नानासाहेब गव्हाणे
महाराष्ट्राने आजवर अनेक महापुरुषांना जन्म दिला आहे. पर्वतप्राय उंचीच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्त्वाची कितीतरी माणसे इथे होऊन गेली. एकोणिसाव्या शतकात म.फुले, लोकहितवादी, न्या.रानडे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, लो. टिळक, आगरकर इ. समाजसुधारक आणि समाजचिंतक होऊन गेले. या सर्वात म. फुले यांना अग्रक्रम द्यावा लागतो. याचे कारण असे की, त्यांनी नुसते प्रबोधनाचे, बोलक्या सुधारकाचे कार्य केले असे नाही तर सामाजिक क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने सक्रिय प्रयत्न केले.
हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा मोडून काढण्यासाठी व मानवतावादाचा प्रसार करण्यासाठी म.फुले यांनी जे योगदान दिले ते खूपच मोलाचे आहे. लेखन, भाषण आणि आचरण या त्रिसूत्रीचा स्वीकार करून म.फुले यांनी चळवळ सुरु केली. म. फुले यांनी वाड्:मय निर्मिती दोन माध्यमातून केले.
१) तद्अनुषांगिक वाड्:मय निर्मितीव्दारे
२) प्रत्यक्ष कृतिनिष्ट विचार : आचाराद्वारे
म. फुले यांची साहित्यनिर्मिती
१) तृतीयरत्न :
१८८५ साली ‘तृतीयरत्न’ हे नाटक लिहून म.फुले यांनी साहित्यलेखनाला सुरुवात केली. शुद्रातिशूद्र लोकांवर ब्राह्मणांचे वर्चस्व किती खोलवर भिनलेले आहे याचे स्पष्टीकरण असे करतात, “प्रथम माळ्याकुणब्याचे मूल ते आपल्या आईच्या उदरात कोठे गर्भी वास करू लागल्याचा आरंभ होत आहे. तोच ब्राह्मण जोशाची स्वारी येऊन त्या गरीब बाईस मोठमोठ्या हुलथापा देऊन तिजला द्रव्यहीन कसकशी करितो.” याविषयी लिहिलेले आहे. त्यानुसार जोशीबुवा, गर्भिणी स्त्री व तिचा नवरा अशी तीन मुख्य पात्रे करून फुल्यांनी ‘तृतीयरत्न’ नाटक उभे केले आहे. ही नाट्य दृश्याच्या कळा असलेली वेधक संवादकथा आहे.
२) छत्रपती शिवाजींचा पोवाडा :
१८६९ साली म.फुले यांनी लोकहितार्थ हा पोवाडा केला. “कुणबी, माळी, महार, मांग” वगैरे पाताळी घातलेल्या क्षत्रियांच्या उपयोगी पडणारा हा पोवाडा केला” असे म.फुले यांनी सांगितले आहे. यात महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वर्णन केले आहे.
खानाची भेट म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला सामोरे जाणे, अशा संकटातून सहीसलामत बचावून आल्यावर महाराजांनी “मातोश्रींची” भेट घेतली.
”माते पायी ठेवी डोई गर्व नाडी कडीचा
!! आशीर्वाद घेई आईचा ||
आलाबळा घेई आवडता होता जीजीचा ||
गातो पवाडा शिवाजीचा ||”
काटकपणा, चपळाई, अचाट बुध्दिमत्ता व्यवहारीपणा, चातुर्य, सावधपणा, अखंड उद्योग, मुत्सद्देगिरी, धाडस, रयतेच्या कल्याणाची तळमळ व आदर्श प्रशासन हे महाराजांचे गुण म.फुले यांनी पोवाड्यातून सांगितले आहे.
“राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला | नाही दुसरा उपमेला” असे म्हणून महाराजांचे असामान्यत्वही त्यांनी व्यक्त केले आहे.
३) ब्राम्हणाचे कसब :
सामाजिक प्रबोधनाचा व सुधारणेचा दृष्टिकोन ह्या पद्यग्रंथात प्रकर्षाने जाणवतो. “पुरोहितशाहीच्या कचाट्यातून कुणबी, माळी, मांग, महार यांसारख्या अतिउपयोगी वर्गास सोडवावे व त्यास विद्या शिकवावी या दुहेरी हेतूने १८६९ मध्ये हा ग्रंथ निर्मिला आहे. लुबाडणूक करणाऱ्या पुरोहित वर्गास उद्देशून सांगितले आहे.
”पोटे जाळू नका लोकां फसवूनी।
देवा रागऊनी जोती म्हणे।।”
या पद्यग्रंथात त्यांनी ‘शुद्रांतिशुद्रांना धर्ममिषे, गृहमिषे, पुरोहितास मांडवखंडणी देऊ नका’ असा आदेश दिला आहे.
४) गुलामगिरी :
हा ग्रंथ १८७३ मध्ये प्रसिध्द झाला. या ग्रंथाचे स्वरूप दुलग आणि दुपदरी आहे. प्रस्तुत ग्रंथाची १६ प्रकरणे असून पहिल्या ९ प्रकरणांच्या पूर्वार्धात या देशातील ब्राह्मणी वर्चस्वाचा इतिहास आहे. प्रकरण १०-१६ पर्यंतच्या उत्तरार्धात सुधारलेल्या इंग्रजी राजवटीतील अत्याचारांचा तत्कालीन वर्तमान आहे.
“बहामणी धर्माच्या आडपडद्यात” व “सुधारलेल्या इंग्लिश राज्यात” अशा दोन्हीही ठिकाणी “गुलामगिरीचे” प्रत्यंतर त्यांना कसे आले, याचे अत्यंत परखड व धारदार विवेचन प्रस्तुत ग्रंथात केले आहे.
म. फुले यांनी ‘सर्वस्पर्शी’ गुलामगिरी विरूध्द ‘सर्वंकष’ युध्द आरंभिले आहे. गुलामगिरी मग ती कुणाची व कसल्याही स्वरूपाची असो, तिचे टाके ढिले करणे आणि अंतिमत: तिचे समूळ उच्चाटन करणे हे फुले यांचे जीवितकार्य होते. याचे उत्तम उदा. म्हणजे ‘गुलामगिरीतील’ जोतीराव आणि धोंडीबा यांचा संवाद.
संवाद
धोंडीबा :- युरोपखंडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली. यावरून त्यांनी ‘ब्रह्मदेवाच्या नियमास हरताळ लाविला. कारण मनुसंहितेत लिहिले आहे की, ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून ब्राह्मणास उत्पन्न केले आणि त्या ब्राह्मणांची फक्त सेवाचाकरी करण्याकरिता त्याने आपल्या पायापासून शुद्रास उत्पन्न केले.
जोतीराव: इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली. याजवरून त्यांनी ब्राह्मणांच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे. या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नानाप्रकारचे लोक आहेत. त्यास ब्रह्माने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले, याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे?
धोंडीबा:- याविषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की, इंग्रज वगैरे लोक अधम, दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही.
जोतीराव:- यावरून तुझ्यामते ब्राह्मणांमध्ये अधम, दुराचारी मुळीच नाहीत की काय?
धोंडीबाः शोधाअंती इतर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम, दुराचारी आहेत असे आढळते.
जोतीरावः- तर मग अशा अधम व दुराचारी ब्राह्मणांविषयी मनुसंहितेत कसा लेख आला?
धोंडीबा :- यावरून असे सिध्द होते की, मनूने जी उत्पत्ती लिहिली आहे ती खोटी आहे. कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही.
मनुस्मृतीतील फोलपणा, दांभिकता ‘गुलामगिरी’ या ग्रंथातून दर्शविला आहे.
५) शेतकऱ्यांचा आसूड :
हा ग्रंथ प्रामुख्याने शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या स्थितीची कारणमीमांसा व त्यावरील उपाय सांगण्यासाठी फुल्यांनी लिहिला आहे. आजूबाजूस अफाट पसरलेल्या जनसमुदायाकडे सहानुभूतीने पाहण्याची दृष्टी, ग्रामीण जनता, तिचे प्रश्न, त्यांची दुःखे यांना प्रथमच वाचा फुटली ती म.फुले यांच्या रूपानेच. त्यांचे हे लेखन क्रांतीदर्शी आहे, विद्रोही स्वरूपाचे आहे, प्रस्थापित व्यवस्थेला नकार देऊन न्याय, हक्क मिळविण्यासाठी त्याचे प्रयोजन आहे.
परंतु कधीकधी त्यांचा कळवळा कारूण्याचा तीव्र प्रत्यय आणून देतो.
उदा :- शेतकरी जेव्हा कर्जबाजारी होतो. तेंव्हा मुलीच्या अंगावरचे दागिने विकून टाकतो. परिणामतः तिच्या नांदण्याचे चांदणे होते. शेतकऱ्यांच्या जेवणाचे अतिशय करूण चित्र ते उभे करतात व म्हणतात की, “पाणी पिऊन डरदिशी ढेकर देतात.” किंवा लग्न समारंभात अन्न न मिळाल्यामुळे मुले “लांडग्यासारखी घासामागून घास संपवितात.”
या कथेतील म्हातारी दुःखावेगाने बेशुध्द होणाऱ्या मुलास बघून रडता-रडता जे मनोगत व्यक्त करते, तेही अत्यंत बोलके आहे. ती म्हणते, “अरे मेल्या ठकभटानों थापा देऊन मजपासून तूपपोळ्यांची भोजने व दक्षिणा उपटल्या. अरे तुम्ही मला माझ्या एकुलत्या एक भगवंतरायाच्या जन्मापासून आजदिनपावेतो नवग्रह वगैरेचे धाक दाखवून शेकडो रूपयास बुडवून खाल्ले आता तुमचे पुण्य कोठे गेले?”
म्हातारीच्या तोंडची ही भाषा प्रस्थापित, धर्मव्यवस्थेविरूध्द, पुरोहितशाहीकडून होणाऱ्या शोषणाविरूध्द विद्रोह पुकारणारी आहे.
शेतकरी, कष्टकरी हा प्रतिष्ठित असला पाहिजे. शेती ही उत्तम केली पाहिजे, यादृष्टीनेही म.फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून विचार मांडले आहेत.
६) अखंडादी काव्यरचना :
म. फुले ‘अखंड’ नावातून काव्यरचना करतात व तुकारामांच्या अभंगाशी आपल्या काव्याची नाळ जोडतात ते म्हणतात,
”अखंड न खंडे। अभंग न भंगे।।
तुका म्हणे गंगे। मिळणे सिंधू।।”
सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही. ही त्यांची श्रध्दा होती. एका अखंडात ते म्हणतात,
”सत्य सर्वांचे आदी घर। सर्व धर्माचे माहेर
जगामाजी सुख सारे। खास सत्याची ती पोरे ।।१।।
सत्य सुखाला आधार। बाकी सर्व अंधकार
आहे सत्याचा बा जोर। काढी भंडाचा ती नीर ।।२।।”
गद्याबरोबर पद्यातही कर्मकांडावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. शुद्रांना फसवून त्यांच्या जमिनी बळकावणे, लाच घेतल्याशिवाय काम न करणे, अशिक्षितपणाचा फायदा उठवणे या गोष्टींचा त्यांनी तीव्र निषेध केला. शुद्रांनी कष्टाची कामे करायची व इतरांनी आरामात जीवन जगायचे, याचा निषेध करताना जोतीबा म्हणतात,
”जळो-जळो तुमचे जिणे,
उद्योगाआधी ताजे खाणे”
अखंडादी काव्यरचनेत म.फुले यांनी विविध विषय हाताळलेले आहेत. मानवाचा धर्म एक, मानवी स्त्री-पुरुष, आत्मपरिक्षण, निती, और, समाधान, सहिष्णुता, सद्विवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्य दक्षता, आर्यभट ब्राह्मणाचे कसब, ढोंगी गुरु, शुद्रापासून खंड गोळा करण्याविषयी निषेधार्थ इ. च्या माध्यमातून सामान्यातील सामान्य लोकांना रूचेल, पचेल, समजेल अशा शब्दातून, काव्यातून व्यक्त केलेले आहे.
सत्यधर्माने चातुर्वर्ण्यव्यवस्था, जन्मजात, जातिभेद, सामाजिक विषमता नाकारलेली होती. ते म्हणतात,
”सत्यविण नाही धर्म तो रोकडा। जनांशी वाकडा मतभेद सत्यसोडू जाता वादामध्ये पडे। बुध्दीस वाकडे जन्मभर
सत्य तोच धर्म करावा कायम। मानवा आराम सर्वठायी
मानवांचा धर्म सत्य हीच निती। बाकीची कुनीती जोती म्हणे।”
त्यांची कविता विज्ञान निष्ठेच्या आणि प्रखर बुध्दिवादाच्या तेजात न्हाऊन निघालेली आहे. स्वतःच्या मताचे मंडन व प्रस्तापितांच्या मतांचे खंडन करण्यासाठी काव्य या प्रकारात त्यांनी विपुल अशी रचना केली.
तत्कालीन उच्चभ्रू, पांढरपेशी लेखकांनी शुद्रांति-शूद्रांची दुःखे समजावून घेतली नाहीत, म्हणून ‘आमचा आम्हीच विचार केला पाहिजे’ असे ठरवून फुले यांनी लेखणी वापरली व समाजात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांची इतर पुस्तकेही याच प्रेरणेने निर्माण झाली. ‘सत्सार अंक १ व २, इशारा, अस्पृश्यांची कैफियत, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टक, सत्यशोधक समाज या समग्र वाड्:मयाचा मुख्य भाग समाज चिंतनाला वाहिलेला आणि हिंदू संस्कृतीची संबंध संरचनाच बदलू पाहणाऱ्या देशीपणाचा पोटतिडकीचा आहे.
प्रत्यक्ष कृतिनिष्ठ विचार-आचाराव्दारे म. फुले यांचे सामाजिक कार्य :
राजकीय गुलामगिरीपेक्षा सामाजिक गुलामगिरी अधिक वाईट म्हणून त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेविरूध्द कडाडून हल्ला करून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून दिला. म्हणूनच त्यांना ‘महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग’ म्हणतात.
थॉमस पेन यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ‘राईटस ऑफ मॅन’ हे थॉमसपेन यांचे आवडीचे पुस्तक. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात स्वतःच्या घरातून केली. प्रथम त्यांनी आपल्या पत्नीला शिकविले. महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा पाया १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरु करून घातला. पहिला विधवा पुनर्विवाह पुण्यात (१८०४) मध्ये घडवून आणला. १८६८ मध्ये त्यांनी हौद व विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. १८७३ अस्पृश्यता निवारण्यासाठी जाहीरनामा. सिताराम अल्हाट व राधाबाई निमकर यांचा १८७३ मध्ये पहिला सत्यशोधक पध्दतीचा विवाह. १८७७ मध्ये जोतीबांच्या प्रेरणेने साप्ताहिक सुरु झाले. अशा स्वरूपाचे कार्य म.फुले यांनी केले. तसेच १८८८ च्या हंटर कमिशनच्या समोर १२ वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत द्यावे. अशी मागणी करून त्यांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून दिला.
सामाजिक व आर्थिक समतेवर आधारलेला शोषण विरहीत असा समाज निर्माण करण्याचे म.फुले यांचे स्वप्न होते आणि ते आपल्या प्रत्यक्ष कृतीतून साध्य केले.
म. फुले यांचे शैक्षणिक कार्य :
अज्ञान म्हणजे अंधार, शिक्षण म्हणजे प्रकाश. शिक्षण हे सर्व सुधारणेचे मूळ आहे. म्हणून त्यांनी स्वतः कनिष्ठ वर्गाच्या मुलींसाठी १८४८ च्या ऑगस्ट महिन्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. ती आर्थिक कारणांमुळे बंद पडली. ३ जुलै १८५१ मध्ये पुन्हा सुरु केली, त्यात ८ मुली होत्या. १७ सप्टेंबर, १८५१ रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली. आणि १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी तिसरी शाळा काढली. यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे सहकार्य केले. जोतीरावांना यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे व सदाशिव गोवंडे हे त्यांना ती शाळा चालविण्यासाठी आर्थिक सहाय्य करीत असे. स्वतः स्थापिलेल्या शाळेत त्यांनी जवळ-जवळ ११ वर्षे काम केले. स्त्रियांच्या हक्कासाठी, उध्दारासाठी त्याग करणाऱ्या आणि कष्ट भोगणाऱ्या जोतीरावांचा ‘स्त्रियांचा उध्दारकर्ता’ म्हणून गौरविण्यात येते.
म. फुले यांचे धर्मविषयक विचार :
म. फुले त्यांच्या काळातील समाजाला आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक हक्कांपासून त्याला वंचित ठेवण्यात आले होते. त्यांच्या मनावरील देवकल्पनेचा पगडा जबरदस्त होता. तो नाहीसा करण्याचे कार्य फुले यांनी केले.
प्रार्थना समाज अस्तित्वात असताना सुमारे सहा वर्षांनी म. फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. सार्वजनिक सत्यधर्म हा रूढ अर्थाने धर्म नसून तो त्यांनी आयुष्यभर चालविलेल्या समता लढ्यांचा मार्गदर्शक तत्वांचा साररूप जाहिरनामाच होता. यात केंद्रस्थानी परलोक, परमेश्वर न राहता त्यांची जागा इहलोक व मानव यांना प्रदान केली जाते.
”निर्मिकाने तर एक पृथ्वी केली। भार वाही भली।। सर्वत्रांचा
तृणभार वृक्ष पाळी आम्हांसाठी।। फळे ती गोमटी।। छायेसह।।
सुखसोईसाठी गरगर फिरे।। रात्रंदिनसारे।। तीच करी।।
मानवाचे धर्म नसावे अनेक।। निर्मिक जो एक।। जोती म्हणे”
इ.च्या माध्यमातून म.फुले यांनी ‘मानवतावादी’ धर्माचा पुरस्कार केलेला दिसतो.
म. फुले यांचे हे यश विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरिभाऊ आपटे, केशवसुत, अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यापेक्षा कालिकदृष्ट्या अगोदरचे आणि गुणवत्तेच्या दृष्टीने कितीतरी वेगळ्या प्रकारचे आहे. या साहित्यिकांच्या तुलनेने म. फुले यांची साहित्यधारा अधिक देशी, अधिक व्यापक, अधिक मानवतावादी आणि अधिक आधुनिकही आहे. म्हणूनच म.फुले हे आधुनिक मराठी साहित्याचे आद्य जनक ठरतात.
नानासाहेब गव्हाणे
लेखक मराठी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक आहेत.
- सावित्रीबाई फुले : उद्यमशील समाज शिक्षिका - January 3, 2022
- आधुनिक मराठी साहित्याचे जनक – महात्मा फुले - December 10, 2021
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि सद्यस्थिती - December 6, 2021
Leave a Reply