शिक्षणातून परिवर्तन होण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेच परिवर्तन व्हायला पाहिजे

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव

शैक्षणिक क्रांतीला तेव्हा सुरुवात होईल जेव्हा शाळेत दिवसाची सुरुवात पसायदान, मनाचे श्लोक, गीताई अथवा इतर कोणत्याही प्रार्थनेने न होता संविधानाचे कलम, पिरिओडिक टेबल, प्रेरित करणाऱ्या कविता इ. महत्वाच्या बाबींनी होईल. काउंटर करण्यासाठी म्हणू शकता की श्लोक वगैरेनी मुलांचे उच्चार शुद्ध/स्पष्ट होतात किंवा मुलांची लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची क्षमता कळून येते. पण भारत सोडला तर इतर देशातही मुलं या सगळ्याशिवाय व्यवस्थित बोलूही शकतात आणि बुद्धीही थोड्या-जास्त प्रमाणात तेवढीच असते. मला आजही गीताई, मनाचे श्लोक वगैरे लक्षात आहेत कारण ते बालवाडीपासून शिकवण्यात आले होते. त्याचा आता काहीच उपयोग नाही पण तेच तर पिरिओडिक टेबल माझ्याकडून नीट करून घेतलं असतं तर कदाचित दहावीनंतर मी करिअरचा दुसरा मार्ग निवडला असता. शाळेत असताना फक्त संत किंवा देवांच्याच नाही तर बुद्धांबद्दलसुद्धा एक प्रार्थना होती. ‘बुद्धदेवा तुझी ज्ञानगंगा’. तेव्हा तर काही कळतही नव्हतं पण बुद्धांना देवाची उपाधी कोणी दिली कोणास ठाऊक. आम्ही तर आधीपासूनच देवाचं अस्तित्व नाकारलंय पण या प्रार्थनेमुळे इतर मुलांनीही तेव्हा हाच बोध घेतला असेल की बुद्धसुद्धा देव होते. मराठी शाळेत सरस्वतीपूजन हासुद्धा एक प्रकार होता. सर्व धर्माची मुलं शाळेत असताना सरस्वतीपूजन करून काय साध्य झालं असेल कोणास ठाऊक. 

संस्कृत शिकण्यात किती मुलांना रस असेल शंकाच आहे पण शाळेत तेही शिकवलं जातं. अगदीच संस्कृत अभ्यासक्रमात ठेवायचंच असेल तर इंग्लिश सोडून दुसऱ्याही फ्रेंच, जर्मन अशा भाषा शाळेत शिकवल्या गेल्या पाहिजेत. संस्कृतचे अभ्यासक्रमात असलेले श्लोक अजूनही पाठ आहेत. त्याऐवजी जर तेव्हा मागणी असलेल्या फॉरेनच्या भाषा शैक्षणिक धोरणात समाविष्ट केल्या असत्या तर आता मुलांना जास्त संधी मिळाल्या असत्या. संस्कृतमध्ये करिअर करणारे खूप कमी आहेत त्यासाठी सबंध शाळेला ऐच्छिक का होईना पण 100 मार्कांचा पेपर असण्याला लॉजिक ते काय असू शकेल?

जग एवढं पुढे गेलंय पण आपल्या बेसिकमध्येच गडबड आहे. मुलांच्या मेंदूवर जोर द्यायचा अजिबात हेतू नाही. पण मुलं तेवढी सक्षम असताना आपण त्यांना ठराविक गोष्टींमध्ये अडकवून त्यांचेच पाय मागे खेचतोय असं वाटत नाही का? शैक्षणिक धोरणामध्ये प्रचंड मोठा बदल व्हायला हवा. अजून 10-20-30 वर्षांनी अमेरिका, जपान, चायना, रशिया टेक्नॉलॉजी मध्ये प्रचंड पुढे गेलेले दिसतील आणि त्याच वेळेला आपली मुलं बेसिक गरजाच अपुऱ्या पडतायत म्हणून मागे राहायला नकोत. नवीन पिढी जगात आणायला जास्त कष्ट नाही लागत पण त्या पिढीला व्यवस्थित शिक्षण आणि जगाची ओळख करून देणं आपलं काम आहे. म्हणून एवढ्यातच सरकारने, राजकारण्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि आपणही लक्ष दिलं पाहिजे. काल परवाच इंजिनिअरिंग डिग्री मराठीमध्ये करून देण्याबद्दल बातमी आलेली. बीए बीकॉम तर आताही मराठीत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकायचं असेल तर इंग्लिश शिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्र सोडला तर मराठीला कोणी विचारत पण नाही. कार्पोरेट मध्ये मराठीला किती व्हॅल्यू आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे ही असली धोरणं विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक आहेत.

बहुजन समाजापुढे(एससी, एसटी, ओबीसी) खूप जास्त समस्या आहेत. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रात समस्या आहेत. एक – एक समस्या सोडवायला गेलं तर आयुष्य कमी पडेल म्हणून आपण सर्वांनीच एकजुटीने, समांतरपणे सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.

आपण सगळे वेगवेगळ्या पक्ष/संघटनांमध्ये विभागले गेलोय पण राजकारणातलं प्रतिनिधित्व, सामाजिक विकास हे कायमच आपले कॉमन ध्येये राहतील. सगळे पक्ष/संघटना वेगवेगळ्या पातळ्यांवर पोहोचल्यात पण आजही बऱ्याच खेड्यांमध्ये रस्ते नाहीत, वीज नाही, शाळा दूरवर, दवाखाने नाहीत. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात जवळजवळ 150-200 गावं आहेत. आपण खरंच एकमेकांशी कनेक्टेड आहोत का? आपल्या तालुक्यातल्या 50 तरी गावांची नाव सांगू शकतो का? आपण फक्त राजकीय नाही तर वैचारिक दृष्टीने पण विखुरले गेलोय. आपली ध्येय जशी समान आहेत तशी मूल्ये सुद्धा समान हवीत. यासाठी प्रत्येक आपली वाडी, वस्ती, नगरं एकमेकांशी कनेक्ट करायला हवीत. या लहान मोठ्या गोष्टीसुद्धा चळवळीसाठी महत्त्वाच्या ठरतात. 

महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या गावांमधल्या बौद्ध वाडी, वस्ती, नगर कनेक्टकरण्याचं काम हाती घ्यायला हवं. भटके, आदिवासी, छोट्या दुर्बल जातींना पण जोडून घेतल पाहिजे. जास्त नाही प्रत्येक गावातले शिकलेले 2-2 तरुण जरी कनेक्टेड राहिले तरी ते आपल्या वाडी वस्तीचं प्रतिनिधित्व करू शकतात. आणि एक विषय जेव्हा हजार लोक उचलून धरतील तेव्हा त्याचा इफेक्ट दिसायला सुरुवात होईल. एकदा का तरुणांचं जाळ उभं राहिलं की त्या त्या गावात असणाऱ्या विषयांनासुद्धा एकीने मार्गी लावता येईल. जर हे खरंच शक्य झालं तर लवकरच फरक दिसायला सुरुवात होईल.  जर एखाद्या गावात रस्त्याचा विषय असेल किंवा दुसरी बेसिक अडचण असेल तर राजकीय पक्ष, संघटनामार्फत आवाज उठवता येईल. आपले पक्ष तर कायमच मदतीसाठी उभे राहतील फक्त समस्या  निदर्शनास आणून देणं आपलं काम आहे. आपल्या वाडी वस्तीसाठी असलेला निधी ग्रामपंचायत कसा वापर करतेय इकडेही लक्ष देण प्रत्येक वाडी वस्तीचं काम आहे. आपला हक्काचा पैसा इतरत्र जाणार नाही म्हणूनसुद्धा चौफेर लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याच शिकलेल्या तरुणांनी आपल्या वाडी वस्तीतल्या मुलांना करिअर, जगाबद्दलसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे. 

राजकीय क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींनी स्वतःच्या पोटाकडे दुर्लक्ष होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवं. जे जे चळवळ म्हणून ग्राउंड वर आहेत त्यांनी स्वतःचा इनकम सोर्स आधी उभं करणं गरजेचं आहे. राजकारणाला करिअर म्हणून अवश्य बघावं पण त्यावर अवलंबून राहण्यात शहाणपण नाही. आपल्या मुलांनी स्किल्स डेव्हलप करण्याकडेसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. जग खूप पूढे गेलंय त्यामुळे आपण जास्त मागे राहणार नाही याकडे वैयक्तिक विचारसरणीप्रमाणे लक्ष द्यायला हवं. व्यवस्थित शिक्षण, नोकरी-व्यवसाय करून भक्कमपणे चळवळीचा भाग होता येईल हे विशीतल्या तरुणांनी लक्षात घ्यायला हवं. कारण अर्थिकदृष्टीने जेवढे आपण खंबीर असू तेवढंच पुढच्या पिढीला कशाचीही कमी न पडता घडवता येईल.

शैक्षणिक धोरणांमध्ये बदल आणि आपलं जाळ उभं करणं हे आताच्या घडीला महत्वाचे मुद्दे आहेत. खेड्यातल्या मुलांना जगाची ओळख होणं खूप जास्त गरजेचं आहे. गुणवत्ता, बुद्धिमत्ता तिथेही आहेच पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. चांगलं शिक्षण, आरोग्य मुलांचा हक्क आहे आणि तो मिळवून द्यायला आपण आता झटलं पाहिजे. आपापसातले मतभेद बाजूला ठेऊन विधायक कृती केल्या तर आपल्यालाच फायदा होईल. राजकीय मतभेद असतील पण समाजाचं भले कायम आपल्या अग्रस्थानी असेल यात मुळीच शंका नाही. बऱ्याच गोष्टी आहेत, कुठूनतरी सुरुवात करूया.

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव

लेखिका नवी मुंबई येथील रहिवासी असून MNC मध्ये Senior Analyst ह्या पदावर कार्यरत आहेत.

2 Comments

  1. प्रज्ञा मैंने तुम्हारा पोस्ट पढ़ा और मैं भी मानता हूं लोगों ने एक ऐसा संगठन बनाना चाहिये, जो राजनीतिक होने के साथ ही सामाजिक भी होना चाहिये। संगठन में बाबा साहेब को मानने वाले लोग हो तो ज्यादा अच्छा होगा, संगठन के लोग गांव में जनजागरुकता के कार्यक्रम करे, समाज के लोगों को आपस में जोड़ने का काम करे। मेरी शिक्षा गैर मराठीभाषी प्रदेश मध्यप्रदेश की राजधानी भोपाल में संघ के स्कूल सरस्वती विद्या मंदिर में हुई है, तुम्हारे विचारों से सहमत हूं, शिक्षा में बड़े बदलाव की गुजांइश है।
    ये मेरा जॉब्स का वेबसाइट है, फ्री जॉब्स दिलाने में हेल्प करता हूं
    https://bhaskarjobs.com/home/

  2. खुपच वैचारिक लेख आहे हा प्रज्ञाजी.
    इंग्रजी सोबत इतरही परदेशी भाषा खुप महत्त्वाच्या आहेत. प्रादेशिक भाषेला अस्मितेचा मुलामा देऊन कुपमंडूक पद्धतीने जगण्यात काही अर्थ नाही.

    विचार करायला लावून शोधप्रवृत्ती जागृत करणारे शिक्षण मिळणे संपूर्ण भारतीय समाजास खुपच आवश्यक आहे.

    जयभीम

Leave a Reply

Your email address will not be published.


*