सिद्धार्थ कांबळे
शब्दांच्या दुनियेत
शून्य फोडत जाणारा
तू क्रियाशील तत्ववेत्ता
विवस्त्रतेच्या मूलस्रोतांची
अखंड मांडणी करणारा
एका युगाचा
पक्षपाती भाष्यकार
आणि म्हणून
असतो आविर्भावात
अगदी आनंदिक
तुझ्या अभंगाच्या अर्थाला प्रकट करताना
आतमध्ये रुतवताना…
आम्ही-
शब्दांचे बुरुज चढतो
तुझ्या तात्त्विक स्वरांचं प्रकटीकरण करतो
तुझ्या ओवींच्या श्लीलतेची
विस्कटलेल्या तर्क-वितर्कातून
मोजणी करतो बांधणी करतो
सफळ -निष्फळ …
याउपर
देतो संदर्भ ऐतेहासिक अघोरीपणाचे
पेरतो सुरुंग राजरोस
रोखतो आरोपांच्या फैरी
उद्ध्वस्त करतो सनातनी इमले
आणि प्रसवतो आमच्या माणूसपणाच महाकाव्य
तुझ्यामार्फत…
पाहतो-
समुद्राला बेचिराख करणारी त्सुनामी
त्यात वेदनांकित तुझी नाव
मुक्ततेसाठी लढताना झगडताना
साहाजोगपणे मिरवताना
मिथ्यत्वाला लाथाडताना
चातुर्वण्याच्या बदफैलीला सडेतोड नागवताना
तुला अधोरेखित करतो-
गोलपिठ्याच्या अंधारातून तू सूर्य पाहत असताना
‘त्यांच्या’ सनातन दयेला भडव्याची किंमत देताना
अगणित सुर्याना – शहरांना
आग लावत असताना
स्वातंत्र्याच्या उदात्तीकरणाला
गाढवीच्या बाजारात उभा करताना
आणि
माणूस म्हणून
उध्वस्त करून घेताना आणि करतानाही
नामदेवा,
शेवटी तू सिद्ध केलंस
स्वतःला- तुझातल्या माणूसपणाला
तू चुकलास हरलास
फितूरधार्जिणा झालास
ऐतेहासिक गद्दारीचा बळी ठरलास
स्वाभाविक असतं हे
नाहीतर ठरला असतास महान
सापेक्ष सप्रमाण
कारणं-
तळहातांच्या रेषांवरून नांगर फिरवणारा तू
केलीस गल्लत केलास भेदभाव
सम्यक विचारात आणि सम्यक आचारात
तुझा समतेचा झरा आटला
तुझ्याच दुष्काळलेल्या घरादारांत…
परंतु आज सारं अलाहिदा
व्यासपीठांना ओलांडून
तू जाहीर केलंस –
तर हे बघ आजही त्यातच बोट धरून चाललो आहोत…
माणसाने माणसाचेच गाणं गावं हे सांगण्यासाठी
शेवटी सारं काही समष्टिसाठी
पुन्हा अधोरेखित करण्यासाठी …
सिद्धार्थ कांबळे
लेखक टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) येथे PhD रिसर्च स्कॉलर आहेत.
- नामदेवा… - February 15, 2022
- प्रिय पँथर… - July 15, 2021
Leave a Reply