डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि सद्यस्थिती

प्रा.नानासाहेब गव्हाणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे,ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून! जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. असे जरी असले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. धर्मशास्त्र, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक,द्रष्टे विचारवंत, विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी केलेली पत्रकारिता आजही प्रेरक ठरेल अशीच आहे.

समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी ‘मूकनायक’ या पत्राच्या पाक्षिकाच्या 31 जानेवारी, 1920 रोजी जन्म झाला. मूक अशा अस्पृश्यांचे नायकपण-नेतेपण आपण स्वीकारल्याचे मूकनायक काढून 1920 साली त्यांनी जाहीर केले. मूकनायकाने त्यांच्या पुढील घणाघाती चळवळीची नांदीच जणू म्हटली. यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते.
मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर पुढील बिरुदावली छापली जात असे.

काय करु आता धरुनिया भीड | नि: शंक हे तोंड वाजविले ||1||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||
तुकारामांच्या या ओळी त्यांनी बिरुदासाठी निवडाव्यात,यात केवढे तरी औचित्य आहे. वृत्तपत्राचे ‘मूकनायक’ हे नावही त्यांना ”नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण” या चरणावरुन सुचले आहे हे निश्चित. बाबासाहेब विलायतेला गेले व 1923 मध्ये ‘मूकनायक’ बंद पडले.
बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी काढले. या पाक्षिकाचे ते स्वत: संपादक होते. दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानदेवांच्या ओव्या उद्धृत केलेल्या असत.
या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वत: लिहित असत. खूप लोक वर्गणीदार झाले नाहीत. कायमची आर्थिक तरतूद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत 15 नोव्हेंबर, 1929 रोजी बंद पडले. या पाक्षिकाचे एकूण 34 अंक निघाले. त्यातला 04 जानेवारी 1929 चा अंक सोडता सर्व अंकात अग्रलेख आहेत. 31 अंकांमध्ये आजकालचे प्रश्न ”प्रासंगिक विचार” या सदरामध्ये त्यांनी स्फूट लेख लिहिले आहे. त्यांच्या स्फूट लेखाची संख्या 145 आहे.
जनता वृत्तपत्राचा प्रथम अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित झाला. संपादक श्री. देवराव विष्णू नाईक होते. जनता प्रारंभी पाक्षिक होते. 31 ऑक्टोबर 1931 रोजी ते साप्ताहिक झाले.या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ”गुलामाला तू गुलाम आहेस,असे सांगा म्हणजे तो बंड करुन उठेल” हे वाक्य होते. जनतेत त्यांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेच पण जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून लिहून पाठविलेली पत्रे प्रकाशित झाली आहेत. 1955 पर्यंत जनता सुरु होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले. कधी त्यात अनियमितपणा निर्माण झाला पण तरी ते खूप दिवस टिकले.

4 फेब्रुवारी 1956 रोजी जनताचे नामकरण ‘प्रबुद्ध भारत’ असे करण्यात आले.
बाबासाहेब हे सव्यसाची पत्रकार होते. सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक न्याय ह्या तत्वांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी आग्रह धरलेला होता. त्यांची सर्व पत्रे याच ध्येयवादाने भारलेली होती. नैतिकता हा तर त्यांनी वृत्तपत्रसृष्टीचा कणाच मानला होता. वृत्तपत्र हे जर जनकल्याणाचे साधन असेल तर मग पीत पत्रकारिता ही निषेधार्हच मानली पाहिजे.
महाराष्ट्रात एक ध्येयशील पत्रकारितेची परंपरा आहे आणि म्हणून व्यथित अंत:करणाने पण परखडपणे आपल्या ध्येयापासून वंचित होणाऱ्या पत्रांना त्यांनी आपल्या मूळ बैठकांची जाणीव दिली. वृत्तपत्रांनी आचारसंहिता पाळली नाही आणि तंत्र स्वैर असले तर अज्ञजन रानभैरी होतील, असे त्यांना वाटत होते. भडक, विकृत आणि भावनांना आवाहन करणारे लेख लोकमानस घडवू शकणार नाहीत. लोकजीवनाला नवे परिणाम देऊ शकणार नाहीत,अशी त्यांची खात्री होती. वृत्तपत्राचा खप वाढणे म्हणजे लोकमनाला संस्कारित करणारी विधायकता नव्हे. नि:पक्षपातीपणाचा अभाव आणि न्यायोचित लोककल्याणाच्या विचारांशी फारकत, लोकमनाची व लोकमताची अविकृत जडणघडण करु शकत नाही,असा त्यांचा ठाम विचार होता. वृत्तपत्र हे शोषणाचे माध्यम बनविणाऱ्या प्रवृत्तींना त्यांनी धारेवर धरले.

त्यांच्या मते,व्यक्तिपूजा ही भारतातील अनेक पत्रांना लागलेली कीड आहे. व्यक्तिपूजा आंधळी असते. त्यामुळे नीतीमत्ता ढळते म्हणून वृत्तपत्रांनी नीतीमत्तेला बाधा येणार नाही आणि सत्यापनाचा सूर बदलणार नाही,ह्याची काळजी घेतली पाहिजे. वृत्तपत्र प्रपंच म्हणजे नीतीमत्तेचा प्रपंच अशी त्यांची धारणा होती.जाहिरातीशिवाय वृत्तपत्रे जगू शकत नाहीत,हे खरे असले तरी वृत्तपत्रांनी जाहिरातीच्या आहारी जावे का? आणि कितपत जावे! आर्थिक सवलतीसाठी जाहिराती आवश्यक असल्या तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात,यासंबंधीची संहिता पाहायला हवी, असे ते म्हणत. जाहिरातीची उद्दिष्टे आणि जाहिरात करण्याची पद्धती यात विरोध निर्माण झाला की, जाहिराती करण्यामागील तत्व भ्रष्ट होते,असा त्यांचा दावा असे.
जाहिरात आणि नीतीमत्ता यांचा अन्योन्य संबंध बाबासाहेबांना अपरिहार्य वाटे. समाज उन्नतीचे साधन म्हणून त्यांनी वृत्तपत्राकडे पाहिले. लौकिक ऋण फेडण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा प्रभावीपणे वापर केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेले विचार, भूमिका आजही तंतोतंत लागू पडते, यावरुनच त्यांची दूरदृष्टी आणि विचारांची खोली दिसून येते.

पण, आज सद्यस्थिती वेगळी आहे.२१व्या शतकात या चौथ्या स्तंभाचा विचार केला असता, ‘माध्यमे खरंच आपली जबाबदारी पार पाडत आहेत का?’ हा मोठा प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. त्यासाठी सर्वप्रथम माध्यमांनी अधिकारांच्या किंवा सत्तेच्या दुरूपयोगाला थांबवण्याची गरज आहे. मात्र, सध्या माध्यमांचाच वापर एक सत्ताकेंद्र किंवा अधिकार केंद्र म्हणून सर्रास केला जातो. कोणत्याही देशांत लोकशाही तेव्हाच बळकट होते, जेव्हा तिथली माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष असतात. काही निष्पक्ष माध्यमे प्रथेप्रमाणे आपल्या देशातही आहेत. परंतु, पूर्वग्रहदूषितता आणि पक्षपातीपणानेही त्यांना ग्रासले आहेच. लोकशाहीमध्ये सर्वात जबाबदार असा हा माध्यमांचा चौथा स्तंभ. त्याचे कारण म्हणजे माध्यमांचा जनतेशी येणारा दैनंदिन संबंध. पण, एवढा सशक्त असलेला हा चौथा स्तंभ सध्या कमकुवत झालेला दिसतो. म्हणूनच आजच्या माध्यमांनी आरशात पाहण्याची, आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे,असे मनापासून वाटते.

प्रा.नानासाहेब गव्हाणे

लेखक हे वालचंद महाविद्यालय,सोलापूर येथे पदव्युत्तर मराठी विभागात अध्यापनाचे कार्य करत असून प्रगतिशील लेखक संघ, सोलापूरचे सदस्य आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*