गोष्ट स्वातंत्र्याच्या ७० वर्षा नंतरची!! (भामरागड तालुक्यातील अनुभव)

बोधी रामटेके

रोशनी ला झालेल्या असाह्य वेदना आणि जयाने गमावलेला जीव या दोन्ही घटना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या आणि त्यातूनच त्या दोघींच्या व त्यांच्या कुटुंबाबद्दल निर्माण झालेली काळजी मला अनेक किलोमीटरचा खडतर प्रवास करत त्यांच्या घरा पर्यंत घेऊन गेली.

घटना आहे जुलै महिन्यातली. रोशनी ही नऊ महिन्यांची गरोदर होती. घरी असतांना तिला प्रसूतीच्या वेदना व्हायला सुरुवात झाल्या. गावचा सर्वात जवळचा दवाखाना तब्बल २३ किमी वर होता. गावातून जाण्यासाठी कुठलेच साधन नव्हते. म्हणून चालत जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मग करायचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा नऊ महिन्याचे मूल पोटात असलेल्या आपल्या रोशनीने कुठलाही विचार न करता त्या जंगलातून एकटी पायी चालायला सुरुवात केली. तिच्या बोलण्याप्रमाणे जवळपास १४-१५ किमी ती एकटीच चालत राहिली. तिच्या सोबत असलेली आशा वर्कर सुद्धा तिला दूर दूर पर्यंत दिसत नव्हती. तो रस्ता पूर्ण खडकांनी भरलेला होता. वाटेत लागणाऱ्या दोन डोंगरांना सुद्धा पार करत ती पुढे जात राहिली. एकाजरी खडकावरून तिचा पाय घसरला असता तर फार वाईट परिस्थिती निर्माण होऊन बसली असती. पण ती चालत राहिली. वाटेत येणारी पमुलगौतम नदी, छोटे छोटे नाले परत करत शेवटी तो ३-४ तासांनी ती लाहेरी च्या उपकेंद्रा पर्यंत पोहचली. तिथून भामरागडला तिला घेऊन जाण्यात आले. तिची त्याच दिवशी प्रसूती झाली आणि एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला.

तर दुसरीकडे चार महिन्याची गरोदर जया शेतावर गेली होती. घरी आल्यावर अचानक ती खाली कोसळली. तिला दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ सुरू झाली. परंतु गावा जवळून जाणाऱ्या नदीवर पूल नाही आणि पाण्याची पातळी फार वाढली असल्यामुळे कुठलीच गाडी जाऊ शकत नव्हती. म्हणून घरच्यांनी तिला खाटेवर झोपवलं आणि तब्बल ७ किमी जंगलातून चालत निघाले. नदी प्रचंड भरली होती. मात्र क्षणभरही विचार न करता तिच्या घरच्यांनी प्रचंड भरलेली नदी पार करू लागले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे लाहेरीच्या दवाखान्यात पोहचल्यावर कुठलाच इलाज करण्यात आला नाही आणि तिला भामरागड नेण्यात आले. सोबत डॉक्टर सुद्धा नव्हते आणि अश्या परिस्थितीत शेवटी तीचा दवाखान्यात जायच्या आधीच मृत्यु झाला. तिचा नवरा २-३ वेळा दवाखान्यात जाऊन आला परंतु आद्यप पोस्टपार्टम रिपोर्ट सुद्धा मिळालेला नाही. या दोन्ही घटनेबद्दल मी व माझ्या सहकाऱ्यांनी मिळून मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात त्यांचा अहवाल सादर केला परंतु मला त्यात त्रुटी दिसल्या आणि मी त्यांच्या गावी जायचं ठरावलो.

भामरागडला अनेकदा गेलो पण हा प्रवास फार वेगळा होता. दिवस होता २६ नोव्हेंबर २०२० ‘संविधान दिन’. माझ्या गावापासून भामरागड चे अंतर १४० किमी चे आहे. सुमारे ११ वा. मी तिथे पोहचलो. त्या भागात वातावरण भीतीचेच होते. कारण नक्षलवाद्यांनी रस्त्यावर झाडे पाडून महामंडळाची बस अडवली होती. मी आलेल्या रस्त्यावर सुद्धा असाच प्रकार घडला होता हे पोहचल्यावर मला कळलं. मी रोशनी आणि जयाच्या घरी जायच्या नियोजनात होतो. पण कुणी सोबती मिळत नव्हता. त्याच वेळेला पाऊस सुरू झाला आणि तेव्हा लोकांनी सांगितलं की रोशनी च्या गावी जाणे आता तरी तुला शक्य होणार नाही आणि वातावरण भीतीचे असल्यामुळे तू जाऊच नको. पण मी ठाम निर्णय केला होता की मी तिच्या पर्यंत पोहचणारच.

मी पोहचलेल्या दिवशी मित्र अविनाश पोइनकर दादा यांच्या मार्गदर्शनात वनहक्क कायदा वर इतर विषयावर सृजन संस्थेच्या कायकर्त्यांचे चर्चासत्र होते. अनेक गावांतील लोक सहभागी झाले होते. त्यांना दुसऱ्या दिवशी पाचगावला प्रशिक्षनाला जायचं होतं. कुणी सोबती न मिळाल्याने मी त्यांच्या सोबतच थांबलो. रात्री चिनू माहाका यांच्या घरी सामूहिक भोजन झाले व लोकांसोबत वनहक्क कायदा व इतर गोष्टींवर चर्चा झाली. रमेश पुंगाटी, चिना मडावी व इतर ऍक्टिव्ह लोकांची भेट झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी हेमलकसा वरून लाहेरी जायला निघालो. वाटेत पाऊस लागला आणि मी भिजत भिजत पोहचलो. लाहेरी पोलीस स्टेशनला पुढच्या गावात जाणाऱ्या नवीन व्यक्तींची चौकशी होते. पण माझ्यासोबत तसे झाले नाही. लाहेरीतील एका सहकाऱ्यासोबत गुंडेनूर साठी निघालो. लाहेरी नंतर पुढच्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे संपतो. जंगल मार्गाने वाट काढत जावी लागते. मधात पामुलगौतम नदी पार करावी लागते. ही तीच नदी जिथून जयाला खाटेवरून आणण्यात आले होते. त्या नदीवर पूल नाही. पण आता गुंडेनूर गावातील लोकांनी श्रमदानातून एक लाकडाचा सुंदर पूल बांधला आहे. तो पूल पार करून आम्ही गावात पोहचलो. गाव एकूण २७ घराचं आणि दोन्ही बाजूंनी डोंगरांनी व्यापलेलं. गावात गेल्यावर पहिलच घर जयाचं होतं. घरी गेलो तेव्हा आदराने चहा, पाणी दिला. मग मी माझ्या विषयावर आलो. त्यांना सविस्तर घटना विचारली. तुम्हाला नुकसानभरपाई मिळावी या साठी आम्ही प्रयन्त करत राहू असे सांगितलो. बराच वेळ त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्याने सादर केलेल्या अहवालाच्या फार विपरीत गोष्टी आढळुन आल्या. मी त्यांच्यासाठी नेमकं काय करतोय हे त्यांना समजलं नाही पण काहीतरी चांगलं करतोय हे मात्र त्यांना समजलं आणि ते माझ्यावर फार खुश होते. मी पुढे रोशनीच्या गावी जाण्यासाठी विचारणा केली. तेव्हा सगळे एकदम डगमगले आणि नकारच दिला. कारण ते गाव फार संवेदनशील आहे आणि अबुजमाडच्या भागात येतं. त्या भागात पोलीस चौकी बांधण्यासाठी अद्याप शासकीय यंत्रणा सुद्धा यशस्वी झाली नाही. असो पण मी त्यांना समजावून सांगितलं की तिला भेटणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. तेव्हा जयाचा नवरा राजू येण्यास तयार झाला. गुंडेनूर पासून तुरेमर्का हे अंतर १८ किमीचे होते. मी विचार केला लगेच जाऊन परत येणं होईल पण जेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त जाण्यासाठी आपल्याला तीन तास लागतील तेव्हा मी थक्क झालो. पण जायचं होतंस. तेव्हा जेवून जायचा आग्रह केला आणि माझ्यासाठी त्यांनी कोंबडा कापून मोठा पाहुणचार केला. जेवण झाल्यावर आम्ही माझ्या गाडीने तुरेमर्का साठी निघालो. रस्त्यात जंगलातील बंदूक धाऱ्यांकडून (नक्षलवाद्यांकडून) विचारणा होऊ शकते असे राजूने मला सांगितले. जंगल वाट सुरू झाली. आम्ही जात राहिलो.

त्या रस्त्यावरून जात असतांना रोशनीचा प्रवास कसा असेल त्याचाच मी विचार करत होतो. आता पहिला डोंगर चढायचा होता. रस्ता पूर्ण खडकांनी भरलेला होता. मग डबल सीट जाणे अशक्य झाले होते. राजू गाडी चालवत पुढे गेला आणि मी बराच टप्पा चालत पार केला. वाटेत २ म्हाताऱ्या महिला भेटल्या. जवळपास १५-२० किलोचे पोते घेऊन ते सुद्धा तुरेमर्काला जात होते. इच्छा असून सुद्धा त्यांना मदत करणे शक्य झाले नाही. आम्ही आता गाडीने पुढे जातच होतो दोन नाले पार झाले. आपण विचार नसेल केला इतका घनदाट आणि भव्य तो जंगल होता ज्याची कल्पनाही होऊ शकत नाही. वाटेत बरेच मोर आणि विविध पक्षी दिसत होते. दुसरा डोंगर चढण्याची वेळ आली. गाडी चढत नसल्यामुळे आम्ही दोघेही गाडीवरून पडलो. पुढेही वाटेत आम्ही २-३ वेळा गाडीवरून खाली पडलो. हा मोठा पल्ला पार करून आम्ही बिनागुंडा गावात पोहोचलो. तिथल्या आश्रम शाळेत गेलोत. ३ शिक्षक ड्युटीवर होते. आम्ही बाईक ने डबल सीट आलोत असे सांगितल्यावर त्यांना फारच आश्चर्य वाटले. ते म्हणाले की, आम्हाला चार वर्षे होऊन आम्ही कधीच बाईक नी येऊ शकलो नाही. आम्ही हा पल्ला पायीच पार केलेला आहे. राजुने फारच जोखिमेनी गाडी चालवली होती. जर ‘Rock Bike Riding’ सारख्या काही स्पर्धा असतील तर राजू त्यात नक्कीच जिंकेल.

आता पुढे आम्हाला ५-७ किमी चा प्रवास करायचा होता. बिनगुंडावरून मला पुढे जाण्यासाठी रस्ताच दिसत नव्हता. मग राजुने एका घराच्या बाजूला असलेल्या कूपाचा(कंपाऊंडचा) फाटक(गेट) खोलला आणि तिथून तुरेमर्का जाण्याचा रस्ता आहे सांगितला. तिथे तर एक व्यक्तीला जाण्यापूर्तीचा सुद्धा रस्ता नव्हता तरी आम्ही गाडी घेऊन शेवटी तुरेमर्काला पोहोचलो. त्या गावात फार कमी लोकांना मराठी समजत होती. राजुला सुद्धा मराठी फारशी येत नव्हती. आम्ही रोशनीच्या घरी गेलोत. मी मराठीत बोलत होतो राजू तिला माडिया भाषेत भाषांतर करून सांगत होता. तिने माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिले. तिच्या बाळाला भेटलो. तो फारच गोंडस आहे. त्याच्या हातात भोजारा ठेवला. तिला खूप आनंद झाला की तिला भेटण्यासाठी मी इतका प्रवास केला होता.

मला तिच्या घरापर्यंत पोहचायला झालेला त्रास मी शब्दात सांगू शकणार नाही. माझा स्वतःचा अनुभव इतका त्रास दायक असेल तर विचार करा तिने इतका मोठा पल्ला किती त्रास सहन करत जिद्दीने पार केला असेल.

नंतर आम्ही तिच्या घरून बाहेर अलोत आणि जाण्यासाठी गाडीवर बसलोत तेव्हा आम्हाला दिसलं की गाडीच्या Accelerator चा वायर पूर्णपणे तुटला होता. गाडी पुढेच जाऊ शकत नव्हती. क्षणात माझ्या समोर मी आलेला पूर्ण रस्ता उभा झाला. आता गाडी भामरागड शिवाय दुरुस्त होणार नाही हे मला माहित होते. याचाच अर्थ की मी आलेला जवळपास ५० किमी चा पूर्ण रस्ता मला गाडी ढकलत न्यावी लागणार. या विचारात मी खूपच चिंतेत आलो. तेव्हा राजुने धीर दिला आणि काही तरी उपाय काढू असा बोलत होता. लगेच इकडून तिकडून काती, सुरे, कुऱ्हाड जमा केले आणि Accelerator चा भाग खोलायला लागला. ते खुलल्यावर दिसले की पूर्ण २३ किमी पहिल्याच गेर वर गाडी आणल्यामुळे तो वायर पूर्ण पणे तुटला होता. राजुने लगेच बाजूचा एक बांबू घेतला. त्याने लगेच त्या बांबूचा एक छोटा नट बोल्ट बनवायला लागला. ते झाल्यावर मच्छी पकडायच्या जाळीचा एक दोर जवळच्या घरातून घेऊन आला. त्याने त्या बांबूच्या नट ला तो दोर बांधला आणि तुटलेल्या वायर ला त्या दोरीने बांधले. गाडी बराच वेळ सुरू झाली नाही. मग बऱ्याच वेळेच्या प्रयत्नानंतर सुरू झाली आणि पाहतो तर काय, त्या दोरीचा आधार घेत गाडीचा Accelerator काम करायला लागला होता. राजुचे मला फार नवल वाटले. असं काही करता येईल हा विचारच मला त्यावेळी आला नाही. एकतर राजू कधी शाळेत गेलेला नाही आणि त्याच्याकडे गाडी सुद्धा नाही. पण त्याने लावलेली शक्कल खूपच भारी होती. त्याने माझा बराच त्रास वाचवला. एकाच्या घरी चहाचं निमंत्रण आलं. आम्ही जात असतांना २-३ बंदूकधारी आले. राजुला माडिया भाषेत चौकशी केली. काय बोलले ते मला फारसं समजलं नाही. मग आम्ही चहा प्यायला गेलो. राजुने सांगितलं की, ते विचारत होते की हे कोण आहेत, कशासाठी आले आहेत. तर मी त्यांना सगळं समजावून सांगितलं अस तो बोलला. आता आम्हाला पाहायचं होतं की माझी गाडी त्या दोरीच्या आधारे वापसीचा प्रवास पूर्ण करू शकणार की नाही. बिनगुंडा पर्यंत आम्ही पोहोचलो तिथे काही लोकांनी पत्र दिले. कारण त्या भागात ना नेटवर्क ना वीज कनेक्शन म्हणून संपर्काचे काहींच साधन नाही. काही माहिती पोहचवायची असल्यास असेच कुणी आल्यास त्याचा जवळ पत्र देतात.

आम्ही पत्र घेऊन परत निघालो. उतार असल्यामुळे जास्त त्रास झाला नाही. तरी गुंडेनूर येत पर्यंत आम्हाला दीड तास लागला. जयाच्या घरी मुक्काम करण्याचा आग्रह केला पण मी परत भामरागड साठी निघालो. आता पुढचा परतीच्या प्रवासात त्या दोरीच्या भोरोषावर मी निघालो होतो. सोबतीला कुणीच नाही आणि अंधार पडायला सुरू झाला. मधात काही झाल्यास माझ्याकडे गाडी ढकलत नेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्या दोरीने मला भामरागड पर्यंत साथ दिली. मी पोहचल्या बरोबर थेट एका मेकॅनिक कडे गाडी दिली. त्याला Accelerator दाखवल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यात असे त्याने सांगितलं. मग मी त्याला सगळी कहाणी सांगितली. त्याने तो पार्ट खोलला आणि तो अक्षरशः अचंबित झाला की इतका प्रवास या दोरीच्या भरवशावर शक्य झालाच कसा.

गाडी दुरुस्त झाल्यावर तहसीलदारांना भेटलो ते नवोदय विद्यलयातील माझे सिनियर आहेत. ते फार ऍक्टिव्ह आहेत. या बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली. त्यांच्या हातात जे करता येत असेल त्या साठी ते पूर्ण प्रयत्न करत आहेत. अजून आनंदाची गोष्ट म्हणजे मित्र अनिमेश जैन लाहेरी उपकेंद्राला मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झाला आहे. मी जाऊन आलेल्या व त्या भागातील सर्व गावात चालत जाऊन जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांचा साठी करणार असे त्याने बोलून दाखवले.

ही आहे कहाणी स्वातंत्र्याच्या ७० वर्षनंतरच्या भारताची. आणि हो मी प्रवास केलेला रस्ता त्या भागातील सर्व गावातील लोक मिळून उन्हाळ्यात चांगला करतात म्हणजे त्यावर मुरूम टाकणे वगैरे. परंतु शासनाकडून त्या साठी कुठलाच मोबदला मिळत नाही. गुंडेनूर सारखं अनेक गावात असेच सुंदर लाकडी पूल बांधले जातात. पावसाळ्यात मात्र ३-४ महिन्यांसाठी या गावांचा जगाशी संपर्क तुटतो. त्याकाळात आरोग्य व इतर बऱ्याच समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते.

या सगळ्या गोष्टी फार लांबल्या परंतु बरच काही शिकवणाऱ्या होत्या. त्या लोकांची आपल्या जगण्याशी तुलना केली तर त्यांच्या रोजच्या जगण्यात मोठा संघर्ष आहे. पण ते त्यांच्या सुंदर जगात खुश आहेत. कारण रस्ता, पूल, आरोग्य हे त्यांची संवैधानिक मूलभूत गरज आहे हे त्यांना कुणी अद्याप संगीतलच नाही. परंतु त्यांना त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मोठे काम करावे लागेल. तिथे काम करण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावेल हे मात्र तितकेच खरे आहे. भविष्यात मोठा पल्ला गाठायचा आहे. दलित-आदिवासी बांधवांच्या न्याय हक्काच्या लढाईत मोठे काम आपल्याला करायचे आहे. यश मिळेल न मिळेल तो नंतरचा प्रश्न पण काम करत राहावे लागेल.

मी घरी पोहोचलो तरी मात्र रोशनी ला झालेल्या त्रासाची मी अजून कल्पना करू शकलो नाही. स्यालुट आहे या वीर मातेला. तिचा तो २३ किमी चा प्रवास माझ्यासाठी तरी फार ऊर्जा देणारा आहे.

त्या लोकांवर, तिथल्या जंगलावर, डोंगर-नदी-नाल्यांवर फार प्रेम झाले आहे.

बोधी रामटेके

लेखक ILS Law College, Pune येथे विद्यार्थी आहेत.



Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*