माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व

मानसी एन.

२०,२१ मार्च १९२०, माणगाव, संस्थान:कागल (सध्या हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे.)

“तुम्हाला भिमराव आंबेडकरांच्या रुपात तुमचा नेता मिळाला आहे!”
_ राजर्षी शाहू महाराज

२० मार्च१९२० रोजी माणगाव येथे झालेल्या परिषदेत आधुनिक महाराष्ट्राच्या समाजक्रांतीचे दोन जनक, क्रांतिबा जोतिबा फुल्यांचे वारसदार राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले होते. ही परिषद आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील ऐतिहासिक आणि क्रांतिकारी घटना आहे. कारण, या परिषदेपासून अस्पृश्यांना बाबासाहेबांच्या रुपाने खंदे नेतृत्व मिळाले.
२० मार्च १९२० रोजी माणगाव परिषदेत केलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या उद्बोधक भाषणातील काही अंश….,

ते म्हणतात,

“आज माझे प्रिय मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. त्यांच्या भाषणाचा लाभ मला मिळाला म्हणून मी शिकारीतून बुध्या येथे आलो आहे. मिस्टर आंबेडकर हे मूकनायक पत्र काढतात व सर्व मागासलेल्या जातींचा परामर्ष घेतात, याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
अस्पृश्य लोकांची हजेरी माफ करण्याची बुद्धी मला का झाली याचे कारण याप्रसंगी थोडक्यात सांगावे असे मला वाटते. हजेरी असल्यामुळे या गरीब लोकांवर गावकामगार व इतर अॉफिसर्सचा फारच जुलूम होत होता. म्हणजे गावात बारा आणे मजुरीचा दर असला तरी गैरहजेरीची भीती घालून त्या गरीब लोकांकडून अधिकारी लोक फुकट काम करुन घेत होते. फार झाले तर त्यांच्या पोटाला काहीतरी थोडे देत होते.

गुलामगिरीपेक्षा सुद्धा या विसाव्या शतकात अशी भयंकर गुलामगिरी चालली आहे!”


“ज्याचे प्रमाण हजारी एक सुद्धा नसून जे मागासलेल्यांना खुद्द क्षत्रियांना ( ज्यांनी याचा मोगलापासून बचाव केला व ज्यांचे पूर्वज राम कृष्ण सूर्यवंशी सोमवंशी क्षत्रीय हे ज्यांच्या देव्हाऱ्यावर आहेत त्यांना) सुद्धा शूद्र म्हणून गोमय काय विष्ठेपेक्षाही अस्पृश्य मानितात व स्पर्श झाला म्हणजे जे स्वतःची शुद्धी करुन घेतात, असे पुढारी काय कामाचे? पाश्चिमात्य देशांत अगर इतर कोणत्या देशात आपले पुढारी कोण कबूल करील?”

“पशुहून काय? गोमय किंवा विष्ठेहूनही कमी दर्जाचे आपल्या बंधू-भगिनींना व देशबांधवांना मानणाऱ्या लोकांनी पुढारी व्हावयाची इच्छा करणे कितीतरी बेशरमपणाची गोष्ट आहे? मला त्यावेळी मुखत्यारी मिळाली ज्यावेळी ब्राह्मणेत्तर एकही वकील अगर नोकर नव्हता, परंतु त्यांना वकिलीचे ज्ञानामृत पाजल्यापासून ते वाकबगार झाले आहेत. त्याचप्रमाणे अस्पृश्य मानिलेल्या लोकांनी नोकऱ्या व स्पेशल केस करुन वकिलीच्या सनदा दिल्या आहेत. यात ते इतर लोकांप्रमाणे वाकबगार होतील अशी उमेद आहे. मी लवकर सेल्फ गव्हर्नमेंट थोड्या प्रमाणावर देणार आहे.त्याचा फायदा सर्वांना व विशेषतः अस्पृश्य मानिलेल्यांनाही सारखा मिळावा म्हणून कम्युनल रिप्रेझेंटेशनही देणार आहे.”


“कित्येकजण म्हणतात की, राजकारणाचा व स्पृश्यास्पृश्यतेचा काय संबंध आहे? काही संबंध असल्यास आम्ही तसेच करू. पण मी म्हणतो, अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागविल्याशिवाय राजकारण कसे होणार? ज्यांना राजकारण करणे आहे, त्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे म्हणजे इतर देशांत वागवितात त्याप्रमाणे वागविले पाहिजे, आणि तसे वागविल्याशिवाय देशकार्य कसे होणार? आणि असे जो वागविल त्यानेच देशकार्य केले असे म्हणता येईल, इतरांना नाही.”


“हिंदुस्थानशिवाय इतर कोणत्याही देशांत मनुष्यात ‘जात’ नाही, परंतु दुर्दैवाने हिंदुस्थानात मात्र जातीभेद इतका तीव्र आहे की; मांजर,कुत्रे किंबहुना शेणापेक्षा देखील कमी अशा प्रमाणे आम्ही देशबांधवांस व भगिनींस वाढवितो व अजूनही आम्ही गैरशिस्त पुढारी करतो, म्हणून गरीब लोक अहमदाबाद, अमृतसर सारखे ठिकाणी व मागे मुंबईस झालेल्या दंग्यासारखे प्रसंगी बळी पडतात. तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हांस नको आहेत. कृतीने जातीभेद मोडून आम्हांस मनुष्याप्रमाणे वागवितील असे पाहिजेत.”


“म्हारा-मांगाच्या उद्धाराची ही चळवळ मी सुरु केली, म्हणून लोक मला म्हारडा राजा म्हणतात. त्याची मला फिकीर नाही. परंतु आता माझी काळजी मिटली आहे. आता यापुढे माझ्यावरची जबाबदारी आंबेडकर स्वीकारतील आणि हेच तुमचे तरुण पुढारी तुमची जबाबदारी पेलतील, अशी मला खात्री आहे. आंबेडकर ती जबाबदारी स्वीकारतीलच, पण एक वेळ अशी येईल का ते केवळ तुमचेच पुढारीपण करतील असे नव्हे,तर सबंध भारताचे पुढारीपण केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी माझ्या मनाची खात्री आहे.”


छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी माणगाव येथे २० मार्च रोजी भरलेल्या सभेत हे भाषण केले.
संदर्भ: माणगाव परिषद ६१वा स्मृति-महोत्सव विशेष अंक, दिनांक २० व २१ मार्च १९८२ संपादक: प्रा.‌रमेश ढावरे, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर उपसंपादक: डॉ. डी.टी. माने, विलास कांबळे


या परिषदेने काय साधले?…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रत्येक माणसाच्या मनात उत्सुकतेचे स्फुल्लिंग पेटवले गेले. बाबासाहेबांची ‘खूप शिकलेला तरुण, बॅरिस्टर, आपला नेता, आपला वाली, आपला पुढारी’ ही पहिली ओळख या परिषदेमुळे अस्पृश्य मानल्या गेलेल्या प्रत्येकाच्या मनात ठसली गेली. त्यांना पाहाण्याची, ऐकण्याची उत्सुकता लोकांमध्ये इतकी पराकोटीला पोहोचली होती की माणगाव परिषदेनंतर १९२० ते १९४२ या काळात रहिमतपूर,मसूर, कोल्हापूर, निपाणी, अथणी, मिरज या गावांमध्ये झालेल्या सभांसाठी शेकडो मैल पायपीट करून केवळ बाबासाहेबांना पाहाण्यासाठी खेडोपाड्यातली लोकं हजारोंच्या संख्येनं आली. त्यांना ऐकलं. आत्मभान, वेदना, विद्रोह आणि नकार तिथं जन्मला.आंबेडकरी चळवळीची बीजं या काळात रोवली गेली. परिवर्तनाच्या लढाईला सुरुवात झाली.

२०,२१ मार्च १९८२ ला माणगाव परिषदेच्या ६१ व्या स्मृतिमहोत्सवानिमित्त कोल्हापूर मध्ये एक विशेषांक काढण्यात आला होता. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. रमेश ढावरे सरांनी या विशेषांकाचे संपादन केले. माझे बाबा त्यावेळी एम्.ए करत होते. ढावरे सर माझ्या बाबांचे गुरु! घरातल्या पुस्तकांमध्ये हा जुना अंक बाबांनी विशेष जपला आहे. माणगाव परिषदेला प्रत्यक्ष हजर असणाऱ्या आणि १९८२ ला हयात असणाऱ्या काही व्यक्तींच्या मुलाखती या अंकात प्रकाशित केल्या गेल्या. देशभक्त रत्नापाण्णा कुंभार यांच्या सह अनेक ज्येष्ठ विचारवंतांनी आपल्या लिखाणातून माणगाव परिषदेचा परामर्ष घेतला आहे. या परिषदेसाठी राजर्षी शाहू महाराजांच्या पाठबळामुळे कोल्हापूर परिसरातील विशेषतः माणगाव, कागल या भागातील जैन, मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांनी अस्पृश्यविरोधी, जातीयवादी सवर्ण लोकांचा विरोध आणि रोष पत्करून केलेले सहकार्य उल्लेखनीय आहे. यासंदर्भातील अनेक विशेष नोंदी, काळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्तींची नावे, परिषदेपूर्वीच्या घडामोडींचे तपशील या अंकात प्रकाशित झालेल्या मुलाखतींमध्ये आहेत.
१९८२ साली या अंकाच्या रुपात इतक्या विस्तृत स्वरुपात माणगाव परिषदेच्या घडामोडींचे केलेले दस्तऎवजीकरण मला खूप मोलाचे वाटते.
त्याबद्दल विस्ताराने लिहावे लागेल.

आज माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे. यानिमित्ताने मागील घडामोडींचा बारकाईने विचार करणं आवश्यक आहे. काळासमोरची आव्हाने अधिकाधिक कठीण आहेत.
१९२० ते २०२० या शंभर वर्षांच्या काळात आंबेडकरी मूल्यांची निर्मिती, त्यांचे भरण-पोषण आणि आजची आव्हानं यांचा एकत्रित विचार करताना ‘माणगाव परिषद’ हा एक मैलाचा दगड आहे,जिथून एका मोठ्या क्रांतीची सुरुवात झाली होती. हे क्रांतीचे चक्र फिरते आहे. त्याला आवश्यक गती आणि योग्य दिशा आपल्याला द्यायची आहे.

टीप: या पोस्ट सोबत शेअर केलेले छायाचित्र प्रतिकात्मक आहे.

मानसी एन.

लेखिका कोल्हापूर येथील रहिवासी असून त्यांचं शिक्षण M.Sc.(Microbiology), M.A.(Political Science) असे आहे, तसेच त्या विविध सामाजिक प्रश्नांच्या स्वतंत्र अभ्यासक आहेत.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*