आशयाचा श्रम : अण्णाभाऊ साठे मराठी कथा स्पर्धा – भूमिका

सागर अ. कांबळे

पुणे येथील प्रकाशन

कथा-गोष्ट सगळ्यांकडे असते. लोककथा, संस्कृती म्हणून हे खरं आहे, पण हे तितकंच रोजच्या जगण्याच्या अनुभवाशी संबंधित आहे. जीवनाची ओळख ही व्यक्तिगत अनुभवातूनच होत असते. या सर्वंकष अर्थाने गोष्ट- कहाणी सर्वांपाशी असतेच.

आशयाचा श्रम हा कथासंग्रह प्रकाशित करण्याच्या आणि कथा स्पर्धा नियोजनाच्या मागेही एक विशिष्ट भूमिका आहे. मराठी साहित्य क्षेत्रात लिहिणार्‍या नव्या दमाच्या हातांना प्लॅटफॉर्म आणि प्रोत्साहन देण्याचा मुख्य हेतू कथा स्पर्धेमागे आहे. लेखन ही दोन बाजूंनी पुढे जाणारी प्रक्रिया असते. आपल्या लेखनाला वाचक मिळावा, वाचकापर्यंत आपली कथा पोहचवण्याची संधी मिळावी ही लेखकाची अपेक्षा असते. साहित्यव्यवहार आणि प्रकाशन व्यवहार आर्थिक गणितात तर अडकलेला असतोच पण तो मर्यादित वर्तुळातही अडकून राहतो. सामाजिक माध्यमांनी लिहिणार्‍याना ‘स्पेस’ मिळवून दिली असली तरी तिथल्या अवकाशात लिखाण हरवून जाण्याची शक्यता असते. या गरजेतूनच ही कथा स्पर्धा आयोजित झाली आणि आता हे पुस्तक तयार होत आहे. लिहिणार्‍यांना सन्मान मिळवून देणे आणि त्यांच्या कथा वाचकांपर्यंत पोहचवणे हे सर्व हेतू या पुस्तकाच्या निमित्ताने साध्य होत आहेत.

मराठीत ‘अलीकडचे नव्या दमाचे’ साहित्य निर्माण व्हायला हवे ही संशयवादी अपेक्षा अभ्यासक, वाचक कायमच मांडत असतात. नावीन्यपूर्ण सकस साहित्य निर्माण होण्यासाठी लेखकाची दृष्टी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची आहे त्याच्या प्रदेशातली आणि भाषेतली साहित्य संस्कृती. ती संस्कृती सर्वसमावेशी हवी पण त्याही पुढे जाऊन तिच्यातला संकुचितपणा स्वतःच विसर्जित करणारी हवी. लेखकाची जडणघडण त्याला उपलब्ध होणार्‍या साहित्यिक मूल्यांवर होत असते. तसेच त्या साहित्यसंस्कृतीत कोणत्या मूल्यांची जोपासना होते त्याचा साधक-बाधक परिणाम साहित्यनिर्मितीवर होत असतो. साहित्यनिर्मितीत आशय आणि शैली हे दोन प्रमुख घटक आहेत. प्रयोगात्मक शैली आणि आशय यात कशाला प्राथमिकता असायला हवी हा मूलभूत प्रश्‍न समोर ठेवून नव्या दमाचे साहित्य निर्माण होण्याच्या अपेक्षेचा तिढा समजून घेता येईल. साहित्यकृतीत प्राथमिकता ही आशयाला असली पाहिजे. साहित्यातील आशय हा लिहिणार्‍याच्या जगण्यातून येत असतो. साहित्य वर्तुळात केवळ प्रयोगशीलतेचे अवडंबर केले जाते तेव्हा साहित्यातला आशय बाजूला राहून ते फॉर्म/शैली, कल्पना‘विलास’ यांच्या कचाट्यात अडकून बसते. याउलट ज्यांनी जगण्याशी एकरूपता साधली आहे अशा हातातून सकस आशय येण्याची शक्यता जास्त असते.
आशयातून शैलीकडे ही लिहिणार्‍याची भूमिका जास्त प्रामाणिक आहे. सक्षम आशयाशिवाय प्रयोगशील शैलीच्या आधारावर साहित्यकृती निर्माण करायला बघणे म्हणजे चांगल्या संगीताच्या चालीवर सुमार गीत लिहिण्यासारखे आहे. ही केवळ धूळफेक ठरेल. त्यातून मग वाचकाला स्तब्ध करुन टाकणारी, मनाचा तळ हलवून टाकणारी साहित्यकृती होणे अशक्य आहे. आशयाला प्राथमिकता मिळाली नाही तर अब्सर्डीटी, प्रयोगशिलतेच्या नावाखाली ‘दिसामाजी पाने खरवडत राहणे’ हाच साहित्यप्रवास असा चकवा तयार होईल. सक्षम, नाविन्यपूर्ण आशयच शैलीला दमदार बनवतो. नवीन, तगडा आशय साहित्यिक आविष्कारातून समोर येतो तेव्हा तो अस्तित्वाच्या सेंद्रिय गरजेतून ‘फॉर्म’ची आवश्यक तोडफोड करतो.

प्रस्तुत कथासंग्रहातील हरमेनचे भूत आणि काटामार दोन कथा या संदर्भात पाहता येतील. फ्रान्झ काफ्काचा कठोर, नियंत्रित करणारा बाप-हरमेन काफ्का याचा संदर्भ घेऊन लिहिलेली ‘हरमेनचे भूत’ ही सिद्धांत बोकेफोडेची कथा साक्षेपी आशय आणि शैलीचे दमदार मिश्रण आहे. ही कथा आंतरसंहितात्मतेचा (Intertextuality) अभिनव वापर दर्शवते. हरमेनचे भूत ही कथा आशयाची गरज म्हणून स्टोरीटेलिंगची विशिष्ट पद्धत अवलंबते. विशाल राठोडच्या ‘काटामार’चे ही तेच वैशिष्ट्य जाणवते. या कथेची वर्णनशैली एका करिअरिस्ट तरुणाने खरवडलेल्या दिवसाला तंतोतंत उभी करते. परंतु विस्तारताना ती त्या खरवडलेल्या दिवसाला आणखी आशयबद्ध करत जाते. या दोन्ही कथा वाचत असताना सोबत सोबतच उंच कड्यावर नेतात आणि वाचकाला तिथून खाली आदळतात. कथा संपली तरी कथेचा आवेग टिकून राहतो.

प्रकाश रणसिंगची ‘आरोळी’ ही कथा नुसती लॉकडाऊनची कथा नाही. काळाचा मोठा पट चारपाच पानाच्या या लघुकथेत व्यापला आहे. मराठी-अहिराणी मिश्रणामुळे कथनाला गोडी प्राप्त झालेली ‘गाव-शहर’ ही कथाही असाच मोठा काळ मांडताना वर्तमान-भूतकाळाची एकत्रित बांधणी करते. अहिराणी, मालवणी, वर्‍हाडी अशा बोलीभाषांचा वापर तीन-चार कथांमध्ये आहे, ही गोष्ट या कथासंग्रहाला वैविध्यपूर्ण बोलींमधून व्यापकता आणते. या कथासंग्रहात अशा एकूण अकरा कथा आहेत. अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धेच्या पहिल्या वर्षातील या निवडक उत्कृष्ट कथा. यातील कथालेखकांमध्ये भौगोलिक प्रदेश, बोलभाषा, वय, कार्यक्षेत्र या अनेक बाबतीत विभिन्नता आहे. या लेखकांमध्ये शिक्षक, नोकरदार, साहित्याचे अभ्यासक, गृहिणी, सिनेमा-वेबसिरीज लेखक, विद्यार्थी आहेत. अकरा नवीन कथा, जगण्याच्या वेगवेगळ्या अनुभवातून सिद्ध झालेला आशय आणि तो सादर करणारे बहुतांश नव्या दमाचे लेखक यांमुळे हा कथासंग्रह समृद्ध झाला आहे.

सागर अ. कांबळे

लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*