सुनिता बुरसे
RRR सिनेमा पहिल्याच दिवशी बघायचा ठरलं, उशिरा बघेपर्यंत अनेक परिक्षण वाचायला मिळतात, आपली मतं त्यात मिसळावी असं होऊ नये म्हणून पहिल्याच दिवशी बघितला.
सिनेमाच प्रमोशन चालू झालं तेव्हा त्यात आदिवासी क्रांतिकारकांवर आधारित असल्याने सिनेमा वेगळ्या विषयाला हात घालणार, आदिवासी समाजाचा संघर्ष जो आतापर्यंत फारसा रूपेरी पडद्यावर आला नाही तो बघायला मिळणार याची उत्सुकता आदिवासी समाजाला होती.
सिनेमाच पोस्टर रिलिज झालं ते एनटीआर च्या हातात जल जंगल जमीन असा झेंडा असलेला होतं.
तीन तास सहा मिनिटे असलेल्या सिनेमात आदिवासी समाजाचं चित्रण किंवा आदिवासियत असलेले प्रसंग अगदी पंधरा वीस मिनिटात उरकून बाकी पूर्ण वेळ काल्पनिक कथेला दिलाय.
यात खटकलेल्या गोष्टींमध्ये…
१)एक गोंड जमातीचा आदिवासी स्वातंत्र्यसैनिक आणि एक आदिवासी समाजासाठी लढणारा बिगर आदिवासी स्वातंत्र्यसैनिक यांची काल्पनिक मैत्री यावरच पूर्ण सिनेमा चालू राहतो, जे कधी प्रत्यक्षात भेटलेच नाहीत अशा आदिवासी आणि बिगर आदिवासी अशी मैत्री का दाखवाविशी वाटते ?
२) सिनेमातल्या पात्र ती खरी पात्र असताना रामाच्या रूपात दाखवणं (अल्लुरी सिताराम राजु) , सीता, कोमाराम भीम ला सिताच्या सांगण्यावरून रामाला सोडविण्यासाठी जाणारा प्रतिकात्मक हनुमान असा दाखवून सिनेमा हिंदुत्वाकडे झुकवला जातोय. आदिवासी इतिहासातील जल जंगल जमीन साठीचा संघर्ष न दाखवता रामायणाच्या रूपात का पेश करावासा वाटला?
३) सिनेमात कुठंही आदिवासी जल जंगल जमीन संघर्ष दाखवला नाही जो प्रत्यक्ष हे क्रांतिकारक लढलेत. ह्या महान क्रांतिकारकाचा उपयोग फक्त सिनेमा चालावा म्हणून केला
आहे, यांचा संघर्ष न दाखवता इंग्रज आपला शत्रू एवढीच गोष्ट का अधोरेखित केलीय?
दिग्दर्शकाने सिनेमाच प्रमोशन स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ठिकाणी जाऊन केलंय. प्रत्यक्षात ते ठिकाण आदिवासींच्या विस्थापनावर उभं राहिलं असताना हे आदिवासींच्या जखमेवर मीठ चोळणे यासारखं आहे. गंगा आरतीच्या ठिकाणी सिनेमाच प्रमोशन हा अॅगल हिंदुत्वाचा नाही काय? आदिवासी क्रांतिकारकांचा संघर्ष हिंदुत्वाच्या बाजूने दाखवून आदिवासी समाज जो वेगळ्या धर्म कोड असावा म्हणून मागणी करत आहे ती एका झटक्यात संपूष्टात येते.
बऱ्याच गोष्टी असतील ज्या फक्त सिनेमा म्हणून न बघता कोणत्या संकल्पना लोकांच्या डोक्यात फिट्ट करायच्या ह्या उद्देशाने सिनेमा तयार झाला असू शकतो ह्या बाजूने बघितलं तर लक्षात येतील.
निधर्मी असलेल्या आदिवासी समाजाला हिंदुत्वाशी जोडण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. आदिवासींच वनवासीकरण फक्त एनजीओ च्या माध्यमातून न होता या ही माध्यमातून जास्त प्रभावी पणाने दिसून आलं. आदिवासींचा संघर्ष हा फक्त इंग्रजांविरुद्ध किंवा स्वातंत्र्य चळवळीपुरता मर्यादित नव्हता तर त्यांच्या भुमीवर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकाविरूद्ध होता.
सिनेमा हे मानवी भावभावना पोहचवण्यासाठीच साहित्या इतकंच प्रभावशाली माध्यम आहे. हे माध्यम हुशारीने वापरलं तर अनेक नसलेल्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात, नव्हे त्या खऱ्या वाटाव्यात हाच सुप्त हेतू असतो. RRR सिनेमा उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांची मने जिंकत आहे, पण त्या बरोबर ठराविक शक्तींना अपेक्षित असलेला सामाजिक ध्रुवीकरणाचा अजेंडा यशस्वी होताना दिसत आहे त्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय.
सुनिता बुरसे
लेखिका पुणे येथे वास्तव्यास असून आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
- एका आदिवासीच्या नजरेतून RRR… - March 30, 2022
तुमचं बरोबर आहे ताई… “ह्या महान क्रांतिकारकाचा उपयोग फक्त सिनेमा चालावा म्हणून केला
आहे”
अगदी बरोबर म्हणणं आहे तुमचं,
कुमरां भीमु व अल्लोरी सीताराम राजू यांची केव्हाही भेट झाली नाही.
सर्वप्रथम जल जंगल जमीनीचा मावा नाटे मावा राज या संकल्पनेचे जनक कुमरां भीमू यांनी गोंड आदिवासी समाजासाठी लढा दिला त्यांनी निजामाकडे स्वतंत्र गोंडवाना राज्याची मागणी केली ,आपल्या कार्य काळात त्यांनी आपल्या भूमी साठी लढा दिली.
कुमरां भीमू कधीही दिल्लीला गेले नाही पण rrr या movie मध्ये त्यांना दिल्लीला गेले असे दाखविले आहे .
ते प्रकृती पूजक होते, ते निसर्गाची पूजा करणारे होते,
गोंड लोकांचे देव वेगळे आहेत हे लोकांना माहीत आहे.
तरी लोक गोंड आदिवासी लोकांचा ब्रेन वॉश करण्यासाठी काल्पनिक गोष्टी समोर घेऊन त्यांना राम,ब्रम्ह,… इतर काही हिंदू देवतेचे उपासक होते हे दाखवण्याचं प्रयत्न करत आहेत .
या RRR movie मध्ये कुमरां भीमू ने जो लढा दिला त्या बद्द्ल माहिती दाखविली नसून पूर्ण माहिती काल्पनिक आणि खोटी आहे.
तरी पण आज पर्यंत गोंड आदिवासी समाजातील कुमरां भीमू या क्रांतिकारकाला भारतात जास्त प्रमाणात कोणी ओढकत न्हवते ती ओढक या movie च्या माध्यमातून झाली असे म्हणण्यास काही हरकत नाही.
आज लोकांना कुमरां भीमू यांचा नाव माहीत झाला आणि आता तुम्ही आणि आम्ही मिळून या देशातील लोकांना त्यांचा खरा इतिहास माहीत करून देऊ…