दिपाली साळवे
उच्च शिक्षणासाठी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळविल्यापासून सतत एक शब्द कानावर पडत होता, तो म्हणजे राजकारण. माझ्या पदवीपर्यंत मला जातिवाद/शोषणाचा सामना करावा लागला नसल्यामुळे, जातिवाद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यापासून मी दूरच होते. जसा लहानपणी मनात एक भ्रम होता की शिक्षक फक्त शालेय स्तरापर्यंत फक्त मारतातच पण, तो भ्रम हळूहळू दूर होत गेला तसाच काहीसा भ्रम महाविद्यालयामध्ये येण्यापूर्वी आणि आल्यानंतर ही काही काळ माझ्याही मनात होता की महाविद्यालयांमध्ये खूप राजकारण चालू असते पण ते राजकारण नाही तर जातिवाद होता. त्यामुळे मनात एक भीती होती की कसे चालत असेल हे राजकारण शिक्षण व्यवस्थेमध्ये, कोणत्या अडचणीचा सामना करावा लागेल आणि आपली कोणतीही चूक नसताना का म्हणून आपण बळी पडणार. असे एक ना अनेक प्रश्न मनात डोकावत होते म्हणून प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या नजरेने बघायला सुरुवात केली छोट्या-छोट्या गोष्टींवर कटाक्षतेने बघत होते.
बरं हे राजकारण म्हणजे काय तर ऑफिस क्लार्कपासून ते विभाग प्रमुखापर्यंत असणारे सगळे उच्चवर्णीय जेव्हा विनाकारण बहुजन विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देतात त्याला तथाकथित राजकारण म्हटले जायचे. वर्गात दोन गट पडतात एक तर अपर क्लास आणि लॉवर क्लास. तसे हे वर्ग क्लास बरोबर कास्टचे पण असायचे अप्पर कास्ट आणि लोअर कास्ट हे कळायला मला वेळ लागला परंतु जेव्हा विद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आणि जाणिवानेणिवा जिवंत होत गेल्या. सेमिनार, लेक्चर किंवा अकॅडमिक स्टडी साठी इतर ठिकाणी प्रवास करताना अनेक विद्यार्थी संपर्कात येत राहिले मग विद्यापीठांमधील कॅन्टीन पासून ते विभागातील क्लासरूम पर्यंत सगळे विषय निघायचे.स्वतःचे अनुभव शेअर केले जात असे नवीन कार्यक्रमा बद्दल माहितीची देवाणघेवाण होत असे. उच्च शिक्षण घेताना कोणत्या समस्या निर्माण होतात, त्यांचा सामना करताना होणारा मानसिक/शारीरिक त्रास असे अनेक संवादाचे विषय असायचे. त्यात सतत समोर येणारी एक समस्या म्हणजे फर्राटेदार इंग्रजी. इंग्रजी भाषेचा कोणताही बॅकग्राऊंड नसलेल्या एससी/एसटी विद्यार्थ्यांना अचानक हाय लेवलचे इंग्रजी ऐकणे व ते समजून घेणं खूप कठीण जाते. त्यात पुन्हा अप्पर कास्ट विद्यार्थीन समोर प्रश्न विचारला तर फक्त इंग्रजी भाषेमध्ये उत्तर न देता आल्यामुळे वाटणारी लाज अपमानित करत होती आणि म्हणून उत्तर माहिती असून ही भाषामुळे गप्प बसणे हे अनेक वंचित समुदायातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत.
सरतेशेवटी, याचा अर्थ असा होतो की “राजकारण” हा गोंधळात टाकणारा शब्द जो विद्यापीठात नियमितपणे आढळतो तो जाती-विशेषाधिकाराच्या पार्श्वभूमीतून येतो. बरं हे राजकारण करणे म्हणजे नक्की काय होते तर एक विद्यार्थी एका शिक्षकाच्या खूप जवळचा आहे त्या विद्यार्थ्याला सर्व प्रकारे मदत करणे मग त्याच्या बरोबर व इतर आवडीच्या विद्यार्थ्यांचा ग्रुपच (एकाच जातीचा) शिक्षकांच्या केबिनमध्ये बसून गप्पागोष्टी करणे किंवा मार्क्स, लेनिन आणि फेमिनिझम या विषयावर चर्चा करणे आणि जे विद्यार्थी आपल्या ठराविक जातीच्या ग्रुप मधील नाहीत त्यांना दूर ठेवणे व त्यांना कोणताही सहयोग न करणे. मग त्यांना फक्त कारणे दिली जातात की “आम्ही बिझी आहोत तर इतर प्राध्यापकांना विचारा”.एम ए द्वितीय वर्षामध्ये पदार्पण करताना बराच वेळ लागला हे कळायला की जेव्हा म्हटले जाते की हा प्राध्यापक जाणीवपूर्वक ठराविक विद्यार्थ्याला मानसिक त्रास देत आहे, तर त्या पाठीमागे एक कारण होते ते म्हणजे दोघांनाही चिटकलेली त्यांची जात. त्यामूळे तो प्राध्यापक जे करत आहे ते राजकारण नाही तर सरळ सरळ जातिवाद आहे. हे सर्व माझ्या लक्षात येण्याचे कारण म्हणजे माझे जातीविरोधी साहित्य वाचणे, परिसंवाद, संमेलने, व्याख्याने यांना उपस्थित राहणे आणि रोजच्या जातीय घटनांचा अनुभव घेणे आणि या सगळ्यामुळे क्लासच्या पाठीमागे कास्ट आहे हा दृष्टिकोन निर्माण झाला मग यानिमित्ताने इतर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनी बरोबर हळूहळू चर्चांचे विषय वाढत गेले. त्यामध्ये सवर्ण आणि अवर्न असे दोन्ही विद्यार्थिचा समावेश होता. तसे माझेही निरीक्षण करणे चालू होते त्यामुळे राजकारण करणे म्हणजे जातिवाद करणे हे कळून चुकलं. आता मी त्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या आडनावावरून जाती ओळखल्या ज्यांनी मला हे सांगितले की “हा त्रास बऱ्याच विद्यार्थ्यांना दिला जातो हे त्यांचे विभागातले राजकारण चालू असते” तेव्हा कळले की जातीवादाला राजकारण म्हणणारे आणि राजकारणाच्या नावाखाली जातिवाद करणारे एकाच जातीचे विशेषाधिकार घेऊन आलेले आहेत आणि जातिवाद लपविण्यासाठी त्यांनी या जातीवादाला राजकारण असे गोंडस नाव दिले आहे. यापाठी मागे त्याची दोन कारणे असू शकतात एक म्हणजे आपण व आपल्या जातीचा व्यक्ती अत्याचार करत असेल तर ते जातीवादी कृती आहे हे एक्सेप्ट करणे कठीण जाते, कारण आधुनिक भारतात आता जातिवाद कुठे आहे सगळे गुण्यागोविंदाने राहतात/जगतात आणि दुसरे म्हणजे महाविद्यालयावर जातीवादाचा शिक्का लागून त्यांची प्रतिमा मलिन न करणे. त्यामुळे मग हा जातीवाद नाही तर हे शिक्षण संस्थेतील राजकारण आहे. त्यांना जाणीवपूर्वक माहिती असूनही की जो विद्यार्थी/विद्यार्थिनीचे शोषण होते ते सामाजिक आणि आर्थिक मागासलेल्या समुदायातून आलेले आहेत. तरी ही याला कास्ट अँगलने न पाहता क्लास अँगलमधून पाहिले जाते, कारण त्यांच्या वर्चस्ववादी दृष्टिकोनातून भारतामध्ये मार्क्सवादी/स्त्रीवादी क्रांती अजून झालेले नाही त्यामुळे हे जे डिस्क्रिमिनेशन होत आहे त्याच्या विरुद्ध चाललेला जो संघर्ष आहे तो वर्गसंघर्ष आहे, जात संघर्ष नाही.
“कॅम्पस मधील जातिवाद” ज्याला बामन राजकारण म्हणतात. शोषक किती चालाख असतो हे यावरून कळू शकते की, एक तर एससी/एसटी विद्यार्थीना प्रवेश प्रक्रिया दरम्यान कसे रोखता येईल याचा पुरेपूर प्रयत्न ते (सवर्ण) करतात आणि एवढ्या प्रयत्ना नंतरही जर बहुजन विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला तर त्यांच्याविरुद्ध ते दोन प्रकारची रणनीती तयार करतात.
- तो खूप दुबळा आहे, त्याला सतत आधाराची गरज असते म्हणून त्या विद्यार्थिला “विचारी बनविण्याऐवजी बिचारी बनवतात” खोटी सिम्पथी दाखवतात आणि मग विद्यार्थ्याला वैचारिक पातळीवर त्यांचे जातीचे वर्चस्व टिकविण्यासाठी स्त्रीवादी, मार्क्सवादी, गांधीवादी साहित्य दिले जाते. ज्यामुळे या विद्यार्थ्यांना असे वाटते की शिक्षक/शिक्षिका खूप चांगल्या आहेत, इतरांपेक्षा आपल्याला जास्त महत्त्व देतात, आपण त्यांचे आवडते विद्यार्थी आहोत, परंतु या भोळ्याभाबड्या विद्यार्थ्यांना माहिती नसते की त्यांचे एवढे लाड फक्त यासाठी केले जातात की विभागाची कोणतीही कामे करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेण्यात यावा म्हणुन. विद्यापीठ, शाळा, कॉलेजमध्ये कोणताही प्रोग्राम असो तेथील कामांची विभागणी बघितले तर लक्षात येईल की जातीवाद जरी ओठांवर नसला तरी पोटात असतोच आणि कृतीत ही तो दिसून येतो. या लाडक्या बहुजन विद्यार्थ्यांची कामे कोणती तर हॉलमधील खुर्च्या व्यवस्थित लावणे, टेबलावर पाण्याच्या बॉटल ठेवणे, हॉल बाहेर कार्यक्रमाची नोंद ठेवणे, जेवणाची तयारी बघणे आणि चुकून जर प्राध्यापिका बाईची बॅग कुठे विसरली तर ती शोधून देणे त्या बदल्यात त्या विद्यार्थ्यांला गुड बॉय/गर्लचा टॅग लावला जातो, म्हणजे शोषक ही खुश आणि शोषित ही खुश. बर सवर्ण विद्यार्थिनीला दिली जाणारी कामे काय तर सुत्रसंचालन करणे, प्रमुख अतिथींचा सत्कार करणे, सेमिनारच्या शेवटी त्यांना प्रश्न तयार करून देणे आणि या कार्यक्रमाचा रिपोर्ट तयार करण्याची जबाबदारी देणे ही आहे सवर्ण लिबरलांची समानता. अशा प्रकारे कामाचे केलेले विभाजन बघता हे राजकारण आहे की जातिवाद हे लक्षात येईल आणि याच क्रांतीकारी सवर्ण नारीवादयांनी मिळून वुमन डेव्हलपमेंट सेल सुरू केले आणि त्या द्वारे एससी/एसटी च्या प्रश्नांवर चर्चा करण्याचा दिखावा केला आणि त्या एवढ्यावरच थाबल्या नाहीत तर त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांना व्यसनमुक्ती, घरगुती हिंसा आणि आर्थिक समस्येवर ज्ञान पाजळतात.
2. आता प्रवेश प्रक्रियेला यशस्वी रित्या पार करून आलेला दुसरा विद्यार्थी जर निडर असेल, त्याला भेदभावाबद्दल पूर्णपणे जाणीव असेल तर मग त्या विद्यार्थीला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, अशी परिस्थिती निर्माण केली जाते की विद्यार्थ्याकडे दोन पर्याय असतात एकतर शिक्षण सोडून देऊन आर्थिक-सामाजिक बदलाची दरवाजे कायमचे बंद करणे किंवा आत्महत्या करणे. दुसरा पर्याय म्हणजे संघर्ष करणे घडणाऱ्या घटनांना सामोरे जाणे, जसे की सवर्ण प्राध्यापकांद्वारे एससी/एसटी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये अनेक अडचणी निर्माण करणे, विभागाकडून मिळणाऱ्या कागदपत्रासाठी वारंवार विद्यापीठाच्या फेऱ्या मारायला लावणे, लायब्ररीचा उपयोग करता यावा म्हणुन लागणाऱ्या सहीसाठी विद्यार्थ्यांना तासन्तास बसविणे, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कम्प्युटर लॅब आणि स्टडी रूम मध्ये बसण्यासाठी “फक्त एका विद्यार्थ्यांसाठी कसे काय खुले ठेवणार” अशा प्रकारे दिली जाणारी उडवाउडवीची उत्तरे. या सगळ्यामुळे हा संघर्षचा प्रवास मानसिक आणि शारीरिक थकवनारा असतो, खूप कमी विद्यार्थी ब्राह्मणवाद्याना कायदेशीर धडा शिकवतात व जातीवादी शिक्षण व्यवस्थेबद्दल लढण्याचा निर्णय घेतात. परंतु असेही एससी/एसटी विद्यार्थी आहेत जे निमुटपणे सगळे सहन करतात आणि फक्त डिग्री मिळविण्यावर भर देतात. इन्स्टिट्यूशनल कास्ट डिस्क्रिमिनेशन सहन करण्याची दोन कारणे असू शकतात, मुलींच्या बाबतीत म्हंटले तर ब्राह्मणवादी पितृसत्ताकता ही समाजाला लागलेली कीड आहे, त्यामुळे सहजासहजी बहुजन समाजातून जाणार नाही. तर होते असे की मुलींना भीती असते की आपले आई-वडील एवढे हाल-अपेष्टा सहन करून आपल्याला शिकवतात, त्यांनी कधी पोलीस/कोर्ट/ कचेरी बघितलेली नसल्यामुळे ते लवकर घाबरतात त्यामुळे ते आपले शिक्षण ही बंद करू शकतात, आपल्यामुळे त्यांना त्रास नको तसेच समाजामध्ये आपले नाव खराब होईल, शिक्षण सोडून काय करणार किंवा कायदेशीर कारवाई केली तर तेव्हा त्यांच्या जातीचे भाऊबंधू अजून त्रास देतील असे एक ना अनेक प्रश्नांचा विचार करून सरतेशेवटी सगळे सहन करून शिक्षण पूर्ण करायचे. त्याचप्रमाणे मुलांच्या बाबतीत ही तसेच काहीसे ते सहन करतात, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण, घरात मोठा असेल तर जबाबदाऱ्या अजूनही वाढतात, काम करुन लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करणे व सामाजिक-आर्थिक संघर्षातून मिळालेली संधी गमावणे म्हणजे बहुजन विद्यार्थ्यांना सोपे नसते कारण हे कित्येक पिढ्यांच्या व शाहू-फुले-आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या संघर्षाचे फळ आहे. वर्चस्ववादाचा माज आणि संपत्तीच्या अहंकारात बुडालेल्या प्रस्थापितांच्या मुलांना अशा परिस्थितीची जाणीव नसते किंवा असेही म्हणता येईल की त्यांचे बापजादे त्यांना यांची जाणीव होऊ देत नाही म्हणून सवर्ण मुलांना काही माहिती असो व नसो परंतु एवढे नक्कीच माहिती असते की घरात संपत्ती किती आहे त्यामुळे महागडे क्लासेस लावून आणि बक्कळ पैशाच्या जीवावर कोणत्याही प्रतिष्ठित शिक्षण संस्थेमध्ये सीट विकत घेतात आणि हेच पुढे जाऊन आरक्षण, एससी/एसटी ॲक्टला विरोध करून बहुजन मुलांना “फुकटे” म्हणून अपमानित करतात. तसे बघितले तर भारतामध्ये असे एक ही शैक्षणिक संस्थान नसेल जिथे बहुजन विद्यार्थ्यांना जातीवादाला सामोरे जावे लागत नसेल, प्रत्येक ठिकाणी आहे परंतु आधुनिकतेमुळे त्याचे स्वरूप बदलेले आहे. आता कॅन्टीनमध्ये एकत्र बसून जेवण करणे, चहा पिणे तसेच अनेक मुद्द्यांवर चर्चा ही केल्या जातात फक्त जेव्हा बहुजनांच्या हक्क, अधिकारांचा, प्रतिनिधित्वाचा विषय निघाला की एक तर खुर्च्या खाली होतात किंवा 90% मिळून ही जनरल वाल्यांना म्हणजेच बामणांना आरक्षणामुळे चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही, अपराध नसताना ही त्यांच्यावर एससी/एसटी एक्ट अंतर्गत खोट्या केसेस टाकल्या जातात, मग सविधान फक्त डॉ. बाबासाहेबाची देण नाही तर त्यात इतर ही व्यक्तींचा समावेश होता, एवढेच काय तर पावलोपावली डॉक्टर आंबेडकर यांना कसे ब्राम्हणांनी सहकार्य केले हे पटवून देण्याची धडपड/आक्रस्ताळेपणा चालू असतो. बरं हे सगळे बोलताना कोणताही ठोस पुरावा नसतो. खरंतर मुद्दा हा आहे की जो खाली बसत होता तो आता खुर्ची वर बसतो आणि ज्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता तो आता सवर्णांना शिकवत आहे हे त्यांना सहन होत नाही. हळूहळू वर्चस्ववादला/ ब्राह्मणवादाला तडे जाताना बघू शकत नाहीत म्हणून मग कपटी विचारांनी नाहीतर भ्याड हल्ल्यांनी बहुजन विद्यार्थ्यांना रोखण्याचे काम करतात.
एससी/एसटी समुदायातून आलेल्या खूप कमी विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी मिळते आणि अशा संध्या त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीला सुधारण्याचा पाया असतो तसेच पुढील पिढीला प्रेरणा आणि संघर्ष करण्यासाठी बळ ही देतात. कुणाला ही वाटेल की संशोधन करून नावापुढे डॉक्टर लावणे मोठी गोष्ट नाही व उलट मज्जा आहे. चार-पाच वर्षे यूजीसी कडून नॉ-नेट फेलोशिप घ्यायची, हॉस्टेलची लाईफ जगायची, मस्त सेमिनार कॉन्फरन्स आणि वर्कशॉपच्या नावाने देशभर फिरून यायचे आणि चार वर्षानंतर तुम्ही डॉक्टर. खरंच एवढे सोपे आहे का हे आणि विशेष म्हणजे एससी/एसटी च्या विद्यार्थ्यांसाठी, तर बिलकुल नाही. दिसते तेवढे सोपे नसते डॉक्टर या शब्दासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो, जोपर्यंत डॉक्टर ही पदवी तुमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण विश्वासाने सांगूच शकत नाही की तुम्हाला डॉक्टर ही पदवी मिळेल ते (ब्राह्मणवादी) पावलोपावली तुम्हाला असाह्य असा मानसिक त्रास देतात जेणेकरून तुम्ही तुमचे शिक्षण मधेच सोडून द्यावे आणि तसे होते ही जेव्हा मानसिक त्रास असह्य होतो तेव्हा संशोधन सोडून देणेच योग्य वाटते किमान जिवंत तरी राहू हा विचार करणाऱ्या अनेक मैत्रिणी मला भेटल्या आणि त्यांना कशा प्रकारे जातीवादाला सामोरे जावे लागते हे त्यांच्या अनुभवातून आणि निराशजनक चेहर्यातून दिसून आले. एक गमतीदार गोष्ट सांगू, जे ब्राह्मणवादी प्राध्यापक एससी/एसटी विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात त्यांची मुले त्याच शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत असताना बहुजन विद्यार्थ्यांच्या मेंटल हेल्थ वर संशोधन करतात आणि डिग्र्या मिळवितात. विकृत मानसिकतेवर उपचार करण्याची गरज कोणाला आहे हे त्यांना सांगणे खूप गरजेचे आहे की रुग्णांवर उपचार करण्याचा फायदा नाही तर जातिव्यवस्थेवर आणि ब्राह्मणवाद मानसिकतेवर उपचार करावा लागेल आणि या दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला दलित वस्त्यांमध्ये जाऊन संशोधन करण्याची गरज नाही तर स्वतःच्या घरांमध्ये, वस्त्यांमध्ये, गावांमध्ये जी रोगाचे मूळ आहे त्या धर्मशास्त्राची चिकित्सा करण्याची जास्त गरज आहे.
तसे बघितले तर पुर्ण शिक्षण संस्थांमध्ये संघाचे जाळे पसरलेले आहे, खालपासून वरपर्यंत त्यामुळे संशोधन मार्गदर्शक दुसरा कोणी मिळेल याचे खूप कमी चान्स असतात आणि मग सुरु होतो ब्राह्मण मार्गदर्शकामध्ये आणि बहुजन संशोधकामधील संघर्ष. जे स्वतः ठरावीक जातीमुळे विशेषाधिकार घेऊन अकॅडमिक मध्ये येऊन उच्च पदावर बसतात ते सगळ्यात पहिले बहुजन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करतात की, उदा. पीएचडी मध्ये कसा प्रवेश मिळाला, किती मार्क्स होते ‘बरं कमी मार्कस् देणारे ही यांचेच जात बंधू असतात’ परंतु तरीही जाणून घ्यायचे असते की बहुजन विद्यार्थ्यांकडे कोणती गुणवत्ता असते, कारण ज्या प्रकारे मनुस्मृति मध्ये सांगितले आहे की ब्राह्मण जन्मताच हुशार, श्रेष्ठ आणि विद्वान असतो ‘मग त्याला काडीचीही अक्कल नसली तरीही’. त्यामूळे ते मनूच्या नजरेने वर्णव्यवस्थच्या चौथा वर्णाकडे बघतात. त्यानंतर सुरू होतो संशोधन कम शोषणाचा प्रवास.
हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी मधील डॉक्टर रोहित वेमुला, मुंबईच्या प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल मधील डॉक्टर पायल तडवी आणि आयआयटी मद्रासमधील फातिमा लतीफ सारखे असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांची शिक्षणव्यवस्थेतील ब्राह्मणवाद्यांनी हत्या केली आहे काही केसेस बाहेर येतात तर काही केसेस आपल्या आत दाबल्या जातात. त्यामुळे ठराविक शाळा/ कॉलेज आणि विद्यापीठांची नावे जातिवाद करण्याच्या लिस्ट मध्ये शामिल असतात आणि ज्या शिक्षण संस्थांची नावे त्यामध्ये शामील नाही त्यामध्ये जातीवाद, नस्लवाद होत नाही असा गैरसमज बिलकुल करून घेऊ नये. तिथेही जातिवाद असतोच फक्त त्याचे नामकरण राजकारणामध्ये झालेले असते. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या बहुजन स्कॉलरानी युवा पिढीशी जातीवादावर चर्चा करावी त्यांना मार्गदर्शन करावे तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे नाही तर तुम्ही तुमचा वेगळा क्लास बनविण्यामध्ये व आपल्या बामन पार्टनर, बामन मित्र-मैत्रिणींना खुश ठेवण्यामध्ये मग्न राहाल आणि दुसरीकडे तुमच्या भाऊ-बहिणीचे शोषण होत राहील मग शैक्षणिक हत्या झाल्यानंतर स्टँड विथ यू सिस्टर/ब्रदर म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
दिपाली साळवे
लेखिका मुंबई विद्यापीठ येथे PhD (समाजशास्त्र) चे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या एम फिल दरम्यान त्यांनी Perception of caste, gender, and intersection of Scavenging women संबधित संशोधन केलं आहे.त्यांच्या संशोधनाचे इतर विषय पुढीलप्रमाणे आहेत – social and economic status of Scavenging women, social stratification and inequality, women Labour issues and issues related to Girl child education.
- विद्यापीठ स्तरातील “विभागीय राजकारण”मिथकामागील सत्य - November 15, 2021
- स्वरा भास्कर सारख्या पुरोगाम्यांचे ब्राह्मणवादाला खतपाणी आणि बहुजन स्त्रीची जागा बळकावण्याचे प्रयत्न - September 4, 2021
खूपच महत्त्वपूर्ण विषयाला हात घालत अगदी परखडपणे वास्तविक परिस्थिती मांडली आहे ताई तुम्ही.!
खरं आहे, बहुजन विद्यार्थ्यांनी जात वर्ग आणि पितृसत्ता आणि यामुळे आपल्यावर होणारे अन्याय आणि त्या अन्यायाचे स्वरूप या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत त्यावर संवादी होऊन त्याचा अंत कसा करता येईल यावर विचाविनिमय केला पाहिजे.
बहुजन समाजातील बरेच विद्यार्थी हे ब्राम्हणवादी मानसिकता बाळगणाऱ्या प्रोफेसरांच्या किंवा त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या प्रभुत्व आणि वर्चस्वाच्या जाळ्यात अगदी सहजरित्या अडकतात. ते [ब्राम्हणवादी] लोक त्यांना [बहुजन विद्यार्थी] गुलाम समजूनच त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करतात आणि तसाच व्यवहार करतात…आणि हे बहुजन विद्यार्थांना कळतही नाही. त्यांना वाटते की, ते आपल्याला अगदी जवळचे समजतात किंवा त्यांचे आपण लाडके आहोत म्हणून ते आपल्याला हक्काने बोलत असतील. असं समजून गपगुमान सारं काही सहन करत जातात. आणि हे आजही घडते आहे. बहुजन विद्यार्थांनी आता वेळीच सावध होऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव करून घेऊन त्यांच्या [ब्राम्हणवाद्यांच्या] नेणीवांचेही टीकात्मक परीक्षण करणे गरजेचे आहे.