नामदेवा तू कोण होतास?

पूजा वसंत ढवळे

नामदेवा महाकवी ना रे तू ?
वादच नाही निर्विवाद……
तुझ्या कविता एक
बिभत्स सत्य…
आणि तुझं प्रत्यक्ष
जीवनही….
कौतुक आहेच रे तुझ्या
विद्रोहाचं
व्यवस्थेला डंख मारणाऱ्या तुझ्या
भयाण अनुकुचीदार लेखनीचं सुद्धा
खरंच रे नामदेवा !
अप्रूप वाटायचं मला
लिखाणाला ही हिम्मत लागते
हे अगदी कळून चुकलंय मला
हल्ली अलीकडेच
तुला वाचता वाचता जेंव्हा, मी ‘ती’
उध्वस्त झालेली मल्लिका वाचली तेंव्हा..
नामदेवा खोटं नाही रे!
खरं तेच सांगतेय..

तुझ्यापेक्षाही ग्रेट जेंव्हा ‘ती’ मला
वाटायला लागते.
दाद द्यावी लागेल तिच्या हिमतीची,
जेंव्हा ती लिहते,
तूही काही वेगळा नव्हतास,
तुझ्या कवितेतील पात्रांपेक्षा.
तू सुद्धा एक हापापलेला नर होतास.
मला वाचून हादराच बसला काही क्षण
विश्वासच बसत नव्हता;
पण
मजबूर व्हावं लागलं
तुझं ते, मला माहीत नसलेलं
सत्य स्वीकारण्यासाठी.
एव्हना ते स्वीकारणं भागच होतं
शेवटी सत्यच ते बाहेर येणारचं !
आणि हेही तितकंच सत्य
तू प्रत्येकासाठी वेगळा होतास
कोणासाठी मायबाप,
कोणासाठी पुढारी,
कोणासाठी मैतर,
कोणासाठी तू तसाच
गोलपिठयातील गिऱ्हाईक
अन् माझ्यासाठीही तू माझ्यादृष्टीने
मला वेगळाच भासतोस की;
फक्त की मी ठरवू शकत नाही
तू नेमका कोण होतास…ते
म्हणून थेट तुलाच विचारतेय,
उत्तर देशील ना रे ?
निदान तुझी ओळख तरी नीट करून दे;
म्हणजे माझे समज आणि गैरसमज
स्पष्ट होतील..
म्हणजे कळेल मलाही
तू कोण होतास ?
तू एक भगव्याकडे भटकलेला
पँथर होतास की,
भ्रष्ट व्यवस्थेची लागण झालेला,
कमी प्रतिकारशक्ती असलेला एक
कृश,अवसान गळलेला सामान्य रुग्ण
सांग नामदेवा सांग
तू कोण होतास ?
त्या विझलेल्या पँथर चळवळीतील
तुझी नेमकी भूमिका कोणती होती ??
नामदेवा माझ्या ह्या प्रश्ननाचं उत्तर
फक्त आणि फक्त
तूच देऊ शकतोस
तेवढा हिम्मतवाला मी
आजही तुला समजते..
कारण गोलपीठा लिहणं थोडीचं
सोप्प काम होतं…!

पूजा वसंत ढवळे

लेखिका नांदेड येथील रहिवासी असून वाणिज्य शाखेच्या स्टुडंट असून कवियत्री आहेत.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*