भीमा कोरेगांवचे पूरक युद्ध आणि शिवशाहीची पेशवाईच्या जंजाळातून मुक्तता !

सतीश केदारे

1 जानेवारी 1818 या अविस्मरणीय पर्वाचे इतिहासात अन्यन्य साधारण महत्व आहे. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासाला सन1818 पासुन प्रारंभ होतो. 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगांव येथे जी लढाई झाली तिची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याचे दिसते. दूसरा बाजीराव पेशव्याचे सैन्य व ब्रिटीशांच्या बॉम्बे नेटिव लाइट इन्फैन्ट्री सेकंड बटालियन फर्स्ट रेजिमेंट यांच्यात युद्ध झाले यात पेशव्याकडून जवळपास 28000 सैन्य ज्यात 20000 घोडदळ तर 8000 पायदळ सैन्य होते तर ब्रिटीशांच्याबाजूने 500 पायदळ आणि 250 घोड़दळ सैन्य असतांना देखील बाजीराव पेशव्याच्या सैन्याचा पराभव होऊन त्यास माघार पत्कारावी लागली. कप्तान स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली हा विजय बॉम्बे इन्फेंट्री बटालियन प्राप्त झाला होता.
या आगंतुक झालेल्या युद्धाच्या जय पराजयाबाबत अनेक तर्क वितर्क केले जातात. डॉ श्रद्धा कुम्बोजकर यांच्या संशोधनपर निम्बधात हेन्री मॉरिस यांच्या एका टिप्पणीचा उल्लेख आहे ज्यात त्यांनी म्हटले होते “”भारतातील इंग्रजांच्या सर्वाधिक धाड़सी कामगिरी पार पाडून कैप्टन स्टॉन्टन शिरूरमध्ये परतले तेव्ह्य रंग उधळले जात होते ढोल बड़वले जात होते ” तसेच 1819 सालच्या संसदीय चर्चेतही या लढाईचा उल्लेख करण्यात आला होता. बखरकारांनी या सैन्यावरील कौतुकाचा वर्षाव सुरूच ठेवला होता. 1885 साली तर न्यूझीलंड मध्ये प्रकाशित होणाऱ्या ग्रे रिव्हर्स ऑर्गस या वर्तमान पत्रानेही या लढाईस महत्वाचे स्थान दिले होते असे नमूद केले आहे.
कमिशनर मोउंटफोर्ड यांनी मुंबई कौन्सिलात 5 नोव्हेम्बर 1925 साली केलेल्या भाषणात ” जॉन कंपनीचे जे सैन्य होते त्या सैन्यात महार लोकांचा बराचसा भरणा होता. कोरेगांवला जो विजयस्तम्भ उभारलेला आहे तो महारांनी गाजविलेल्या पराक्रमाचे विजयचिन्ह होय. पौर्वात्य देशात जे पराक्रम आतापर्यंत समजले त्यापैकी कोरेगांवचा एक आहे.
या युद्धातील सहभागाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जातात त्यात काही राष्ट्रवादी अस्मितेचे आहेत तर काही स्वकियाविरुद्ध युद्धात सहभागाविषयी आहेत तर काही स्वराज्याच्या विरुद्ध ब्रिटीशांना सहयोग करण्याचे आहेत. परंतु हे सर्व प्रश्न वास्तववादी निश्चित नाही. जर्मनीतील हिटलर करत असलेल्या अमानवी अत्याचारातून सुटका करुन द्वितीय महायुद्धात जर्मनी विरोधातील अमेरिकेला जर्मनीच्या गुप्त अण्वस्त्रे कार्यक्रमाची माहिती देऊन अमेरिकलाही अण्वस्त्रे विकसित करण्याचा सल्ला देणारे महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टीन यांना राष्ट्रद्रोहाच्या चौकटीत बसविले तर असा प्रयत्न म्हणजे मानवतेच्या स्तम्भावर आघातच ठरेल!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मूल्यांना हरताळ कोणी फासला ? -: हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी शुद्राती शुद्र जाती जमाती, कुणबी, साळी,माळी, ताम्बोली,धनगर,वाणी, मांग,महार,धोबी,गारुड़ी कैकाडी, लमाणी,कोळी या व इतर जाती जमातीतील लोकांनी शिवाजी महाराज यांचा आदेश शिरसावंधद्य मानुन स्वराज्यास हातभार लावला आणि स्वराज्याचे रक्षणकर्ते झाले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जातीव्यवस्थेला मूठमाती देण्यात आली होती आणि स्वराज्यामध्ये कोण श्रेष्ठ वा हीन ही भावना लोप पावत चालली होती याची प्रचिती ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतोय या शिवाजी महाराजांच्या विधानावरून येते.खऱ्या अर्थाने आठरा पगड़ जाती एकत्र येऊन नविन व्यवस्था निर्माण होईल अशी परिस्थिति निर्माण झाली होती.स्रियांना देखील सन्मानाने वागविण्यात येत होते.
शिवाजी महाराजाच्यानंतर सभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली,त्यांच्या क्रूर हत्येनंतर राजाराम महाराजांनी ती जबाबदारी पार पाडली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पत्नी येशुबाई व पुत्र शाहू यांना मोगलांनी बंदीवासात ठेवले होते. शाहूंची सुटका झाल्यावर ताराबाई शाहू वादात स्वराज्याची विभागणी झाली,सातारा गादीवर शाहू विराजमान झाले तर कोल्हापूर गादीवर ताराबाईचा दबदबा निर्माण झाला. शाहू ताराबाई संघर्ष पेटतच राहिला. या वादात बंडाळी मोडून काढण्यासाठी शाहू महाराजांनी बालाजी विश्वनाथ यास पेशवेपद बहाल केले. बालाजी विश्वनाथ यांच्या मृत्युनंतर त्यांचे अल्पवयीन चिरंजीव बाजीरावास पेशवे पदाची वस्त्रे देण्यात आली सदर नेमणूक अनेक मराठा सरदारास आवडली नाही.या बाजीराव पेशवे काळात पुण्यात शनिवारवाडा बांधून पेशव्यांनी सातारा ऐवजी पुण्यावरून कारभार पाहण्यास प्रारंभ केला आणि सतेचे केंद्र सातारा ऐवजी पुणे निर्माण होण्यास सुरवात झाली.
महाराष्ट्राची इतिहास मंजरी मध्ये दातात्रय विष्णू आपटे थोरल्या बाजीरवांच्या कारकिर्दी विषयी नमूद करताना पातशाहीच्या संरक्षणाची जबाबदारी प्रकरणात दिल्लीचा पातशाहीशी दिल्लीच्या पातशाहीच्या संरक्षणाचा करार करताना सनदेत साताऱ्याच्या छत्रपतींचा नामोल्लेख टाळला. याच ग्रंथात पेशव्यांच्या अधिकाराच्या गुणदोषांची चर्चा करतांना आपटे नमूद लिहितात “पेशवाईच्या अधिकारासारखा अधिकार दुनियेत कधी कोणी चालविला नसेल.पेशवे दिल्लीच्या बादशहाचे सुभेदार, छत्रपतींचे प्रधान व आपल्या राज्यापूरते मालक होते.” आपटे पुढे नमूद करतात सातारकर छत्रपतींचे सस्थान पूर्णपणे पेशव्यांच्या ताब्यात होते. शाहू निपुत्रिक निर्वत्यालवर रामराजा हा धाकट्या शिवाजीचा मुलगा विवादात गादीवर आसीन झाला.
सवाई माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर 1796 ला नाना फडणवीस यांच्या सहाय्यामुळे दुसऱ्या बाजीरावास पेशवाई वस्त्रे मिळाली. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड(भाग 2) यात डॉ.खोबरेकर नमूद करतात काही पूर्व वादातून बाजीरावाने नाना फडणवीस यांना कैद केल्यानंतर बाजीरावाने रयतेकडून पैसे उकळण्यास सुरवात केली, व्यापाऱ्यांना लुटण्यास सुरवात केली. बाजीरावाने पैसे उकळण्यासाठी रयतेवर संतोषपट्टी नावाचा कर लादला. या संतोषपट्टी रयतेत असंतोष वाढला परंतु बाजीरावाचे पैसे उकळणे,मेजवान्या,तमाशे, नाचगाणे नित्याचेच झाले होते.

विठोजी व यशंतराव होळकर यांचा विद्रोह थांबविण्यासाठी पेशव्यांनी सेनापती बापू गोखले यास विठोजी होळकर यास कैद करण्याचे आदेश दिले कैद करून पुण्यास पाठविल्यानंतर 16 एप्रिल 1801 रोजी पेशव्यांनी विठोजीस हत्तीच्या पायाखाली देऊन ठार केले. यामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला केला,तत्पूर्वी होळकरांनी हडपसर येथे शिंध्याच्या सेनेचा पराभव केला. होळकर पुण्यावर चालून येताच बाजीरावाने कोकणात पळ काढला आणि बाजीराव इंग्रजाच्या आश्रयासाठी गेला व वसई येथे 1802 साली इंग्रजांशी तह केला. यात इंग्रजांनी पेशवाई मुलखाचे संरक्षण करण्याची इंग्रजानी घ्यावी, त्यासाठी पेशवे मुलखात इंग्रजांना सैन्य ठेवण्याची परवानगी मिळाली व या संरक्षणार्थ खर्च म्हणून सव्वीस लक्ष नक्त उत्पन्नाचा मुलुख इंग्रजांस कायम देणे तसेच सुरत शहर इंग्रजांस देणे या अटी होत्या आणि एक प्रकारे पेशव्यांनी आपले सार्वभौमत्व हे इंग्रजांना प्रदान केले होते.

छत्रपती शाहू ते छत्रपती प्रतापसिंह :- महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड,भाग 2 मध्ये डॉ खोबरेकर नमूद करतात,थोरले शाहू महाराज निर्वतल्यावर छत्रपतींचे अधिकार कमी होऊन त्या अधिकाराचा वापर पेशवे करू लागलें. देशाच्या राजकारणात छत्रपतींचे महत्व पेशव्यांनी कमी कमी करीत राजांना बंदिवासाची वागणूक मिळू लागली.सातारच्या किल्यात मराठ्यांचे छत्रपती पेशव्यांचा खड्या पहाऱ्यात राहू लागले,त्यांना फक्त पेशव्यांस नवीन वस्र देण्याचे कार्य उरले होते.थोरले शाहूनंतर राजाराम गादीवर बसले. छत्रपती राजाराम सन 1777 मध्ये निर्वतल्यावर राजाराम यांनी त्रिंबकजी भोसलेचा पुत्र विठोजी भोसले यास अगोदरच दत्तक घेतले होते,ते दुसरे शाहू हे नामधारण करून सात्ताऱ्याच्या गादीवर बसले.दत्तक प्रसंगी त्यांचे वय 15 होते. या दुसऱ्या शाहूंचा पूर्वीच्या पेशव्यापेक्षा नाना फडणवीस यांनी अधिक जांच केला. छत्रपतींचा आर्थिक पुरवठा तुटपुंजा करण्यात आला, सर्व खर्च पुणे येथून पेशवे दरबारातून निश्चित होऊ लागला. सर्व हत्ती पागा पुण्यात आणण्यात आले. छत्रपतीवर मर्यादा टाकून त्यांच्यावर पहारा ठेवण्यात आला. अशा पद्धतीने साताऱ्याच्या गादीवर छत्रपतींच्या वाट्याला बंदिवास,अपमान येणे निश्चित झाले. रंगोजी बापूजी या प्रबोधनकार ठाकरे समग्र वाडमयात सदर प्रकारास ठाकरेंनी नोकरांच्या कैदेत धनी अशी उपमा दिली आणि शाहूंची(दूसरे ) हयात साताऱ्याच्या किल्यात अटके दाखल खर्च झाली. त्रिंबकजी भोसलेचा लहान मुलगा चतुरसिंग हे साताऱ्याच्या किल्यात राहण्यास आले या अपमानास्पद जीवनाची चीड येऊन तो पेशव्यांच्या विरोधात उठाव करण्यास कामाला लागला व मराठ्यांचे गेलेले वैभव परत मिळावे या उद्देशाने कार्यास लागला. परंतु शाहू निर्वतल्यावर त्रिंबक डेंगळेच्या दगाबजीला तो बळी पडला व तुरुंगात मरण पावला.
दुसरे शाहू यांना आनंदीबाई माईसाहेब याजपासून तींन पुत्र झाले,प्रतापसिंह,रामचंद्र भाऊसाहेब व शहाजी अप्पासाहेब. दुसरे शाहू 1808 साली निर्वतल्यावर त्यांचा मुलगा प्रतापसिंह गादीवर बसला. पेशवा बाजीरावाने सातारकरांनी केलेल्या उठावाचा साताऱ्यावर फौजा पाठवून बंदोबस्त केला.
छत्रपती प्रतापसिंह यांच्यावर बाजीरावाची करडी नजर :- दुसरे शाहूच्यानंतर बाजीरावाने प्रतापसिंह यांना वयाच्या 15 व्या वर्षी गादीवर बसविल्यानंतर त्यांचावर करडी नजर ठेवली. रंगोजी बापूजी ग्रंथात प्रबोधनकार म्हणतात बाजीरावाने साताऱ्याचा त्रिंबक डेंगळेच्याकडे सोपवून त्यामार्फत काशीपंत बंदरे नावाच्या ब्राम्हण गृहस्थ साताऱ्याच्या किल्यात किल्लेदार म्हणून नियुक्त करुन अप्रत्यक्ष काम पाहू लागले, या किल्ल्यावर त्रिंबक डेंगळेचे हेर असायचे. प्रतापसिंह व परिवाराची सर्व माहिती काशिपंताकडे जायची, येथे कडेकोट पहारा असायचा,पेशव्यांकडून दिलेले पैशात गुजारा करायचा व किल्ल्यावर फेरफटका मारायचा हेच छत्रपतींचे जीवन होते. डिपोस्ड राजा सातारा या पीटिशन मध्ये देखील छत्रपती राजाराम यांच्या अंत्यक्रियेला पुरेसे पैसे नसल्याचे नमूद केलेले असून दुसऱ्या एका संदर्भात नाना फडणवीस यांनी राजारामाच्या मुलीच्या लग्नासाठी रुपये पन्नास हजार एवढाच खर्च करावा असा उल्लेख आहे.
परंतु त्यांच्या मातोश्री माईसाहेब अत्यंत चाणाक्ष व हुशार बुद्धीच्या होत्या त्यांना परिस्थितीची जाणीव होती त्यांनी वेळोवेळी आपल्या मुलांना शिक्षण दिले. रात्री पहारेकरी झोपल्यावर त्या छत्रपती प्रतापसिंह व इतर भांवडाना रात्री उशिरपर्यंत शिक्षण द्यायच्या हे अत्यंत गुप्तपणे सुरू असायचे. सहा वर्षे हा कोंडमारा छ्त्रपतीनिष्ठ लोक सहन करत राहिले. यावर तोडगा काढण्यासाठी छ्त्रपतीनिष्ठ रांगोजी बापू व इतर सहकारी यांनी इंग्रज राजकीय प्रतिनिधी एलपिस्टनाची पुणे येथे भेट घेऊन छत्रपतींचा हाकहवाल देऊन त्यांची सुटका व्हावी व त्यांचे राज्य हाती देण्याविषयी प्रयत्न सुरू केले. यात त्यांना यश आले आणि त्यांनी ब्रिटिश प्रतिनिधी एलपिस्टनकड़े सर्व अहवाल कळविला आणि विनंती करण्यात आली छत्रपतींची बाजीरावाच्या तावडीतून सुटका करण्यात यावी,परंतु यावर एलपिस्टन यांनी छत्रपतींचा तसा लेखी संदेशाच्या आवश्यकतेवर भर दिला. तशी चिठ्ठी रांगोबाने मोठ्या शिताफीने छत्रपती प्रतापसिंह यांचेकडून प्राप्त करून एलपिस्टन यांना दिली त्यावर एलपिस्टन यांनी रंगोजी बापू यांना पाच मोहरा इनाम देखील दिला.

पेशवेकाळातील सामाजिक स्थिती -: पेशवेकाळात एकंदरीत सामाजिक स्थिती अत्यंत आमानवी, विषमतावादी, विलासी होती. या काळात प्रचंड जातीव्यवस्था, दासप्रथा समाजव्यस्थेत वाढीस लागली होती. पेशवाईच्या सावलीत या ग्रंथात लेखक नारायण गोविंद चाफेकर पेशवे दफ्तरावरून काही नोंदी नमूद केल्या आहेत. यात कुणबीच्या व्यापाराच्या अर्थात खरेदी विक्रीचे संदर्भ प्राप्त होतात. पेशव्यांच्या दिमतीला कुणबी असायच्या. पृष्ठ क्र 184 वऱ 185 रू 2 कुणबीणी खरेदी तसेच तुलसी कुणबीण उम्र 18 वर्षे बापू बाबरा कडून 75 रुपयास विकत घेतली. कुणबीण विकत घेण्यासाठी उसने देण्याचेही संदर्भ आढळतात. गुलाम विक्रीचाही देखील सर्रास व्यवहार आढळतो त्याची किंमत 90 रुपया पर्यंत होती.एकट्या सुभेदाराच्या खासगीकडील अशा कल्याणास 14 कुणबीणी होत्या आणि ठाण्यास 15 होत्या. ह्या कुणबीत मुसलमानही असे आणि अशा मुसलमानी कुणबीस ईदसाठी खर्चही नमूद असलेला दिसतो.
वा. कृ.भावे लिखीत पेशवेकालीन महाराष्ट्र या ग्रंथात या विषयी संदर्भ आहे त्यात दास व दासी यात फरक करावयाचा झाल्यास पेशवाईत दासापेक्षा दासीच अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते असे नमूद केले आहे . तत्कालीन लोक दासींना कुणबीणी किंवा बटिकी व दासांना पोरगे म्हणत.पेशवाईतील सरदार, राजेरजवाडे, श्रीमंत व सुखवस्तू लोक हे आपल्या पदरी कुणबीणी व बटकी बाळगत. त्यांचा क्रमविक्रय करण्यात येई. जशा गोठ्यात किंवा पागेत गाई,बैल किंवा घोडी. बटीकाला किंमत सुमारे साठ रुपया पर्यंत पडावी. बटिक तिच्या पोरग्या सुद्धाविकायची झाल्यास त्या दोघांची किंमत दडीशे रुपयांपर्यंत जात असे. काही बटकिना त्यांचे मालक पागेतच राहवयास जागा देत. परंतु वर्णांनाहून असे दिसते की ब्राम्हणाच्या कुटुंबात अतिशूद्र स्त्रिया चालत नव्हत्या ते केवळ शूद्र जातीतील कुणबीणी ठेवत असत .
ना.वि.जोशी लिखीत च्या पुणे वर्णन 1868 आवृत्तीतील बाजीराव विषयी अभिप्राय इथे अत्यंत महत्वाचा आहे, त्यात म्हटले आहे बाजीरावाची चाल व निती फार वाईट व राज्यपदवीस तो पुरुष फार आयोग्य ह्याजमुळे त्याजवर दंगा करून लोकांनी त्यास मारले असते.पण त्यानें भटास व ब्राम्हणास जेवणे व दाने बहुत दील्ही.आणि आपल्या जातीस संतोषात राखले, म्हणून बावीस वर्षे ह्याने राज्य केले,नाही तर हा मागेच पदभ्रष्ट होता. त्याची बुद्धी दुष्ट होती,कोणावर त्याचा विश्वास नसे आणि सर्वास फसवावे हे त्याचे मनात. आणि नेहमी सरदारात कलह उत्पन्न करून व वैमण्यस आणून वाकडे पाडीत. त्यास कोणी ब्राम्हणाशिवाय चाहत नसे.
नारायण चाफेकर त्यांच्या पेशवाईच्या सावलीत ग्रंथात दुसरा बाजीरावाच्या कारकीर्दीत,दक्षणेचे रुपये लोंकाकडून वसूल करीत असावे असे म्हटले आहे त्याच्या दाखल्यासाठी पेशवे दफ्तराच्या नोंदीचा संदर्भ ते देतात ” 2 रू प्यादे सरकार बापू लेले याजकडून श्रावणमासचे दक्षणेचे तागाद्यास आले त्यास देणे. तसेच नेवासे महालाचे श्रावणमासचे दक्षणेचा भरणा रू 25000″ नमूद केल्या आहेत.
ना.वि.जोशी यांच्या पुणे वर्णानात मुक्ता साळवेच्या बोलक्या निंबधातील काही उतारे तत्कालीन विषम परिस्थितीवर प्रकाश टाकतात. ” आम्हा गरीब मांग महारास हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेलशेंदुर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता.आम्हा मनुष्यास ब्राम्हण लोकांनी गाई म्हासीपेक्षा नीच मानीले आहे.सांगते ऐका, ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे मानीत होते की काय?”
त्यासमयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखाण्या समोरून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तरवारीचा दांडू करून खेळत होते. शुरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे,त्रिमकजी, आंधळा पानसरा, काळ, बोहरा इत्यादी हे निरर्थक मांगमहारावर स्वाऱ्या घालून विहिरी भरत होते, व गरोदर बायकासही देहांत शासने करीत होती ती इंग्रज सरकारमुळे बंद झाली आहेत.

बाजीराव पेशव्यांचा दारुण पराभव :-महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड(भाग 2) मध्ये डॉ खोबरेकर नमूद करतात की गंगाधर शास्त्री यांचा खून झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर इंग्रजांनी पेशव्यावर 13 जून 1817 रोजी नविन तह लादला. सातारचे छत्रपती प्रतापसिंह व त्यांचे भाऊ,मातोश्री माईसाहेब अशी मंडळी सातारच्या किल्ल्यावर पेशवे बाजीराव पेशवे यांच्या निर्बंधाखली राहत असताना इंग्रजांच्या वाढत्या प्रभावाखाली परिस्थितीतून मुक्त होण्याचे प्रयत्न सुरू केला. याची भनक बाजीरावास लागताच त्याने माहुलीस मुक्काम करून छत्रपतींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इंग्रजांशी लढाई देण्याची गुप्तपणे तयारी सुरू केली.गंगाधर शास्त्री यांचा खून झाल्यानंतर पेशव्यांची घटका भरली असे जबाबदार मराठे व्यक्तींना वाटून त्यांनी इंग्रजांच्या मदतीने आपली सोय लावून घेण्याची सर्वात केली. प्रतापसिंह व माईसाहेब यांनी गुप्तपणे बोलणी करून इंग्रजांना अनुकूल असल्याचे कळविले.या कुणकुण लागताच बाजीरावाने छत्रपतींना सातारा किल्ल्यावरून वासोट्याला हलविले. त्यात बाजीरावाने इंग्रजाशी 1817 मध्ये युद्ध सुरू केले. 5 नोव्हेंबरला प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटले, बाजीरावाने एल्फिन्स्टन उतरलेल्या गणेशखिंडीवर हल्ला चढविला, परंतु एल्फिन्स्टन सहीसलामात बाहेर पडला कारण बाजीरावाच्या सैन्यात फितुरी होती असे डॉ खोबरेकर नमूद करतात. खडकी येथे कर्नल बर व बाजीरावाच्या सैन्यात लढाई झाली.
पुढच्या टप्प्यात जनरल स्मिथ पुण्यावर चालून आल्यावर तोफेचा मारा होताच बाजीरावाने पुण्यातून पळ काढला. बाजीराव पुणे सोडून पळताच बाळाजी पंत नातूने शनिवार वाडयावर इंग्रजांचा युनियन जॅक झेंडा चढविला. बाजीराव पळत जेजुरीस पोहचला तेथून माहुलीला गेला. छत्रपती इंग्रजांशी मिळाले हे कळताच त्याने छत्रपतींची अपराधाची माफी मागितली. माहुलीहून तो मिरजेस गेला. इंग्रज फौज दक्षिणेकडून येत असल्याचे कळताच तो पंढरपूरला आला आणि सिद्धटेक मुक्कामी त्याने छत्रपतींना बरोबर घेतले. बाजीराव झुकांड्या देत संगमनेर,नाशिक, फुलगाव असा प्रवास करत चाकण येथे पोहचला. 31 डिसेंबर 1817 रोजी कॅप्टन स्टाँटन आपली बॉम्बे नेटिव लाइट इन्फैन्ट्री सेकंड बटालियन फर्स्ट रेजिमेंट घेऊन शिरूरला निघाला व सकाळी भीमा कोरेगाव येथे पोहचला येथेच बाजीरावाच्या सैन्याबरोबर तुंबळ लढाई झाली जिथे महार सैनिकांच्या प्रित्यर्थ विजयस्तंभ निर्माण केला गेला आहे.
कोरेगाव येथे बाजीरावाच्या सैनाचे नुकसान व पराभव झाल्यानंतरनंतर फलटण मार्गे आष्टी येथे इंग्रज फौजेशी सामना झाला या युद्धात बाजीरावाचा सेनापती बापू गोखले मृत्यमुखी पडला. आणि पेशवा तेथून निसटला. छत्रपती व इंग्रज यांची भेट झाली. छत्रपती प्रतापसिंह यांनी एल्फिन्स्टन यांच्या सूचनेवरून बाजीराव बंड आहे त्यास आम्ही काढून टाकले आहे,त्याचे हुकूम कोणत्याही मामलेतदाराने मानू नयेत असा जाहीरनामा काढला. यानुसार बाजीरावाला मराठीशाहींत कोणीही सहकार्य केले नाही. बाजीराव भटकत राहिला इंग्रज त्याचा पाठलाग करत नर्मदेकडे पोहचले, चारही बाजूंनी इंग्रज फौजांनी घेरले हे लक्षात येताच त्याने माल्कमकडे आपले वकील पाठवून वाटाघाटी सुरू केली, त्यानुसार त्यास उत्तरेस ब्रम्हावर्तास ठेवावे व वर्षाला 8 लाख रुपये पेन्शन दिली जाईल असे आश्वासन मिळताच पेशवा बाजीराव 3 जून 1818 रोजी माल्कमच्या स्वाधीन झाला.

छत्रपती प्रतापसिंह सातारच्या गादीवर विराजमान:-सर्वसामान्य मराठ्यांची भक्ती छत्रपतीकडे आहे याची कल्पना इंग्रजांना होती हे जाणून कंपनी सरकारने प्रतापसिंह यांच्या गादीचे पुनरुत्थान करून त्यांना 14 पेट्याचे राज्य देऊन तह करून छत्रपती पदावर विराजमान केले. ग्रँट डफ यास इंग्रजांनी पॉलिटिकल एजंट नियुक्त केले.
रंगोजी बापूजी या प्रबोधनकार ठाकरेंच्या समग्र वाडमयात छत्रपती प्रतापसिंह यांना स्मिथ पुण्याला घेऊन निघाला त्यावेळी गावोगावचे लोक छत्रपतींचे दर्शन घेऊन आरत्या ओवाळीत असल्याचे नमूद आहे याचाच अर्थ रयतेच्या हायसे झाले होते. साताऱ्याला पोहचताच शहरात नागरिकांनी महोत्सव साजरा केला. 11 एप्रिल 1818 रोजी छत्रपतींना गादीवर बसवताच जनतेने आनंदोत्सव साजरा केला. अशा पद्धतीने छत्रपतींची गादी पेशवाईच्या जंजाळातून मुक्त झाली.

निष्कर्ष -:भीमा कोरेगाव युद्ध हे महाराष्ट्रीय जनभावनेचे प्रतिक होते, पेशंव्याच्या असामाजिक व विलासी राज्यकारभाराविरोधात मराठेशाहीच्या मनातील आक्रोशाचे द्योतक होते. बाजीराव पेशव्याच्या काळात जनता त्रस्त होती,पेशव्यांच्या अन्याय अत्याचारातून संबंध मराठेशाही होरपळून निघाली होती हे नाकारता येणार नाही. सदर युद्ध जरी निर्णायक नसले तरीही तत्कालीन अविषमता, दासप्रथा, जातिभेद मोडून टाकण्यासाठी अभिमुख ठरली. या युद्धांने बाजीराव पेशव्याच्या बलाढय सैन्याला प्रचंड आवाहन दिले हे निश्चित आहे.
छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी इंग्रजांशी संधान साधून बाजीरावास पदच्युत करण्यासाठी बोलणी केल्याचे इतिहासकार दाखले देतात. तसेच छत्रपतीं प्रतापसिंह यांनी बाजीराव पेशवे हा बंड असल्याचे जाहिर केल्याचे दिसते. भीमा कोरेगाव व आष्टी लढाईनंतर छत्रपतीं प्रतापसिंह भोसले व इंग्रज अधिकारी स्मिथ यांचा तह होऊन प्रतापसिंह पुन्हा साताऱ्याच्या गादीवर छत्रपती म्हणून विराजमान झाले.
त्यामुळे भीमा कोरेगाव लढाई व सहभागाविषयी जे आक्षेप नोंदवले जातात ते अमानवी पेशवाईच्या अस्तातून दुखावलेल्या मानसिकतेचे प्रतिक आहे, आणि सदर आक्षेप वस्तुनिष्ठ इतिहासाशी प्रतारणा करणारे आहेत. त्यामुळे भीमा कोरेगावचा विजयस्तम्भ जगाला सात्यत्याने अमानवतेविरूद्ध मानवतेच्या विजयाचे आणि अन्यायाविरुद्ध न्यायाच्या विजयाचे स्मरण करुन देत राहिल.

सतीश केदारे,
फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अभ्यासक,
9604412387
satish.Kedare123@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*