पेरियार : ब्राह्मणी वर्चस्वास सुरूंग लावण्यासाठीचा बूस्टर डोस

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे

फुले, शाहू, आंबेडकर यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक इशारे आपल्याला दिले होते.
सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रात बहुजन जातींचे वर्चस्व किती महत्त्वाचे आहे, हे म.फुले यांनी अखंड, नाटके, लेख लिहून दाखवून दिले. पण या अस्सल बावनकशी वारशाकडे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आणि सरंजामी जातींनी अक्षरशः दुर्लक्ष केले. याचाच परिणाम पुण्यातील एका पेठेतील, एका जातीपुरती मर्यादित असणारी भेदभावाची संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती, संपूर्ण राज्याची संस्कृती म्हणून प्रसिद्ध केली. त्याच संस्कृतीचा, जातीचा किळसवाणा गवगवा आणि दबदबा सर्व क्षेत्रात आज हावी आहे. यातूनच जेम्स लेन सारख्या बांडगूळांना हाताशी धरुन जिजाऊ-शिवराय यांची बदनामी करणाऱ्याला महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला. हा फुलेंच्या वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा परिणाम.

बाबासाहेबांनी दिलेले इशारे, जसे की, सर्व क्षेत्रांत सर्वसमावेशी लोकशाही, संसाधनांचे न्याय्य वाटप, जातीयतानिर्मूलन, महिला सक्षमीकरण व पितृसत्तेची समाप्ती, सायंटिफिक टेम्पर, संघराज्याची संतुलित व्यवस्था, व्यक्तीपुजेचा विरोध, हिंदू-बाह्मणी राष्ट्राचा संभाव्य धोका याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज लोकशाही झुंडशाही झाली आहे. दंगल-खून-तडीपारीत लिप्त लोक आज मोठ्या घटनात्मक पदांवर आहेत. संवैधानिक नैतिकतेच्या ठिकर्या होऊन लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित झाली आहे. दहशतवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीला संसदेत पाठवणारा भारत कदाचित एकमेव आधुनिक लोकशाही देश असेल. संसाधनांवर आज ही फक्त काहीच जातींचा, उद्योगपतींचा कब्जा आहे. जातीयतानिर्मूलन राहिले बाजूला, आता तर जातीयवाद सरकार स्पाँन्सर्ड झाला आहे. नोकरशाही, न्यायालये, मिडिया सगळीकडं ठराविक जातींचीच-परिवारांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचाराला तिलाच जबाबदार धरून, पीडितेची जात-धर्म बघून सोयीस्कर निषेध आणि बलात्कारी गुन्हेगाराच्या समर्थनात मोर्चे काढले जात आहेत. स्वतः प्रधानमंत्री प्राचीनकाळी भारतात प्लास्टिक सर्जरी होत होत्या म्हणून सांगतो, गटारीतून गँस काढायला लावतो. केंद्रीय सत्ता एकाच ठिकाणी एकवटल्यामुळे, हिंदी भाषेच्या आग्रहामुळे, ब्राम्हणी संस्कृती लादली जात असल्याने आज राज्यांमध्ये असंतोष वाढत आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच ईशान्येकडील दोन राज्यात दंगल झाली. खाजगीकरणातून पद्धतशीरपणे आरक्षण आणि बहुसंख्य ओबीसी-दलितांचे प्रतिनिधित्व संपवण्यात येत आहे. CAA-NRC सारखे कायदे आणून देशाला ब्राह्मणीराष्ट्र बनवले जात आहे.
हा बाबासाहेबांनी दिलेल्या इशार्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम.

छ.शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात दलित-मागासवर्गीयांना आरक्षण आणि सर्वांना मोफत शिक्षण दिले. डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेची कदर करून त्यांना शिक्षणासाठी निरपेक्षपणे मदत केली. त्यांनी या उदात्त कामांतून खूप मोठा संदेश दिला. तो म्हणजे, सर्वांसाठी शिक्षण आणि गुणवंतांची कदर करणे, हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. पण आपल्या राज्यकर्त्या वर्गाने छ.शाहू महाराजांच्या शिकवणुकीकडे दुर्लक्ष केल्याने आज शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाते आहे.

आता, पेरियार यांच्या तामीळ भाषेच्या आग्रहाकडे वेगळ्या तामिळ राष्ट्राच्या मागणीकडे आजच्या परिप्रेक्षातून पाहू. नर्मदा नदीच्या खालच्या भागात, म्हणजे महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या देशातील विकसित आणि शिक्षित राज्यांची लोकसंख्या कमी होते आहे, तर गायपट्ट्यात लोकसंख्या वाढत आहे. याचा परिणाम म्हणून भविष्यात महाराष्ट्र व दक्षिण भारतातील लोकसभेच्या जागा घटून त्या युपी आणि इतर उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढणार आहेत. आधीच आपल्या सर्व राज्यांना केंद्रीय सत्तेत काहीच से नाही, आणि जागा कमी झाल्यामुळे आपल्या सर्व राज्यांची ताकद खूप कमी होणार आहे. ग्लोबल वाँर्मिंग आणि प्रदूषण यामुळे एकतर गंगा संपून तरी जाईल किंवावारंवार येणाऱ्या पुरांमुळे सुपीक जमीन नष्ट होईल. आधीच स्थलांतराचा वेग वरुन खाली वाढतो आहे, तो आणखी वाढेल. आणि आपली भाषा आणि संस्कृती धोक्यात येवून आपण सर्व उत्तर भारताची एक काँलनी/ गुलाम बनून राहू.
वेगळे राष्ट्र अथवा फुटून निघणे, हा काय पर्याय नाही, पण पेरियार यांनी वेगळेपणाची मागणी का केली, हे लक्षात ठेवले तरी वरील संभाव्य धोका टाळता येईल.
आयुष्यात ज्याने एकदा जरी भेदभाव अनुभवला असेल, अपमान सोसला असेल, मग तो तुमच्या दलित-मागास असण्यामुळे झालेला असो अथवा वेगळ्या धार्मिक, भाषिक किंवा लैंगिक ओळख/कल असल्यामुळे झालेला असो. तो व्यक्ती जर संवेदनशील आणि स्वाभिमानी असेल, तर तो या अन्यायाविरुद्ध नक्कीच आवाज उठवेल. आणि आपल्यावर जी वेळ आली, ती आपल्या आप्तस्वकीय किंवा समाजबांधवांवर येऊ नये म्हणून कसोशीने प्रयत्न करील. प्रसंगी हिंसक/आततायी मार्ग देखील अनुसरेल. कारण अरे ला का रे करण्याशिवाय अथवा प्रतिकार करण्याशिवाय त्याला दुसरा कुठलाच पर्याय नसतो. कारण स्वतः च्या आणि समाजबांधवांच्या आत्मरक्षणासाठी अनुसरलेला मार्ग हिंसक/आततायी असला तरी तो त्याज्य ठरवता येत नाही.
हे सगळं सांगण्याचे कारण हे आहे की, ज्या महान व्यक्तींनी स्वतःच्या जातीय ओळखीमुळे बामणांकडून अपमान सहन केला, त्यांनीच ह्या बामणी धर्माला आणि त्यांच्या जातीय वर्चस्वाला सुरूंग लावायचे काम केले. यात प्रामुख्याने फुले पती-पत्नी, डॉ. आंबेडकर आणि पेरियार रामसामी नायकर येतात.
फुलेंनी तर त्यांच्या कार्यातून आणि लेखनातून सर्व सनातन्यांची अब्रू पार शनवार वाड्याच्याच वेशीवर टांगली. सावित्रीमाईसोबत मोठ्या हिंमतीनं सरस्वतीला फाट्यावर मारून शिक्षणाची मुळा-मुठा थेट महार-मांगवाड्यापर्यंत नेली.
पुढे बाबासाहेबांनी संपूर्ण देशालाच सामाजिक-आर्थिक-राजकीय लोकशाही आणण्यासाठी संवैधानिक मार्ग आणि सद्धम्म दिला. हा तडाखा तर पार वर्मीच बसणारा होता.
असाच लढा किंवा यापेक्षा ही अधिक radical म्हणता येईल असा लढा दक्षिणेकडे पेरियार रामसामी नायकर यांनी सुरू केला. ज्याप्रकारे फुलेंना मित्राच्या लग्नात अपमानित व्हावं लागलं, बाबासाहेबांना तर आयुष्यात अनेकदा मानहानीला सामोरं जावं लागलं, तसंच पेरियार यांनासुद्धा अशाच उपमर्दाला तोंड द्यावं लागलं. या तिघांना अपमानित करणारी होती ती तीच बामणी जातीव्यवस्था आणि सनातनी बामण.
ईरोड येथे एका अतिशय श्रीमंत व्यापारी घरात रामसामी नायकर यांचा जन्म झाला. घरातील वातावरण अतिशय धार्मिक. वाढत्या वयासोबत धर्म आणि कर्मकांडे यांची चिकित्सा करण्याची चांगली खोड रामसामींमध्ये निर्माण झाली. आणि इथेच विद्रोहाची ठिणगी त्यांच्यामध्ये निर्माण झाली.

त्याकाळी कांग्रेस हा एकच ताकदवान पक्ष होता. त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. वायकोमचा सत्याग्रह केला. सामाजिक भेदभाव आणि बामणवादाविरोधात पक्षाने खंबीर भूमिका घ्यावी, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. पण बनियांच्या पैशावर सोकावलेल्या व संपूर्णपणे सनातनी बामणांच्या ताब्यात असलेल्या तत्कालीन कांग्रेसने त्यांचे सारे प्रयत्न हाणून पाडले. मग स्वाभिमानी पेरियार यांनी कांग्रेसलाच लाथ मारली. आणि ती लाथ इतकी पावरफुल्ल होती, की तामिळनाडूत आजही कांग्रेस लकवाग्रस्तचं आहे.
जातीयवादाला विरोध, कर्मकांडाला विरोध म्हणून त्यांना स्वतः च्या घरातून बाहेर पडावे लागले. आजूबाजूला दिसणारा जातीय अन्याय आणि उच्चवर्णियांचा जातीय माज ते पाहत होते. पण त्यांना स्वतः ला अजून जातीय अपमानाचा अनुभव आलेला नव्हता. तो ही आला, जेव्हा ते काशीला गेले तेव्हा. तिथे भटकंती करताना त्यांना खूप भूक लागली. एके ठिकाणी फुकट्या भट-भिकार्यांसाठी अन्नदान सुरु होते. मग पेरियारसुद्धा पंगतीत जावून बसले. पण कुणालातरी संशय आला की, ते ब्राह्मण नाहीत म्हणून. आणि त्यांना अक्षरशः तिथून हाकलून लावलं. हा अपमान त्यांना सहन नाही झाला. बाहेर येऊन त्यांनी पाहिले की, त्या दिवशीच्या अन्नदानाचा सारा खर्च त्यांच्याच समाजातील एका दानशूर तामीळ माणसानं केला होता. हे समजताचं त्यांच्या आतील विद्रोहाची आग आणखी पेटून उठली.
तामिळनाडूत परत येऊन त्यांनी बामणशाहीचा नांगा अगदी शिस्तीत ठेचायचा कार्यक्रम सुरु केला. धार्मिक क्षेत्रात बामणांच्या वर्चस्वाला नकार, संस्कृतऐवजी कितीतरी प्राचीन असलेल्या तामिळ भाषेवर जोर, राम-लक्ष्मणासारख्या उत्तर भारतीय बामणी देवांना पायताणांचा हार, तर राजकीय क्षेत्रात जस्टीस पार्टी स्थापन करून भविष्यातही सत्ता बहुजनांच्या हातातचं राहील, अशी तजवीज केली.

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले, लग्नाकार्यातून ही बामण वजा करून नवीन द्राविडी लग्न पद्धत सुरू केली. शिक्षणातूनही सर्वसमावेशक-निधर्मी द्राविडी संस्कृतीचाच पुरस्कार केला.
कला, साहित्य, सिनेमा अगदी सगळीकडून तामिळ-द्राविडी संस्कृती, समतेचा आणि बामणशाही व जातीयवादाविरोधातील आवाज बुलंद केला.
राजकीय, सामाजिक, कला-साहित्यिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा चहूबाजूंनी त्यांनी ब्राह्मण वर्चस्वावर असा काही हल्ला चढवला की, बहुजन तामिळ लोकांच्या बोकांडी पिढ्यानपिढ्या बसलेला, परजीवी, अल्पसंख्य तरीही मोठमोठ्ठाली पदं बळकावून बसलेला ब्राह्मणवर्ग अक्षरशः वेचून वेचून निकामी केला.
हा उपाय इतका जालीम आणि यशस्वी ठरला की, तामिळनाडूच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मण मक्तेदारी त्यांनी कायमस्वरूपी मोडून काढली.

अन्याय करणार्यांना कशी शिस्तीत पाचर मारून कायमस्वरूपी जायबंदी करायचे, हे त्यांनी दाखवून दिले.
त्यांच्या आंदोलनाची हितकारक तीव्रता, धग आजही तामिळनाडूच्या सर्व क्षेत्रांत जिवंत आहे. म्हणूनच नीट रद्द करणे असो, केंद्रीय सरकार ऐवजी संघराज्य सरकार शब्द वापरायची सूचना असो, मंदिरात बहुजन-दलित जातीचे पुजारी, संस्कृतऐवजी तामिळ मंत्रोच्चार, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, शिक्षणात इंग्रजीचा पुरस्कार, तसेच अनेक सामाजिक उपक्रम, हे आजही तामिळनाडूत सुरू आहे. कारण सत्तेत फक्त दोनच खेळाडू आहेत. आणि दोन्ही पक्ष पेरियार यांच्याच विचारधारेवर चालणारे आहे. संघोट्यांनी कितीही आपटून घेतली तरी तामिळ माती ब्राह्मणी कमळ तिथं फुलूच देणार नाही.
तिथले नेते अंत्यविधीपण निधर्मी पद्धतीने करतात.
अशाप्रकारे फुल-टू संघी-बामणप्रूफ व्यवस्था पेरियार यांनी तयार केली. आणि इथं महाराष्ट्रात इथल्या “जाणता” म्हणवणाऱ्या नेत्यांनी सर्व क्षेत्रे जातीयवादी ब्राह्मणांना दान केली.
बहुजनांना-दलितांना फुले-शाहू-आंबेडकरी विचारांसोबत पेरियार यांच्या विचारांचा बूस्टर डोसंच सर्व प्रकारच्या जातीय-धार्मिक-सरंजामी कोविडविरोधात इम्युनिटी देईल.

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे

लेखक स्वतंत्र संशोधक आहेत

1 Comment

  1. a part that you’ve mentioned that cow belt(gobar belt) population is increasing and maharashtra & south indian states not is an important one. Instead of moving towards federalism, the centre day-by-day passes laws to strengthen its control. Maharashtra is pretty saffronised so less hopes of being separate nation(If it happens that would be the best thing). But, south indian states have potential to break away from the indian union in future.

Leave a Reply

Your email address will not be published.


*