राहुल पगारे
काय माहोल होता तो ! आमच्या बौद्धवाड्यात विहार सुद्धा नव्हतं. पंधरा वीस घरापैकी अर्धी घरं पत्राची तर अर्धी घरं पाचोटा टाकलेल्या ओसरीची होती. आणि या वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला.
आणि त्या निळ्या झेंड्याखाली अख्खा बौद्ध वाडा एकत्र येऊन बसायचा. थोड्या अंतरावर एक वाढलेलं पिपंळाचं झाड होतं. वाऱ्यानिशी त्याची पानं हालुन जणु पाऊस पडत असल्याचा रीदम ऐकवीत होता. दर गुरुवारी, दर पौर्णिमेला ही बैठक असायची. बैठकीत बुद्ध, भीम गीत म्हटली जायची फक्त. नागपुर दीक्षाभूमीवर कोणीतरी प्रत्येक वर्षी जायचं. तेव्हा गेल्यावर तिथुनच खुप साऱ्या छोट्या-मोठ्या शाहीर, गीतकार गायकांची भीम बुद्ध गीतांचे छापील पुस्तके आणत.
वाड्यातील बायां सगळ्या बिलकुल अडाणी होत्या. पण त्यांची मुलं जी आठवी दहावीला असतील त्यांच्या कडुन त्या गीतांचे बोल पाठ करुन घ्यायचे. आणि मग हे पाठ झालेलं गाणं सामुहिक म्हणायच्या. आठवी दहावीला तिथे शिके पर्यंत अशी कितीतरी गाणी म्हटली त्यांनी जी मला आजही युट्युबवरती ही सापडत नाही. कारण या रिसोर्सलेस कलाकारांच्या कृतीचं चळवळीचं साहित्य म्हणून डॉक्युमेंटशन झालंच नाही कधी.
वामन दादा, बोदाडे दादा यांचीच गाणी काही प्रमाणात ऐकायला मिळालीत त्यानंतर. टीव्ही एकाच्याही घरी नव्हता. आणि रात्री नऊ नंतर गावात चिडीचूप शांतता असत. हे रात्रीचे नऊ म्हणजे जसं काही मध्यरात्री असायची. निळ्या झेंड्याखाली एक पिवळा बल्ब आणि बाजुच्या मोडकळीस अवस्थेत आलेल्या घरांची एकमेकांवर, रस्तावर लांब लांब पडलेल्या सावल्या. गावच्या चारबाजुनी अंधार आणि आकाशात ताऱ्यांचा एक ठिगळ, आणि तो पौर्णिमेचा चंद्र. पिंपळाच्या पानांचा सळसळणारा तो आवाज आणि अशातच सगळं गाव झोपी असताना गावाच्या पल्याड कोपऱ्यात बसलेल्या वस्तीतुन शेतातुन, मजुरी करुन थकुन भागुन आलेल्या आयाबाया भीम राजा की जय, बुद्ध भगवान की जय म्हणत जेव्हा बुद्ध भीम गीताला सुरुवात करत तेव्हा त्या सामुदायिक गीताची पहिलीच ओळ अंगावर काटा फुलवीत होती. तो माहोल बनुन जायचा.
हे आमचं विद्यापीठ होतं. येथेच गाण्याच्या ओळीओळीत साठलेला बुद्ध भीम मिळाला. तेव्हा साहित्य नव्हतं, पुस्तक नव्हती, ना मिडिया, ना मला फार काही समज, पण एका कोपऱ्यात भिंतीला पाठ लावुन गप ऐकत बसायचो. पण साहित्याची कमी भरुन काढली, या गीतांनी, आमच्या आयाबायांनी. मोठ्या ताकदीने भीम आमच्यापर्यंत पोहचवला. हे गीतकार, शाहीर, गायक, आमच्या आयाबहीनी यांनी वाहीनी बनुन बुद्ध भीम मोडक्या तोडक्या कल्पनेने पण आमच्याच भाषेत आमच्या सबकॉन्शयस माईंड, सचेतन मेंदुत उतरवला ! आणि येथुन बुद्ध भीम हलनं, हलवनं शक्य नाही. खुप देणं लागतो आपण ज्ञात अज्ञात लोकांचं. ज्यांनी मेनस्ट्रीमला पर्याय शोधुन आपली अस्मिता, अस्तित्व रक्षकांना सदैव जिवंत ठेवलं !! आपली भीम नावाची मातृभूमी शाबुत ठेवली, पुढच्या पिढी साठी !
जय भीम
राहुल पगारे
लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Leave a Reply