सिद्धांत बारसकर
विख्यात साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांचा संग्रह नुकताच लोकवाङ्मय गृह तर्फे प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहामध्ये आठ कथांचा समावेश आहे. याचे संपादन लेखक समिक्षक जी. के. ऐनापुरे यांनी केल आहे. या कथासंग्रहाला एकुण ८५ पानांची दीर्घ प्रस्तावना लिहून बागुलांच्या साहित्याची उकल केली आहे.
बाबूराव बागुल यांच्या कथांना प्रस्थापित उच्चवर्णीय ब्राह्मणी साहित्यिक समिक्षकांनी दलित कथेच्या चौकटीत यशस्वी रित्या बसवले होते. ही चौकट खऱ्या अर्थाने या समिक्षेने मोडून काढली असे म्हणता येईल. बागुलांच्या कथा जेव्हा वाचनात येतात तेव्हा त्यामध्ये फक्त दुखः, शोक आणि पिडा नसते, तर याच बरोबर विद्रोह, नवनिर्माण आणि कारुण्याची भावना सुद्धा असते.
या प्रस्तावनेतून ऐनापुरे नवकथाकार म्हणून बागुलांकडे पाहतात. भावे-गाडगीळ-माडगूळकर ज्यांना प्रस्तावित उच्चवर्णीय समिक्षक नवकथाकार म्हणतात ते जुन्या गंजलेल्या रामायण महाभारत पोथीपुराण उगळण्याचे काम करीत होते. तेव्हा बागुल-सारंग-चित्रे आणि भास्कर चंदनशिव सारखे लेखक खऱ्या अर्थाने नवकथा निर्माण करत होते.
या नवकथाकाराचं हे सामर्थ्य नवीन वाचक मान्य करतो. परंतु ज्याला आपण सूज्ञ वाचक समजतो तो सुध्दा बाबुराव बागुलांच्या काही कथांवर कळत नकळत अन्याय करतो. या वाचका कडून पेसुक आणि सूड यांच्यावर एक आक्षेप नेहमी ऐकायला मिळतो तो म्हणजे बागुलांनी यात पुन्हा सती सावित्री सारख्या आदिम आणि प्रतिगामी उपमा वापरून चूक केली. यापुढे जाऊन बागुल फसले-गंडले इथपर्यंत ऐकायला मिळते.
जी. के. ऐनापुरे यांच्या प्रस्तावनेतून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतात.
१) पेसूक या कथेत पुरूषांची नाके कापणारी सावित्री ही तिचा अतोनात छळ करणाऱ्या नवऱ्याचे (जयदेवचे) नाक कापून वध करत नाही तर त्याला भिती दाखवून मारते व शेवटी सती जाते. तिचे सती जाणे हे बागुलांच्या ideology च्या विरोधी जरी असले तरी सावित्रीचे सती जाणे हे उपरोधिक आहे. हा उपरोध “भारतीय स्त्री सर्व सहन करील; पण विधवा होणे सहन करणार नाही. विधवा होणे ही भयंकर शिक्षा… देहदंडापेक्षा भयंकर…” ह्या वाक्याने स्पष्ट होतो. येथून बागुल हिंदू स्त्रीयांची ज्यांना आदर्श मानले जाते उदाहरणार्थ सीता/सती/सावित्री यांच्या वर टीका करतात.
२) सूड या दीर्घकथेत ज्वाला स्त्रीजन्माचा द्वेष करते. पुरुषत्वाचा आग्रह धरते. पण शेवटी अध्यात्माच्या सावलीत येऊन पुन्हा स्त्रीत्वात विलीन होते. ही कथा वास्तवापासून सुरू होऊन पुराणात घुसते. यात जानकीचे अनुभव स्वामीच्या काल्पनिक आध्यामावर मात करतात. येथे जरी अनुभवावर आधारित बौद्ध तत्वज्ञान जिंकले असं वाटतं असेल तरी व्यक्ती म्हणून पुढे येणारा ज्वाला शेवटी स्त्रीभावामध्ये अडकतो.
3) वरील दोन्ही वेळी शेवटी स्त्रियांची पात्रे स्त्रीभावामध्ये अडकून राहतात. याला कारण भारतीय समाजात अजूनही स्त्रीयांची स्थिती मागास आहे. बागुल जेव्हा ही पात्रे रंगवत होते तेव्हा त्यांच्या समोर हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्या स्त्रीया होत्या. हिंदू कोड बिल हे न भूतो न भविष्यती असा अमूलाग्र बदल भारतीय स्त्रीयांच्या जीवनात करणार होते. तरीही शिक्षीत हिंदू स्त्रियांनी याचे पाहिजे तसं समर्थन केले नाही. याठिकाणी मला सरोजिनी नायडू आठवतात. हिंदू कोड बिल तीन वेळा मांडणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांची तुलना त्यांनी बिनाटो मुसोलिनी याच्याशी केली. हेच दुर्दैव सावित्री आणि ज्वाला यांमध्ये प्रतिबिंबित झाले असावे. हे स्पष्टीकरण माझ्या सारख्या वाचकाचे समाधान करते.
या प्रस्तावनेत ऐनापुरे बागुलांच्या कथांची सुत्रे, त्यांची निर्मिती, बागुलांच्या साहित्यात असलेला मुंबईतील अधोविश्वाचा प्रभाव, बागुलांच्या साहित्यवर केलेल्या समिक्षा यांचा सविस्तर आढावा घेतात. यात शिरीष पै, शरद पाटील, म. ना. वानखेडे यांच्या समिक्षा आणि भाष्याचा समावेश आहे. प्रस्तावनेत बागुलांच्या स्त्री पात्रांची तुलना विलास सारंगांच्या स्त्री पात्रांशी केली आहे. एकुणच ह्या समिक्षेमुळे बागुलांच्या एकुण कथांचे सर्वांगिण आकलन होण्यासाठी मराठी वाचकांना मदत होईल!
बागुलांच्या कथांबाबत :
बागुलांच्या ह्या कथा मानवी भाव जपणाऱ्या आहेत. आधुनिकतेच्या पुढे आहेत. बुद्ध-आंबेडकर-मार्क्स-मार्टिन ल्युथर किंग जुनियर यांच्या विचारांचे प्रतिबिंब यात ठळकपणे उमटलेले आहे. ह्या कथा व्यक्तीचा विचार करतात.
पहिली कथा पान. टॉम आणि हेझल यांच्या प्रेमाची आहे. टॉम हा ब्लॅक (अमेरिकन) आहे. तो मार्टिन ल्युथर किंग जुनियर यांचा अनुयायी आहे. त्याच्या कडे आकर्षित झालेली हेझल white (श्वेत)आहे. ह्यामुळे दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या white supremacist संघटना देत आहेत. अशी कथा मराठी यापूर्वी कधीच आली नाही. अजूनही जागतिकीकरण च्या युगात ब्लॅक लोकांच्या कथा भारतीय साहित्यात नाहीत.
दुसरी कथा धम्म ही कथा पहिल्या आंबेडकरी पिढीचा आणि अस्पृश्यता पाळणऱ्या जुन्या पिढीतील संर्घषावर आधारित आहेत. येथे नवयान बौध्द धम्माचे अंतरंग एका ठिकाणी प्रखर नास्तिक विचारांशी जुळते. वर्षांनुवर्षे असलेल्या अंधश्रद्धा बुद्ध एका झटक्यात हाणून पाडतो. भगत नावाच्या पारंपरिक व्यक्तीला सामाजिक परिवर्तनाच्या दृश्याने होणारा त्रास यात दिसतो. सामाजिक मानसिकता किंवा परिवर्तनाचा अडथळा ही गोष्ट कशी भावनिकतेशी जोडली आहे हे दाखवणारी एक अद्वितीय कथा.
तिसरी कथा मनुची मनाई आहे. यातून समाजपरिवर्तन होत असताना कुठेना कुठे जातीप्रथा नव्या रुपात जिवंत राहत आहे, याचं वर्णन बाळा पाटील आणि महिपती यांच्या संबंधातून केले आहे. प्रेमात वात्सल्यात आडव्या येणाऱ्या जातीचे जिवंत आणि भावनिक वर्णन या कथेत आहे.
चौथी कथा सूर्याचे सांगाती. ह्या कथेत शंकर जाधव, नाखवा, संजय कुलकर्णी आणि मोहम्मद भाई अली या चळवळीतील लोकांच्या माध्यमातून त्यांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अडचणी, त्यांचे आपापल्या पातळीवरील लढे, त्यांचे यश अपयश आणि याचा त्यांच्या वैयक्तिक मानसिक पातळीवर पडणारा प्रभाव दिसून येतो. ही कथा प्रेरणादायी आहे. आणि परिवर्तन घडणार हा विश्वास पेरण्याचे काम करते.
पाचवी कथा ही फकिराचा वंशज नावची. ज्या जातींना ब्रिटीशांन कडून गुन्हेगार ठरवल गेलं, त्या जातींमधील मातंग लोकांवर आधारित कथा. कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या पात्राशी प्रेरित असलेल्या नायकाची आहे. नव्या भारतात ज्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे. आता त्यापुढे बंडखोरी हाच पर्याय दिसत असतानाची ही कथा आहे.
सारंगीचे सूर ह्या सहाव्या कथेत संभा पाटील आणि त्याच्या कुटुंबाची. संभा पाटील हा पाटीलकी उपभोगलेला गावातील मोठा माणूस आहे. त्याच्या सोबत त्याची कमी वयात विधवा झालेली बहिण आणि बायको पाकोळी राहतात. त्याची बहिणीचे अस्पृश्य असलेल्या आत्माराम सोबत प्रेमसंबंध आहेत. याने त्यांच्यात निर्माण होणाऱ्या ताणतणावावर ही गोष्ट आधारलेले आहे.
आंधळा उजेड यामध्ये आदिवासी मजूर आणि जमीनदारातील संघर्ष त्यातून निर्माण होणारी बंडखोरी आणि पात्रांच्या संवादातून येणार विद्रोही तत्त्वज्ञान हे कथेची सुत्र सांगता येईल. गावात नव लग्न झाल्यावर प्रत्येक आदिवासी मजूराने आपली पत्नी जमीनदाराकडे पाठवण्याच्या अमानुष प्रथेच्या विरोधात ही कथा लिहिली गेली आहे.
शेवटची कथा पुन्हा मुंबईतली आहे. धर्मा देशमुख जो जगण्यासाठी मुंबईतल्या लेबर कॅम्पात आपल्या कुटुंबासोबत आला आहे. धर्मा बेरोजगार असल्याने त्याच्या आईला कामावर जावं लागतं आहे. आसपासच्या नवीन महानगरीय दलित कामगारांच्या वस्ती राहणं देशमुख बाईंना असाह्य होत आहे. बेरोजगारीने सभोवतालचं वातावरण तुरुंग वाटतं आहे.
वरील सर्व कथा दुखाचा शोध घेतात. बागुलांच्या कथांमधून शेवटपर्यंत बुद्ध-मार्क्स-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे दर्शन होते. दलित,आदिवासी,श्रमिक,ब्लॅक,महिला,विधवा,स्थलांतरित,गुन्हेगार ठरलेले जाती अश्या संबंध शोषितांच्या दुखाला वाचा फोडणाऱ्या कथा आहेत. यातून परिवर्तित होऊन बदलणारा समाज, समाजात तयार होणारी बंडाची विद्रोहाची जाणीव कथांमधून होते. प्रस्तावनेतून मिळालेले स्पष्टीकरण हे कथाकार बागुलांना पूर्णत्व मिळवून देते.
सिद्धांत बारसकर
लेखक सोलापूर येथील रहिवासी असून B.B.A. चे विद्यार्थी आहेत.
- आपल्या डॉक्टरने दिलेल्या होप वर स्वप्न बघता येईल - April 16, 2022
- सूर्याचे सांगाती : बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांचा संग्रह - December 26, 2021
- व्ही शांताराम आणि लागूंचा गांधीवादी ‘पिंजरा’ शेवटी शोषित समूहालाच बदनाम करतो - August 13, 2021
Leave a Reply