डॉ.तनोज मेश्राम
(बहुजन कलेक्टीव्सचा अर्थ बहुजन समाजातील कुठलेही सामूहिक संस्थात्मक/संघटनात्मक प्रयत्न)
मला अजूनही आठवत की मी स्वतःला व इतरांना माझ्या कॉलेजच्या दिवसांमधील सर्वांनी मिळून चहा बनविण्याचे कलेक्टीव्सचे(अर्थात या चहामध्ये दूध आणि साखर असायचे कारण असाच चहा भारतात बहुदा प्राशन केला जातो) साधे सोपे उदाहरण देत असे, हे उदाहरण देण्यामागचा उद्देश असा कि वंचित बहुजन विद्यार्थी किंवा लोक फक्त समूहांना प्रोत्साहन देऊन स्वतःची प्रगती करू शकतात अथवा जीवितार्थ चालवू शकतात. माझ्या उदाहरणामधील एका व्यक्तीजवळ चहापत्ती, दुसऱ्या व्यक्तीजवळ साखर, तृतीय व्यक्तीजवळ दूध, चौथ्या व्यक्तीजवळ स्टोव्ह, पाचव्या व्यक्ती जवळ भांडी आणि सहाव्या व्यक्तीजवळ पाणी असायचे. या सहा व्यक्ती एकत्र आल्या तरच या सहा व्यक्तींना चहा मिळू शकतो. अशी परिस्थिती बहुदा सर्व बहुजन जनतेची आहे, त्यांच्याजवळ केवळ एक अथवा दोन घटक आहेत, परंतु जीवितार्थ चालविण्यासाठी अथवा स्वतःची प्रगती साधण्यासाठी किंवा सर्वोत्तम इस्पित साध्य करण्याकरिता आवश्यक सर्वच घटक त्यांच्याजवळ नाहीत व यामुळे एकत्र येऊन काम करण्याची अथवा समूहाची (कलेक्टीव्सची) भूमिका येथे सुरू होते.
मला असे वाटते कि, माझ्या स्वतःच्या आयुष्याचा दूरवरचा प्रवास ज्यामुळे आज मी इथपर्यंत पोहचलो आहे, तो अशाप्रकारच्या विविध समूहात्मक (कलेक्टीव्स) गोष्टींमुळेच शक्य झाला आहे. मला असे वाटते कि, भलेही व्यक्ती म्हणून शारीरिक अथवा सामाजिक क्षमतांची देणगी माझ्यासोबत आहे, तरीही आजवरची माझी प्रगती एकट्यानेच साध्य करणे मला शक्य झाले नसते. नुकतेच पाच पानांचे लांबलचक आभार प्रदर्शन माझ्या शोधनिबंधासाठी लिहित असताना, मला समूहात्मक (कलेक्टीव) काम माझ्या आयुष्यात किती महत्वाचे ठरले व माझ्या व्यक्तिगत जीवनप्रवासामध्ये ज्यांनी कोणी मला मदत केली जरी सध्या ते माझ्या जवळ नसले तरीही त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे किती महत्वाचे आहे, या गोष्टींची जाणीव झाली.
मला असे वाटत नाही कि बहुतांश बहुजन जनतेला त्यांच्या व्यक्तिगत आणि सामुहिक मुक्ततेसाठी सामुहिक (कलेक्टीव्स) कार्याचे महत्व समजलेले नाही. याउलट मला हे वाटते कि, समुहात्मक कार्याचे महत्व समजून सुद्धा, सध्याच्या काळात लोकांचा विश्वासर्हता व कृतज्ञता या समूह (कलेक्टीव) बांधणी व विकासामध्ये आवश्यक असणाऱ्या मुल्यांबाबत गंभीरता कमी होत चालली आहे व यामुळेच हा लेखनप्रपंच. बहुजन नसलेल्या व्यक्तींना या ठिकाणी या लेखनाचे वाचन करणे इथेच थांबवावे व बहुजनांमधील अंतर्गत वादविवाद बहुजनांनाच सोडवू द्यावेत असे वाटू शकते.
विश्वास व कृतज्ञता या मुल्यांची मानव तसेच मानव नसणाऱ्या प्रजातींमध्ये असलेली भूमिका यावर मोठ्या प्रमाणावर साहित्य प्रकाशित झाले आहे. निल्ससनच्या मते (२०१८, पान नंबर ८४५-८४६), विश्वासाची ढोबळमानाने व्याखा अशी कि विश्वासाच्या आधारवर व्यक्ती स्वतःला असुरक्षित करून घेत असते व असे स्वतःला ( इतरांकरिता ) असुरक्षित करून घेत असताना इतर लोकांच्या उद्देश अथवा वर्तन, नियत याबाबत व्यक्ती सकारात्मक (assured) असते (Rousseau, Sitkin, Burt, camerer,1998). उदाहरणार्थ जेव्हा लोक एकमेकांना सहकार्य करीत असतात व एकमेकांसोबत ज्ञानाची अथवा माहितीची देवानघेवाण करीत असतात तेव्हा बऱ्याचवेळा एकमेकांना संवेदनशील गुप्त माहितीसुद्धा सांगितली जाऊ शकते परंतु या गुप्त माहितीचा दुरुपयोग होणार नाही याचा लोकांना विश्वास असतो……विश्वास या संकल्पनेचा उपयोग अथवा अंमल विविध स्तरावर केला जाऊ शकतो. सूक्ष्म स्तरावर व्यक्ती व्यक्तीमध्ये व विशिष्ट परिस्थितीमध्ये, मध्यम स्तरावर विविध गट तसेच समूहामध्ये तसेच मोठ्या स्तरावर औपचारिक ( नियम व कायदेशीर संस्थाप्रणाली ) व अनौपचारिक संस्थामध्ये (संस्कृती इ.) यामध्ये विश्वासाचा उपयोग केला जाऊ शकतो.
याचप्रमाणे, कृतज्ञता या मूल्याचे महत्व साहित्यामध्ये अधोरेखित केले आहे. ‘ग्रेटर गुड सायन्स सेंटर यांनी ‘University of California, Berkeley’ येथे २०१८ साली ‘अधिकांसाठी कृतज्ञतेमागचे विज्ञान’ या विषयावर प्रकाशित केलेली आकर्षक श्वेतपत्रिका वाचावी ( याला यापुढे जी जी एस सी श्वेतपत्रिका म्हणून समजावे.) या श्वेतपत्रिकेप्रमाणे, कृतज्ञतचे वर्णन समाजाला एकत्र आणणारे सामाजिक डिंक (सोशल ग्लू ) असे आहे. जे नातेसंबंधांना बळकटी आणते व समाजाचा आधार (कणा) म्हणून कार्य करते. रोबेर्ट एममॉस व मिशेल मॅकयुलोह हे कृतज्ञतेची व्याख्या दोन टप्प्यांची प्रक्रिया असे करतात –
१. हे मान्य करणे कि एखाद्याला सकारात्मक फलिती (परिमाण) मिळाला आहे. २. हे मान्य करणे कि या सकारात्मक फलितामागे बाह्य स्त्रोत आहे. हा बाह्य स्तोत्र कृतज्ञतेला ‘इतर अभिमुखता असणारी भावना’ असे ठरवतो ( जी जी एस सी व्हाईट पेपर २०१८ पान नं ३). हे पण खूप आकर्षक आहे कि,
विविध प्राणी जसे कि मासे, पक्षी, रक्त शोशक वटवाघूळ ‘परस्पर परोपकाराचा’ स्वभाव दर्शवितात – जसे कि एक प्राणी आपल्या जातीमधील इतर प्राण्यांना मदत करतो, बऱ्याचवेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून हि मदत केली जाते, कारण त्यांना हे गृहीतक मान्य असते कि अडचणीच्या वेळी कोणीतरी इतर प्राणी त्यांच्या मदतीची इतर दिवशी परतफेड करेल.( जी जी एस सी श्वेत पत्रिका २०१८ पान नंबर ३)
कृतज्ञतेची सामाजिक डिंक (सोशल ग्लू) अशी भूमिका पाहता, कृतज्ञता लोकांना सामाजिक होण्याकरिता प्रेरित करते म्हणजेच कि अधिकाधिक दयाळू, कनवाळू, मदतनिष्ठ बनवते व नातेसंबंध दृढ करते.
यात काहीच आश्चर्यचकित होण्यासारखे नाही कि, विश्वास व कृतज्ञता यांनी बहुजनांचे विविध क्षेत्रामध्ये समूह (कलेक्टिव्ह) उभारणीकरिता मदत केली आहे व यामधून कित्येक शोषित व्यक्तींना अन्यायाविरुद्ध लढण्याकरिता, जीवितार्थ चालविण्याकरिता, उच्च स्थानी झेप घेण्याकरिता अथवा मुक्ती मिळविण्याकरिता मदत झाली आहे. जातीअंताच्या चळवळींमध्ये, कार्यकर्ते व नेते सामाजिक कार्यासाठी प्रेरित करण्यासाठी ‘सामाजिक निष्ठा’ या संज्ञेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. परंतु, मी असे म्हणेन कि निष्ठा (कमिटमेंट) हि बहुल स्तरावर काम करते व ही ध्येय, विचारधारा व चळवळ ह्या बद्दल असू शकते. पण लोकांना एकत्र काम करण्याकरिता किंवा एकत्र राहण्याकरिता विश्वास व कृतज्ञता हि मुल्ये प्रेरित करतात. हे असे घटकमुल्ये आहेत जे खूप आवश्यक अशी रसायन निर्मिती करतात. आपल्याकडे असे बहुतांश उदाहरणे आहेत कि ज्यामध्ये लोकांची समान किंवा बळकट निष्ठा आणि आदर्शांप्रति सामुहिक धारणा असूनसुद्धा, लोक वेगळे झाले आहेत अथवा त्यांनी एकत्र काम करणे बंद केले आहे कारण एकमेकांप्रती विश्वास ठेवण्यास अथवा कृतज्ञता बाळगण्यास ते तयार नाहीत. आपण विश्वास अथवा कृतज्ञता या मूल्यांना गंभीरपणे घेण्याची का गरज आहे हे काही उदाहरणांवरून समजून घेण्यास मदत होऊ शकते.
काही दिवसांपूर्वी कोणी उच्चपदस्थ व्यक्तीने डी के खापर्डे यांच्या बामसेफ व तिच्या ऑफशूट संघटनांच्या स्थापनेमध्ये व विकासामध्ये असलेल्या सहभागावर व योगदानावर शंका उपस्थित केली होती. कांशीराम यांच्या चळवळीतील योगदानामुळे कांशीराम यांची नेहमीच प्रशंसा केली जाते, मात्र कांशीराम यांचे या स्थापनेच्या काळातील सहकारी खापर्डे व इतर लोक यांना मात्र विसरले जाते. जे बसपा अथवा बामसेफच्या बाहेरचे आहेत यांचे बसपा अथवा बामसेफच्या उभारणीमधील योगदान मान्य केले जात नाही व यामुळेच मला येथे कृतज्ञतेची कमतरता जाणवते. कृतज्ञतेची कमतरता जाणवण्याचे इतर उदाहरण म्हणजे एखाद्या संघटनेच्या स्थापनेनंतर जर एखाद्या संघटनेचे संस्थापक त्या संघटनेपासून वेगळे झाले तर त्या संस्थापकाचे त्या संघटनेच्या स्थापनेमधील, विकासामधील योगदान मान्य केले जात नाही. इतर उदाहरणे असे आहेत कि, स्वतःच्या बौद्धिक, शैक्षणिक अथवा नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये इतरांनी दिलेले योगदान मान्य न करणे, जसे कि आर्थिक, भौतिक अथवा आपण इतरांच्या एखाद्या उपक्रमाकरिता कष्ट घेत असतो परंतु त्याची दखल घेतली जात नाही. हे खूप सर्वसामान्य आहे कि, लोक जे खाजगी जीवनात बोलतात किंवा एका ठिकाणी व एकावेळी वर्तन करतात, ते त्यांच्या सार्वजनिक जीवनात अथवा इतर ठिकाणी, इतर वेळी वागण्या किंवा बोलण्यापेक्षा खूप भिन्न असते. आता याबाबत मी खूप निश्चित नाही कि, आपण राजकीयदृष्ट्या योग्य अथवा विनम्रता ज्या मध्यमवर्गीयांच्या धारणा आहेत, ज्या आपण प्रगत होत असताना नकळत अंगीकारल्या असतील.परंतु आपल्याला हे समजायला हवे कि अशा न पटणाऱ्या विसंगती लोक लोकांमधील विश्वास कमजोर करतात. बऱ्याच वेळा असे घडते कि, लोक एकत्र येतात, चर्चा करतात, समान ध्येयावर कृतिकार्यक्रम निश्चित करतात व पुढे जणू असे काहीच ठरले नाही असे दाखवत वेगळे देखील होतात. अशाप्रकारे काही वर्षांपूर्वी एक उपक्रम सुरु केला होता. परंतु, लोकांचा एकमेकांवर विश्वास न राहिल्याने काही दिवसातच याला बंद करावे लागले होते.
माझ्या पिढीतील कार्यकर्ते ज्या पद्धतीने वाढले, घडले ती संस्कृती अशाप्रकारची नव्हती. एकमेकांवर विश्वास ठेवणे व एकमेकांच्या विश्वासाला जागणे हा कार्यकर्ते घडण्याच्या प्रक्रियेमधील महत्वाचा घटक मानला जायचा. परंतु ज्या सहकाऱ्याने आयुष्यातील महत्वाचा काळ नोकरशाहीमध्ये व्यतीत केला आहे त्यांना कदाचित हे संक्रमण कमी महत्वाचे वाटेल. त्याच्या संघटना बांधणीच्या आकलनानुसार, संघटनेमध्ये प्रत्येकाची भूमिका अधोरेखित केलेली असणे व नोकरशाहीमध्ये अथवा औपचारिक संघटनांमध्ये असतात त्याप्रमाणे काही बक्षिसे अथवा शिक्षा यांची तरतूद असणे हे अधिक महत्वाचे आहे. या दृष्टीकोनवरून एखादा आश्चर्यचकित होऊ शकतो कि, समान ध्येयाप्रती निस्वार्थीपणे काम करीत असताना आवश्यक भावनिक जवळीकता साध्य करण्यासाठी लागणाऱ्या परस्परांवरील विश्वास व अपेक्षा या मुल्यांची भूमिका येथे कोठे आहे ?
जर आपण समाज म्हणून विश्वास व कृतज्ञता या मुल्यांचा आदर ठेवला नाही तर बहुजन वर्ग असे नाविन्यपूर्ण, कल्पक, सामाजिकदृष्टीने उपयोगी उपक्रम ज्यासाठी विविध घटकांचा सहभाग आवश्यक असतो घेऊन येऊ शकणार नाही. विश्वास व कृतज्ञता यांच्या कमतरतेचा रोख कालांतराने एकमेकांना सहज आधार देण्याची भावना व सहानुभूतीपूर्वक वर्तन संपुष्टात आणण्यापर्यंत जाऊ शकतो. आपल्याला असा मध्यमवर्गीय समाज व संस्कृती अस्तित्वात आणायचे आहे का ज्यामध्ये आपण जे बोलतो ते लोकांची भलामण करणारे, समाजाला आवडणारे, इष्ट वाटणारे असते परंतु प्रत्यक्षात मात्र आपले ते उदिष्ट नसते अथवा त्याप्रमाणे कृती करायची नसते किंवा यामधून फक्त स्वतःचे हित साधायचे असते व परस्परांचा उद्धार हा महत्वाचा नसतो ?
मला भीती वाटते कि, ज्या प्रश्नांची मी वरील परिच्छेदात चर्चा केली आहे, ते वेगळया परंतु अस्वीकारार्ह मार्गाने बहुजनांमध्ये संघटनानिर्मिती घडविण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष वेधतील. ( मला आशा आहे कि, जे काही मी येथे चर्चा करीत आहे त्या अल्पशा मध्यमवर्गीय घटना आहेत व या बहुतांश ठिकाणी दिसत नाहीत. बहुजन वाचक समूह/संघटना निर्मितीचे इतर मार्ग सुचवू शकतात). पण या घटना आपल्या नातेसंबंध व संघटन यामध्ये औपचारिकता येऊ शकते हे दर्शवितात. हे असे धडे शिकवितात कि, एखादा उपक्रम सुरु करण्यापूर्वी आपण एक औपचारिक करार करावा, कागदोपत्री काम ठरवून द्यावे, प्रत्येकासाठी बक्षिसे व शिक्षा यांचा उहापोह करावा, प्रत्येकाला बाह्य जगासमोर आणावे व आपण काय योगदान देतो त्याचे कागदोपत्री दस्तावेज ठेवावे (‘दस्तऐवजीकरण’ असे औपचारिक एन जी ओ च्या परिभाषेत यास म्हटले जाते.) माझे मते असे औपचारीकरण आपण पारंपारिक चळवळीमध्ये काम करीत असताना आत्मसात केलेल्या मूल्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. जिथे लोकांना नाव, चेहरा, पद ह्या गोष्टींची चिंता न करता किंवा सामाजिक व व्यक्तिगत जीवनामध्ये बदल घडवू पाहणाऱ्या शक्तिशाली संकल्पनांचे सैनिक म्हणून पडद्यामागे काम करण्यास प्रोत्स्थाहन देण्यात यायचे त्याच्या हे पूर्णपणे विरोधाभासी आहे. सध्याच्या परिस्थितीत ह्या बाबी अधिक महत्वाच्या ठरतात. जेव्हा आपण एका ज्ञानी समाजामध्ये राहत असतो, जेथे आपण एकत्र येऊन कार्य करतो, ज्ञान अथवा संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करतो ज्यामुळे एखादा उपक्रम अस्तित्वात येऊ शकतो अथवा संपुष्टात येऊ शकतो, तेथे विश्वास व कृतज्ञता यांची भूमिका खूप महत्वाची आहे, जर विश्वास व कृतज्ञता या मूल्यांना बहुजन संस्कृतीमध्ये कमी लेखण्यात आले तर औपचारिक संघटन व करार आपल्याला टाळता येणार नाहीत व याचा परिणाम म्हणजे बहुजनवादी संघटनांच्या निर्मितीवर व विकासावर खूप मर्यादा येतील.
(मूळ इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर ॲड. भाग्येशा कुरणे यांनी केले आहे, त्यांचे आभार!)
डॉ.तनोज मेश्राम
लेखक आंबेडकरवादी बहुजनवादी अभ्यासक असून गेली तीन दशके भारत व अमेरिकेमधील विविध बहुजन समूहांच्या कलेक्टीव्स सोबत काम करण्याचा अनुभव आहे.
- बहुजन कलेक्टीव्स विश्वास व कृतज्ञतेशिवाय टिकू शकत नाहीत - December 8, 2021
- मराठी चित्रपट “जयंती” ह्या बहुजन प्रोजेक्टचे महत्व तसेच माझ्या योगदानाची उपेक्षा! - November 14, 2021
- सार्वजनिक शालेय शिक्षण व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यानी रणजितसिंह डिसले यांना प्राप्त झालेल्या ग्लोबल टीचर प्राईझ-२०२० या पुरस्काराचे समर्थन करावे का ? - December 14, 2020
Leave a Reply