आपल्या डॉक्टरने दिलेल्या होप वर स्वप्न बघता येईल

सिद्धांत बारसकर

उंचावलेल्या हातांनी जयभीम करताना…
आवळलेल्या मूठी थॉरच्या हातोड्या सारख्या…
झटका देणाऱ्या त्यांच्या कडे पाहून वाटलं…
आजच्या दिवशी कोणत तरी पोर्टलं,
उघडलंय आपल्यासाठी!

त्यातून लख्ख निळा प्रकाश दिसतोय!
पण पण
टेजरॅक काय दिसं नायं…?
दिसतोय फक्त स्वयंदीप भीमबाबा!
तो लिहतोय काहीतरी…
भुकेल्यासाठी अन्नाची,
बिमारासाठी औषधाची,
विद्यार्थ्यासाठी साळंची,
भटक्यासाठी निवासाची,
प्रवाश्यासाठी वाहनाची,
शोषितसाठी न्यायाची,
होयं…
तो करतोय तरतूद माणसासाठी,
त्याचे दुखः कमी करण्यासाठी!

भोवतालच्या गर्दीतून मान उंचावऱ्या
आतूर चेहऱ्याकडं नजर टाकतं
तो मला हाक मारतो…
आणि मी त्याला
मिठी मारायला धाव घेतो.
रुमालांन तोडांवरला घाम
पुसत भीमबाबा म्हणतो,
अरे काय झालं? इकडे नवीन आहेस का?
तुला ह्या शहरात आसरा हवा आहे का?

लोडशेडिंगन घाम वाढतो
उठतो त दिसतं
स्क्रीनवर Fri, Apr 15.
च्यायला मल्टीवर्समधला
बेगमपुरा/प्रबुद्ध भारत/युटोपिया
जयंती निमित्तानं पाहायला त मिळाला…

ह्या गमपुऱ्यात बंद डोळ्यांन
स्वप्न बघनं प्रिव्हलेज होईल,
तरी आपल्या डॉक्टरने दिलेल्या
होप वर स्वप्न बघता येईल.

सिद्धांत बारसकर

लेखक सोलापूर येथील रहिवासी असून B.B.A. चे विद्यार्थी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*