माझं माणूस असणं हे ब्राह्मणी व्यवस्थेनं घालून दिलेल्या व्याख्येच्या पलीकडं आहे…

गुणवंत सरपाते

‘अप्रोप्रीएशन’ ह्या शब्दाचा अर्थही ठाऊक नव्हता तेंव्हा. शोषक वर्गानं त्यांच्या कम्फर्टनुसार आखून दिलेल्या प्रत्येक बायनरी नरेटीव्हच्याचं बाजारगप्पात अडकून पुरोगामी गालगुच्चे घेत जगणं साला, तेंव्हाही जमलं नव्हतं. सारी धडपड होती आजूबाजूचं अक्राळविक्राळ जात वास्तव आन ब्राह्मण-सवर्णांचं अमानवी वर्चस्व कसं काम करत हे समजून घेण्याची. माझं संबंध मानवी अस्तिव फक्त ‘छिन्नविच्छिन्न देह’ आन ‘भेदभाव’ ह्या दोन गोष्टी पुरतं मर्यादित करत, शोषणाच्या समूळ सरंचनेला निकाली काढणारे इंटलेक्चुअल्स. काही कळायचं नाही तेंव्हा. लहान होतो. एकलकोंडा होता. दमवून टाकणारी घालमेल व्हायची. जातीय वर्चस्व म्हणजे वस्तीवर पडणारे दगड इतकंच वाटायचं. स्वतःचं माणूसपण देखील अकॅडमीयातल्या बामण-सवर्णां कडून ‘चेक’ करून घ्यायचं साला इथवर नेणिवेतली गुलामी.

आज जर माझ्यावर वस्तीवर एका बाजूनं लाठ्याकाठ्या घेऊन आम्हाला जीवानिशी मारायला येणारी सवर्ण झुंड आन दुसऱ्या बाजूनं रजिस्टर/लॅपटॉप घेऊन माझ्यावर अभ्यास/रिसर्च करायला येणाऱ्या अरुंधती रॉय, शर्मिला रेगे टाईप बामण सवर्ण बाया ह्या पैकी मला कुणाची भीती वाटेल तर निश्चितचं ह्या ‘प्रागतिक ब्राह्मण सवर्णांची’. कारण पुण्याच्या एका ऑफीसात बसून संबंध समूहाला रेशीयलाईज करत त्यांचं ‘माणूसपण’ एका रिसर्च पेपरद्वारे डिफाईन करण्याची ताकद फक्त रेगे टाईप बायांकडं आहे. दगड, काठ्या हल्ले ह्या घटना त्या बामण स्त्रीच्या क्षमतेपुढं अगदी किरकोळ. हे नीट स्ट्रक्चरली समजून येणं हे मी माझं माणूसपण क्लेम करण्याची पहिली पायरी समजतो! हे जर बेसिक क्लियर नसेल तर गळ्यात मडकं नसलं तरी मग मी गुलामचं. त्यांच्या बायनरी नॅरेटीव्हचा. त्यांच्या प्रागतिक नोंदवहीचं. त्या एका चेकलीस्टचा.

बाबासाहेबांच्या Annihilation of Castes चे अरुंधती रॉय ह्यांनी केलेल ॲप्रोप्रिएशन ह्या संदर्भात विश्लेषण करणारं पुस्तक ‘Hatred in the belly’

हे सगळं समजून घेत, स्वतःच्या आयुष्यात पुढं जात राहणं हे एवढचं आज लक्षात आलंय. बाबासाहेब म्हणतात तसं जगण्याच्या अमर्याद शक्यतांचा विचार करत. माझं असणं हे ब्राह्मणी व्यवस्थेनं घालून दिलेल्या व्याख्येच्याही पलीकडं आहे. माझं माणूस असणं हे बिग बँग पासून ते आजवर चालत आलेल्या जैव उत्क्रांतीच्या प्रोसेसचा भाग आहे. आणी हो, जेंव्हा बा भीमाच्या एका हाकेवर लादलेली महारकी सोडून बुद्धं..शरण..गच्छामि ह्या मुक्तीच्या आदिम प्रेरणेत पण माझ्या माणूसपणाचे जिवंत दाखले मला सतत वाट दाखवत राहतील अजूनही लर्निंग-अनलर्निंग चा प्रवास सातत्यानं चालूचं राहील. ह्या प्रागतिक लिबरल बाजारपेठेच्या क्रांत्या, परिवर्तनं, विद्रोह वगैरेचं ओझं वाहण्यात मला वेळही नाही आणि तितकी गुलामीही आता मेंदूत उरलेली नाही.

आणी हे सगळे ‘लादलेले’ लेअर्स बाजूला सारत शोषकवर्गाला अधोरेखित करण्याची हिंमत मला तुमच्या सगळ्यामुळेचं येत आलीय. गावाच्या वस्तीपासून ते फेसबुकच्या पोस्टीं पर्यंतच्या प्रत्येकामुळे. तुम्ही सगळीजण माझ्यासाठी सुपरहिरो पेक्षा कमी नाहीयत.

तुम्हा सगळयांना एक व्हर्च्युअल मिठी
आणी जय भीम! 🙂💙

गुणवंत सरपाते

लेखक मूळचे नांदेड येथील रहिवासी असून सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*