संघटनात्मक व संस्थांत्मक बांधणी आणि बाबासाहेब

सचिन आनंदराव तुपेरे

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच आयुष्याचा विचार करता त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू बघायला मिळतात. भारताचा तत्कालीन कदाचित एखादाच असा प्रश्न असेल ज्याला बाबासाहेबांचा परिसस्पर्श झाला नसेल. एवढं मोठं कार्य बाबासाहेबांनी त्यांच्या पासष्ठ वर्षाच्या आयुष्यात केलेलं आहे.

बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचा तसाच एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या मध्ये असलेल संघटन कौशल्य आणि संस्थात्मक बाधणी. समाजाच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांनी अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कामगार अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात संघटना व संस्था काढल्याचे दिसून येते.

समता सैनिक दल : १९२७.

त्या काळात एकूणच असणारी सामाजिक विषमता अस्पृष्य समाजावर होणारे अन्याय, अत्याचार या सगळ्या बाबी लक्षात घेऊन बाबासाहेबांनी७ मार्च 1927 साली महाड देवे भरवलेल्या परीषदेत समता सैनिक दलाची स्थापना केली. समता सैनिक दलाच मुख्य उद्धिष्ट हे समाजातील संघटन वाढवून अस्पृष्यावर होणारे अन्याय अत्याचार टाळणे, गावागावात होणारे हल्ले रोखणे व दलित चळवळीची ताकद वाढवणे.जातीय, धार्मिक आधारावर असलेली विषमता व एकूणच शोषणाविरुद्ध संघर्ष करणे. तरुणांना मानसिक, शारीरिक दृष्ट्या सशक्त करणे, शोषितवर्गाला शिक्षित करून समता, स्वातंत्र्य, न्यायाच्या आधारावर उत्तम समाजाची निर्मिती करणे अश्या अनेक कार्यासाठी समता सैनिक दल या संघटनेची स्थापना बाबासाहेबांनी केली.

आजही समता सैनिक दल तेवढयाच प्रभावीपणे कार्य करत आहे. समता सैनिक दलाच्या माध्यमातून जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम, महापरिनिर्वाण दिनी होणारे कार्यक्रम यामध्ये दिशाभूमी, चैत्यभूमी व इतरही ठिकाणी लाखो समाज बांधवांना शिस्तीने दर्शन घेता यावे म्हणून गर्दीचे नियोजन करत असतात.देशभरात दहा ते बारा हजार समता दलाचे सैनिक दक्षपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

दि म्युनिसिपल कामगार संघ

1934 पूर्वीही ही बर्याच कामगार संघटना देशभरात कार्य करत होत्या. त्यामध्ये काँग्रेस व कम्युनिष्ट विचारधारा असणार्या कामगार संघटना या अग्रणी होत्या. कांग्रेस व कम्युनिस्ट कामगार कार्यकर्ते हे दलित म्हणवल्या जाणार्या जातींच्या कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे बाबासाहेबांच्या लक्षात आले. आणि म्हणूनच अस्पृष्यांचे प्रश्न सोडवता यावे, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देता यावे यासाठी बाबासाहेबांनी 1939 साली दि म्युनिसिपल कामगार संघाची स्थापना केली. बाबासाहेब स्वतः संघटनेच्या अध्यक्षपदी होते तर सरचिटणीस पदी बापूसाहेब सहस्त्रबुद्धे व सहचिटणीसपदी गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा हे कार्य करत होते.

‘आजही दि म्युनिसिपल कामगार संघ याचे कार्य चालू आहे. सध्या संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे कार्य करत आहेत. सध्या संघाचे काम परळ येथील कार्यालयातून चालते

स्वतंत्र्य मजूर पक्ष

समाजात सामाजिक बदल हा राजकीय सत्तेतून व राजकारणाच्या माध्यमातून घडवून आणता येऊ शकतो ह्यावर बाबासाहेबांचा ठाम विश्वासहोता. त्यासाठी बाबासाहेबांनी 15 ऑगस्ट 1936 साली स्वतंत्र्य मजूर पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केली. स्वतंत्र्य मजूर पक्ष केवळ अस्पृष्यांचा किंवा विशिष्ट जातींच प्रतिनिधीत्व करणारा पक्ष नव्हता तर मजूर, शेतमजूर, कामगार, भूमीहीन शेतकरी, गरीब कुळे यांच्या समस्यांना सोडवण्यासाठी पक्षाची निर्मिती केली होती.

१९३६ साली झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे १५ उमेदवार आरक्षित तथा इतर जणांवरून उभे होते. स्वतंत्र्य मजूर पक्षाला चांगले यश मिळून 15 पैकी १३ जागा निवडून आल्या होत्या.

बौद्धजन पंचायत समिती : 1942.
मुंबई येथे खार विभागातील कोकणस्थ कॉलनीतील गणपत विठ्ठल कासारे (लाखणकर) यांच्या अंगणामध्ये २५ मे ९४२ साली बाबासाहेब आंबेडकरांचा अध्यक्षतेत महार पंचायत समिती या सामाजिक संस्थेची स्थापना झाली. महार जाती याच संस्थेचे नाव धर्मांतरानंतर बौद्धजनपंचायत समिती करण्यात आले. त्याचे मुख्यालय 1958 साली यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांनी भोईवाडा, परळ येथे बांधले. आजहीही संख्या तिच्या अनेक शाखांसह कार्यरत आहे.

शेड्युल कास्ट फेडरेशन : १९४२.
बाबासाहेब आंबेडकरांच पुढच क्रांतीकारी पाऊल म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन. अस्पृष्य-दलित समुदायाला समान हक्क मिळवून एक समताधिष्ठीत समाजव्यवस्था निर्माण व्हावी व अस्पृष्य, दलित वर्गाला कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर एकामजबूत राजकीय पक्षाची स्थापना करायची बाबासाहेबांची इच्छा होती. त्यासाठी बाबासाहेबांनी देशभरातून अस्पृष्य नेत्यांना दिल्लीला बोलावूनही इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली. आणि १८-१९ जुलै १९४२ साली नागपूर या ठीकाणी अखिल भारतीय शेड्युल्ड फास्ट फेडरेशन हा पक्षस्थापन करण्यात आला. या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेब दलित, अस्पृष्यांच्या राजकीय हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढा देत होते.

स्वातंत्र्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत झालेला पराभव लक्षात घेता कांग्रेस ला पर्यायी असा सशक्त विरोधी पक्षअसावा अशी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली. म्हणूण बाबासाहेबांनी रिपब्लीकन पक्षाची संकल्पना २९ सप्टेंबर १९५६ रोजी नवी दिल्ली येथेपक्षाचा आराखडा तयार करून शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष त्यात विसर्जित करण्याची वाच्चताही केली. पण त्याची स्थापना होण्याआधीच६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेबांचे महानिर्माण झाले.

त्याच्या एक वर्षानंतर धम्मदिक्षा सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होणार होते त्याच दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर १९५७ साली लाखो लोकांच्या उपस्थितीत नागपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. व पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणूण एन. शिवराज यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचवर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ९ खासदार व मुंबईविधानसभेवर 17 आमदार निवडून आले.

भारतीय बौद्ध महासभा

भारतातून लोप पावलेला बौद्ध धर्म पुन्हा नव्याने देशभर रुजवण्यासाठी व त्यांच्या प्रचार व प्रसाराची एका संस्थेची गरज लक्षात घेऊन बाबासाहेबांनी हिंदू महासभेच्या धर्तीवर “दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” या धार्मिक संस्थेची स्थापना केली. अनेक उद्धिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन बाबासाहेबांनी या संस्थेची निर्मिती केली होती त्यापैकी देशभरात कार्यकर्ताचे जाळे निर्माण करणे, बौद्ध धम्माच्या प्रचारास चालना देणे, उपासनेसाठी बौद्ध विहार स्थापन करणे, सर्व धर्माच्या तुलनात्मक अध्यापनास प्रोत्साहन देणे तसेच बौध साहित्य प्रकाशित करणे इ. उद्धिष्ट मनात ठेऊन ही संस्था बाबासाहेबांनी चालवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचे पुत्र यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर हे अध्यक्षपदी आले. सध्या भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांच्या स्नुषा महाउपासिका मिराताई आंबेडकर या कार्य करीत आहेत. मिराताई बौद्धमहासभेच्या मध्यमातून बौद्ध धम्माचा प्रसार प्रचाराचे काम वेगाने करत आहेत.

पिपल्स एज्युकेशन सोसायटी

बाबासाहेब आंबेडकरांचा आधीपासूनच मुख्य भर हा शिक्षणावर होता. पण फक्त सुशिक्षितांची फौज उभी करणे नाही तर शिक्षणासोबतच प्रज्ञा, शील आणि करुणा यांच्या आधारे संस्कारीत नागरिक तयार करायचे होते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तसेच मागासवर्गियांना शिक्षण मिळालेपाहिजे या हेतूने बाबासाहेबांनी ३ जुलै १९४५ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सुरवातीला कॉलेज मरीन लाईन्स चर्चगेटपरिसरात भरत असे. त्यानंतर १९४६ साली मुंबई फोर्ट येथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू करण्यात आले व १९५० साली औरंगाबाद येथे मिलिंद महाविदयालयाची स्थापना बाबासाहेबांनी केली.

अश्या अनेक संस्था बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत स्थापना केल्या. व त्यातून समाजाचा उत्कर्ष घडवून आणला. हा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या असंख्य पैलूंपैकी एक पैलू. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या ह्या संघटना पक्ष आजही वटवृक्षाप्रमाणे बहरत आहेत अजून खोलरुजत आहेत. शेकडो पिढ्यांना या संस्था नेहमीच योग्य दिशा दाखवित राहतील.

सचिन आनंदराव तुपेरे

लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असून गंगापूर, औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.

4 Comments

  1. सचिन मला तुझ्यात लिखाणात स्पष्ट ठवाळांची छबी दिसते
    तू जबरदस्त आहेस यार

Leave a Reply

Your email address will not be published.


*