जात, वर्ग, आणि जेंडर यांचा घातलेला गोंधळ

गौरव सोमवंशी

जात, वर्ग, आणि जेंडर, आणि मागील 3 दशकात माजलेला (मुद्दामून माजवला गेलेला) गोंधळ. .

‘नॉलेज प्रोडक्शन’ हे भारतात विद्यापीठ-केंद्रीय राहिलं आहे, आणि विद्यापीठ हे ब्राह्मण-सवर्ण केंद्रीय, म्हणून अधून-मधून जे काही तेथील राजकरणाला खरंच धक्के देऊ शकेल अश्या गोष्टीला गिळून वेड-वाकडं करून त्याचं “सीलॅबसिकरण” करून पुढे सरकत आहे. जर का मासिक किंवा जर्नल असेल तर एका कॉलम (जसं EPW च “मार्जिन स्पीक”) मध्ये बंदिस्त करून छान पॅकेज केलं जातंय.

आता स्वतः नॉलेज प्रोडक्शनच्या बिजनेस मध्ये असणारी मंडळी असं काही पुढे आणतील का की ज्याने त्यांचीच जागा किंवा वर्चस्व धोक्यात येईल? पण नाईलाजाने काही गोष्टींकडे दुर्लक्ष पण करता येत नाही, नाहीतर रस्त्या-गल्ली-चौका-चौकातून वाहणारे वारे यांना उडवून लावतील. म्हणून मग जेव्हा यांना जात गिळायची पाळी आली तेव्हा यांनी जातीप्रश्नाला कस स्वरूप दिलं ते पाहू.

पुढे जाण्या अगोदर एक गोंडस शब्द सुद्धा शिकून घेऊ, ते म्हणजे ‘इंटरसेक्शन’. दोन वर्तुळ जर एकमेकांमध्ये थोडे ‘ओव्हरलॅप’ झाले, तर त्या कॉमन जागेला इंटरसेक्शन जसं म्हणतात, तसलेच काही (शाळेत शिकलेले ‘व्हेन डायग्राम’) . उजव्यांनी तर जातीला पूर्णपणे सांस्कृतिक प्रश्न म्हणून वळवण्याचा प्रयत्न केलाय, आणि त्या प्रकाराला ते स्वतः सोडले तर बाकी कोणी भीक घालत नाही, म्हणून ते असंच उडवून लावू.

मग आता हे सवर्ण पुरोगामी/डावे ज्यांच्या हातात नॉलेज प्रोडक्शन होतं आणि आजही आहे, त्यांनी काय केलं?

त्यांनी पण थोडक्यात तेच केलं जे त्यांच्या उजव्या चुलत्यांनी, पण थोडं डोकं लावून अजेंडा राबवला.

जातीप्रश्नातून वर्ग आणि जेंडर हे वेगळे करून पाहता येतील आणि यावेत, हा त्यांचा आग्रह, आणि कुठे जर का दोघांमधील संबंध जास्तच ठळकपणे जाणवत असेल तर तो गोंडस शब्द आहेच की, ‘इंटरसेक्शन’. बाबासाहेबांनी जातिव्यवस्था समजवतांना वर्ग आणि जेंडर कधी वापरले नाहीत की काय असा विचार करण्यास तुम्हाला भाग पाडलं जातं. पण त्यांनी तर सतीप्रथा समजावून सांगताना सुद्धा ही “सरप्लस वुमन” आणि तिच्या भोवती असणाऱ्या जात-पिंजऱ्यामुळे कशी उद्भवते हे सुद्धा या पद्धतीत समजावून सांगितले आहे. जात हे कामाचे नाही तर कामगारांचे वर्गीकरण आहे या एका वाक्यात सुद्धा त्यांनी या देशाचा सामाजिक आणि आर्थिक स्थिती समजावून सांगितली.

पण जेव्हा मुद्दामून असा आव आणला जातो की “अहो नाही नाही, तुम्ही फक्त जातीवर बोललात, वर्ग आणि जेंडर राहून गेलं की” तेव्हा त्यामागील हेतू हा सुद्धा असतो की तिघा प्रश्नांना असं काही ट्विस्ट करणे की त्यांच्यामधील असणारे क्रांतिकारी सामर्थ्य हे नष्ट होऊन प्रस्थापितांना आरामात पचवता येईल अशे चुरण तयार होईल.

कसं?

जेंडर मधून जात काढली की सवर्ण स्त्रीवाद हा सावित्रीमाई च्या स्त्रीमुक्तीला बाजूला सारून स्वतः ठाम मांडून बसेल (बसला आहे). आणि त्यामधून तुम्हाला शेफाली वैद्य सुद्धा मिळेल, आणि “दलित पितृसत्ता” वर निबंध लिहीणार्या ब्राह्मण-सवर्ण लेखिका.

वर्गामधून जात वेगळी केली की दलित मध्यमवर्गावर (हे वर्ग पण अशे की बहुतांश वेळी एक कुटुंब नोकरी मिळालेला असतो आणि सगळी नातेवाईक अजून पण गरीब, पण तरी पण हा वर्ग बनतो असा त्यांचा आग्रह आपण मान्य करू), की या वर्गावर मग तुम्ही ग्लोबल वार्मिंग पासून ते दिल्लीतील प्रदूषण ते राष्ट्रीय भांडवलशाही ते जागतिक साम्राज्यवाद, या सगळ्याचा खापर फोडता येते. आणि स्वतःचा वर्ग हा सुद्धा त्याचवेळी जातीप्रश्नातून बाहेर काढता येतो (कारण “जात म्हणजे दलित” हे डाव्यांचे समीकरण त्यांच्या मदतीला धावून येते).

म्हणून शेवटी मग तुम्ही या डाव्यांच्या पाश्चिमात्य-ब्राह्मणी ब्रँडेड चष्म्यातून पाहता तेव्हा जात काय म्हणून उरते? तेच, एक सांस्कृतिक प्रश्न, की आडनावे खोडली किंवा एक बौद्ध मित्र ठेवला किंवा ‘जय भीम लाल सलाम’ म्हणलं की झालं. करण यांच्या मते वर्ग आणि जेंडर तर यांनी उकरून-शोधून काढलेले प्रश्न आहेत, आंबेडकरी चळवळीतील लोकांना जसं हे दोन माहीत नाहीच.

म्हणून एक सांगतो की जो गोंधळ माजवला गेला आहे त्यापासून स्वतः सावध राहा आणि आपलं सगळं काही ठळकपणे मांडत राहा. फुलेंनी नॉलेज प्रोडक्शनवरील नियंत्रणामुळे अक्खा समाज कसा नियंत्रित केला जातो यावर लिहिलेच आहे (‘विद्येविना मति गेली..’), आणि जातमुक्ती म्हणजे वर्ग आणि जेंडरच्या बंदिस्त पिंजऱ्यातून मुक्ती हे त्यांनि पहिल्या प्रकाशित निबंधापासून शेवट पर्यंत लिहिलेच आहे.

म्हणून सुरुवात जशी ‘इंटरसेक्शन’ आणि ‘भूमिती’तुन झाली तर त्याच भाषेत सांगतो. जात हे जर एक सर्वात मोठं वर्तुळ म्हणून आपण डोळ्यांसमोर आणलं तर त्या एका वर्तुळामध्ये अनेक अंतर-वर्तुळ सामावून जात आहेत असं चित्रित करा (इंग्रजीमध्ये याला ‘इनस्क्राईब्द’ म्हणतात). मग या देशामधील आर्थिक प्रश्न, जेंडर वरील प्रश्न, कोण विचारवंत आणि कोण साधा लेखक, कोण सेक्युलर आणि कोण राष्ट्रवादी, कोण सात्विक आणि कोण तामसी, या सगळ्यांचा उगम जातीतून कसा होतो ते आपण समजून घेऊन मांडणे फार गरजेचे. आणि जो पर्यंत त्यावर हल्लाबोल होत नाही तो पर्यंत आपण फक्त स्वतःच्या आणि एकमेकांच्या पाठीवर पुरोगामी असल्याची शाब्बासी देण्याचा खेळ खेळत बसू.

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*