काडीमोड ~ निमित्य अण्णा भाऊ साठेंची जयंती

दिवस उगवला.त्याची सोनेरी किरणं नांदगावाकडं धावली.माणसं उठली,त्यांची श्रमशक्ती कार्यक्षम झाली.औताड्याची सखुबाई देवळातून परतली.शंकर जंगम बोलला-‘तुझ्या पोराची रास चांगली आहे,यंदा त्याच्यावर तांदूळ टाकून मोकळी हो.’
सखु आनंदली.भीमाचं लगीन करायचं असा तिनं निश्चय केला.सखुचा नवरा एकएकी मेला तेव्हा सखु अवघी 20 वर्षांची होती नि तिच्या पदरी 2 वर्षाचा भीमा होता.झिंग्याएवढं मुल आज ना उद्या मरंल नि बुडता हिस्सा मोकळा होईल असं सर्व औताडे म्हणत होते.
हे मुल आहे तर सारं आहे.त्याला मोठं करत जगण्याचा तिनं निश्चय केला.मी मुलाला मरू देणार नाही.या विचारानं तिचं मन बलिष्ट केलं होतं.भावी सुखासाठी भयंकर दुःख तिनं गिळून घेतलं आणि सर्व शक्ती एकवटून ती जगू लागली.
कडव्या शिस्तीचा रंधा फिरवून त्याच्या मनाचे सर्व खोंबार तासून गुळगुळीत केले होते.तो बस म्हटले की बसत होता,उठ म्हटले की उठत होता.
भीमा 20 वर्षाचा तरणाबांड गडी झाला.आईच्या कडक शिस्तीत तो हसताना दिसत नसे.कमी बोले.मनाविरुद्ध काही घडले तर तो फक्त ‘भले’ म्हणून चालू लागे.तो काम कर म्हणताच कामाला जुंपून घेई नि पुरं कर म्हणावे तेव्हाच ते पुरं करी.’आता दिवस मावळला, पुरं कर की भीमा.’ असं सखु म्हणताच तो तिच्याकडे न पाहताच म्हणे- ‘भले!’ मग मघाशीच न्हाय का सांगायचं ?’ रेड्याचं बळ अंगात असून त्याच्या चेह-यावर आनंद नव्हता म्हणूनच पोराच्या ओसाड जीवनात आनंद फुलविण्यासाठी ती त्याच्या लग्नाच्या मागं लागली होती.
सखु पांढरवाडीत भैरुबापुढं उभी राहिली तिने हात जोडून देवाला नवस केला-‘देवा,माझ्या मुलाचं लगीन जुळू दे.म्होरच्या वर्षी मुलगा नि सुन ह्यास्नी गाठ मारून त्येंची वावरजत्रा तुझ्या दरबारापातुर आणीन.’
त्याच महिन्यात पाडळीची मनाजोगी नवरी ठरली.भीमाचं लग्न झालं.हरणा सासरी आली.भीमा नि सखुच्या जीवनात चमत्कार घडला.भीमाच्या चेह-यावर आनंद फुलला.सखुची सुन हरणा फुलानं डवरलेल्या वेलीसारखी दिसत होती.सारा गाव तारीफ करू लागला तेव्हा सखुला अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं.
परंतु सखुला भैरुबाच्या नवसाची आठवण झाली.जर आपण शब्द पाळला नाही तर देवाचा कोप होईल.
हरणा घरात होती.भीमाचा आत्मा उगीचच घरात घोटाळत होता.परंतु त्याच वेळी सखुला पेच पडला होता. उष्टं फळ देवाला चालणार नाही.भीमाला आवरला पाहिजे असं तिनं ठरवलं आणि भीमाला बाजुला घेऊन ती हळुच म्हणाली-‘म्या भैरूबाला नवस केला म्हणून तुझं लगीन झालंय तवा देवाच्या पाया पडल्यावाचून तू हरणाला शिवू नगं का बोलू नगं-न्हाय तर देव कोपंल!’
भीमा गंभीर झाला.खर्रकन उतरला. काहीच बोलला नाही तशी त्याची हिंमतच कधी झाली नाही-अखेर ‘भले!’ म्हणून तो गप्प बसला.सखुबाई चिडली-‘बिथरू नगं.तुझ्या भल्यासाठीच म्हंत्ये मी.त्यो देव वंगाळ हाय..त्याला वावगं खपत नसतं.वाटुळंच करील त्यो.’
‘मग काय करू?’
‘बायकुच्या अंगाला हात लावू नगं का बोलू नगं.नि ही गोष्ट कुणाला सांगू नगं.’
त्या दिवसापासून घरात कुंद वातावरण दाटलं.
रोज भीमा देवळात जावून पडत होता.सकाळी आला की सखु संशयानं पाहत होती.आई पहात आहे म्हणून भीमा हरणाकडे पाहण्याचे टाळीत होता नि कारणाने पाहताच आजारी माकडाप्रमाणे पापण्या पाडून भुई टोकरीत होता.आणि त्याचा हा अवतार पाहून हारणा बुचकळ्यात पडली होती.घरात माणसं अवघी तीन त्यापैकी या दोन मानसांच्या मनात कसला बेत रचला जात आहे,ही अशी अवंदळी का आहेत,ती हात राखून बोलतात याचा हारणा रोज विचार करीत होती.ती करपत होती,मनात कुढत होती. दोन महिने तसेच रेटले आणि एके दिवशी नव-याला एकांतात गाठून त्या घुम्या वर्तनाचं कारण विचारलं.परंतु त्यावेळी भीमा काहीच न बोलता गुमान चालता झाला.हरणाला त्याचा संताप आला,ती खुप रडली.या घरात आपली गरज नाही म्हणून तिने माहेर गाठले. गावभर भीमाची बायको पळाली असा बभ्रा झाला.जो तो कारण विचारू लागला तेव्हा सखु हादरली. हरणा गेली,भीमाला वाईट वाटलं पण आई आणि भैरूबा यांच्या दोन उग्र मूर्ती त्याच्यापुढे गप्पकन आल्या नि तो गप्प बसला.दुस-या दिवशी सखुबाई भीमाला म्हणाली-‘भिम्या आता बसू नगं.पाडळीला जावून आपल्या बायकुला घेवून ये.जा बरं.’
भीमा उठला आणि पाडळीची वाट चालू लागला.त्यानं एका दमात चार मैल वाट तुडविली नि भर दुपारी सासुरवाडीत दाखल झाला.तेव्हा दोनशे घरांचा तो जमाव भर्रकन त्याच्याभोवती जमला नि त्यानी क्षणात बाजार भरवला.
‘का म्हून पोरीला बोलत न्हाय ?’
‘काय अनेव केला तिनं?’
‘तिच्या पाठीवर कुणी न्हाय असं वाटतं का काय तुम्ही?’
जिकडून तिकडून ललका-या उठू लागल्या आणि पावसात रेडा खुशाल चरतो तसा भीमा खुशाल ऐकू लागला.त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं कारण त्यानं जन्मभर तसला भडीमार रात्रंदिवस ऐकला होता.
‘ए पाव्हण्या,तू काय किवंडा हायीस?’
‘भले!,मला ऐकू येतंय की.’ भीमा हळूच उत्तरला.
सर्वांनी वेढलेलं पाहून हरणाला त्याची दया आली पण ती आता काहीच बोलू शकत नव्हती.
‘पोरीला का बोलत नाही त्येचा आम्हासनी जबाब पाहिजे.’
त्या म्हाता-यांनी भीमाच्या पाठी तगादा लावला तेव्हा भीमा कण्हत म्हणाला-‘त्ये आईला ठावं हाय.’
घरात हरणा रडत होती.भीमा भोळा आहे हे तिला माहित होतं.त्याच्यावर आलेला प्रसंग पाहून तिला कापरं भरलं होतं.
‘ह्यो दांडगा हाय.’
‘द्या दणकं.’
‘दे सोडचिठ्ठी. ‘ असा एकच गिल्ला झाला.
भीमा ओठावरून जीभ फिरवित सर्वांच्या तोंडाकडे पाहत होता.इतक्यात एका म्हाता-याने कुडाची काडी ओढून ती भीमापुढे टाकून म्हणाला-‘घे ती काडी नि दे काडीमोड, आनि जा.’
त्या दंग्यात भीमा गुदमरला होता.जा म्हणताच त्याला धीर आला.त्यानं चटकन ती काडी घेऊन मोडली तसा घरात हरणानं हंबरडा फोडला.
मग तो म्हातारा म्हणाला, ‘ही अर्धी काडी घेऊन जा.’
भीमाला हायसं वाटलं त्याने ती काडी घेऊन घर गाठलं.
भीमा एकटाच पाहून सखु चरकली.
‘भीमा,हरणा कुठाय ?’
“भले!” भीमा वैतागून म्हणाला, ‘सारा गाव मला मारीत व्हता,मरत होतो.’
‘आनि रं काय ?’ सखुनं भयभीत होवून विचारलं.
आणि हातातील काडी तिच्यापुढे टाकून भीमा म्हणाला,’काडी मोडून दिली तवा सुटलो मी.’
भीमानं हरणाला काडीमोड दिली हे लक्षात येताच सखु ऊर बडवित उठली,जोरदार बोंब ठोकली.सारा गाव थरारला आणि सखुबाईच्या घराकडे धावत आला.
‘सखुबाई, काय झालं ?’
‘भीमानं काडीमोड दिली’ असं म्हणून ती पुन्हा रडू लागली.तेव्हा जंगम म्हणाला-‘अगं पर का ?’
तेव्हा सखुबाई म्हणाली-‘#त्याभैरूबाचंमडंगेलं! #त्याच्यानवसापायीमाझीसोन्यावाणीसुन_गेली.’ असं म्हणून वावरजत्रा, नवस,भीमाला दिलेली ताकीद हे सारं तिनं लोकाना सांगितलं तेव्हा लोक विचारमग्न झाले.इतक्यात हरणा आणि तिचा बाप दोघं अंगणात आली. हरणाला पाहताच सखुचा जीव भांड्यात पडला.पण हरणाचा बाप कडाडला-‘माझ्या पोरीला काडीमोड देवून जावई पळून आला त्येचं नाव काय ?’
तेव्हा कोंडिबा हसला व म्हणाला–
‘अवं,हतं भात कमी नि वराण फाजील हाय! म्हंजी अक्कल कमी नि शहाणपण फाजील!’
सखु पुढे आली सर्व प्रकार पाव्हण्याला सांगितला तेव्हा पाव्हणा हासू लागला.हरणा हसत होती,सखु हासत होती, सारा गाव हासत होता..


थोर साहित्यिक व “सांगून गेले मला भीमराव..” हा विचार आपल्या प्रत्येक कलाकृतीतून साकारणा-या थोर विचारवंत आण्णाभाऊंचा विचार अंगिकारून आपण सर्वांनी प्रकाशवाट चोखाळावी या उद्देशाने खंबीरपणे व हळुवार देव-नवससायास व प्रगती यांचा संबंध नाकारणारा विचार पेरणारी आण्णाभाऊंची “काडीमोड” ही कथा त्यांच्याच शब्दात संक्षिप्त स्वरूपात एकेक अक्षर कष्टपूर्वक मोबाईलवर कोरत देत आहे..
आण्णा भाऊंचं साहित्य वाचताना “दिड दिवसाची शाळा” मोडित निघते व त्यांच्या प्रज्ञावंत शाळेत प्रवेशल्याचा आनंद मिळ्तो तद्वतच प्रत्येक कृती पंचशील अधोरेखीत करताना दिसते तेव्हा आण्णा भाऊंच्या विचाराच्या उंचीला मन नतमस्तक होतं..
आण्णाभाऊ साठे जयंतीच्या आपणा सर्वांना लाख लाख मंगलकामना.

~~~

साभार: भारत सातपुते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*