इंटरसेक्शन म्हणे ~ गुणवंत सरपाते

इंटरसेक्शन म्हणे. यार कधीतरी स्वत:चीचं लाज वाटून, नेहमीच्या मार्गदर्शक नाहीतर सेव्हीयर च्या आवेशातून बाहेर येत ‘पार्ट ऑफ दी प्रॉब्लेम’ म्हणून बोलता जा राव. जी मित्र बोलतात, ती खरी समविचारी मित्र. शोषणाप्रती, शोषितांप्रती कळवळा तीच असते. त्या पलीकडीच्या सगळ्या,’छान लिहता सर” वगैरे टाईप बाजारगप्प्या. तिकडं नेटफ्लिक्सवर डेव शपेल बेडधक कोलतो तेंव्हा भारी वाटत, भेंडी इथं लिव्हड एक्सप्रीयंस मधून एक ओळ लिहलं का थेट ‘तुच्छतावादी’? इतकं पटकन ऑफेंड? लोल. क्लासिक सवर्ण फ्रॅजीलिटी.

कसं असतं, मी इथं व्यवस्थित दोन वेळचं जेवू शकत असलो, मला सॅलरी मिळत असली तरी दर दोनचार महिन्यांनी आईबाबाकडं गावी जातो ना तेंव्हा सगळ्या गावच्या नजरेत मी ‘इंग्रजी बोलणारा’ महार’ असतो. बसमधून उतरल्यावर पाठीवर बॅग घेऊन वस्ती पर्यंत जाताना सगळ्यांची होणारी जळफळाट मला स्पष्टपणे कळत असते. मी फक्त हसत आपलं वस्ती जवळ करतो. कारण ही सुप्रीमसी, त्यांच्या मनातला द्वेष आदिम आहे हे मला नीट ठाऊक आहे.

आन इथं बालकॉम्रेड थेअरी मांडतो ‘गरीब ब्राह्मण’ आणी ‘पण नौकरीवाले दलित’ वाली. साला ह्यांना नीट मार्क्स कळालाय ना जात कळालीय. सगळं अधांतरी. मित्रा, इथं श्रमाला जात असती. गावची मेलेली गुरं ओढणं, त्याचं चामडं कमावणं, लाकडं फोडणं, मालकाच्या रानात औत धरण्या पासून ते कॉर्पोरेटच्या मॅनेजमेंट, न्यूज एडीटोरीयल बोर्डपर्यंत, श्रम जातीत विभागलं असतंय. जात हे ‘कॅपिटल’ असतं हे तुला कधीचं कळणार नाही, कारण ते तुला जन्मतः आयतं मिळालेलं. ते ज्यांच्याकडं नाही त्यांची हतबलताही तुला जाणवणार नाही. जे आयतं मिळालय ना, त्या मागं माझ्या कित्येक पिढ्यानी पसाभर शिळ्या भाकरीसाठी संबध गावाची गुलामी केलीय. ह्या शोषणाला स्ट्रक्चरली न पाहता, आयसोलेट करून कायतरी मांडणं म्हणजे थेट ह्या शोषणाला नकळत पाठींबा देणं होय.

कसंय ना, जात नावाचं एक भलं मोठं वर्तुळ असतं. अवघं अवकाश खाऊन टाकणारं वर्तुळ. त्याच्या आत मध्येचं, जात व्यवस्थेनं घालून दिलेल्या परिघातचं अनेक छोटंछोटी वर्तुळं असतात. जसं की वर्ग आणी लिंग वगैरे. ह्या प्रमाणचं त्यातचं एका छोट्या वर्तुळात एलजीबीटीक्यु समूह आला. परत तुमचा डिसेबल्ड समूह आला. भारतीय परीक्षेपात जवळपास हरएका प्रकारच्या शोषणाला जात व्यवस्थेचं एक घट्ट असं आवरण आहे. गरीब ब्राह्मण आणी एक गरीब दलित ह्यात जमीन अस्मानाचा फरकयं. तोच फरक सवर्ण स्त्री आणी आदिवासी स्त्री.

हे स्पष्ट. क्लियर आणि लाऊड.

आता. जर कुणी ह्या हरएक प्रकारच्या शोषणाला जात व्यवस्थेपासून आयसोलेट करून, वेगळं करून, सुटं करून पाहत असेल तर ते रुलिंग क्लास, म्हणजेचं शोषक वर्गाला मदत करणारं आहे. त्यामुळं अशी मांडणी अथवा असं नॅरेशन कुणी करत असेल तर तो व्यक्ती जात व्यवस्थेचा थेट प्रायमरी लाभार्थी आहे हे ओळखावं. तो आपलं जातव्यवस्थेतलं स्थान, पिढ्यानपिढ्या चालत आलेली संसाधनं, जातीचे सगळे प्रीवलेज तसंच ठेवून परत शोषितांना शिकवायला येईल की “तुम्ही ह्यांव केलं पाहिजेत त्यांव केलं पाहिजेत’ असल्या श्वापदांना ग्राम्सी ‘रुलिंग क्लास इंटलेच्युअल’ म्हणतो. शोषक वर्गातले विचारवंत. हे मुख्यत: पत्रकारं, प्राध्यापकं वगैरे असतात. ह्यांना फाट्यावर मारत शोषित वर्गातले, ऑरगॅनीक विचारवंत पुढं आणा म्हणतो. कारण ह्यांच काम फक्त आपल्या शोषक वर्गाचे हितसंबंध एवढंचं असतं.

एवढं लक्षात ठेवा यार की, क्लास इंटरेस्ट हा नेहमी शोषक वर्गाच्या बाजूने काम करत असतो. त्यामुळं स्वतंत्र भारतातील, महारवाड्यातल्या चौथ्या पिढीतीलं एक पोरगं वस्तीसोडून आयटीत नौकरी करतोय म्हणजे तो ‘बुर्ज्वा’ नसतोय भावड्या. कारण त्याच्या पाठी मागं काम करणारी परिसंस्था नसते, तिथं त्याला मदत करणारा कुठला ‘क्लास इंटरेस्ट’ नसतोय. तो तिथंपण त्यांच्या नजरेत ‘ओह! दोज फ्री रिझर्व्हेशन पिपल’ एवढचं असतोय. त्यांचे अनुभवं, त्यांचं कोषातलं जगणं हे आजही बाह्यजगासाठी अस्पृश्यचं आहे.

आणी अजून एक : कुठल्याचं शोषक वर्गाला उत्तरं, स्पष्टीकरण देण्यास मी बांधील नाही. लेट्स फ्लिप द नरेटिव्ह! मी काय लिहावं, माझ्या वेळेसोबत काय करावं, ह्यांच कंट्रोल फक्त माझं असणार. मी यूडेमीचा एखादा कोर्स पाहावं का कुण्या प्रिवलेज्ड सवर्णाला उत्तर देत बसावं ते मी ठरवणार. मी कुणाच्या नरेटिव्हीचा गुलाम नाही आणी माझा कुणी मालक नाही.लव. पीस.

असो. मार्क्सचा ‘क्लास इंटरेस्ट’ हा आपण नीट समजून घेतला पाहिजेत. त्यावर नंतर कधीतरी सविस्तर.

गुणवंत सरपाते

लेखक हे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

Chat conversation

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*