जयभीम!

नयना दरडमारे बन्सोड

जयभीम!

मी एकाला जयभीम केला माणुसकी म्हणून,
तो म्हणाला तुम्ही दलित का?..
मी म्हटले कुठल्या अंगानं? मी दलदलीत फसलेली, चेहऱ्यावरून मरगळलेली
कपड्यांवरून फाटकी लाचार दिसते का?
तो नाही म्हणाला..
मग तुम्ही मला दलित म्हणून का संबोधलात?
तो म्हणाला तसं नाही हो, सहजच..
असं सहजच नसतं, सांगा ना..
तो आढेवेढे घेत बोलला, तुम्ही जयभीम म्हणालात
म्हणून..
मी म्हणाले, जयभीम म्हणण्याने दलित होत नाही रे वेड्या.. उलट,
उच्चाटन होत जातं दलित असणाऱ्यांचं
शुद्रत्व गळून जातं शूद्रत्वांच…
अस्पृश्यत्व गळून पडतं अस्पृश्य समजणाऱ्याचंं..
तो माणूस होऊन स्वाभिमान मुरवत नेतो
देहाच्या पेशीपेशींतून अन् रंध्रारंध्रांतून..
तो पुरस्कर्ता होतो मानवमुक्तीचा..
तो अन्यायाचा प्रतिकार
करणारा बुलंद आवाज होतो..
तो तिमिरात चाचपडत असणाऱ्यांचा प्रकाश होतो..
तो लोकशाहीचा पाया होतो, तो संविधानाची छाया होतो, दमनकऱ्यांचा कर्दनकाळ होतो..
तो घालत नाही माळ, तो वाजवत बसत नाही टाळ
तो पुस्तक पेन हाती घेतो, प्रगतीची वाट धरण्या उच्च शिक्षणाची कास धरतो..
तो झुगारुन टाकतो देवधर्माच्या पोकळ बाता
तो टेकवत नाही आपला कुठेही माथा..
तो रंगाची भाषा बोलत नाही, तो दंग्याची भाषा करीत नाही, तो युध्दाला पर्याय बुध्द सांगतो..
तो माणसाला माणुसकी सांगतो..
ज्याच्या नयनातून स्वाभिमान झळकतो…
तो जयभीमच सांगतो
तो कायम जयभीमच म्हणतो…

नयना दरडमारे बन्सोड

लेखिका प्लॅटिनम जुबली हायस्कूल, गडचिरोली येथे सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहेत, स्थानिक सत्यशोधक न्यूज २४ च्या संपादिका आहेत, जिल्ह्यातील फुले-आंबेडकरी चळवळीत सहभाग आहे.

Latest posts by नयना दरडमारे बन्सोड (see all)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*