“देव” – संत गाडगे बाबा यांची कविता

कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||

मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला,
अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||१||

सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस…
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस…
खुप केलं हरी हरी तरी,
मुखांत कधी मावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||२||

कधी स्वत: राहून उपाशी,
भुक त्याची भागवली…
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली…
आहार त्याचा वाढतं गेला,
कधी एका बक-यावर भागला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||३||

आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या…
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या…
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
मला त्यानं दावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही…||४||

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*