्रमाण 5% पेक्षा पण कमी म्हणजे नाहीच्या बरोबर असावे. त्याउलट शिपाई/सैनिक लेव्हलला एससी/एसटी/ओबीसीचे प्रमाण 95% पेक्षा जास्त असावे
मिलीटरीच्या अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या ह्या शाही स्वरुपाच्या असतात. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसारखा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा जनप्रतीनिधींचा राजकीय दबाव नसतो, त्यांचे राजकीय बॉसेस नसतात, त्यांच्यावर जनतेचा दबाव नसतो. त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा असतात, क्लबस, स्वस्तामध्ये मिलीटरी स्टोअर्स मधुन वस्तु, मुलांसाठी मिलीटरी स्कूल्स, सेंट्रल स्कूल्स, घरी नौकरांचे काम करण्यासाठी दोन-चार शिपाई, कुत्र्याची देखभाल करण्याचे, त्याला बाहेर फिरवायचे, भाजीपाला घेण्याचे, सगळे काम शिपाईच करतात.
काही लोकांना वाटत असेल की मिलीटरी च्या अधिकाऱ्यांना प्राणाची जोखीम घेऊन सर्विस करावी लागते. तसे काही होत नाही. पूर्णसर्विसमध्ये झालेच तर एखादे युद्ध होते. त्यामध्ये सुद्धा त्यांना फ्रंटवर लढावे लागत नाही.
मग, तरी ह्या मिलीटरी अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यासाठी एससी/एसटी/ओबीसी चे युवक का प्रयत्न करत नाही ? ह्याचे उत्तर आहे अज्ञान, माहितीचा अभाव व आरक्षण नसलेल्या सरकारी नोकऱ्यांप्रती असलेली उदासिनता. ऊद्या जर ह्या मिलीटरी अधिकाऱ्यांच्या पदांसाठी आरक्षण लागू झाले तर एका झटक्यात सगळे लोक MPSC/UPSC Civil Services सोडुन ह्या नोकऱ्यांच्या मागे लागतील. दुसरे आणखी एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे ह्या मिलीटरी अधिकाऱ्यांची सिलेक्शन प्रक्रिया ही मुळात ग्रामिण भागातील, सरकारी शाळेतून, मात्रृभाषेत शिक्षण घेतलेल्या युवकांच्या विरोधी आहे. मी स्वतः 1991 मध्ये, 12 वी मध्ये NDA ची परीक्षा पास करुन 4-5 दिवसांची SSB म्हणजेच Interview प्रक्रिया अनुभवलेली आहे. ही SSB ची प्रोसेस खुप indepth असते. त्यामुळे ह्यामध्ये सिलेक्ट होणारे युवक हे एकतर मिलीटरी अधिकाऱ्यांची पोरच असतात व ते सगळे सेंट्रल स्कूल्स, मिलीटरी स्कूल्स, पब्लिक स्कूल चे विद्यार्थी असतात, मोठ्या शहरांत राहणारे असतात.
हे सगळे जरी खरे असले तरी, एससी, एसटी, ओबीसी युवकांनी मिलीटरी अधिकाऱ्यांच्या दरवर्षी हजारोंच्या संख्येत भरल्या जाणाऱ्या नोकऱसाठी तयारी न करणे, प्रयत्न न करणे व बोटावर मोजण्याजोगत्या MPSC/UPSC च्या नोकऱ्यांच्या मागे लागणे, हे बहुजन समाजामध्ये आजही असलेल्या अज्ञानाचे, माहितीच्या अभावाचे, असमंजसपणाचे द्योतक आहे.
जयंत रामटेके
लेखक Meritorium Knowledge Academy चे संस्थापक असून आयआयटी मुंबई, तसेच आयआयएम कलकत्ता येथून पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तसेच विविध MNCs मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर वीस वर्षांपेक्षा अधिक कामाचा अनुभव आहे.
- मिलीटरी अधिकाऱ्यांच्या नौकऱ्यांप्रती बहुजनांची उदासीनता - July 18, 2021
- सरकारी नौकऱ्यांच्या तयारीचा मायाजाळ… - July 5, 2021
Leave a Reply