शेतकऱ्याचा आसूड

सरकारी सर्व खात्यांनीं ब्राह्मण कामगारांचें प्राबल्य असल्यामुळें त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माचे मिषाने अज्ञानी शेतकऱ्यांस इतकें नाडितात कीं, त्यांस आपली लहान चिटुकलीं मुलें शाळेंत पाठविण्याचीं साधनें रहात नाहींत व एकाद्यास तसें साधन असल्यास यांच्या दूरुपदेशानें तशी इच्छा होत नाहीं. आतां पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकऱ्यांस भटब्राह्मण धर्म मिषाने इतकें नाडितात कि त्यांजविषयी या जगांत दुसरा कोठें या मासल्याचा पडोसा सांपडणें फार कठीण पूर्वीच्या धूर्त आर्यब्राह्मण ग्रंथकारांनीं आपले मतलबी धर्माचे लिगाड शेतकऱ्यांच्या मागे इतक्या सफाईनें लावलें आहे कि शेतकरी‍ जन्मास येण्याचे पूर्वीच त्याचे आईस ज्या वेळेस ऋतू प्राप्त होतो, तेव्हां तिच्या गर्भाधानादि संस्कारापासून तो हा मरेपर्यंत कित्येक गोष्टींनी लुटला जातो, इतकेंच नव्हे तर हा मेळा तरी याच्या मुलास श्राद्ध वगैरेंच्या मिषानें धर्मांचें सोसावें लागतें. कारण शेतकऱ्यांचे स्त्रियांस ऋतू प्राप्त होताच भटब्राह्मण जपानुष्ठान व सदरचीं, ब्राह्मणभोजने घेतें वेळी भटब्राह्मण आपले आप्तसोयरे व इष्टमित्रांसह तूप पोळ्यांची व दक्षिणेची इतकीं धांदल उडवितात कीं, त्यांच्या उरल्या सुरल्या अन्नापैकी त्या बिचाऱ्या अज्ञान शेतकऱ्यांस पोटभर आमटीपोळी मिळण्याची सुद्धा मारामार पडते. ऋतुशांतीनिमित्तानें भटब्राह्मणांची उदरशांती होऊन त्यांचे हातावर दक्षिणा पडताच ते शेतकऱ्यांस आशीर्वाद दिल्यानंतर त्यास त्यांचे स्त्रियांनी शनिवार अथवा चतुर्थीचीं व्रतें धारावी म्हणोन उपदेश करून घरोघर चालते होतात.

पुढें भटब्राह्मण दार शनिवारीं व चतुर्थीस शेतकऱ्यांचे स्त्रियांकडून रुईचे पानांच्या माळा मारुतीचे गळ्यात घालवून व गवताच्या जुड्या गणपतीच्या माथेवर रचून शिधेदक्षिणा आपण घेतात व पुढें कधीं कधीं संधान साधल्यास सदरची व्रतें उजविण्याची थाप देऊन शेतकऱ्यांपासून लहानमोठी ब्राह्मणभोजने घेतात. इतक्यांत शेतकरणी बाया सृष्टिक्रमाप्रमाणे गरोदर झाल्यांस, भटब्राह्मणांनी शेतकऱ्यांकडून मुंज्यांचे ब्राह्मण घालविण्याचे लटके पूर्वी केलेले नवस शेतकर्यांशीं सहज बोलतां बोलतां बाहेर काढावयाचे व शेतकऱ्यांच्या स्त्रिया प्रसूत होण्याच्यापूर्वी भटजीबुवा शेतकऱ्यांच्या घरीं रात्रंदिवस खडया (फेऱ्या) घालितात व त्यांच्याशीं मोठीं लाडीगोडी लावून त्यांच्याशीं यजमानपणाचीं नातीं लाऊन त्यांजपासून त्या नवसाची फेड करून घेतात. पुढें शेतकऱ्यांचे स्त्रियांस पुत्र झाले कीं, भटब्राह्मणांची धनरेषा उपटते. ती अशी कीं, प्रथम मुख्य उपाध्ये शेतकऱ्यांचे घरीं जातात व त्यांचे घरांतील वाव व कसऱ्यांनी वेळ मोजणाऱ्या या अज्ञानी स्त्रियांस मुलांचे जन्मकाळ विचारून,ज्या राशीस जास्त अनिष्ट ग्रह जुळत असतील, तसल्या राशी मुकरर करून त्यांच्याअर्भकांच्या जन्मपत्रिका अशा रीतीनें तयार करतात कीं अज्ञानी शेतकऱ्यांचे पुत्रजन्माने जहालेल्या सर्व आनंदांत माती कालवून त्यास घाबरे करितात व दुसरे दिवशीं त्याजकडून पिंडींतींल लिंगापुढे आपले भाऊबंद, सोयरेधायरे व इष्टमित्रांपैकीं भटब्राह्मणास मोलनें जपानुष्ठानास बसवितात व त्यापैकीं कोणांस शेतकऱ्यांपासून उपोषणाचे निमित्तानें फलाहारापुरते पैसे देववितात. उन्हाळा असल्यास पंखे देववितात, पावसाळा असल्यास हात चालल्यास तो, शेतकर् यापासून पुजेच्या निमित्तानें तेल तादं ळू , नारळ, खारका, सुपाऱ्या, तूप, साखर, फळफळावळ वगैरे पदार्थ उपटावयास कमी करीत नाहींत.

शेतकऱ्यांचे मनावर मूर्तिपूजेचा जास्ती प्रभाव ठसावा म्हणून काहीं भट तपानुष्ठान संपेपावेतो आपल्या दाढ्याडोया वाढवितात, कांहीं फलाहारावर राहतात. अशा नानाप्रकारच्या लोणकढ्या थापा देऊन जपानुष्ठान संपेपावेतो भटब्राह्मण शेतकऱ्यांचे बरेंच द्रव्य उपटतात. शेवटीं समाप्ती करवितेवेळी भटब्राह्मण अज्ञान शेतकऱ्यांपासून ब्राह्मण भोजनासहित यथासांग दक्षिणा घेण्याविषयीं कसकशी चंगळ उडवितात हें सर्व आपणास माहिती असेलच.


क्रमशः

(शेतकऱ्याचा आसूड)

~~~

महात्मा जोतिबा फुले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*