चिरेबंदी वाड्यात बहुजनांचा ‘मांगीर’

आनंद क्षीरसागर

“कोणतीही गोष्ट सांगताना सर्वात मोठा धोका हा एका पैलूने किंवा एकाच वैचारिक दृष्टीने ती गोष्ठ सांगण्यात असतो ”. –चमामांडा नगॉझी अडीचे , कृष्णवर्णीय आफ्रिकी नायजेरियन लेखिका

“जो पर्यंत सिंह बोलायला सुरवात करणार नाहीत तो पर्यंत सर्व जग हे फक्त शिकाऱ्याच्या धाडसीपणाचेच गुणगान करत राहील ”- आफ्रिकन स्वाहिली भाषेतील म्हण .

मानवी जग हे ‘गोष्टींवर’ चालते . गोष्टी ह्या समाजाचे असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष धागे असतात ज्यामुळे आपण एकतर एकमेकांना जोडले जातो किंवा एकमेकांपासून कायमचे दुरावतो . हे विषद करण्यामागे कारण असे की नुकताच आमच्या वाचनात महेश एलकुंचवारांचा १४ मार्च २०२१ च्या लोकसत्ता वृत्तपत्राच्या ‘विशेष ’ ह्या सदरातील ‘माझं नातं सार्वभौम जीवनाशी ‘ हा लेख वाचनात आला . हा लेख जेष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना ‘महाराष्ट्र फाऊंडेशन ’ चा ‘दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार ’ प्राप्त झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातील संपादित अंश आहे . सर्वप्रथम आम्ही महेशदांना ह्या पुरस्काराबद्दल मनापासून अभिनंदन करतो . तसेच त्यांच्या उत्तम आरोग्याची कामना देखील करतो .
परंतु आपल्या मनोगतामध्ये ज्या मुद्द्यांवर महेशदांनी आपले विचार प्रकट केले त्या विचारांबद्दल मात्र बहुजन कलाकार म्हणून आम्हाला काही प्रश्न पडतात आणि त्यांच्या काही मुद्द्यांशी आम्ही पूर्णपणे असहमत आहोत, हे आम्हाला इथे स्पष्टच सांगावेसे वाटते . कारण महेशदा ज्या विषयांवर आपले मनोगत व्यक्त करत आहेत, त्या विषयांवर बहुजन समाजातील नव्या दमाच्या तरुण कलाकार, विचारवंत , सामाजिक कार्यकर्त्यांची आणि लोकशिक्षकांची सहभागिता खूप महत्वाची आहे .त्यामुळे अश्या विषयांबद्दल आमची बाजू आम्ही स्पष्ट आणि निर्भीडपणे अधिक खोलात जाऊन मांडणे गरजेचे आहे. नाहीतर इथे एकाच दृष्टीमधून एखादा विचार समोर येण्याचा धोका तयार होऊ शकतो . यासाठी आम्ही हा लेख लिहिण्याचा प्रपंच करत आहोत.

आपल्या मनोगतामध्ये महेशदा असे म्हणतात की-” जरा थांबून लेखकाकडून आपल्यासुद्धा काय मागण्या आहेत , हे सामान्य वाचकाने ठरवायला पाहिजे “. त्यामुळे आम्ही आमच्या बाजूचे म्हणणे या लेखामध्ये मांडत आहोत. महेशदा म्हणतात की-” त्यांच्यासाठी लेखन ही कधीही ‘कारकीर्द’ नव्हती किंवा ‘करियर’ नव्हते . कारण अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट कारकीर्द होऊ शकत नाही . कारण तिथून आनंदापलीकडे तुम्हाला काहीच मिळवायचे नसते.”
हे खरेच आहे की कोणत्याही प्रवाही , चिंतनशील , प्रयोगशील व्यक्ती आणि लेखकाची ‘लेखन’ ही कधीही कारकीर्द होऊ शकत नाही. परंतु आपल्या लेखनातून त्याला फक्त आनंदप्राप्तीच होईल किंवा फक्त आनंदप्राप्ती होईल यासाठीच तो लेखणी आणि पानाचा मधुर सहवास घडवून आणतो हे मात्र माझ्यासारख्या अनेक तरुण बहुजन कलाकार , विचारशील व्यक्ती यांना पटत नाही . कारण आमच्यातील बऱ्याच लोकांना आज लेखक म्हणून कोणतीही ‘ कारकीर्द ’ किंवा ‘करियर ’ न घडवता लेखणी हाती घ्यावी लागत आहे . यामागे त्यातून आम्हाला आनंदप्राप्ती व्हावी हा उद्देश नक्कीच नसून या उलट आमच्या पिढीवर बदलत्या सामाजिक , राजकीय , आर्थिक , सांस्कृतिक , धार्मिक वातावरणात जो काही अन्याय , शोषण , दमन , भेदभाव , फसवणूक वाट्याला येत आहे ; त्याविरुद्ध आम्ही आमची लेखणी ‘शेवटचे हत्यार ’ म्हणून उचलली आहे .
महेशदा म्हणतात की -“ आजकाल भारतात कुठलीच बाजू न घेता सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल आपण आदर ठेवणं आता दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलेला आहे . तुम्हाला इथे बसाव लागत नाही तर तिथे बसाव लागत , अदर वाईस यु डोन्ट बिलॉन्ग ”.
आम्ही महेशदांना विचारतो , भारतात अनेक लोकांना ज्यात बहुजन समाजातील अनेक अगणित सर्वसामान्य व्यक्तींचा समावेश होतो कुठलीच बाजू न घेता सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल आदर ठेवायचा प्रयत्न करतात . परंतु त्यांच्या वाट्याला आपल्याच समाजातून अन्याय , अपमान , शोषण , अवहेलना , फसवणूकच येते . इथे बहुजन समाजातील व्यक्तींना महेशदा विषद करत असलेले ‘तुम्ही इथे बसा किंवा तिथे बसा , अदर वाईस यु डोन्ट बिलॉन्ग’ हा पर्यायच नाकारला जातो . इथे मात्र बहुजन समाजातील व्यक्तीच्या तोंडावर आपल्याच समाजाकडून पैसे , सत्ता , प्रतिष्ठा , सन्मान , संधी , सांस्कृतिक , वैचरिक अभिव्यक्ती यांचे दार बंद केले जाते . यातून बहुजन समाजातील व्यक्तींना समाजाकडून स्पष्टच सांगितले जाते की “You dont belong anywhere at all!”

महेशदा म्हणतात की – “मी कुठलाही आदर्शवाद (IDEOLOGY) कधी स्वीकारला नाही ; कारण निरनिराळ्या आयडियॉलॉजिस असतात . आदर्शवाद असतात . त्यांनी लोकांचे भले व्हावे यासाठीच त्या अत्यंत सद्हेतूने , विचारपूर्वक जन्माला घातलेल्या असतात . परंतु हळूहळू आपल्या असे लक्षात यायला सुरुवात होते की , त्या अपुऱ्या पडत आहेत . या विचारसरणींमुळे काही तात्कालिक प्रश्न सुटतात . काही काळापुरते सुटतात . ते जातात . नवीन प्रश्न येतात . आणि तोपर्यंत त्या विचारसरणीला हळूहळू एक बंदिस्तपणा येतो .कारण विचारसरणीसुद्धा ‘इन्स्टिट्यूशनलाईस ‘ ‘होतात . त्यांची पीठं होतात . आणि त्या पिठाचे जे कोणी अधिकारी असतात , ते तितकेच कडवे होतात . ‘ते आणि आपण ‘ असा विचार होऊ लागतो . एकात्मतेसाठी प्रयत्न करणारेच हळूहळू नकळत विभाजन करतात . मग तुम्हाला त्या अनुयायांमध्ये बसाव लागत किंवा मग तुम्हाला दुसरी कुठली विचारसरणी बरी वाटत असेल तर तिथे बसाव लागत.”
महेशदा , माझ्यासारखे तरुण बहुजन कलाकार नम्रपणे पण तितक्याच स्पष्ठपणे हे आपणास सांगू इच्छितात की , मानवी इतिहासामध्ये काही आदर्शवाद (IDEOLOGIES) लोकांचे भले व्हावे यासाठी सद्हेतूने विचारपूर्वक जन्माला घातलेले असतीलही ; परंतु ह्याचा अर्थ सर्व आदर्शवाद हे अशाच सद्हेतुक भावनेने जन्माला येतात अशी जर महेशदांची भूमिका असेल तर ती अतिशय चुकीची असेल . महेशदांची अशी भूमिका ज्या ज्यू , रोमा जिप्सी आई वडिलांनी आपली तान्ही मुले , आणि निरागस निष्पाप मुलामुलीनी आपले आई वडील आणि नातेवाईक ‘नाझी वंश श्रेष्ठत्व आदर्शवादामधून’ जन्माला आलेल्या माणसांना जाळणाऱ्या भट्यांमध्ये आणि गॅस चेंबरमध्ये गमावली आहे तसेच , ज्या काळ्या गुलामांना श्वेत वंश श्रेष्ठत्व आदर्शवादामधून पायाला दोन्ही बाजूने घोडे बांधून त्यांना विरुद्ध दिशेने पळवून त्या गुलामांच्या शरीराला मधून फाडून दोन तुकडे करून मारण्यात आले तसेच , ज्या साऊथ आफ्रिकेतील काळ्या लोकांना तेथील वंश श्रेष्ठत्वाच्या आदर्शवादामधुन जन्माला आलेली पोलीस यंत्रणा गळ्यात टायर घालून जाळून मारून टाकत होती , तसेच भारतामध्ये बहुजन समाजाला हजारो वर्षे शिक्षण , संपत्ती , सन्मान पासून वंचित ठेवते या वास्तवाबद्दल काय म्हणते हा आम्हाला प्रश्न पडतो .

मुळात एखादा आदर्शवाद जन्माला घालणे ही मानवी समाजातील प्रक्रिया प्रत्येक वेळी सद्हेतुक असेलच असे नाही . मुळात कोणताही आदर्शवाद जन्माला घालणे हे ‘सत्तेच्या समीकरणाचे मूळ ’ आहे . इथे हे देखील समजणे महत्वाचे आहे की WHITE SUPREMACY (श्वेत वंश वर्चस्ववाद ) किंवा भारतातील जाती श्रेष्ठत्वाचा वर्चस्ववाद ह्या कोणत्याही सद्हेतूने सर्वजणांच्या भल्यासाठी आणि कल्याण करण्याकरता जन्माला घातलेल्या विचारसरणी नाहीत . ह्या मुळातच समाजातीलच एका मानवी समूहाचे वर्चस्व समाजातील दुसऱ्या मानवी समूहावर व्हावे यासाठी तयार करण्यात आलेली वैचारिक सामाजिक , राजकीय ,सांस्कृतिक , आर्थिक व्यवस्था (INSTITUTION) आहेत . भारतात ह्या वर्चस्वाखाली चिरडून निघणारा समाज ‘बहुजन ’ आहे . अशा व्यवस्थांचे समर्थन करणारे वंशश्रेष्ठवववादी किंवा जातीव्यवस्था वर्चस्ववादी हा युक्तिवाद करतात की मुळात ह्या व्यवस्था व त्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत राहणारी विचारसरणी / आदर्शवाद मुळात सर्वांच्या भल्यासाठी , सद्हेतूने तयार करण्यात आला होता . परंतु नंतर मात्र त्यात बंदिस्तपणा आला आणि त्या विचारसरणीचे अन्यायी , अत्याचारी ‘INSTITUTIONALISATION ’ झाले .
महेशदा अश्याच प्रकारचे मत आपल्या मुलाखतीमध्ये मांडत आहेत का ? हा प्रश्न आम्हाला पडतो . हा विचारच मुळात BIASED असून अत्याचारी , दमनकारी व्यवस्था, त्यांची विचारसरणी व त्यांचे आदर्शवाद यांच्या समर्थनाचा बाजूने झुकलेले दिसून येते . महेशदा , आम्हाला आपल्याला हे स्पष्ठ् सांगायचे आहे की ; आम्ही भारतीय परिपेक्ष्यात ज्या सामाजिक , राजकीय , आर्थिक , सांस्कृतिक , वैचारिक जातीय बंदिस्थपणा असलेल्या विचारसरणी , आदर्शवादावर उभ्या असलेल्या व्यवस्थांशी लढत आहोत त्या सद्हेतूने कधीच जन्माला आलेल्या नसून त्या त्यांच्या जन्मजात स्वरूपामध्येच बंदिस्त , संकुचित , अन्यायी, शोषक व बहुजनविरोधी राहिलेल्या आहेत . आणि त्यांचे हे स्वरूप आजही मोठ्या प्रमाणात तसेच टिकलेले आहे . त्यामुळे त्यांचे हे मत आम्हाला चुकीचे आणि शोषणकारी व्यवस्थेचे केलेले केविलवाणे छुपे समर्थनच दिसून येते . महेशदांना वेळेनुसार बदलत जाऊन चांगल्या आंब्याचे खराब आंब्यामध्ये होणारे रूपांतर आणि पहिल्यापासून अळी , कीड लागलेल्या आंब्याचे अधिक किडत सडत जाणे ह्या सामान्य जीवनातील दोन प्रक्रियेमधला फरक कळत नसेल तर तो आम्हा तरुण बहुजन कलाकारांना नक्कीच कळतो .
आम्हाला हा फरक स्पष्टपणे दिसून येतो अथवा दिसून येऊ शकतो कारण आम्ही महेशदासारखे “मी कुठलाही आदर्शवाद स्वीकारलेला नाही “अशी निरपेक्ष भूमिका स्वीकारलेली नाही . खरे तर ह्या समाजच बहुजन कलाकार , विचारवंत , लेखक ह्यांना अशी निरपेक्ष भूमिका नाकारत आलेला आहे . ज्या समाज घटकांवर हजारो वर्षे अन्याय , भेदभाव , अत्याचार , अवहेलना डावललेपण वाट्याला आलेले आहे तो ‘निरपेक्ष ’ राहू शकत नाही . त्याला महेशदांसारखे समाजसमूह म्हणून सामाजिक , सांस्कृतिक म्हणून किंवा वैकेतीक सुद्धा निरपेक्ष राहणे शक्य नाही . त्यामुळे त्या समाज समूहाला आपल्यावर होत असलेल्या अन्याय , अत्याचार , शोषण याची स्पष्ट जाणिव करून घ्यावी लागते आणि त्याला ती तशी स्वतःच्या अनुभवांमधून होतही असते . त्यामुळे असा समाज घटक कोणती समाजव्यवस्था , विचारसरणी आदर्शवादी व्यवस्था ‘पहिल्यापासून शोषक ’ आहे आणि कोणती व्यवस्था ‘ कालांतराने शोषक’ होत जाते ह्यात फरक करू शकतो . अशा वेळेला असा शोषक व्यवस्थेच्या वरवंट्याखाली भरडून निघत असलेला शोषित समाज स्वतःच्या वैयक्तिक व समाजसमूह म्हणूनच्या मुक्तीसाठी एखादी वैचारिक बाजू ठामपणे उचलून धरतो जी अशा दमनकारी , शोषणकारी विचारसरणी आणि व्यवस्थांच्या विरुद्ध असते .
महेशदांना ह्या दोन विचारसरणींमध्ये फरक जाणवत नसला तरी आम्हा बहुजनांना ह्यामध्ये स्पष्ट फरक जाणवतो ; कारण ह्या दोन विचारसरणी , आदर्शवादातील फरक समजून घेणे हा आम्हा बहुजनांसाठी फक्त वैचारिक , बौद्धिक प्रक्रियेचा भाग नसून तो आमच्या स्वतःच्या अनुभवांमधून आणि सामाजिक जाणिवेमधून येणारे शहाणपण आहे . त्यामुळे अशा जिवंत जाणीव आणि नेणिवेतून बहुजन समाजास ‘शोषक कोण ’ आणि ‘शोषित कोण ’ याचे स्पष्ट विलगीकरण करणे गरजेचे असते आणि ते त्याने नक्की करावे असे आम्हाला स्पष्ट वाटते . कारण तो त्याचा ‘नैसर्गीक अधिकार ‘ आहे जो समाजच काय , निसर्ग देखील प्रत्येक व्यक्ती आणि समाजसमूहाला बहाल करतो . त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ‘ते आणि आपण ‘ ह्या द्विदलस्थितीमध्ये जर आज आमच्यासारखे बहुजन कलाकार , विचारवंत आणि व्यापक बहुजन समाज स्वतःला पाहत असेल तर ती आमची चूक नक्कीच नाही . उलट चूक ही आमच्या ह्या भूमिकेला व्यवस्थित न समजून घेता ‘COSMETIC’ , वरकरणी एकात्मवादासाठी (INTEGRATION) ह्या वास्तविकतेला न मानणारे आणि “आम्ही कोणताही आदर्शवाद मानत नाही ”अशा ‘बंदिस्त विचारसरणीमध्ये ” धन्यता मानणाऱ्यांची आहे असे आम्हाला प्रांजळपणे परंतु स्पष्टपणे वाटते . कोणत्या व्यक्तीस कोणत्या विचारांच्या अनुयायांमध्ये बसावे आणि कोणी कोणत्याच विचारांच्या अनुयायांमध्ये बसू नये हा भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकास ‘REASONABLE RESTRICTIONS’ (माफक बंधने) घालून दिलेला घटनात्मक अधिकार आहे . तो सर्व भारतीयांप्रमाणे महेशदांना देखील आहे . परंतु महेशदांना आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की ; ’एकात्मतेसाठी ’ प्रयत्न करणारेच नंतर विभाजन करतात ‘ हा युक्तिवाद जरी ठीक असला तरी ; सामाजिक एकात्मतेसाठी प्रयत्न करताना जे वास्तवात दिसून येणारे सामाजिक , राजकीय , आर्थिक , सांस्कृतिक , जीवनानुभवाचे , जातीय विभाजन भारताच्या प्रत्येक सामाजिक स्तरावर दिसून येते . त्याला नाकारणे किंवा दुर्लक्ष करणे हे योग्य ठरणार नाही . बहुजन समाजाने अशी घोडचूक अजिबात करू नये . समाजातील प्रस्थापित वर्ग आणि प्रस्थापित जातींच्या फायद्यासाठी त्यांच्या नजरेतून सामाजिक एकात्मता मिळवण्यासाठी अशा पद्धतीने घाईघाईनं समाजातील विषमतेवर माती टाकून त्याला झाकून टाकल्याने हा मूळ प्रश्न अधिकच चिघळत जाणार आहे आणि दिवसेंदिवस स्फोटक होणार आहे याची स्पष्ट जाणीव आम्हा बहुजनांना आहे . त्यामुळे अशा वेळेस कोणती विचारसरणी लाभदायक ठरेल याचा निर्णय बहुजनांनी त्या विचारसरणीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून करावा लागणार आहे . तिथे ‘मी कोणताच आदर्शवाद स्वीकारणार नाही ‘ परंतु समाजाच्या एकात्मतेसाठी प्रयत्नशील आणि संवेदनशील राहणार आहे, असा ‘ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे ‘ असा प्रकार कमीतकमी बहुजनांनी तरी करू नये असा आम्हाला वाटते .

महेशदा म्हणतात की “मी एखाद्या विचारसणीला घट्ट बांधून घेईन ही शक्यताच मला दिसून येत नाही . त्या बाबतीत मी ‘एकांडा ’ आहे . आणि मला कळपात राहायला शक्य नाही . कारण त्याच्यात राहिले तर त्याचे सर्व नियम पाळावे लागतात . आणि ते दरवेळेला बरोबरच असतील असे नाही . पुष्कळदा असे होते की , या विचारसरणींमध्ये साचलेपण येते . त्या पुढे सरकत नाहीत आणि त्यांच्यात कालानुरूप बदल होत नाहीत . पण हट्टाग्रह कायम राहतात . “
महेशदांचे हे म्हणणे वरकरणी योग्य वाटले तरी एक बहुजन कलाकार आणि विचारशील व्यक्ती म्हणून ते आम्हाला चुकीचे वाटते . याचे कारण असे की मानवी समाजात राहणारा कोणताही व्यक्ती एकाचवेळी ‘दुहेरी आयुष्य ‘ जगत असतो . तो ज्यावेळी सामाजिक व्यवस्थेचा भाग म्हणून आयुष्य जगत असतो ; त्याचवेळी तो एक वैयक्तिक एकांडी व्यक्ती म्हणून देखील आयुष्य जगत असतो . तसेच त्याच्या प्रत्येक वैयक्तिक आयुष्यातील क्षण हे मुळात आपल्या सामाजिक व्यवस्थेतून आणि आपल्या सामाजिक आयुष्याचे थेट परिणामस्वरूप जन्माला येत असतात . त्यामुळे महेशदा जेव्हा म्हणतात की मी कोणत्याही विचारसरणीशी स्वतःला घट्ट बांधून घेण्याची गरज शक्यताच दिसून येत नाही . त्या बाबतीत मी एकांडा आहे . कारण मला कळपात राहणे शक्य नाही ” . हा विचारच एकमेकांच्या विरुद्ध जातो असे आम्हाला वाटते . ज्या व्यक्तीच्या घरी महानगरपालिका वीज , पाणी , मलनिःस्सारणाची सुविधा पुरवते जी मुळातच एका विशिष्ठ सामाजिक , राजकीय , आर्थिक , विचारसरणीतून जन्माला येते ; ती व्यक्ती जेव्हा मी एकांगी असून कळपात राहणे मला शक्य नाही असे म्हणतो ; तेव्हा त्याचा हा विचार वास्तवात खरेच किती शक्य आहे हा प्रश्न देखील आम्हाला पडतो .

महेशदा पुढे असे देखील म्हणतात –“ विचारसरणी प्रत्येकवेळी बरोबर असतीलच असे नाही . पुष्कळदा असे होते की त्या विचारसरणीमध्ये साचलेपण येते आणि त्या पुढे सरकत नाहीत . त्यांच्यात कालानुरूप बदल होत नाहीत , पण हट्टाग्रह कायम राहतो” . महेशदांच्या या वाक्यावर विचार करता आम्हाला असे वाटते की ; भारतात आणि महाराष्ट्रात एक पूर्ण अशी कलाकार , विचारवंत , लेखक यांची पिढी आहे की जी कोणत्याही सामाजिक विचारसरणीला स्वतःला घट्ट बांधून घेईल असे मानत नाही . त्यांनी कोणत्या विचारसरणीला बांधून घ्यावे किंवा बांधून घेऊ नये हा त्यांचा वैचारिक मुद्दा आहे . त्यामुळे त्यात आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही . परंतु प्रत्येकवेळी कुठल्याच विचारसरणीला बांधून न घेणे हा विचार आपल्या विचारसरणीचा एक प्रकारचा ‘साचलेला हट्टाग्रहचं’ तर नाही का ? तो पुढे सरकून कालानुरूप काही बदल झालेला आहे की नाही ? ह्या मूलभूत भूमिकेतच बदल करायची गरज कालानुरूप तयार झाली आहे का ? ह्याची देखील परखड आत्मसमीक्षा होण्याची तातडीची गरज तयार झाली आहे असे आम्हा बहुजन समाजातील कलाकार , विचारवंत , लोकशिक्षक ह्यांना स्पष्ट वाटते .

महेशदा पुढे म्हणतात की ; “ज्ञानपरंपरेला काहीच चिकटत नाही . कारण ज्ञानपरंपरा हे मानव समूहाचे निखळ सुंदर आणि तेवतं काम असते . “इथे मात्र आम्ही महेशदांच्या मताशी पूर्णपणे असहमत आहोत . आम्हाला स्पष्ट वाटते की महेशदा इथे ‘ज्ञान ’, ज्ञानप्रक्रिया ’ आणि ज्ञानपरंपरा ’ या तीन महत्वपूर्ण संकल्पनांमध्ये खूप मोठी गल्लत करत आहेत . मुळात मानवी समूह हे सत्ता समीकरणावर चालणारी अजस्त्र यंत्रणा आहे . आपण हे कदाचित एकवेळ म्हणू शकतो की ‘ज्ञान ’ हे ‘धर्मनिरपेक्ष ’ किंवा ‘देवनिरपेक्ष ’ असू शकते ; परंतु ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया ज्यामध्ये कोण व्यक्ती , कोणता समाजसमूह ज्ञान निर्मिती करेल , ते ज्ञान कोणत्या प्रकारचे असेल , ते ज्ञान निर्मितीमध्ये कोणत्या समाजसमूहातील व्यक्तींचा वापर फक्त प्रयोगशाळांमधील माकड , ससे यांसारखा होणार आहे ई . घटकांचा समावेश होतो . त्यामुळे ज्ञान निर्मितीची प्रक्रिया अत्यंत ‘राजकीय’ (POLITICAL) असते. तसेच ‘ज्ञान परंपरा ’ ज्यामध्ये कोणत्या प्रकारे ज्ञानाचे वहन केले जाईल , त्यासाठी कोणत्या व्यक्ती व समाज समूहाला ज्ञानपरंपरा जोपासण्याचा अधिकार असेल आणि कोणत्या समाजघटकांना हा अधिकार डावलण्यात येईल , तसेच ज्ञानपरंपरेच्या व्यवहारातून कोणत्या समाजघटकाला अधिकार , नफा , प्रभुत्व , सत्ता , सन्मान , संधी मिळणार आहे आणि कोणत्या समाज घटकास डावलले जाणार आहे ई घटकांचा समावेश होतो . त्यामुळे ज्ञानप्रक्रिया , ज्ञानपरंपरा , कला निर्मिती या वरकरणी पाहता कितीही सुसंस्कृत , निरपेक्ष , पवित्र संकल्पना वाटल्या तरी त्यांच्यामध्ये समाजातील सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक , राजकीय , वैचारिक , शोषणाची बीजे आणि प्रतिबिंबे असतात . ह्याचे सर्वात चांगले उदाहरण भारतातील जातीव्यवस्था व त्या आधारित तयार झालेली अन्यायकारी शोषणकारी ‘बहुजन विरोधी’ ज्ञानप्रक्रिया आणि ज्ञान परंपरा आहे हे महेशदांच्या नजरेतून सुटले असेल तरी आमच्या सारख्या बहुजन कलाकार , विचारवंतांच्या नजरेतून बिलकुल सुटणार नाही . ज्ञानपरंपरा , ज्ञानप्रक्रिया हिंदू असो , मुस्लिम किंवा पाश्च्यात्य असो , तिच्यावर प्रेम असणे किंवा नसणे हा वैयक्तिक प्रेम , श्रद्धेचा विषय असू शकतो , परंतु ह्या सर्व ज्ञानप्रक्रिया व ज्ञान परंपरेच्या मुळाशी सत्ता , शोषण , दमनाचा इतिहास आणि व्यवहार ‘निरपेक्ष ’ असून त्याला काहीच चिकटत नाही असे खोटे बोलून समाजाची दिशाभूल आम्ही तरी करणार नाही . ज्यांना ती करायची असेल त्यांनी ती करावी.

महेशदा म्हणतात की –“ आपली मने शुद्ध असली तर कुठल्याही आदर्शवादाची गरजच काय ?” आम्हाला इथे स्पष्ट वाटते की , व्यक्ती आणि समाजाची मने कलुषित आणि दूषित होणे यासाठी समाजातील त्या कालखंडामध्ये आणि परिस्थितीमध्ये असणारी ‘विचारसरणी ’ आणि ‘आदर्शवाद ’ कारणीभूत असतो आणि त्याला जर दूर करून व्यक्ती म्हणून वैयक्तिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावरदेखील लोकांची मने शुद्ध करायची असतील तर पूर्वीची दूषित विचारसरणी आणि आदर्शवादाचा त्याग करून नवीन ‘विचारसरणीचा किंवा आदर्शवादाचाच ’ अवलंब करावा लागेल . हे तसेच आहे जसे जुन्या वस्त्रांचा त्याग करून ‘नवीन वस्त्रेच ’ परिधान करावी लागणे होय . फरक एवढाच आहे की ; नवीन विचारसरणीचा अवलंब करताना तिचा अतिरेक न होता तिच्या सम्यक स्वरूपाची परखड समीक्षा , टीका , आणि परिवर्तनासाठी सतत दरवाजे उघडे असणे गरजेचे आहे .
महेशदा असे देखील म्हणतात कि -“ एक लेखक म्हणून त्यांचे नाते ते “सार्वभौम जीवनाशी ‘जोडायचा प्रयत्न करतात . त्यामुळे लेखकाचे आपले स्वतःचे असे एक सत्य , एक जग आहे आणि ते स्वायत्त आहे , जे सार्वभौम जीवनाशी बांधील आहे . त्यामुळे ते थोडेसे वेगळे असू शकते “. महेशदांचे हे मत व्यक्तिस्वातंत्र्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या कोणत्याही नागरिकासारखे आम्ही देखील स्वीकारतो . त्यामुळे कोणत्याही लेखक व कलाकाराला त्याची स्वतःची ‘अभिव्यक्ती ’ आणि ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य ’ असते हे आम्ही देखील मान्य करतो . परंतु , ज्या नाटक , लेखन , अभिनय , चित्रपट अशा क्षेत्रांमध्ये महेशदांचा सार्वभौम जीवन जगण्यासाठी मुक्त संचार आहे ; तिथे आजही मोठ्या प्रमाणात बहुजन कलाकारांना महेशदांसारखा सार्वभौम जीवन जगण्याचा अधिकार डावलण्यात येत आहे . आणि जे बहुजन समाजातील कलाकार आपल्याला या क्षेत्रात काम करताना दिसत आहेत ; ते मोठ्या प्रमाणात ह्या क्षेत्रातील सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक , राजकीय व्यवस्थेच्या शोषणाचा बळी ठरत आहेत . आणि जे कोणी ठराविक बहुजन कलाकार आपण पाहत आहोत ते बोटांवर मोजण्याइतके अपवाद (EXCEPTION) आहेत . अशा व्यक्ती ‘COMMON NORM ’(सामान्य मानके ) नक्कीच नाहीत .
आमच्यासारखे बहुजन कलाकार , विचारवंत कोणत्याही कलाकाराचा , विचारवंताचा सार्वभौम जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचे समर्थन करणार नाही . कारण “माणसाचे माणूसपण ” हे त्याच्या सार्वभौम जीवन जगण्याच्या प्रक्रियेतूनच फुलते याची आम्हाला स्पष्ट जाणीव आहे . परंतु आम्ही इतरांचा जो अधिकार मानतो त्या अधिकारांपासून आम्हाला पिढ्यानपिढ्या वंचित ठेवण्यात येते आणि ते आजही कधी राजरोसपणे तर कधी छुप्या पद्धतीने होत आहे हे मात्र आम्हाला बिलकुल मान्य नाही . हे तर एखाद्या समाजसमूहाला श्वास घेण्यासाठी ‘प्राणवायू ’ घेण्याचा अधिकार मान्य करणे परंतु दुसऱ्या समाज समूहाला तो समान अधिकार नाकारण्यासारखे आहे . त्यामुळे अशा प्रकारचे भेदभाव , शोषण , दमण , सापत्न वागणूक आपणास दिसून येते तिथे खऱ्या अर्थाने सार्वभौम जीवन जगण्याचा अधिकार कोणत्याच समाजघटकास किंवा व्यक्तीस नसतो . आणि अशा विषम व्यवस्थेस जाब न विचारता त्याची मुळापासून शहानिशा न करता एखादा व्यक्ती अशा सार्वभौम जीवन जगण्यावर आपला हक्क सांगत असेल ; तर मग असा व्यक्ती एक तर अशा वास्तवाकडे सोयीस्करपणे ‘मूकसंमतीदार ’ आहे किंवा ‘ मुकसहभागी ’ तरी आहे असे आम्हाला स्पष्ट वाटते .
तसेही मोठमोठ्या चिरेबंदी वाड्यांच्या भिंतींमध्ये बहुजनांचा ‘मांगीर ’ बसवण्याची प्रथा आपल्या समाजात खूप जुनी आहे . ते आजही आपल्या समाजात कमी जास्त फरकाने छुप्यापद्धतीने होतच असते . फक्त त्याचा प्रकार आज बदलला आहे .परंतु आता मात्र बहुजनांचे हे मांगिर जिवंत होऊन अशा वाड्यांच्या चिराचिरांमधून आणि ह्या वाड्यांच्या भिंती फोडून बाहेर येत आहेत . आणि आपल्या भसाड्या आवाजात फेर धरून म्हणत आहेत ,-“ गुलामी, शोषण आणि विषमतेचे हे रक्ताळलेले वाडे आम्ही जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही .”

आनंद क्षीरसागर

लेखक M.Sc.(Microbiology), M.A.(Dev. studies TISS, Mumbai) असून नाट्य कलावंत आहेत, तसेच ते बहूरंग या बहुजन सांस्कृतिक मंचाचे संस्थापक आहेत, तसेच तुंबरु ह्या Hip-hop शी संबधित फोरम चे संस्थापक आहेत. ते बहुजनांच्या, आणि मुख्यतः ओबीसींच्या आर्थिक,सामाजिक, सांस्कतिक प्रश्नांवर काम करत आहेत.



1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*